' राज्यातील सद्यस्थिती आणि पंढरपूर निकाल सत्ताबदलाचा संकेत ठरणार का..?!! – InMarathi

राज्यातील सद्यस्थिती आणि पंढरपूर निकाल सत्ताबदलाचा संकेत ठरणार का..?!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – राघवेंद्र जोशी

===

राजकारण हे तर्क, वितर्क आणि अतर्क्यमय गोष्टींवर अवलंबून असते. राजकीय पटलावर क्षणक्षण अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. सामान्य अभिजन आपली तर्कबुद्धी, पूर्वानुभव, राजकीय समीकरणे या सर्वांवर आधारित आपले विश्लेषण मांडत असतात.

विशेषत: सध्या सुरु असलेल्या घडामोडींचा भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होईल, यावर तर्क वर्तवण्याची गरज राजकीय अभ्यासक, पत्रकार मंडळींना अनिवार्य असते.

त्यासाठी ही मंडळी नित्यनेमाने राजकीय पुढारी, नेते, मंत्री, आमदार, खासदार, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी इत्यादी मंडळींच्या तसेच या सर्व मंडळींसोबत जवळचा संबंध असणाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्याचे अंदाज बहुतेकदा इतर अभिजनांच्या तुलनेत अधिक वास्ततवादी असतात किंवा ते अूचकतेच्या जवळ पोहोचणारे असतात.

तरीसुद्धा सामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.

 

mahavikas aghadi inmarathi

===

हे ही वाचा – “बा देवेन्द्रा! तू पुरून उरलास… जिंकलास भावा…!”

===

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरून, प्रस्तूत लेखातून काही तर्क लढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर वेगवेगळ्या चांगल्या-वाईट अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटतील, हे गृहित धरलेच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पंढरपूरमधील पराजय

महाराष्ट्रातील राजकारणात मध्यंतरी एक धक्कादायक घटना घडली. पंढरपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान औताडे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला.

ही लढत अतिशय अटीतटीची झाली असली आणि पराभव अतिशय अल्पमताने झाला असला, तरी शेवटी पराभव हा पराभवच असतो. मात्र, करोना असतानाही या एका जागेसाठी दोन्ही पक्षांच्या अनेक दिग्गज मंडळींनी प्रचंड मेहनत घेतली होती.

 

ajit pawar pandharpur inamrathi

 

पंढरपूरमध्ये भारतीय जनता पक्ष फार ताकदवान नाही, त्यांच्या तालुका अध्यक्षाला काही दिवसापूर्वीच भरदिवसा रस्त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फासून हल्ला केला होता.

भारतीय जनता पक्षाचे पंढपूरमधील पदाधिकारी प्रशांत परिचारक यांचा पंढरपूर शहरात प्रभाव आहे. जेव्हा ‘महानंदा’सारखी मोठी जबाबदारी होती; तेव्हा गावासाठी, तालुक्यासाठी ते फार काही योगदान देऊ शकले नाहीत. उलट, भारतीय जवानांबद्दल अपशब्द बोलून नाराजी ओढवून घेतली.

एवढं सगळं असतानाही त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कसा जिंकला हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, स्थानिक जनतेची पवार कुटुंबातील पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा होती.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात दबावही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खुद्द अजित पवार यांनीही पक्षाच्या निर्णय मान्य असल्याचे वेळोवेळी जाहीर केले होते. अर्थातच कदाचित पुत्रप्रेमाची उफाळीही या पराभवाला कारणीभूत आहे का? अशी कुजबुजही करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीतील प्रवक्त्यांची बदललेली भूमिका

राष्ट्रवादी पक्षाची आणि प्रवक्त्यांची सध्याची भूमिका थोडी विचारात पाडणारी आहे. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते थेट भाजपविरोधी भूमिका घेणे टाळत असल्याचे चित्र आहे.

केंद्रातून मदत मिळत नसल्याबद्दल गवगवा केला जात असला तरीही त्या तुलनेने राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य करून टीका केली जात नाही किंवा जाब विचारला जात नाही.

===

हे ही वाचा – भाजप समर्थकांनी शरद पवारांना “५०-५५ जागांचे नेते” समजण्याची चूक करू नये…

===

शिवसेनेची वायफळ बडबड

शिवसेना पक्ष म्हणून तळागाळात असला किंवा होता; तरी त्यांना संपूर्ण सरकार चालवायचा अनुभव नाही. त्यातच सध्या राष्ट्रवादीचे अनेक मंत्री शिवसेनेच्या कारभाराबद्दल नाराज आहेत.

विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना धडाडीने निर्णय घेणे आणि आर्थिक उलाढाली करण्याची सवय आहे. मात्र, त्यांच्या वेगाशी विद्यमान नेतृत्वाला जुळवून घेणे जमत नसल्याचे चित्र आहे.

 

ajit pawar and uddhav thackeray inmarathi

 

यामुळे एकजण सकाळी एक घोषणा करतो, दुसरा दुपारी दुसरी घोषणा, ट्विट केले जाते, नंतर डिलीट केले जाते; म्हणजेच आपल्या निर्णयांशी – भूमिकांशी केवळ सरकार टिकवण्यासाठी तडजोड करण्याची नामुष्की अनेक नेतेमंडळींवर आली आहे.

भविष्यात काय होऊ शकते?

या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक शक्यता वर्तविल्या जाऊ शकतात. पहाटे पहाटे शपथविधी घेण्याची पुनरावृत्ती होते की काय अशीही शक्यता आहे.

 

ajit pawar devendra fadanvis inmarathi

 

नजीकच्या काळात अजित पवार हे ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर बातमीसाठी भुकेले असलेल्या माध्यमांमध्ये ‘अजित पवार सरकारी निर्णय प्रक्रियेवर नाराज’ अशी बातमी येऊन धडकण्याची शक्यता आहे.

हे गुऱ्हाळ काही तास किंवा काही दिवस चालल्यानंतर अचानकच बातमी येईल की ‘राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार…!’ अर्थातच सरकारमध्ये राहण्यासाठी घड्याळ कमळाशी हातमिळवणी करणार आणि राज्यातील सरकारमध्ये पुन्हा कमळ फुलणार!

असेच झाले तर विद्यमान आमदार रोहित पवार यांचे स्वप्न पूर्ण केले जाऊन त्यांना राज्यातील मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल. तर भाजपला सहकार्य घेतल्याबद्दल सुप्रियाताईंना केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये थेट सहभागी न होता केंद्रीय मंत्रीपदी बढती देण्यात येईल.

अर्थातच विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल आणि उपमुख्यमंत्रीपदाची माळ पंकजाताई किंवा चंद्रकांतदादा पाटील यांच्या गळ्यात पडेल किंवा राज्याला या दोघांच्या रुपाने दोन उपमुख्यमंत्रीही मिळतील.

हे नेमके असेच झाले तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपमधून बाहेर पडलेले एकनाथ खडसे, सतत पक्षबदलाचा प्रयोग करणारे राणे कुटुंबिय, वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा बाळगून कार्य करणारे जयंत पाटील या सर्वांचे काय होईल, हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला सांगण्याची गरज नाही.

 

devendra fadnavis and jayant patil inmarathi

===

हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!

===

राष्ट्रीय राजकारण

निकालाआधीच काँग्रेसची चर्चेतून माघार

याच दिवशी तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी अशा चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. सध्या देशभरातील राजकीय वातावरण प्रचंड मोठ्या प्रमाणात संमिश्र स्वरुपाचं आहे. हे समजून घेत काँग्रेसनी लोकांनी आपल्याला नाकारलं आहे, हे अप्रत्यक्षपणे मान्य करत कोणत्याही प्रवक्त्याने कोणत्याही चर्चेत सहभाग घ्यायचा नाही हे ठरवून टाकलं.

‘‘सारा देश कोरोनाच्या आगीत होरपळत असताना आणि मोदी सरकार सपशेल कोसळले असताना निवडणुकीतील जय – पराजयाची चर्चा करणे अप्रशस्त वाटल्याने अखिल भाारतीय कॉंग्रेस पक्षाने उद्या दिवसभर निवडणूक निकालांवर विविध टीव्ही चॅनल्सवरील चर्चांमध्ये पक्षाचे प्रवक्ते सहभागी होणार नाहीत असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मी किंवा अन्य सहकारी उद्या कोणत्याही चॅनेलवरील चर्चेत सहभागी होणार नाही.”, अशा शब्दांत याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करून टाकली होती.

एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातील राजकारण जेव्हा आपण पाहतोय त्यातून भविष्यात काय होऊ शकत याबद्दल अंदाज मांडता येतील. अंदाज खरा ठरण्याची शक्यता किती आहे, ते प्रत्येकाने आपापल्या आकलनबुद्धीप्रमाणे पडताळून पहावे, ही विनंती.

 

maharashtra politics inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?