दाऊद कराचीमध्ये असो किंवा नसो मात्र आपली मराठमोळी शाळा आजही दिमाखात उभी आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दाऊद इब्राहिम या नावाची वेगळी ओळख सांगावी लागत नाही. अंडरवर्ल्डच्या जगतातला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात फरार झाला असल्याचं अनेक वर्षांपासून म्हटलं जातं.
अनेक वेळा अटक होऊनदेखील पोलिसांच्या तावडीतून नेहमीच सुटलेला दाऊद भारताबाहेरून भारताविरुद्ध कारवाया करतो, त्याचे दहशतवादी संघटनांसोबत असलेले संबंध, त्याचे राजकीय नेतेमंडळींसोबत असलेले संबंध, त्याचे बॉलिवूडशी असलेले संबंध याविषयीच्या अनेक चर्चा आपल्या कानांवर पडल्या आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मुंबई बॉंबस्फोट घडवून आणण्यामागेही दाऊदचाच हात असल्याचं म्हटलं जातं. दाऊदवर अनेक सिनेमे येऊन गेलेत. हुसैन झैदी यांच्या ‘डोंगरी टू दुबई’ या पुस्तकातही दाऊदविषयी लिहिलंय. दाऊदचा अनेक वर्षं शोध घेतला जात होता.
अखेरीस, तो कराचीमध्ये असल्याचा सुगावा ईडीला लागल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. दाऊदचा भाचा अलीशाह पारकर यानेच ही कबुली ईडीला दिल्याचं समजतंय.
दाऊद कराचीमध्ये आहे की नाही याचा शोध घेतला जाईलच. पण कराचीमध्ये चक्क एक मराठमोळी शाळा आहे आणि ती आजही तिथे दिमाखात उभी आहे हे कळल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
ही मराठी शाळा तिथे कधी स्थापन झाली? कुणी स्थापन केली? त्या शाळेचं नाव काय? ती शाळा नेमकी कशी आहे? कराचीमध्ये मराठी माणसं कशी? या सगळ्याविषयी जाणून घेऊ.
‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’ची स्थापना आणि या शाळेविषयी:
फाळणीपूर्वी भारत आणि पाकिस्तान ही राष्ट्रं वेगवेगळी नव्हती तेव्हा ‘हिंदुस्थान’ हे राष्ट्र होतं. १६०० साली सर थॉमस रॉ यांनी मुघल बादशाहकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या. त्यानंतर हिंदुस्तानात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली गेली. सिंध प्रांत जेव्हा कंपनीच्या सत्तेत आला तेव्हा कंपनीने तिथे शैक्षणिक आणि राजकीय सुधारणा करायला सुरुवात केली. १८५० मध्ये सर बार्टल फ्रिअर यांची सिंध प्रांताच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.
सिंध प्रांत जोवर कंपनीच्या सत्तेत नव्हता तोवर तिथे पर्शियन भाषा वापरली जायची. फ्रिअर गव्हर्नर झाल्यानंतर यापुढे तिथे सिंधीतून शिक्षण दिलं जावं असं म्हणणं त्यांनी मांडलं. पण सिंधीला स्वतःची लिपी नव्हती. अरबी आणि खुदाबादी अशा लिप्यांचे पर्याय त्यावेळी त्यांच्यासमोर होते. हिंदूंसाठी अरबी लिपी सोयीची ठरणार नाही आणि मुस्लिमांसाठी खुदाबादी लिपी सोयीची ठरणार नाही हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढायचं ठरलं.
हिंदूंसाठीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खुदाबादी लिपीतून शिक्षण द्यायचं ठरलं. ईस्ट इंडिया कंपनीने नारायण जगन्नाथ वैद्य या व्यक्तीची कंपनीचे पहिलेवहिले डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक केली. १८६८ मध्ये खुदाबादी लिपीतील चुका सुधारण्यासाठी कंपनीकडून वैद्य यांना नेमलं गेलं.
१८६९ साली सर बार्टल फ्रिअर यांनी कराचीमधील ‘बंदर रोड’ म्हणजेच आताच्या ‘महंमद अली रोड’ येथे हिंदू शाळेची स्थापना केली. हीच ती कराचीतली मराठमोळी शाळा. केवळ पहिली मराठी शाळाच नाही तर सिंध प्रांतातलीच ही पहिली शाळा आहे.
मूळचे मुंबईचे असलेले नारायण जगन्नाथ वैद्य या शाळेत शिक्षकपदी रुजू झाले. या शाळेला सुरुवातीला ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ हे नाव दिलं गेलं होतं. पण १९३९ साली बॅ. सी. डी. वैद्य यांच्या नातवाच्या विनंतीवरून या शाळेचं नाव ‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’ केलं गेलं. सुरुवातीला या शाळेत ६८ विद्यार्थी होते.
