' पैसा प्रसिद्धी नव्हे तर केवळ देशाच्या स्वाभिमानासाठी खेळलेल्या भारतीय संघासाठी ८३ बघा! – InMarathi

पैसा प्रसिद्धी नव्हे तर केवळ देशाच्या स्वाभिमानासाठी खेळलेल्या भारतीय संघासाठी ८३ बघा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

८३ वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलपर्यंत येऊनसुद्धा जेव्हा “भारतीय टीम तुक्का मारून इथवर पोहोचली आहे” असं जेव्हा पेपरमध्ये छापून आलं तेव्हा इंडियन प्लेयर्सनी कर्णधार कपिल देवकडे मागणी केली की आतातरी त्याने एक स्टेटमेंट द्यावं!

सिनेमातला हा सिन आणि त्या सिनमधले कपिल देवचे संवाद अजूनही कानात घोळतायत, यादरम्यान १९७५ च्या वर्ल्डकपचा दाखला देत वेस्ट इंडिजच्या स्ट्रगल विषयी सांगण्यात आलं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तेव्हाच्या वर्ल्डकपमध्येसुद्धा अशाचप्रकारे वेस्ट इंडिजचं खच्चीकरण करण्याचं काम या मोठ्या देशांनी केलं होतं तेव्हा वेस्ट इंडिजच्या कॅप्टनने कोणतंही स्टेटमेंट न देता २ वर्ल्डकप जिंकून उत्तर दिलं होतं, खरंच तो सिन बघताना मनातून हेच वाटत होतं की आजच्या काळात हे असे प्लेयर्स सापडतील का?

ही कहाणी आहे त्या ऐतिहासिक संघाच्या ऐतिहासिक विजयाची जो विजय आमच्या पिढीसाठी एका दंतकथेपेक्षा कमी नाही कारण त्या विजयाचं कुठेच फारसं फुटेज उपलब्ध नाही!

 

83 IM

 

ही कहाणी आहे त्या खेळाडूंची जे फक्त देशासाठी खेळले आणि हे सगळं आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब उभं करणाऱ्या दिग्दर्शक कबीर खानचे आभार मानावे तितके कमी आहेत.

८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच या चित्रपटाचं अनन्यसाधारण महत्व आहे.

हा सिनेमा बघण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या खरंच आजही ऐकताना दंतकथाच वाटतात. कशाप्रकारे भारतीय संघाने न भूतो ना भविष्यती एवढा मोठा विजय मिळवला तेसुद्धा वेस्ट इंडिजसारख्या भयानक खेळाडूंसमोर, हे सगळं ऐकून होतो!

होल्डिंग, मार्शल, रॉबर्ट हे तीन कर्दनकाळ, शिवाय गार्नरचं व्यक्तिमत्व. विवीयन रिचर्ड, डेव्हीस, क्लाइव्ह लॉइड सारख्या बॅट्समनची खेळी याविषयी ऐकून होतो, आणि या अशा घातक खेळाडूंना धूळ चारून वर्ल्डकप जिंकणं याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही.

 

west indies IM

 

आपल्या खेळाडूंसमोर ते म्हणजे शेपूट नसलेले महाकाय प्राणीच वाटायचे, पण त्यांच्या या अशा वागण्यामागेसुद्धा एक खूप मोठा इतिहास आणि संघर्ष आहे जो तुम्हाला Fire In Babylon या documentary मध्ये पाहायला मिळेल! वेस्ट इंडिजचा खेळ असा का झाला? जो रोष भारताने झेलला त्याहून कैक पटीने जास्त अपमान वेस्ट इंडिज टीमला सहन करावे लागले आहेत.

वेस्ट इंडिजसोबत घडलेल्या घटना असो किंवा १९८३ मध्ये भारताला मिळालेली वागणूक असो क्रिकेट हा खरंच Gentlemen’s game आहे हे पदोपदी या दोन्ही संघांनीच सिद्ध केलं.

अशा या क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण करणाऱ्या वेस्ट इंडिजला हरवून भारताने विश्वचषक जिंकला आणि केवळ याच कारणासाठी ही गोष्ट सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावी म्हणूनच हा सिनेमा महत्वाचा आहे.

