' २० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’! – InMarathi

२० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

३५० गर्लफ्रेंड्स असो, ड्रग्सची सवय असो, सार्वजनिक ठिकाणी मारहाण असो, किंवा हत्यार लपवण्याबाबत टाडाखाली जेलची हवा खाल्लेली असो, अशा अनेक कॉंट्रोवर्सीमध्ये फसूनसुद्धा नरगिस – सुनील दत्त यांच्या लाडावलेल्या संजू म्हणजेच संजय दत्तला लोकांनी भरभरून प्रेम दिलं.

आज संजू जरी या सगळ्या कॉंट्रोवर्सीमधून बाहेर पडला असला तरी त्यामुळे त्याच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ट अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. अभिनेता म्हणून आणि खासकरून अॅक्शन सुपरस्टार म्हणून या ‘खलनायक’ला लोकांनी एकेकाळी डोक्यावर घेतलं होतं.

 

khalnayak inmarathi

 

संजूची अॅक्शन स्टार किंवा खलनायक ही इमेज बनण्यात सर्वात मोठा हात कुणाचा असेल तर तो महेश मांजरेकर यांचा! खरंतर वास्तव येण्याआधी संजूने बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

अगदी रॉकी, विधाता, थानेदार, सडक,सारख्या सिनेमांपासून साजन, दौड, हसीना मान जायेगीसारखे हलके फुलके सिनेमेसुद्धा संजूने केले आणि लोकांनी त्यांना पसंती दर्शवली.

एकंदरच लाडावलेला पोरगा म्हणून संजयची छबी तशी एवढी काही चांगली नव्हतीच, आणि त्याच दरम्यान एप्रिल १९९३ मध्ये मुंबई बॉम्ब ब्लास्ट संदर्भात संजय दत्तला अटक करण्यात आली आणि योगायोग असा की त्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्याचा सुभाष घाई दिग्दर्शित ‘खलनायक’ प्रदर्शित झाला.

लोकांनी सिनेमा डोक्यावर घेतला, पण या सिनेमानंतर आणि त्यादरम्यान घडलेल्या घटनांनंतर संजू हा रियल लाईफमध्येसुद्धा ‘खलनायक’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला.

 

sanjay dutt arrest inmarathi

 

वडील सुनील दत्त यांनी हिंदूहृदयसम्राट बाळसाहेबांकडे शब्द टाकला, संजू बाहेर आला पण त्याच्यावर ‘खलनायक’ हा ठपका लागला तो कायमचा. तो ठप्पा पुसण्यासाठी त्याने प्रयत्न केले, पण नंतर लगेच काही वर्षांनी महेश मांजरेकर यांनी वास्तव मधून संजूमधल्या ‘खलनायकाला’ नायक म्हणून पडद्यावर साकारलं आणि रघू भाई म्हणजे संजू आणि संजू म्हणजेच रघू भाई हे समीकरण जुळून आलं ते कायमचंच!

वास्तव हा संजय दत्तच्या दुसऱ्या इनिंगमधला सर्वात महत्वाचा मैलाचा दगड ठरला, मुंबईचा डॉन छोटा राजनच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे असं त्यावेळेस म्हंटलं जात होतं.

खासगी आणि व्यावसायिक अडचणींच्या काचाट्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या संजय दत्तला महेश मांजरेकर यांनी ‘वास्तव’ दिला आणि तिथून संजय दत्त हे वादळ पुन्हा इंडस्ट्रीत घोंगावू लागलं, जे अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये.

vaastav inmarathi

 

१९९५ साली जेव्हा शाहरुखच्या DDLJ ने साऱ्या देशवासियांवर गारुड केलं होतं तेव्हाच महेश मांजरेकरच्या ‘आई’ या सिनेमाने त्यांना ओळख मिळवून दिली होती. याच सिनेमामुळे महेश मांजरेकर यांना त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपट ‘निदान’ची संधी मिळाली.

निदानमुळे महेश यांच्या मित्राने संजय दत्तशी ओळख करून दिली, पण दुर्दैवाने महेश यांचा मित्र स्वर्गवासी झाला, नंतर बराच काळ गॅप पडला आणि एका डबिंगदरम्यान संजय दत्त आणि महेश मांजरेकर पुन्हा समोरासमोर आले, आणि तिथे महेश मांजरेकर यांनी वास्तवची स्क्रिप्ट ऐकणार का? अशी विचारणा संजूकडे केली.