या शाळेत मराठी, फारसी, गुजराथी या भाषांतून शिक्षण दिलं जाऊ लागलं. ही शाळा सरकारच्या अखत्यारीत होती. या शाळेत जैन, पारसी, हिंदू, हिंदू ब्राह्मण आणि मुस्लिम विद्यार्थी होते. ‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.
आता या शाळेला ‘एन. जे. व्ही. वैद्य स्कूल’ असं नाव आहे. खेदाची बाब अशी की या शाळेत वैद्य यांच्या फोटोखाली ‘वैद्य’ असं लिहिलेलं नसून उर्दू भाषेत ‘विद्या’ असं लिहिलंय. एकप्रकारे हा वैद्य यांचा अवमान म्हणता येईल.
१८७६ मध्ये ही शाळा आता जिथे आहे त्या ठिकाणी स्थलांतरित केली गेली. फाळणीनंतर सिंधी असेंब्लीकडून या शाळेच्या इमारतीत चर्चा आणि उपक्रम घेतले जायचे मात्र अखेरीस या इमारतीचे पुन्हा शाळेतच रूपांतर केले गेले. केशव बापूजी बाळ हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते तर बालाजी विनायक गोखले हे या शाळेचे दुसरे मुख्याध्यापक होते. फाळणीपूर्वी इथे बहुसंख्य मराठी विद्यार्थी होते.
नारायण जगन्नाथ वैद्य हे बरीच वर्षं म्हैसूर राज्यामध्ये डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्टर होते. इंग्रज सरकारने त्यांना ‘रावसाहेब रावबहाद्दूर’ ही पदवी बहाल केली होती. सिंध प्रांतात शिक्षणक्षेत्रात त्यांनी जे मोठं योगदान दिलं त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही मराठी शाळा कराचीमध्ये सुरू केली गेली.
कराचीमध्ये इतके मराठी लोक कसे?
स्वातंत्र्यापूर्वी मुंबई जेव्हा ‘बॉंबे’ होतं त्यावेळी बॉंबेमध्ये सिंधमधील कराचीचा समावेश होता. समुद्राच्या मार्गे काही तासांच्या अवधीतच मुंबईहून कराचीला जाता यायचं. त्याकाळी मुंबई, पुणे, कोकणामधली अनेक माणसं व्यापार उदिमाच्या निमित्ताने कराचीमध्ये राहू लागली तर कराचीमधलेही अनेक जण मुंबईमध्ये राहायला आले. काही लोकांचं म्हणणं आहे की युद्धप्रसंगी मराठी लोक कराचीत गेले असावेत. तर काहींच्या म्हणण्यानुसार, पानिपतच्या समरप्रसंगी मराठे तिथे गेले असावेत.
कराचीत त्याकाळी पुष्कळ मराठी कुटुंबं होती. त्या काळात ‘सिंधमराठा’ या नावाचं एक मराठी वृत्तपत्रंही कराचीत निघायचं. गंगाधर निळकंठ गोखले या मराठी माणसाने पाकिस्तानातलं सक्करचं धरण बांधलं. संगीताचे उपासक असलेले जनार्दन पेठे कराचीतच राहायचे. शरद बापट आणि प्रभाकर बापट कराचीमध्ये संगीत शिकवायचे. ते तेव्हा लाहोरच्या अनारकली बाजारामध्ये राहायचे.
–
ज्या नावावरून इतका गदारोळ सुरू आहे ते ‘औरंगाबाद’ नाव कसं पडलं ? वाचा!
९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…
–
फाळणीनंतर हे बापट बंधू दादरमध्ये आले. इतकंच काय, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे आजोबाही कराचीत बरीच वर्षं मोठ्या पदावर होते. विनोद गायकवाड यांचे वडील शंकर गायकवाड, श्रीकांत गायकवाड यांचे वडील लक्ष्मण गायकवाड आणि संभाजी भोसले हे कराचीमधले लोकप्रिय खेळाडू होत.
पाकिस्तानाशी एरव्ही आपले संबंध मित्रत्त्वाचे नसले तरी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आजही मराठी शाळा आहे ही गोष्ट आपली मान भारतीय आणि मराठी माणूस म्हणून अभिमानाने उंचावते. सारखी मातृभाषा असणाऱ्यांशी आपला आपसूक एक भावनिक बंध असतो. त्यामुळे ही शाळा तिथे कायम टिकावी, शाळेची प्रगती होत राहावी आणि कराचीमधील आपल्या मराठी बांधवांना तिथे नेहमी सुरक्षित वाटावं हीच इच्छा व्यक्त करूया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.