असोसिएशन तर सोडाच पण तेव्हाच्या भारतीय संघातल्या खेळाडूंनासुद्धा विश्वास नव्हता की आपण या टूर्नामेंटमध्ये टिकू, जिथे भारतीय संघच याबाबत कॉन्फिडेन्ट नव्हता तिथे इतर भारतीयांचं काय घेऊन बसलात?

पण एक वेडा कॅप्टन होता ज्याने हे स्वप्न नुसतं बघितलं नाही तर सत्यात उतरवून दाखवलं, त्यावेळेस ईश्वरसुद्धा त्याच्यासोबत होता, अशा या कपिल देवची ही गोष्ट, खरंच सिनेमा बघून झाल्यावर जाणवतं की कपिल देव नसता तर आज आपली क्रिकेटमधली अवस्था बिकट असती!

 

kapil dev IM

 

त्या संघाने एक आत्मविश्वास दिला आणि त्या जोरावरच आज आपण क्रिकेट विश्वात भारताचं नाव मोठं केलं आहे.

सिनेमात मॅनेजर मान सिंग यांचा एक डायलॉग आहे “आपण स्वातंत्र्य ३५ वर्षांपूर्वी मिळवलं खरं पण सन्मान मिळायचा बाकी आहे!” आणि कपिल देवने आणि त्याच्या त्या ११ लोकांनी तो सन्मान भारताला मिळवून दिला त्याची गोष्ट म्हणजे ८३!

सिनेमा त्याच्या नावाला जागलाय, म्हणजे फक्त ८३ टूर्नामेंटवर फोकस करणारा हा सिनेमा कुठेही त्याचा ट्रॅक सोडत नाही, कोणत्याही खेळाडूची पार्श्वभूमी नाही, कसलाही लव्ह अॅंगल नाही, फक्त आणि फक्त क्रिकेट मॅच यावरच फोकस केल्याने बऱ्याच लोकांना हा सिनेमा तसा रटाळ वाटू शकतो, पण  भारताने नेमक्या कोणत्या अडचणींवर मात करत हा विजय मिळवला त्यासाठी हे सगळं सांगणं अत्यंत गरजेचं होतं.

सिनेमात तुम्हाला भारतीय संघाची बहुतेक करून प्रत्येक मॅच हायलाइटच्या स्वरूपात दाखवण्यात आली आहे, पण इथे दिग्दर्शक कबीर खानने एक जादू केलीये ती म्हणजे ८३ च्या मॅचेसमधले काही रियल फुटेज वापरुन ते यात घेण्यात आले आहेत त्यामुळे काही खास क्षण होते जे तुम्ही अगदी रियल फुटेजमध्ये बघू शकता आणि लगेचच त्यासोबत जोडले गेलेले सीन्स बघताना आपण आणखीनच भारावून जातो.

मुळात ८३ च्या वर्ल्डकपचं फुटेजच कमी उपलब्ध असल्याने तो सगळा काळ लोकांसमोर उभा करणं हे एक शिवधनुष्य होतं जे कबीर खानने लीलया पेलेलं आहे. आपला धर्म, जात सगळं विसरून लोकं कशाप्रकारे क्रिकेटसाठी एकत्र येतात याचंसुद्धा दर्शन सिनमात घडतं!

kabir khan IM

 

याबरोबरच कपिल देवची जिम्बाब्वेविरुद्धची १७५ नॉट आऊट इनिंग दाखवणं आणि त्यात खुद्द कपिलचा एक छोटासा सीन असणं ही तर पर्वणीच होती. बीबीसीचा स्ट्राइक असल्याकारणाने कपिलची ती इनिंग कुठेच रेकॉर्ड झालेली नाही, पण कबीर खान आणि रणवीर सिंगने ती इनिंग पुन्हा दाखवून एक उमदा खेळी के असते हे दाखवून दिलं आहे.

अशा बऱ्याच घटना आहेत ज्या अजूनही लोकांच्या मनात तितक्याच ताज्या आहेत आणि त्या सगळ्या घटना शक्य होईल तितक्या अचूकपद्धतीने पडद्यावर मांडल्या आहेत हे थिएटरमधल्या त्या लोकांकडे बघून जाणवत होतं ज्यांनी तो वर्ल्डकप पाहिला होता.

