‘बॉम्बे’सारखा चित्रपट देणाऱ्या मणीरत्नमच्या घरावर बॉम्बहल्ला का झाला? वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या रशिया युक्रेनपेक्षा एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे काश्मीर फाईल्स हा सिनेमा, काश्मीर पंडितांवर झालेल्या अन्यायावर हा सिनेमा बेतला आहे, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हे धाडस दाखवले आहे, या सिनेमावरून त्यांचे कौतुक तर झालेच त्यांना धमक्या देखील आल्या होत्या, म्हणून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हिंदू मुस्लिम वाद देशात नवा नाही.
आमीर खान किरण राव यांच्या घटस्फोटाचा संबंध थेट लव जिहादशी जोडला गेला होता, पण हीरो मुसलमान आणि हिरोईन हिंदू हे समीकरण काय बॉलिवूडसाठी नवीन नाही. भारतीय सिनेमा इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला तर दर १० पैकी ८ सिनेमांमध्ये तुम्हाला हाच अजेंडा पाहायला मिळेल.
बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात नेहमीच हा अजेंडा पसरवायचं काम फिल्म इंडस्ट्रीने अगदी पद्धतशीरपणे केलेलं आहे, पण तुम्ही कधी भारतीय सिनेमात एका मुस्लिम मुलीला हिंदू मुलाच्या प्रेमात पडताना पाहिलंय का?
फार क्वचित अगदी नाहीच म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही, कारण जेव्हा जेव्हा असं दाखवायचा प्रयत्न झालेला आहे तेव्हा तो प्रयत्न हाणून पाडला आहे किंवा त्याविरुद्ध प्रचंड जोरदार निदर्शनं झालेली आहेत.
याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मणीरत्नम या दाक्षिणात्य दिग्दर्शकाचा ‘बॉम्बे’ हा सिनेमा! हा सिनेमा लोकांसमोर सादर करणं हे त्याकाळी मोठं आव्हान होतं, आणि यामुळेच खुद्द मणीरत्नम यांना नेमक्या कोणत्या संकटाचा सामना करावा लागला हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
‘बॉम्बे’ कशावर बेतलेला होता?
१९९५ साली मणीरत्नम दिग्दर्शित, अरविन्द स्वामी आणि मनीषा कोयराला अभिनीत ‘बॉम्बे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, १९९२ च्या दंगलीवर बेतलेला आणि त्यानंतर बाबरी मशिदीच्या पाडावाची पार्श्वभूमी असलेला बॉम्बे हा त्यावेळेस विविध कारणांनी बराच चर्चेत होता.
एक हिंदू मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर घरच्यांच्या विरोध पत्करून ते दोघे लग्न करून त्यावेळच्या “बॉम्बे” मध्ये राहायला येतात, त्यानंतर मुंबईत उसळलेल्या जातीय दंगली आणि त्यामुळे यांच्या दोघांच्या आयुष्यात घडणारे बदल याबद्दल हा सिनेमा भाष्य करतो.
एकंदरच बघायला गेलं तर या सिनेमाचा अजेंडा तसा साधा सरळच होता पण तेव्हा त्याला एक धार्मिक आणि राजकीय रंग देण्यात आला. ए.आर.रहमान या गुणी संगीताकाराने या सिनेमाला संगीत दिलं होतं.
–
हे ही वाचा – “भन्साळींचं डोकं ठिकाणावर आहे काय?” प्रेक्षकांना पुन्हा पडला सवाल!
–
सिनेमामुळे वातावरण का तापलं?
सिनेमाचा विषय आणि एकंदरच मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याने बऱ्याच शहरात या सिनेमाविरुद्ध जोरदार विरोध प्रदर्शन झालं, मेट्रो सीटीज म्हणजे मुंबई कोलकाता, अशा काही ठिकाणी विरोध तसा सौम्य होता, पण देशाच्या काही भागात हा विरोध फार हिंसक वळण घेत होता.
बेळगाव सारख्या काही शहरात थिएटरमध्ये तोडफोड झाली, काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
देशातल्या त्या वेळच्या इस्लामच्या ठेकेदारांनी या सिनेमावर कठोर कारवाई करून बंदी आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. रजा अकादमीच्या आणि मुस्लिम लीगच्या काही मुस्लिम लिडर्स जे २०११ च्या आझाद मैदान दंगलीतसुद्धा सामील होते त्यांनी या सिनेमावर कठोर कारवाईची मागणी केली.
त्यांच्यासाठी या सिनेमाचं खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलं. तो चित्रपट पाहून झाल्यावर या नेत्यांनी सिनेमातल्या हिंदू मुस्लिम जोडप्याच्या लव्ह स्टोरीची कठोर शब्दांत निंदा केली, हा सिनेमा आमच्या परंपरा आणि रिती रिवाज यांचा अपमान करणारा आहे. काहींनी तर हिंदू मुस्लिम यांच्यातलं लग्न हे हराम आहे अशी स्टेटमेंटसुद्धा केली.
या सगळ्या प्रकारानंतर आणि एकंदरच हिंसक आंदोलनानंतर मुंबई पोलिसांना ‘बॉम्बे’ सिनेमावर ७ दिवसांची बंदी घालायला भाग पडलंच!
छोट्या छोट्या शहरात या सिनेमावर बंदी आणली असली तरी, मोठी शहरं, मेट्रोपोलिटन सिटीज किंवा इतर राज्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला, तिकीटबारीवर याने खूप कमाई केली, शिवाय लोकांनी सिनेमाची प्रशंसादेखील केली.
शिवसेनेचंही यामध्ये नेमकं काय कनेक्शन होतं?
