आपला इतिहास सोडून मुघलांचं गुणगान का? बॉलिवूडचे धिंडवडे काढणारा परखड लेख
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
गेल्याच वर्षी सर्वात वादग्रस्त गोष्टीवर पडदा पडला, ती गोष्ट म्हणजे भव्य राम मंदिराचे निर्माण! खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी तिथे जाऊन भूमी-पूजन करून वर्षानुवर्षे आणखीन चिघळत जाणाऱ्या मुद्द्यावर पडदा पडला.
ज्या बाबरी मशिदीवर सध्या भव्य राम मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे ती उभरणाऱ्या सर्वात क्रूर शासक अशा बाबरची महिमा मंडन करणारी वेबसिरीज नुकतीच हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
The Empire या नावाने येऊ घातलेली ही सिरिज Empire of the Mughal या इंग्रजी नॉवेलवर आधारीत असून Alex Rutherford या लेखकाने ६ वेगवेगळ्या भागात हे पुस्तक लिहिले आहे.
जेव्हा या सिरिजचा टीजर रिलीज झाला तेव्हापासून याबद्दल चर्चा सुरू झाली, काहींनी या सिरिजची तुलना थेट गेम ऑफ थ्रोन्सशी केली, एकंदरच सिरिजची प्रोडक्शन व्हॅल्यू पाहता सिरिज भव्यदिव्य आहेच. पण या सिरिजच्या कथेवरून बराच गदारोळ माजला आहे, जो एका अर्थी योग्यदेखील आहे.
सिरिजचा फटका हॉटस्टारलाही बसला आहे. #uninstalldisney+hotstar हा हॅशटॅग ट्रेंड होतोय, जी गोष्ट तांडवच्या बाबतीत झाली तीच आता या सिरिजच्या बाबतीत घडत आहे. बाबरचा उदोउदो करणाऱ्या या सिरिजमुळे हॉटस्टारच्या बिझनेसवरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ज्या बाबरविषयी देशातल्या प्रत्येकाला माहीत आहे, ज्या देशात कित्येक वर्षांपासून शालेय पाठ्यपुस्तकातून मुघलांचा इतिहास शिकवला गेला आहे, ज्या बाबरने हिंदुस्तानची विटंबना केली, त्याच बाबरविषयी २१ व्या शतकात सिरिज काढायची काय गरज आहे?
बरं या बाबरविषयी योग्य माहिती दाखवली असेल तर ठीक पण त्याच बाबरला संपूर्ण सिरिजमध्ये व्हाईट वॉश करून त्याच्याविषयी फक्त चांगल्या गोष्टीच दाखवल्या असतील तर ते चुकीचं आहे, आणि नेमकी हीच गोष्ट या सिरिजमध्ये आपल्याला बघायला मिळते.
बाबरचं बालपण, त्या काळात त्याच्यावर आलेली संकटं, मुघल साम्राज्यासाठी त्याने केलेली चांगली कामं, बाबरने लढलेली युद्धं हे सगळं दाखवताना ही सिरिज बाबर आणि त्यांच्या कुटुंबातल्या नाट्यात इतकी गुरफटून जाते की इतिहास आणि कल्पना याचा कुठेही तुम्हाला संबंध लागत नाही.
–
हे ही वाचा – नक्की कोणत्या अंधश्रद्धेतून बाबरचा मृत्यू झाला? एक न उलगडलेल रहस्य!
–
शिवाय बाबरने हिंदुस्तानात येऊन जो हिंसाचार केला, हिंदूंवर जे आक्रमण केलं, मंदिरांची विटंबना केली, हिंदू संस्कृती भ्रष्ट करण्याचा जो प्रयत्न केला, स्त्रीयांची अब्रू लुटली या सगळ्याविषयी या सिरिजमध्ये अवाक्षरदेखील काढलेले नाही.
उलट या सिरिजमध्ये बाबरला हिंदुस्तानवर आक्रमण करून खूप पश्चात्ताप झाल्याचं दाखवलं आहे. या सिरिजमधला बाबर हा कायम अपराधीपणाच्या भावनेने ग्रसीत आहे. आणि हेच कुठेतरी पचवणं जड जातं त्यामुळेच ही सिरिज आपल्यावर म्हणावा तसा प्रभाव पाडू शकत नाही.
मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या कुणाल कपूर कुठल्याही अंगाने बाबर म्हणून अजिबात शोभत नाही, त्याची डायलॉग डिलिव्हरीतर खूपच गंडलेली आहे. दिनो मोरिया याने साकारलेलं पात्र थोडा वेळ बरं वाटतं, पण नेहमीप्रमाणे त्या पात्रालाही सिरिजमध्ये स्टीरियोटाइप करूनच दाखवलं आहे.
शबाना आजमी यांनी साकारलेली बेगम म्हणजेच बाबरच्या आजीचं पात्रदेखील फार बेगडी वाटतं. अप्रतिम स्पेशल इफेक्टस, युद्धाचं चित्रण, आणि भव्यदिव्य सेट्स हे वगळता अभिनय कथा यापैकी कशातच आपल्याला रुचि वाटत नाही.