मुळात संजय दत्त तेव्हा स्टार असल्याने त्याच्यात एक उर्मटपणा होताच, संजयची प्रतिक्रिया बघून महेश यांनी शक्कल लढवली, ते म्हणाले की “स्क्रिप्ट तुमच्या मॅनेजरला ऐकवतो त्याला आवडली तर आपण पुढे जाऊ.”

यावर संजू म्हणाला की मॅनेजर कशाला ऐकल स्क्रिप्ट, आता महेश एका वेगळ्याच धर्मसंकटात पडले. यावर संजूने त्यांना पुढच्या काही दिवसात सेटवर येऊन भेटण्यासाठी वेळ दिली.

 

mahesh manjrekar with sanjay dutt inmarathi

 

जी वेळ दिलेली त्या दिवशी संध्याकाळी महेश मांजरेकर एका हॉटेलमध्ये गेले, त्यांनी २ पेग मागवले, हॉटेलच्या वेटरकडून त्यांनी नोटपॅड आणि पेन घेतलं आणि धडाधड वास्तवचे २२ सीन्स लिहून काढले.

ते झाल्यावर त्यांनी थेट स्टुडिओ गाठला आणि संजय दत्त समोरच बसला होता, महेश यांना बघताच त्याने विचारणा केली की “किती वेळ लागेल?” संजूचा एकंदर आविर्भाव बघता पहिल्या १० मिनिटांत संजूला स्क्रिप्ट आवडली नाही तर तो काम करणार नाही अशी खात्री महेश यांना होतीच.

म्हणूनच त्यांनी लिहून ठेवलेले सीन्स संजूला ऐकवायला सुरुवात केली आणि खरंच पुढच्या १० मिनिटांत संजू पूर्णपणे त्या कथेत गुरफटला होता, स्क्रिप्ट ऐकल्या ऐकल्या त्याने लगेच होकार दिला आणि मुंबई अन्डरवर्ल्डचं विश्व रेखाटणारा पहिला हिंदी सिनेमा पडद्यावर आला तो म्हणजे ‘वास्तव’!

 

vaastav 2 inmarathi

 

गुन्हेगारी विश्वावर बेतलेला असा सिनेमा तोवर हिंदीत निर्माण झालेलाच नव्हता त्यामुळे वास्तवने वेगळेच रेकॉर्ड सेट केले. संजय दत्त, शिवाजी साटम, रीमा लागू, मोहनिष बहल, संजय नार्वेकर, आशीष विद्यार्थी, मोहन जोशी, परेश रावल, नम्रता शिरोडकर अशी तगडी स्टारकास्ट असूनही या सिनेमाला समीक्षकांनी निगेटिव्ह रेटिंग दिलं.

समीक्षकांनी निगेटिव्ह रेटिंग देऊनसुद्धा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान चालला आणि समीक्षक नेहमीच योग्य परीक्षण करतात या गोष्टीला वास्तवने प्रथमच छेद दिला.

वास्तवचं अफाट यश बघता महेश मांजरेकर यांनी वास्तवचा सिक्वल काढायचा निर्णय घेतला, रघू दीक्षितचा मुलगा रोहित याच्यावर फोकस करणारा ‘हत्यार’ हा सिनेमा महेश मांजरेकर यांनी काढला पण वास्तवसारखं यश मिळवण्यात हा सिनेमा पुरताच अयशस्वी ठरला.

 

hathyar inmarathi

 

वास्तवआधी संजय दत्तला बऱ्याच पुरस्कारांसाठी नामांकन मिळाली होती, पण संजय दत्तला पहिला उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार वास्तवने मिळवून दिला.

वास्तव लोकांच्या सर्वात जास्त लक्षात राहिला ते त्याच्या सुन्न करणाऱ्या क्लायमॅक्समुळे! गुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि तिला आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन खरंच आजही अंगावर येणारा आहे.

लोकांना आश्चर्य वाटेल पण हा संपूर्ण सीन एका टेकमध्ये फायनल झाला आहे.

या सिनेमाने आपला सांगळ्यांचा लाडका देड फुटीया म्हणजेच संजय नार्वेकरला वेगळी ओळख मिळवून दिलीच शिवाय, भारत जाधव, सतीश राजवाडे, उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरे असे कित्येक मराठमोळे चेहऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली.

 

sanjay narvekar inmarathi

 

आज हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी नावं फार कमी उरली आहेत, किंवा नाहीच म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. पण एकेकाळी बॉलिवूडच्या या खलनायकाला जेलची हवा खाऊन आल्यानंतर सर्वात मोठा ब्रेक देणाऱ्या महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’चे उपकार संजय दत्त कधीच फेडू शकणार नाही हे नक्की!

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?