' कधीकाळी मातोश्रीवर वजन असणाऱ्या स्मिता ठाकरे शिंदेच्या भेटीला? !! – InMarathi

कधीकाळी मातोश्रीवर वजन असणाऱ्या स्मिता ठाकरे शिंदेच्या भेटीला? !!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर नवीन सरकार स्थापन झालं असलं तरी सत्तासंघर्ष अजूनही सुरूच आहे. याच दरम्यान एक चित्र समोर आलं जे चर्चेचा विषय ठरलं. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेतील बंडखोरीबाबत स्मिता यांना विचारले असता, मी समाजसेविका असून राजकारणात नसल्याने मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे स्मिता यांनी सांगितले.

स्मिता म्हणाल्या, “मी राजकारणात नाही, मला याबद्दल काहीही माहिती नाही.” पण मित्रांनो १९९५-९९ या काळात त्या शिवसेनेतील एक शक्तिशाली व्यक्ती होत्या… आणि एकेकाळी युतीचं सरकार असताना घेतल्या गेलेल्या अनेक निर्णयांमध्ये स्मिता यांचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सहभाग राहिला आहे.

इतकेच नाही तर नारायण राणे यांना मनोहर जोशी यांना पर्याय म्हणून समोर आणणार्‍या ‘स्मिता’च होत्या. तेव्हा तुम्हाला या गोष्टीची नक्कीच उत्सुकता वाटेल की बाळासाहेबांची सून याओळखी व्यतिरिक्त स्मिता ठाकरे या कोण आहेत? चला तर जाणून घेवू कोण आहेत या स्मिता ठाकरे?

राजकारणात कुणीही कायमचा शत्रु नसतो किंवा कायमचा मित्र नसतो, असं बोललं जातं. त्याची प्रचिती अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी अस्तित्वात आली तेव्हा महाराष्ट्रात आली. मात्र आश्चर्यकारकरित्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर आणि अर्ध्याहून अधिक शिवसेना फुटल्यानंतर उद्धव यांच्याविरुद्ध आता अनेक नेते आपल्या मनातील खदखद बोलून दाखवत आहेत.

 

smita im 1

 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्धव यांना अत्यंत अविश्वासू संबोधलं होतं. त्यातच आज स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. बुद्धिबळाच्या पटलावरील चौसष्ट घरातल्या प्याद्यामध्ये एकच राणी असते आणि इतर वेळी जारी ती सक्रिय नसली तरी योग्य संधी मिळताच ती आपले अस्तित्व दाखवून त्या संधीचे सोने करते. स्मिता ठाकरे यांना बघताना त्या ‘राणीची’ आठवण येते.

१९९९साली शिवसेनेची सत्ता गेली आणि त्यानंतर शिवसेना पक्षात अंतर्गत दोन गट दिसू लागले. एक गट राज ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानत असे आणि दुसरा उद्धव ठाकरेंना. मात्र, या दोघांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती शिवसेनेची धुरा हाती घेण्याच्या स्पर्धेत होती. ती व्यक्ती म्हणजे स्मिता ठाकरे.”

लेखक वैभव पुरंदरे यांनी ‘बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना’ या पुस्तकात हे लिहिलं आहे. पुढे उद्धव ठाकरे यांचं ‘मातोश्री’ आणि शिवसेनेत वजन वाढत गेलं. पर्यायानं स्मिता ठाकरे स्पर्धेतून बाहेर पडल्या. राज ठाकरे तर पुढे शिवसेनेतूनच बाहेर पडले आणि नवा पक्ष स्थापन केला. पण एक गोष्ट इथं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे, या घडामोडींच्या अगदी १०र्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबात प्रवेश केलेल्या स्मिता ठाकरे यांना थेट बाळासाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं.

 

uddhav thackeray im

 

या प्रसंगी असो वा नंतर कित्येक प्रसंगी, ‘स्मिता ठाकरे’ हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या चित्रपटसृष्टीत कायम आपलं वजन राखून राहिले, चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. आजही काही ना काही निमित्तानं स्मिता ठाकरेंची चर्चा होत राहतेच. स्मिता ठाकरे या पूर्वाश्रमीच्या ‘स्मिता चित्रे’.

पासपोर्ट ऑफिसमध्ये त्या रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी करत होत्या शिवाय स्वत:चे असे ब्युटी पार्लर चालवत होत्या. तिथे जयदेव ठाकरे यांची पहिली पत्नी येत असे. तेव्हा स्मिता आणि जयदेव यांची ओळख आणि जवळीक तयार झाली.

आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देवून जयदेव यांनी १९८७ मध्ये स्मिता शी लग्न केलं होत.. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्याशी १९८७ साली झालेल्या विवाहानंतर त्या ‘मातोश्री’च्या सूनबाई झाल्या. पत्रकार योगेश पवार याबाबत अधिक सांगतात “ठाण्यातील एका अत्याधुनिक जिमच्या उद्घाटनासाठी बाळासाहेब ठाकरेंसोबत स्मिता ठाकरेही आल्या होत्या.

साधारण १९९६ सालची ही गोष्ट असेल. स्मिता ठाकरे यांचा राजकीय वर्तुळातील वावर आम्हा पत्रकारांना तेव्हापासून दिसू लागला.” बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर ‘मातोश्री’वरील स्थितीबाबत पत्रकार धवल कुलकर्णी त्यांच्या ‘द कझन्स ठाकरे’ पुस्तकात शिवसेनेच्या एका नेत्याच्या हवाल्यानं विश्लेषण नोंदवतात.”मीनाताईंच्या निधनानंतर ठाकरे कुटुंबात बऱ्याच गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या होत्या.