शिवाय हे सगळं सोडलं तर माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या विदेशी आक्रमणकर्त्यांनी आपल्या संस्कृतीची, आपल्या वास्तूंची विटंबना केली, ज्यांनी आपल्या स्त्रियांवर लहान मुलांवर अत्याचार केले, ज्यांनी आपल्या इतिहासाची मोडतोड केली अशा लोकांचा इतिहास आपल्याकडेच का गलोरीफाय करायचा?
बाबरने त्याच्या साम्राज्यात भले कितीही चांगली कामं केली असतील, पण जेव्हा तो हिंदुस्तानात आला तेव्हा तो काय शांतीदूत बनून नाहीच आला! मग या अशा क्रूर लोकांना हीरो बनवून आपल्याच देशात त्यांच्या शौर्याचे गोडवे का गायले जातात?
बॉलिवूडमध्ये हा प्रकार आजच होतोय असं नाही, याआधीही मुघलांचे गोडवे गाणारे कित्येक सिनेमे आले आहेत. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबरपासून नुकत्याच आलेल्या पानिपत पर्यंत प्रत्येक सिनेमात मुघलांना काही अंशी चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न केला गेला.
तरीही आपल्याकडचे सो कोल्ड लिबरल दिग्दर्शक तोंड वर करून म्हणतात की “आपल्या सिनेमात मुघलांना कायम व्हिलन म्हणूनच दाखवलं जातं!” हे असे स्टेटमेंट करणाऱ्या महाशयांनी The Empire सारखी सिरिज बघून सांगावं यात कुठे बाबरला किंवा मुघलांना व्हिलन म्हणून दाखवलं आहे ते!
इतके दिवस बॉलीवूडवाले ही गोष्ट कशाच्यातरी आड लपून करत होते, पण आता उघड उघड मुघलांच्या शौर्यगाथा मांडणाऱ्या सिरिज यायला लागल्याने हा प्रश्न नक्कीच डोक्यात येतो की यांच्याकडची क्रीएटिविटि संपली आहे का?
आधी बायोपिक आणि आता इतिहासाच्या कुबड्या यांना का हव्यात? बरं इतिहास दाखवायचा आहे तर तो आपल्या देशातला इतिहास दाखवा, आज आपल्या इतिहासातल्या कित्येक शूरवीरांविषयी आपल्या कुणालाच जास्त माहिती नाही.
आजही शालेय पाठ्यपुस्तकातून मुघलांचा, पोर्तुगीजांचा, फ्रेंचांचा इतिहास मुख्यत्वे शिकवला जातो आणि आपल्या शिवाजी महाराजांचा, पेशव्यांचा, तानाजीचा हंबीरराव मोहिते यांच्या इतिहासाची फक्त तोंडओळख करून दिली जाते.
याच आपल्या शूर योद्ध्यांवर आपल्या काही कलाकारांनी सिनेमे केले तर त्यांना कम्युनल म्हणून हिणवलं जातं, आणि क्रूर मुघल शासकांच्या इतिहासाचे गुणगान गाणाऱ्यांना सेक्युलर म्हणून पुरस्कृत केलं जातं, त्यांच्या कलाकृतीला मास्टरपिस म्हणून डोक्यावर घेतलं जातं.
The Empire चा हा पहिला सीझन बाबरविषयी असून, त्या नॉवेलच्या ६ भागांच्या अनुसार यांचे पुढचे सीझन आले तर त्यात हुमायुन, जहांगीर, अकबर तैमुर अशा वेगवेगळ्या मुघल शासकांना अशाच पद्धतीने सादर केलं जाईल आणि मुघल हेच खरे देश घडवणारे शासक होते हे बिंबवण्यात हे बॉलीवूडकर यशस्वी होतील.
इस्राईल सारख्या देशात हिटलरचे गुणगान गाणारी एकही कलाकृती तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण तिथली लोकं त्यांचा इतिहास विसरलेले नाहीत, नाझी काळात त्यांचा झालेला नरसंहार विसरलेल नाहीत.
उलट जेव्हा हॉलोकोस्ट विषयी सोशलमीडियावर उलटसुलट चर्चा होऊ लागल्या तेव्हा त्यांनी मोठा कॅम्पेन सुरू करून खुद्द फेसबुकच्या मार्क झुकरबर्गला दखल घेऊन हेटस्पीच पोलिसीज बदलायला भाग पाडलं होतं!
असाच विरोध आपण कधी करणार? आपल्याच इतिहासाची मोडतोड करणाऱ्या या कलाकारांवर आपण कधीच व्यक्त होणार नाही का? का आपण आपल्यावर अनंत अत्याचार करणाऱ्या शासकांच्या पराक्रमाचे गोडवे गात बसणार?
जसं सिनेमामध्ये बाजीराव पेशवे किंवा तानाजी मालुसरे यांना नाचवणं चुकीचं आहे त्याप्रमाणेच मुघलांचे गोडवे गाणाऱ्या कलाकृती निर्माण करणं देखील तितकंच चुकीचं आहे. या दोन्ही गोष्टींची जाणीव जोवर होत नाही तोवर आपल्याला या अशाच कलाकृती बघायला मिळणार!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.