वेस्ट इंडिज प्लेअर्सचं कास्टिंग लाजवाबच झालंय, शिवाय कपिल देव, सुनील गावस्कर, श्रीकांत, जीम्मी, रॉजर बिन्नी यांचं कास्टिंग अगदी अचूक झालंय.

श्रीकांत कसा होता, त्याचे धम्माल किस्से शिवाय त्याची खेळण्याची स्टाइल हे सगळं ऐकून होतो, आणि सिनेमात ते अगदी अचूक दाखवलं आहे.

कपिल देववर तर या सिनेमात फोकस आहेच, पण त्या नादात इतर कोणत्याही प्लेयरला कमी स्क्रीन टाईम दिलेला नाही. ८३ चा विजय हा संपूर्ण संघाचा विजय होता आणि तो त्याच पद्धतीने आपल्यासमोर सादर केला आहे.

 

83 team IM

 

यातला एक जरी प्लेयर नसता तर तो वर्ल्डकप कदाचित आपण जिंकू शकलो नसतो. आता एवढं सगळं चांगलं लिहिल्यावर तुम्हाला वाटेल की यात काहीच कसं वाईट नाही, तर तसं नाहीये, यातही काही चुका आहेत. काही factual चुका आहेत तर काही ठिकाणी स्पेशल इफेक्ट गंडलेले दिसतात तर काही ठिकाणी आपल्याला मेकअप मधली त्रुटी आढळते.

तरी या सगळ्या गोष्टींकडे आपण कानाडोळा करू शकतो कारण ना भूतो ना भविष्यती अशा विजयाची गोष्ट आपल्यासमोर सादर केली जात असते. मी आधी म्हंटलं त्याप्रमाणे हा काही मास्टरपिस नाही, पण आजच्या काळात ही गोष्ट सांगणं किती आवश्यक आहे हे तुम्हाला हा सिनेमा बघताना जाणवेल.

सिनेमॅटोग्राफी, स्पेशल इफेक्ट, संगीत सगळंच जुळून आलंय. प्रीतमचं म्युझिक अरिजित सिंगच्या आवाजातलं ‘लेहरा दो’ आणि ‘जितेगा इंडिया’ ही गाणी कानावर पडतात तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो!

साकेब सलीम, आदिनाथ कोठारे, जिवा, ताहिर भासीन, चिराग पाटील या सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केलंय, शिवाय पीआर. मान सिंग साकारणारा पंकज त्रिपाठी यामध्येसुद्धा भाव खाऊन जातो. दीपिका पदूकोणला जास्त काही वाव नाही तरी ती स्क्रीनवर आल्यावर एक हास्य आपल्या चेहेऱ्यावर येतं!

 

83 movie team IM

 

रणवीर सिंग याचे त्याच्या खासगी आयुष्यातले माकडचाळे बाजूला ठेवले तर तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे हे पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे. तो ज्या पद्धतीने एखादी भूमिका आपलीशी करतो तसं फार कमी कलाकारांना जमतं, यातही सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो अगदी तसंच बेमालुमपणे तो या भूमिकेत शिरलाय की पडद्यावर तुम्हाला फक्त कपिलच दिसतो!

स्वातंत्र्यानंतर इंग्रजांच्या धर्तीवर एकही मॅच न जिंकणाऱ्या भारतीय संघाने १९८३ मध्ये मात्र त्याच ठिकाणी जाऊन थेट वर्ल्डकप जिंकला. नेहमीच इतरांना कमी लेखणाऱ्या गोऱ्या साहेबाच्या थोबाडीत मारेल अशा या विजयाची गोष्ट पुन्हा अनुभवायची असेल तर ८३ हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा!

तुम्हाला क्रिकेट आवडो अथवा न आवडो पण हा सिनेमा क्रिकेटच्या प्रेमाखातर नाही तर केवळ देशाच्या स्वाभिमानासाठी खेळलेल्या, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणाऱ्या त्या लाजवाब भारतीय संघासाठी आणि त्यातल्या खेळांडूंसाठी बघा!

 

83 world cup IM

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?