' सिनेमॅटिक लिबर्टी की सत्य: कामाठीपुराच्या गंगूबाईला भन्साळी यांनी योग्य न्याय दिलाय का? – InMarathi

सिनेमॅटिक लिबर्टी की सत्य: कामाठीपुराच्या गंगूबाईला भन्साळी यांनी योग्य न्याय दिलाय का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

“गंगू यहाँ हिरॉईन बनने आयी थी, लेकिन पुरा सिनेमा बनके रेह गयी” सिनेमाच्या शेवटी येणाऱ्या या डायलॉगमध्येच सिनेमाची सगळी गोष्ट सामावली आहे आणि संजय लीला भन्साळी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की वाद कितीही निर्माण झाले तरी सिनेमावरचं लोकांचं प्रेम कमी होता कामा नये.

गंगूबाई काठियावाडी या सिनेमाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, काही समीक्षकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे तर काहींनी पोटभर शिव्या घातल्या आहेत, पण खरं बघायला गेलं तर हा सिनेमा तेवढाही वाईट नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेमा हा हुसैन झैदी यांच्या  पुस्तकावर बेतला असला तरी त्यामध्ये किती खरं आणि किती cinematic liberty घेऊन गोष्ट दाखवली आहे हे बाजूला ठेवून आपण याकडे एक सिनेमा म्हणूनच बघूया आणि त्याच्या चांगल्या आणि कमकुवत बाजूविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात.

 

gangubai kathiawadi IM

 

संजय लीला भन्साळी यांच्या बाबतीत एक वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे ते म्हणजे “You can love him, you can hate him, but you cannot ignore him”!

अगदी देवदासपासून गंगूबाईपर्यंत भन्साळी यांच्या प्रत्येक सिनेमाच्या आधी वाद निर्माण होणं ही खूप साहजिक गोष्ट आहे, पण कितीही वाद झाला तरी भन्साळी प्रेक्षकांना आपल्या सिनेमाची दखल घ्यायला भाग पाडतात हेदेखील तितकंच सत्य आहे.

उत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि डोळ्याचं पारणं फिटेल असे सेट आणि लाजवाब सिनेमॅटोग्राफी यामुळेच कित्येक वाद निर्माण होऊनसुद्धा गंगूबाई काठियावाडीसाठी थिएटरमध्ये तेवढीच गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल!

या सिनेमातलं कथानक फारसं नवं नाही, या कथानकावर बेतलेले कित्येक सिनेमे आपण आजवर पाहिले आहेत, पण भन्साळी टच असलेला गंगूबाई मात्र यामध्ये सरस ठरतो हे मात्र नक्की.

 

bhansali gangubai IM

 

तेव्हाची मुंबई, कामाठीपुराचा परिसर हे सगळं इतकं ग्रँड पद्धतीने आपल्यासमोर साकारलं आहे की आपण त्या दुनियेत अक्षरशः खेचलो जातो. सिनेमा, कथा कोणतीही असो भन्साळी यांच्या सिनेमातली प्रत्येक फ्रेम थांबून पॉज करून बघत बसावी अशीच असते!

गंगा, गंगू आणि गंगूबाई अशा तीन टप्प्यात उलगडणारी ही कथा तशी सामान्यच आहे, पण ते चित्रण ज्या पद्धतीने केलं आहे त्यासाठी भन्साळी यांची तारीफ करावी तितकी कमीच आहे.

भन्साळी यांच्या सिनेमातला आणखीन एक प्लस पॉइंट असतो तो म्हणजे त्यातलं संगीत आणि संवाद. राम-लीला, देवदास किंवा हम दिल दे चुके सनमप्रमाणे गंगूबाई काठियावाडीमध्ये तुम्हाला संगीत तसं फारसं बघायला मिळणार नाही, पण जी गाणी आहेत ती योग्य ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे सिनेमाची मजा कमी होत नाही.

