' राज ठाकरेंच्या वेगवान राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागण्याची ५ कारणे जाणून घ्या! – InMarathi

राज ठाकरेंच्या वेगवान राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागण्याची ५ कारणे जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमिताभ बच्चनपासून लालू प्रसाद यादव पर्यंत कित्येकांचा आपल्या खरमरीत शैलीत भर सभेत समाचार घेणारे, मराठीचा मुद्दा कायम उचलून धरणारे, वेगवेगळ्या प्रकरणात जरी अडकले तरी राजकीय वर्तुळात स्वतःचा दबदबा कायम ठेवणारे राज ठाकरे म्हणजे एक झंजावातच!

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसनेचे उत्तराधिकारी म्हणूनच नेहमी राज यांच्याकडे बघितलं जायचं, अगदी लहानपणापासून त्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब या दोघांना मोठं होताना बघितलं आहे, नंतर त्यात सहभागसुद्धा घेतला आहे.

 

raj thackrey 2 inmarathi

 

त्यांच्याकडे असलेलं वक्तृत्व, तरूणांवर असलेली पकड, एका कलाकाराचं डोकं, आणि लोकप्रियता यामुळेच तर बाळासाहेबांनी त्या काळी विद्यार्थी सेनेचा कारभार राज यांच्या खांद्यावर सोपवला होता.

राज यांना कित्येक प्रकरणातून सही सलामत बाहेर काढण्यापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आकार देण्यात सर्वात मोठा हात आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पुढे बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेवर पकड कोणाची असेल तर ती फक्त राज यांचीच अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून काढणारा तो धक्का बसला आणि राज यांनी शिवसेनेला राम राम ठोकला!

 

raj thackrey left shivsena inmarathi

 

पण तुम्हाला माहितीये का राज ठाकरे जेव्हा जेव्हा यशाच्या शिखरावर असतात तेव्हा त्यांना एक मोठा झटका किंवा सेटबॅक हा बसतोच बसतोच. राज ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीतल्या अशाच त्या ५ घटनांविषयी आपण जाणून घेऊया ज्यामुळे राज यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला.

१. शिवसेनेला हादरवणारं किणी प्रकरण :

दादर माटुंगा परिसरातील रहिवासी रमेश किणी यांना त्यांची राहती जागा विकण्यासाठी दबाव आणून त्यांचा खून करण्यात आला, पुण्यातल्या एका थिएटरमध्ये रमेश यांचा खून झाल्याचं समजलं!

हे ही वाचा ‘त्या’ एका भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”!

नुकतेच तेव्हा राज ठाकरे यांनी शिवसनेनेचं नेतेपद स्वीकारून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती, अशातच रमेश किणी यांच्या पत्नी शिला किणी यांनी आपल्या पतीच्या मृत्यूप्रकरणी राज ठाकरे आणि त्यांच्या काही मित्रांनावर आरोप केले.

तेव्हा हे प्रकरण खूप गाजलं, पोलिस यंत्रणा, सीबीआय यांनी कसून चौकशी केली, तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी हे प्रकरण लावून धरलं, न्यूज चॅनेल्स, वृत्तपत्र सगळीकडेच याविषयी चर्चा रंगू लागल्या होत्या!

 

raj thackrey kini inmarathi

 

या प्रकरणामुळे राज यांच्या करियरला सॉलिड ब्रेक बसला, हे प्रकरण एवढं वाढलं की बाळासाहेबांनी मी शिवसेना सोडतो असंही वक्तव्य केलं होतं. यातून बाहेर येईपर्यंत राज ठाकरे हे बराच काळ राजकारणापासून लांब राहिले आणि या पहिल्याच झटक्याने त्यांच्या करियरमध्ये मोठी अडचण निर्माण केली होती.

 २. जेव्हा खुद्द राज यांनी कार्याध्यक्ष म्हणून उद्धव यांचं नाव पुढे केलं :

ही घटना आहे शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनाची जेव्हा निवडणूक आयोगाने बऱ्याच नियमात बदल केले होते आणि त्याप्रमाणे एक राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेतही ते बदल होणं, निवडणूक आयोगाप्रमाणे साचेबद्ध रचना करणं भाग होतं.

या सगळ्यामुळे आता बाळासाहेब आपला उत्तराधिकारी राज यांनाच करणार अशी बऱ्याच जणांची खात्री पटली होती, पण नेमकं त्या अधिवेशनाला बाळासाहेब अनुपस्थित होते, आणि तेव्हा खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदासाठी सादर केलं आणि त्यांची निवड झाली.

नंतर बाळासाहेब यांना याबाबत विचारणा झाल्यावर “या मुलामुलांनी काय ठरवलं याची मला काहीच कल्पना नाही” असं म्हणून बाळासाहेब मोकळे झाले.

 

thackrey family inmarathi

 

राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला बसलेला हा दुसरा धक्का होता आणि यामुळेच खरंतर या २ भावांच्या नात्यात कटुता यायला सुरुवात झाली होती.