मीनाताई गेल्यामुळे कुटुंबात एकप्रकारचं रिकामेपण आलं होतं आणि ते भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि स्मिता ठाकरे प्रयत्न करत होते,” तसंच, यात पुढे नमूद करण्यात आलंय की, “याच ‘किचन कॅबिनेट’मुळे पुढे राज ठाकरे, स्मिता ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि इतर अशा संघर्षाला सुरुवात झाली.”

स्मिता ठाकरे यांची राजकीय महत्त्वकांक्षा तेव्हा लपून राहिली नव्हती. त्यांचा शिवसेना पक्ष आणि एकूणच राजकारणातील वावर वाढल्याचं स्पष्टपणे दिसू लागलं होतं. शिवसैनिकांनाही हे कळलं होतं आणि एकूणच महाराष्ट्रालाही दिसत होतं की स्मिता ठाकरे यांचं राजकीय वजन वाढलं आहे.

स्मिता ठाकरे यांचा शिवसेनेतील वावर आणि वजन युती सरकारच्या काळात वाढलेलं दिसलं, तरी नंतर उद्धव ठाकरेंच्या हाती निर्णयप्रक्रिया येऊ लागली, २००३ ला तर उद्धव ठाकरेंकडे पक्षच जवळपास सोपवला गेला, त्यानंतर मात्र स्मिता ठाकरे बाजूला सरत गेल्या.२००८-०९मध्ये ज्यावेळी स्मिता ठाकरेंना राज्यसभेत सदस्यपद हवं होतं,मात्र, बाळासाहेबांना ते आश्वासन पूर्ण करता आलं नाही. कारण तेव्हा शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती एकवटून स्थिरावली होती.

 

smita im 2

 

यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून राज्यसभेत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांना पाठवलं आणि स्मिता ठाकरेंच्या आशा मावळल्या.”बाळासाहेबांनी म्हटलं होतं की राज्यसभेत पाठवू. पण त्यांनी पाठवलं नाही. का पाठवलं नाही त्याचं कारण माहित नाही. मात्र, राज्यसभेच्या व्यासपीठावरून मी माझे मुद्दे नीट मांडू शकते, असं मला वाटतं,” असं स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या.त्यामुळे स्मिता ठाकरे यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा कधीच लपून राहिल्या नाहीत.

हे झालं त्यांचं राजकीय आणि काहीसे कौटुंबिक प्रवासातील टप्पे. मात्र, स्मिता ठाकरे म्हटल्यावर जितक्या तातडीनं ‘ठाकरे कुटुंबातील सून’ अशी ओळख समोर येते, त्याच्या मागोमाग ‘सिनेनिर्माती’ ही ओळखही समोर येत.

१९९९सालच्या ‘हसिना मान जाये’ पासून त्यांनी राहुल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं होतं. त्यापूर्वी१९९६ राहुल प्रॉडक्शन्सने ‘सपूत’ सिनेमाचीही निर्मिती केली होती. मात्र, तेव्हा निर्मात्यांमध्ये नाव जयदेव ठाकरे यांचं होतं.

जूहूमध्ये सपूत सिनेमाचं प्रीमियर होतं. त्यावेळी स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे हे निर्माते म्हणून तिथं होतेच. मात्र, बाळासाहेब ठाकरेही तिथे होते. पुढे स्मिता ठाकरे यांचा सिनेसृष्टीतील वावर आणि वजन वाढत गेलं. त्यांच्या आडनावाचा त्यांना फायदा झाला.

सिनेमासृष्टीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) च्या २००१ ते २००३ या काळात त्या अध्यक्ष होत्या.सिनेमांच्या पार्टी असो किंवा सिनेमाशी संबंधित एखादा कार्यक्रम असो, स्मिता ठाकरे आयोजनात असतील तर मोठमोठे कलाकार हजेरी लावतात.

सिनेमा आणि मालिकांमध्येही त्यांनी काही उल्लेखनीय निर्मिती केल्या. जसं की, हसिना मान जायेगी (१९९९), हम जो कह ना पाये (२००५), सँडविच (२००६) आणि सोसायटी काम से गई (२०११) सारखे सिनेमांची निर्मिती स्मिता ठाकरे यांनी केली. काही हिंदी आणि मराठी मालिकांचीही स्मिता ठाकरे यांनी निर्मिती केली. हिंदी सिनेसृष्टीत शिवसेनेची ताकद स्मिता ठाकरेंनी वाढवली.

 

smita im 4

जेव्हा पवारांना डॉक्टरांनी सांगितलं, ”तुमच्याकडे फक्त ६ महिनेच आहेत”

शिंदे गटाला एकहाती टक्कर देणाऱ्या शिवसेनेच्या ह्या वाघाचा इतिहास विलक्षण आहे!

स्मिता ठाकरे आता सिनेमा किंवा राजकीय वर्तुळात सक्रिय दिसत नसल्या, तरी त्या गेल्या अनेक वर्षांपासून ‘मुक्ती फाऊंडेशन’ चालवतात. शिक्षणासह विविध क्षेत्रात या फाऊंडेशनद्वारे काम केलं जातं. मात्र, प्रामुख्याने ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांसाठी, तसंच एड्सबाबत जनजागृती याबाबत मुक्ती फाऊंडेशनद्वारे काम केलं जातं.

पासपोर्ट ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय मुलीपासून जबरदस्त राजकीय वर्चस्व गाजवण्यापर्यंतचे स्मिता यांच्यातील जीवनातील बदल एखाद्या बॉलीवूडच्या स्क्रिप्टप्रमाणे होता.

मागील काही वर्षांत स्मिता यांचा शिवसेनेशी फारसा संबंधही दिसून आला नाही. मात्र अलीकडेच त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपले जुने कार्यकर्ते म्हणून संबोधलं. त्यामुळे स्मिता पुन्हा शिंदे गटात सक्रिय होतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?