' महाराष्ट्रातील सत्ता-नाट्यातून सामान्य मराठी माणसाने शिकण्यासारखे ५ धडे! – InMarathi

महाराष्ट्रातील सत्ता-नाट्यातून सामान्य मराठी माणसाने शिकण्यासारखे ५ धडे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

झालं, एकदाचा आठवडाभर चाललेल्या सत्ता-नाट्याला पूर्णविराम लागला. कित्येकांना अतीव आनंद झालाय, तर कित्येकांना अतीव दुःख. काही लोकं जल्लोष करतायत, तर काही शोक करतायत. काही लोकं मिम्स शेअर करतायत तर काही भावनिक होऊन व्यक्त होतायत.

जरा आपण आता या सगळ्याच्या बाहेर येऊन तटस्थपणे बघायला कधी शिकणार? टोकाच्या प्रतिक्रिया देणं आपण कधी टाळणार? या सगळ्या थरारक वेब सिरीजमधून आपण काय धडा घेणार?

 

eknath shinde uddhav im

 

हे आज ना उद्या होणार होतं, ते मुख्यमंत्री किंवा राजकारणी कधीच नव्हते, एक सज्जन मुख्यमंत्री आपण गमावला वगैरे वगैरे सगळी स्तुतीसुमनं आपण ऐकली, एवढंच काय तर विरोधी पक्षाच्या गोटात पेढे वाटप सुरू झालं.

वैयक्तिक मत विचाराल तर माझ्यामते दोन्ही गोष्टी म्हंटल्या तर चूक म्हंटल्या तर त्यांच्या जागी त्या बरोबर आहे. पण आज एक सामान्य माणूस काय म्हणतोय याकडे लक्ष कुणीच देत नाहीये!

सगळे टोकाच्या बातम्या आणि भूमिका मांडतायत. पण “२०१९ चा जनतेचा कौल मोडला नसता तर ही वेळ आली नसती” ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे याकडे कुणीच लक्ष देत नाहीये.

मी तर म्हणतो आपण त्याहीपलीकडे जाऊन विचार करूया. जनतेचा कौल, सत्तापालट हे होत राहणार, आज हे आहेत उद्या आणखीन कुणी येऊन बसतील. या सगळ्यातुन आपण काही बोध घ्यायचा की पुढचं पाठ मागचं सरसपाट ठेवायचं?

 

uddhav and fadanvis IM

 

काल जे घडलं त्यातून पहिली गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी अशी की जनतेचा कौल वगैरे सगळ्या भाकडकथा आहेत, या सगळ्या गोष्टी दाखवायला आहेत. आज यांनी तुमचा कौल मोडला उद्या दुसरा पक्ष कौल मोडणार नाही हे असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे हा पक्ष कौल पाळणारा आहे अशा संभ्रमात असाल तर वेळीच त्यातून बाहेर पडा.

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द ही तशी फार मोठी नव्हती. पण या एकंदर कारकिर्दीतुन आपण दुसरा धडा घ्यायचा तो म्हणजे “जेनुं काम तेनुं ठाय, बिजा करे सो गोता खाय!”

खुद्द मुख्यमंत्री स्वतः शेवटच्या लाईव्हमध्ये म्हणाले की या वाटेला कधीच यायचं नव्हतं. हीच जाणीव आधी झाली असती तर नक्कीच आज स्वतःचं आणि पर्यायाने स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या शिवसेनेचं हसं झालं नसतं. आज खरंच वाईट वाटतंय. ज्या पद्धतीने हे सगळं झालं ते सगळं व्हायला नको हवं होतं.

 

balasaheb shivsena IM

 

यातुन तिसरा धडा काय घ्याल तर तो म्हणजे “मित्र मित्र म्हणून तुम्ही ज्यांना गोंजारता ते तुमच्या पार्श्वभागावर चित्र काढायलासुदधा पुढे मागे बघत नाहीत.” आज एवढं होऊनही शिवसेनेचे प्रवक्ते अक्षरशः तोंडाला येईल ते बरळत होते आणि एक पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी यांचा त्यांच्यावर काहीच वचक नव्हता ही गोष्टच या सगळ्याला कारणीभूत ठरली.

मुख्यमंत्री जाता जाता लाईव्ह मध्ये बोलून गेले “जे विरोधात होते असं भासवलं जात होतं तेच पाठीशी उभे राहिले.” पण उद्धवजी याच पाठीशी असलेल्या लोकांमुळे तुमची ही अवस्था झालीये ही सत्यपरिस्थिती तुम्हाला माहीत नाहीये की तुम्ही उगाच वेड घेउन पेडवागला जाताय हे तुमचं तुम्हालाच ठाऊक. आणि तसं असेल तर एकाअर्थी जे झालं ते बरंच झालं!

यातून पुढचा धडा असा घ्यायचा तो म्हणजे “बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती!” नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी लाईव्हची सुरुवात “ओ लाल मेरी” स्टाईलमध्ये केली.

अहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं? बाकी काही नाही शिकलं तरी चालेल पण ही गोष्ट या सगळ्यातुन नक्कीच शिकायला हवी!

 

sambhaji nagar IM

 

बरं या सगळ्यातुन निष्पन्न काय होणारे तर काही नाही. आपल्या आयुष्यात काही बदल घडणारे का तर नाही. ही नौटंकी अजून काही दिवस बघायला मिळेल सरकार बदलेल नवीन सरकारचे नवीन डोम्बारयाचे खेळ सुरू होतील. नंतर तेही सरकार पडेल. वाजपेयी यांच्या भाषणाप्रमाणे हा खेळ चालतच राहणार आहे पण या देशाच लोकतंत्र अबाधित राहिलं पाहिजे, आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या हातात आहे.

या सगळ्यातुन एक सुजाण, जवाबदार नागरिक म्हणून आपण २ धडे घ्यायचे. राजकारण म्हणजे काय? आपल्याला काय त्याचं? हा attitude आपण बाजूला ठेवून यावर विचार करायला सुरुवात करायची, खासकरुन मतदानाच्या दिवसाची सुट्टी एन्जॉय करणाऱ्या लोकांनी तर यातून पहिले हा बोध घ्यायला हवा.

दुसरी गोष्ट म्हणजे यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाने जनता जनार्दनला गृहीत धरता कामा नये यासाठी आपणच आपल्यात बदल घडवायला हवेत. सुरुवात आपल्यापासून करावी लागेल.

शाळेत असताना आपण इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित सगळ्यात लक्ष घालतो पण एक विषय आहे ज्याला आपल्या शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा जास्त महत्व दिलं जात नाही तो म्हणजे नागरिकशास्त्र.

 

civics IM

 

आज याच विषयाचा सखोल अभ्यास करण्याची आणि त्यातल्या गोष्टी अंगवळणी आणायची गरज आहे, सत्ताधाऱ्यांना आणि हो आपल्यालासुद्धा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?