 

aalia in gangubai IM

 

संवादांच्या बाबतीत मात्र हा सिनेमा तुमचं पुरेपूर मनोरंजन करतो आणि विचार करायलादेखील भाग पाडतो. गंगूबाई, रहीम लाला यांच्या तोंडी दिलेले संवाद तुमच्या मनात घर करतात आणि त्यामुळेच सिनेमा बघण्याचा आनंद द्विगुणित होतो.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आलिया भट हिने तिच्याकडून पूर्ण मन लावून प्रयत्न केला आहे आणि काही काही सीन्समध्ये तिने खरंच लोकांची मनं जिंकली आहेत, पण तरी त्या पात्रात जी मॅच्युरिटी हवी ती आलियाच्या चेहऱ्यावर दिसत नसल्याने काही सीन्स मात्र पुरतेच फसले आहेत.

आलियाचा हा performance कोणाला पसंत पडेल कोणाला नाही, पण तिच्या या प्रयत्नांना आपण दाद द्यायलाच हवी. अजय देवगणने साकारलेल्या रहीम लाला आणि त्याचे जबरदस्त डायलॉग सिनेमात एक वेगळीच जान आणतात.

 

alia and ajay IM

 

अजयचा स्क्रीन प्रेझेंस आणि त्याची नजर इतकीच पुरेशी असते प्रेक्षकांवर पकड घेण्यासाठी, आणि या सिनेमातसुद्धा अगदी तसंच घडतान आपल्याला दिसतं!

विजय राज या माणसाने मात्र सिनेमात आलियासकट सगळ्यांना खाऊन टाकलं आहे. रजिया नावाच्या किन्नरची भूमिका विजय यांनी ज्या perfection ने निभावली आहे ते पाहून खरंच डोळ्याचं पारणं फिटतं!

लाजवाब बेअरिंग, अफलातून डायलॉग डिलिव्हरी आणि हादरवून टाकणारा स्क्रीन प्रेझेंस यामुळेच विजय राजचं पात्र लक्षात राहतं. त्या एका सीनमधून विजय यांनी सिद्ध केलंय की सिनेमा कितीही मोठा असला तरी त्यांच्यासारखे हरहुन्नरी कलाकारच सिनेमाला चार चाँद लावू शकतात!

vijay raaz IM 2

 

बाकी सीमा पाहवा, छाया कदम, शंतनू महेश्वरी आणि जीम सार्भ यांची कामंसुद्धा चोख झाली आहे. या झाल्या सिनेमाच्या चांगल्या गोष्टी आता सिनेमातल्या काही कमकुवत बाजूवर प्रकाश टाकुयात!

सिनेमाचा फर्स्ट हाल्फ जेवढा उत्तमरित्या बांधला आहे, तेवढाच सिनेमाचा उत्तरार्ध हा थोडा खेचल्यासारखा वाटतो, गंगा ते गंगूबाई हा प्रवास खूप प्रभावीपणे मांडला आहे पण त्यानंतर गंगूबाईचा राजकीय प्रवास हा खूपच आटोपशीर घेतला आहे.

शिवाय या सिनेमाच्या माध्यमातून वैश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी हा मुद्दासुद्धा खटकणारा वाटतो, गंगूबाई यांनी त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे ही मागणी केलेली असली तरी सिनेमाच्या शेवटी येणारा हा मुद्दा थोडा खटकतो!

 

gangubai 3 IM

 

समाजात प्रत्येकाला सन्मानाने राहायचा अधिकार आहे, पण सरसकट एखाद्या हिडीस प्रवृत्तीला कायदेशीर मान्यता देणं हे योग्य नव्हे. वैश्या व्यवसाय हा खरंतर हजारो वर्षांपासून सुरू आहे, पण त्याला कायदेशीर मान्यता दिली तर त्यात समाजाचंच नुकसान आहे हे ध्यानात ठेवलं पाहिजे, नाहीतर भारताची अवस्था इतर पाश्चिमात्य देशासारखी व्हायला वेळ लागायचा नाही!

या काही गोष्टी सोडल्या तर सिनेमा चांगला आहे, असं वेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.

अर्थात यात किती लिबर्टी घेतली आहे आणि किती सत्य मांडलं आहे ते भन्साळी यांनाच ठाऊक पण, एक कलाकृति म्हणून गंगूबाई हा सिनेमा एकदा नक्कीच बघायला हरकत नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?