३) जेव्हा शिवसेना सोडून मनसे उभी राहिली :

उद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर एकंदरच शिवसेनेत धुसफूस व्हायला सुरुवात झाली होती, कित्येकांच्या मनातला असंतोष आता ओठावर येऊ लागला होता आणि अशातच राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देत एक मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.

“माझा वाद माझ्या विठ्ठालाशी नसून त्यांच्या आजूबाजूच्या बडव्याशी आहे, मी कधीच शिवसेना तोडणार नाही फोडणार नाही” असं म्हणत राज यांनी शिवसेनेला राम राम ठोकला!

शिवसेनेचे विश्वासू नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनंतर काही महिन्यांतच राज ठाकरेसुद्धा बाहेर पडले आणि स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना!

 

mns inmarathi

 

पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्यासमोर पहिली निवडणूक होती २००७ च्या महानगरपालिकांची ज्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि इथूनच त्यांनी पक्षबांधणीकडे लक्ष देत आपली वाटचाल सुरू केली.

४) २००९ च्या निवडणूका :

पहिले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसेने मराठीचा मुद्दा उचलून धरला, महाराष्ट्रभर प्रचंड आंदोलनं झाली, मनसेची खळखट्याक भूमिका लोकांसमोर आली.

परप्रांतीय येऊन इथल्या मुलांच्या संधी हिरावून घेत आहेत हे दाखवून राज यांनी तरूणांवर गारुड केलं, याची चर्चा थेट संसदेपर्यंत झाली आणि राज ठाकरे यांना पहिल्यांदा अटक झाली आणि त्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली.

 

raj thackrey arrest inmarathi

 

याचा फायदा मनसेला झाला, मोजक्याच ठिकाणी निवडणूक लढवून लाखो मतं राज यांनी मिळाली, सेना भाजपाची बरीचशी मतं मनसेने खाल्ली. २००९ ची विधासभा निवडणूक राज यांच्यासाठी खूप महत्वाची होती.

या निवडणुकीत राज यांच्या पक्षाचे १३ आमदार विधानसभेत निवडून आले ज्यांनी विधानसभा गाजवली. २०१२ ची मुंबई महानगरपालिका निवडणूकही राज यांनी गाजवली त्यानंतर नाशिकच्या महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडवकला.

यानंतर मात्र राज यांच्या कारकिर्दीला जी उतरती कळा लागलीये ती अजूनही तशीच आहे.

५) २०१४ च्या निवडणुकीतला पराभव :

मनसेला आधीच घरघर लागायला सुरुवात झालेली असतानाही गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना गुजरात दौऱ्यासाठी खास आमंत्रण दिलं, त्यानंतर गुजरातचा कायापालट बघून राज यांनी पंतप्रधान व्हावे तर नरेंद्र मोदीच असा प्रचार करायला सुरुवात केली हे जगजाहीर आहेच!

 

raj thackrey and narendra modi inmarathi

 

मोदी आणि राज ठाकरे भेटीमुळे तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरवात झाली की भाजपा आणि मनसे एकत्र येणार, सेनेला सोडून भाजपा मनसेसोबत युती करणार अशा वावड्या उठू लागल्या.

२०१४ नंतर देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढवण्यात आणि मोदी लाट आणण्यात राज यांचाही तितकाच समावेश होता. पण अखेरीस २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबतच जायचा निर्णय घेतला आणि इथून राज यांच्या पक्षाला उतरती कळा लागली.

विधानसभेत १३ आमदार निवडून येणाऱ्या पक्षाचा केवळ एकच आमदार २०१४ च्या निवडणुकीत निवडून आला होता, आणि हा राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेसाठी सर्वात मोठा पराभव ठरला.

 

mns mla inmarathi

 

पुण्यातून निवडून आलेले शरद सोनवणे हेदेखील काही दिवसांनी मनसे सोडून शिवसेनेत सामील झाले. मधल्या काळात नरेंद्र मोदींची स्तुती करणारे राज ठाकरे यांनी त्यांची आलोचना करण्याचा पवित्रा घेतला!

नंतर मुंबईमधले मनसेचे बरेचसे नगरसेवक हे शिवसेनेत गेले आणि तिथेही राज ठाकरेंना पराभव स्वीकारावा लागला. २०१९ मध्येही तीच पुनरावृत्ती झाली आणि अखेर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

 

mahavikas aghadi inmarathi

 

कलासक्त नेता, उत्कृष्ट वक्ता, आणि सगळ्या विषयातली जाण असणारे राज ठाकरे हे लवकरच कमबॅक करतील, एखादा ठोस मुद्दा त्यांना मिळाला किंवा विस्कटलेल्या पक्षाची घडी त्यांनी पुन्हा नीट बसवली तर नक्कीच महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही राज ठाकरे यांचा डंका पुन्हा वाजेल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?