सिनेमामध्ये दंगे भडकवणारं एक पात्र होतं जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मिळतं जुळतं होतं. यावरूनही शिवसैनिकांनी या सिनेमाला विरोध केला होता. बाळसाहेबांची प्रतिमा मलिन का होत आहे? असाही सवाल तेव्हा मणीरत्नम यांना विचारला गेला.
त्यांनंतर एकंदरच होणारा विरोध आणि शिवसेनेची लुडबूड यामुळे तो नेमका सीन नंतर सिनेमातून छाटण्यात आला!
फतव्याचं राजकारण का?
सिनेमा प्रदर्शित झाला आणि लोकांची प्रतिक्रिया बघून याच काही मुस्लिम लिडर्सपैकी या सिनेमाच्या अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते यांच्या विरोधात फतवा जाहीर करण्यात आला.
त्यानंतर सिनेमाची मुख्य अभिनेत्री मनीषा कोयराला हिने नॅशनल टेलिव्हिजनवर येऊन सर्वांची जाहीर माफीदेखील मागितली. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायचा हेतु माझा अजिबात नव्हता आणि नसेल असं नमूद करत तिने तिची बाजू मांडली.
मनीषा कोयरालाच्या या माफीनंतर थोडा विरोध मावळायला लागला, सिनेमाचीही चर्चा सगळीकडेच सुरू होती, पण नेमकं तेव्हा एक अशी घटना घडली जी भारतीय सिनेजगतात आजवर कधीच घडलेली नव्हती.
मणीरत्नम यांच्यावर झालेला बॉम्बहल्ला :
१० जुलै १९९५ च्या त्या सकाळी अशी गोष्ट घडली जी तोपर्यंत कुठल्याच कलाकाराच्या बाबतीत घडली नव्हती. या दिवशी मद्रासच्या आपल्या राहत्या घरी पहिल्या मजल्याच्या गार्डनमध्ये बसून मणीरत्नम आपली कॉफी पित बसले होते.
त्यावेळेस त्यांची पत्नी आणि त्यांची घरकाम करणारी बाईसुद्धा त्यांच्या त्यांच्या कामात गर्क होत्या.
अचानक मणीरत्नम यांच्या घराखाली एक मोटरसायकल येऊन थांबते ज्यावर दोघे बसलेले होते, मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या पिशवीतून एक देशी बॉम्ब काढून मणीरत्नम यांच्या पहिल्या मजल्यावर फेकला.
हा बॉम्ब जास्त मोठा नसला तरी त्याने बराच विध्वंस झाला होता, सुदैवाने हा बॉम्ब मणीरत्नम यांच्यापासून दूर पडला त्यामुळे काही किरकोळ जखमांशिवाय कोणालाच दगा फटका झाला नाही.
एवढं सगळं होऊनही या हल्ल्यामागे नेमकी कोणती संघटना होती हे अद्याप स्पष्ट झालं नव्हतं, नंतर मद्रास पोलिस यांच्या तपासातून असं समोर आलं की ‘अल-उमा’ नामक एका संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता.
फिल्म इंडस्ट्री मणीरत्नम यांच्या पाठीशी खंबीरपणे का उभी राहिली नाही?
CAA विरोध असो, शेतकरी आंदोलन असो किंवा जेलमध्ये दहशतवादाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगणारा एक निर्लज्ज अॅक्टर असो, ही इंडस्ट्री आपल्या सहाय्यक कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते
खासकरून हे मुंबईचं बॉलिवूडतर यामध्ये अग्रेसर आहे, पण त्यावेळेस आपल्याच एका कलाकारावर एवढा मोठा हल्ला होऊनही हे बॉलिवूडकर मग गिळून गप्प होते.
मद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.
स्वतःला सर्वात मोठा सेक्युलर म्हणवणारे जावेद अख्तर यांनीसुद्धा याविषयी काहीतरी उलटीच प्रतिक्रिया त्यावेळेस दिली होती. त्यांनी या सगळ्याचा दोष मणीरत्नम यांनाच दिला होता.
एवढंच नाही तर जावेद अख्तर असंही म्हणाले की “जर बाळासाहेबांचा मान राखून सिनेमात काही बदल केले होते तर मग या मौलवींचंही ऐकून मणीरत्नम यांनी सिनेमात आणखीन काही बदल करायला हरकत नव्हती!”
हे एवढं सगळं होऊनही आजही काही न्यूज आर्टिकल्समध्ये या सगळ्याचं खापर मणीरत्नम यांच्याच डोक्यावर फोडलं जातं, मणीरत्नम हे हिंदुत्ववादी आहेत, hyper-nationalist आहेत म्हणूनच त्यांना या सगळ्याचा सामना करावा लागला असंही म्हंटलं जातं!
–
हे ही वाचा – नाना पाटेकर आणि अनुराग कश्यप : बॉलिवूडच्या निर्लज्ज दुटप्पीपणाचा बुरखा पुन्हा फाटलाय
–
या सगळ्यावरुन हे स्पष्ट होतं की बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीचा हा पाखंडीपणा आत्ताच नाही, ही इंडस्ट्री आधीपासूनच स्वतःचा अजेंडाच पुढे करत आली आहे, यांच्या विचारांच्या जरा विरोधात कुणी मत मांडलं की त्यांच्या बाबतीत ही अशीच घाण खेळी खेळली जाते.
म्हणूनच आज नेपोटीजमचं प्रॉडक्ट आपल्याला बघायला लागतंय, सुशांतसारखे गुणी कलाकार आत्महत्या करतायत, चांगल्या अभिनेत्यांना दिग्दर्शकांना जाणून बुजून डावललं जातंय.
हे कुठेतरी थांबायला हवं, नाहीतर मणीरत्नम यांच्या बाबतीत जे झालं, जे संजय लीला भन्साळीच्या बाबतीत झालं त्याची पुनरावृत्ति नक्कीच होऊ शकते!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.