आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
६० ते ८० च्या दशकांत ऋषिकेश मुखर्जी यांचे सिनेमे गाजत होते. हे सिनेमे नेहमीच्या हिंदी सिनेमांच्या पठडीबाहेरचे असत.
साधा सुधा नायक, मध्यमवर्गीय वातावरण, साधे घरगुती सेट, तसेच घरगुती वाटणारी पात्रे, आणि हलका फुलका विनोद असणारी मनोरंजक कथा हे या सिनेमांचे वैशिष्ट्य असे.
त्यांच्या सिनेमात अवास्तव हिरो, मारामाऱ्या, नाच-गाणी नसे. सर्व कुटुंबाने मिळून पाहावे असे सोज्वळ आणि तरीही मनोरंजक सिनेमे देण्यात ऋषिकेश मुखर्जी यांचा हातखंडा होता.
त्यांच्या अशा सिनेमांत अगदी सुपरस्टारनी देखील कामं केली. पण हे सुपरस्टार त्यांच्या सिनेमात नेहमी साधेसुधे वाटले. ही त्यांच्या सिनेमांची खासियत होती.
अशा साध्या सिनेमांतूनही तेव्हाचे सुपरस्टार काम करायला तयार होत होते. कारण ऋषिकेश मुखर्जी या नावाची जादुच तशी होती!
गुलजार, बासू चटर्जी इत्यादी सोबती –
असे सिनेमे देणारे तेव्हा ऋषिकेश मुखर्जी एकटे नव्हते, बासू चटर्जी, गुलजार ही नावे देखील तितकीच लोकप्रिय होती.
या लोकांनी एकसे बढकर एक नॉन ग्लॅमरस पण सुपरहीट सिनेमे दिले. यात गुलजार यांचे नमकीन, खुबसूरत, परिचय, खुशबू, किनारा असे अनेक चित्रपट होते.
तसेच ऋषिकेश मुखर्जी यांचे अनाडी पासून अनुपमा, चुपके चुपके, गोलमाल, बावर्ची, नमक हराम, गुड्डी, अनुराधा, मिली, आनंद असे अनेक चित्रपट होते.
बिमल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली –
बासू भट्टाचार्य, बासू चटर्जी, गुलजार, ऋषिकेश मुखर्जी ही सगळी मंडळी बिमल रॉय या सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक यांच्या हाताखाली तयार झालेली मंडळी होती.
स्वतः बिमल रॉय यांनी अनेक सुपरहीट पण साधे चित्रपट दिले होते. त्यात बंदिनी, सुजाता, मधुमती अशा अनेक चित्रपटांची नावे आहेत.
ऋषिकेश मुखर्जी हे सायन्सचे विद्यार्थी होते. त्यांना बायोकेमिस्ट मध्ये करीअर करण्याची इच्छा होती खरंतर. त्या विषयात त्यांनी बीएस.सी आणि नंतर एम.एससी देखील केले होते.
परंतु बिमल रॉय त्यांना मुंबईत घेऊन आले. आणि आपल्या सिनेमांच्या एडिटींगचे काम त्यांना सोपवले. त्यांना एडिटींगचे उत्तम ज्ञान होते. त्यांची एडीटींगची एक वेगळी शैली होती.
त्यामुळे सिनेमाला उठाव येत असे. त्यांच्यामुळेच हिंदी सिनेमात एडीटिंगची नवीन शैली प्रस्थापित झाली. ऋषिकेश मुखर्जी हे फार कमी बोलत. स्वतःबद्दल तर कधी फारसे बोलत नसत.
एकदा त्यांनी सांगितले होते की बिमल रॉय यांनी त्यांना शिकवलं होतं –
‘तुला जर फिल्म बनवायची असेल, तर फिल्मच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी तुला यायला हव्यात. त्याप्रमाणे मी त्या साऱ्या शिकून घेतल्या होत्या.’
ऋषिकेश मुखर्जी अशा रितीने आपल्या साऱ्या यशाचं श्रेय आपले गुरू बिमल रॉय यांना देतात. याचप्रमाणे ते आपल्या यशाचे श्रेय राज कपूर आणि दिलीप कुमार यांना देखील देतात.
राज कपूर, दिलीप कुमार यांच्याशी दोस्ती –
ऋषिदा यांनी राज कपूर यांना घेऊन अनाडी हा सिनेमा तर दिलीप कुमारला घेऊन मुसाफिर हा सिनेमा बनवला होता. मुसाफिर त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा.
या सिनेमात पैसे न घेता दिलीपकुमारने काम केलं होतं. या सिनेमात माणसाचं आयुष्य म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र होय हे दाखवलं होतं.
