' पुन्हा ‘पहाटे उठवण्यासाठी’ दादांवर दबाव? राजकारणात काही शिजतंय का? वाचा – InMarathi

पुन्हा ‘पहाटे उठवण्यासाठी’ दादांवर दबाव? राजकारणात काही शिजतंय का? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजही अनेकांना ‘ती पहाट’ नक्की आठवत असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे नव्या आघाडीची स्थापना होत असतानाच, सकाळी सकाळी एक वेगळीच बातमी येऊन धडकली होती.

‘मी पुन्हा येईन’ असं सातत्याने म्हणत असलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले होते; तेदेखील ज्यांच्यासोबत ‘जाणार नाही, नाही, नाही…’ असं छातीठोकपणे सांगितलं होतं, त्या राष्ट्रवादीच्याच अजित दादांसह!

 

ajit pawar devendra fadnavis inmarathi

 

पुढचे २-३ दिवस उलटसुलट चर्चा, राजकारण, राजकीय भूकंप वगैरे गोष्टींना उधाण आलं होतं. अखेर ती खेळी अयशस्वी ठरली, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावं लागलं आणि एका राजकीय नाट्यावर पडदा पडला.

===

हे ही वाचा – शरद पवार यांना डावलून सोनियाजींनी नरसिहरावांना PM पदावर बसवले, ते घटनाचक्र!

===

त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं आणि हेच सरकार आजही महाराष्ट्रात अस्तित्त्वात आहे, हे तर आपण सगळे जाणतोच. या सर्व घटनाक्रमांची उजळणी करण्याचं कारण असं, की अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या एका साखर कारखान्यावर ईडी अर्थात एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने कारवाईचा बडगा उगारला आहे.

 

mahavikas aghadi inmarathi

 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या घोटाळ्यात एका साखर कारखान्याचाही सहभाग असल्याचं ईडीने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. या कारखान्याचे संचालक, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असल्याचं बोललं जातंय.

साखर कारखाने, वाद आणि महाराष्ट्रातील पवार कुटुंबीय हे समीकरण आता कुणाहीसाठी नवीन राहिलेलं नाही. मात्र, यावेळी ‘हा वाद पवारांशी जोडला जाण्यामागे मोठं कटकारस्थान आहे का?’ असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झालाय. त्यावरून उलटसुलट चर्चाही रंगल्या आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पत्र

या अशा चर्चा होण्यासाठी कारणही तसंच आहे असं म्हणायला हवं. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना नुकतंच एक पत्र लिहिलं होतं. यात अजित दादा आणि अनिल परब यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करून त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

 

maharashtra politician inmarathi

 

महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारला भाजप नेत्यांनी ‘वसुली सरकार’ म्हणणं, आता जनतेसाठी नवीन राहिलेलं नाही. या सरकारमधील या २ मंत्र्यांनी सुद्धा वझे यांच्यावर वसुलीसाठी दबाव आणला होता, आणि म्हणूनच त्यांची चौकशी झाली पाहिजे असं पाटील यांचं म्हणणं आहे.

हा प्रस्ताव नवा नसून भाजपच्या जून महिन्यातील बैठकीतच याविषयी चर्चा झाली होती, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

असं असताना, त्यांनी पाठवलेलं पत्र आणि त्यामागोमाग ईडीने केलेली कारवाई या दोन्हीचा एकमेकांशी संबंध असण्याची शक्यता जनतेच्या मनात येणं चुकीचं ठरत नाही, हेदेखील नक्की!

===

हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!

===

साखर कारखान्याची भानगड काय?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा सध्या चर्चेत आहे. याच घोटाळ्यात एका साखर कारखान्याच्या मालमत्तेचा समावेश करण्यात आला आहे. जमीन, इमारती, कारखान्याचा प्लांट आणि यंत्रसामग्री असं सारं लक्षात घेता, २०१० साली असलेली याची खरेदी किंमत ६५ करोडहून अधिक आहे. या मालमत्तेचा समावेश ईडीने त्यांच्या अहवालात केला आहे.

गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असलेली ही मालमत्ता सध्या जरंडेश्वर साखर कारखान्याकडे लीजवर आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी ‘स्पार्कलिंग सॉईल प्राव्हेट लिमिटेड’ ही कंपनी थेट अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

 

ajit pawar and wife inmarathi

 

अजित पवारांनी फेटाळले आरोप

गुरु कमोडिटीकडून करण्यात आलेल्या खरेदीच्या वेळी, अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्समधील महत्त्वाचे आणि प्रभावी व्यक्तिमत्व होते. ही जागा लगेचच जरंडेश्वर मिलला लीजवर देण्यात आली होती. असं ईडीने म्हटलं आहे.

याविषयी झालेल्या तपासातून असं निष्पन्न झालं आहे, की गुरु कमोडिटी ही कंपनी केवळ नामधारी म्हणून निर्माण करण्यात आली आहे. जरंडेश्वर साखर कारखानाच सांगेल व्यवहार बघत आहे. यात असलेली गुंतवणूक हाच खरा कळीचा मुद्दा ठरला आहे.

‘स्पार्कलिंग सॉईल लिमिटेड’ या कंपनीने साखर कारखान्यात केलेली गुंतवणूक आणि त्यांचा अजित दादा आणि त्यांच्या पत्नीशी असलेला संबंध ईडीच्या तपासातून उघड पडला आहे असं म्हटलं जातंय.

 

ajit pawar inmarathi

 

‘मला ईडीने कुठलीही नोटीस पाठवलेली नसून, जरंडेश्वर मिलविषयी काय घडलंय ते मला ठाऊक नाही’ असं म्हणत अजित पवार यांनी हे आरोप थेट फेटाळून लावले आहेत.

===

हे ही वाचा – जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

===

भाजपचा हात असल्याची जनतेत चर्चा

केंद्रीय संस्थांचा भाजप गैरवापर करत असल्याचा विरोधकांकडून होत असलेला आरोप, महाराष्ट्रातील, विशेषतः महाविकास आघाडीमधील नेत्यांमागे लागत असलेला चौकशीचा ससेमिरा, मध्यंतरी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, ही भाजपची राजकीय खेळी आहे अशी चर्चा जनतेत रंगली आहे.

शरद पवार यांच्या गोटातून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करणारे अजित दादा आजही जनतेच्या विस्मरणात गेलेले नाहीत. त्यामुळे पुढे-मागे महाविकास आघाडीचं पर्यायी सरकार महाराष्ट्रात स्थापन करायची वेळ आलीच, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकत्र येणार नाहीच, असं आज कुणीही छतीठोकपणे सांगू शकत नाही.

 

ajit pawar devendra fadnavis inmarathi

 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कुरबुरी सुद्धा आता नव्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अजित दादांचा सुद्धा ईडीच्या तपासात नामोल्लेख होणं याचा संबंध भाजपच्या दबाव तंत्राशी आणि ‘ऑपरेशन लोटस’शी जोडण्याचा जनता प्रयत्न करत असेल, तर त्यात त्यांचं तरी काय चुकलं?

शेवटी जनता जनार्दन सर्वेसर्वा आहे, ते बोलणार, हे राजकीय मंडळींनी लक्षात ठेवावं…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?