आनंद सिनेमा आणि राज कपूर यांचे कनेक्शन –
ऋषिदांच्या फिल्मी करीअरमधील मानाचे पान म्हणजे त्यांचा ‘आनंद’ हा सिनेमा होय. या सिनेमाची कहाणी त्यांना राज कपूर यांच्या आजारपणावरून सुचली होती.
राज कपूर आणि ऋषिदा हे खूप घनिष्ट मित्र होते. हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. राज कपूर हे एकदा खूप आजारी पडले होते.
तेव्हा मित्र या नात्याने ऋषिकेश मुखर्जी यांना त्यांची खूप काळजी वाटत होती आणि भीतीही.
आपण आपला हा इतका चांगला मित्र गमावून तर बसणार नाही ना या अनामिक भीतीत त्या काळात ते राहात होते.
तेव्हा राज कपूर त्यांना ‘बाबू मोशाय’ या नावाने हाक मारून जीवनाचे तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करत. यावरूनच त्यांनी नंतर ‘आनंद’ हा सिनेमा बनवला होता.
यातील आनंद सैगलचे पंजाबी पात्र म्हणजे वास्तवातील राज कपूर यांचे पात्र होते. आणि अमिताभने साकारलेली भास्कर बॅनर्जी या बंगाली डॉक्टरची भुमिका म्हणजे स्वतः ऋषिकेश मुखर्जी होते.
राज कपूर आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यात इतकी दाट मैत्री होती, की राज कपूर यांच्या आजारपणात ऋषिकेश मुखर्जी अस्वस्थ झाले होते.
त्यांना गमावण्याच्या कल्पनेने भयभीत झाले होते. त्याच परीणामातून आनंद सिनेमाच्या कथानकाने आकार घेतला होता.
आनंद सिनेमा आणि राजेश खन्ना व अमिताभ बच्चन –
मात्र आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.
तो आपल्या करिअरच्या शिखरावर पोचलेला होता. तर अमिताभ बच्चन हा तेव्हा उभरता कलाकार होता. त्याच्या नावाचा गाजावाजा अजून व्हायचा होता.
मात्र या सिनेमानंतर राजेश खन्नाच्या यशाला उतरती कळा लागत गेली आणि अमिताभच्या यशाचा ग्राफ हा तिथून उंचावतच गेला तो अगदी आजतागायत.
आनंद सिनेमाच्या वेळी या दोघांच्या अभिनयाच्या चर्चा होत असत. या नंतर या दोघांना घेऊन ऋषिकेश यांनी नमक हराम सिनेमा देखील बनवला.
तेव्हाही या दोघांच्या अभिनयाच्या चर्चा झाल्या आणि कोण श्रेष्ठ कलाकार म्हणून मिडीयात चघळल्या गेल्या. त्यातून अमिताभने राजेश खन्नाला अभिनयात खाऊन टाकल्याची भाषा बोलली गेली.
आणि दोन्ही सिनेमात कमी संवाद असलेली आणि गंभीर असलेली भूमिका मिळून देखील अमिताभ भाव खाऊन गेला.
त्यानंतर राजेश खन्नाने कधीही अमिताभ बरोबर पुन्हा एकत्र काम केले नाही. त्याला एक प्रकारचा भयगंड सतावू लागला होता असे म्हटले तरी चालेल.
ऋषिकेश मुखर्जी हे नंतर हिंदी सिनेमाजगतातले मानाचे, थोर व्यक्तिमत्व बनले होते. त्यांच्या सिनेमात त्या वेळच्या बहुतेक सगळ्या मोठ्या कलाकारांनी काम केलं.
त्या सगळ्यांबरोबर मुखर्जी यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले.
‘त्या वेळचा माईलस्टोन म्हणून गणला गेलेला ‘दो बिघा जमीन’ या सिनेमाची कहाणी ही ऋषिदानीच लिहिली होती. त्यांनी विविध सिनेमे दिले.
आजही त्यांचे नाव घेतले की या सगळ्या चित्रपटांची नावे आपल्या डोळ्यासमोरून झरझर सरकतात.
या सर्व सिनेमांनी जवळपास दोन-तीन पिढ्यांना ‘आनंद’ दिला. आणि आजही हे सिनेमे तितकेच ताजे वाटतात. कधीही टिव्हीवरील कुठल्या चॅनेलवर लागले की आपण तिथे खिळून बसतोच.
एवढेच नव्हे तर पुढच्या पिढीतल्या तरूणांनाही हे सिनेमे तितकेच भावतात हे विशेष!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.