' शिंदे गटाला एकहाती टक्कर देणाऱ्या शिवसेनेच्या ह्या वाघाचा इतिहास विलक्षण आहे! – InMarathi

शिंदे गटाला एकहाती टक्कर देणाऱ्या शिवसेनेच्या ह्या वाघाचा इतिहास विलक्षण आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्र विधानसभेत काल विश्वास दर्शक ठराव नवनिर्वाचित सरकारने जिंकला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महिन्याभरापासून सुरू असलेलं नाटक अखेर संपलं. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेलं विधानसभा अधिवेशन महाराष्ट्राच्या जनतेने विक्रमी संख्येने टीव्हीवर बघितलं आणि त्यांना ‘उठाव’ करणाऱ्या सर्व आमदारांचा चेहरा परत एकदा दिसला.

काल एकेका भाषणानंतर विधानसभेत पिकलेला हशा बघून सामान्य जनतेमध्ये संभ्रम, मतभेद निर्माण करणाऱ्या आमदारांमध्ये सारं काही आलबेल आहे असं चित्र महाराष्ट्राच्या जनतेला बघायला मिळालं.

इतके वर्ष आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण सध्या आपल्या कर्माने शांत झालेल्या शिवसेना पक्षाच्या केवळ ‘भास्कर जाधव’ या आमदाराचा आक्रमक पवित्रा काल विधानसभेत बघायला मिळाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक असलेले इतर ४० आमदार यांचा भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या जुन्या घटनांचा दाखला देत चांगलाच समाचार घेतला. स्वभावाने आक्रमक पण वाणीने संयमी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी भास्कर जाधव यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली खरी, पण लोकांचं लक्ष हे ‘भास्कर जाधव’ यांनीच अधिक वेधून घेतलं. कारण, ते शिवसेनेच्या वतीने मुद्देसूद, आक्रमकपणे बोलणारे एकमेव शिवसैनिक वाटत होते. कोण आहेत हे ‘भास्कर जाधव’ ? त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द कशी घडली आहे? जाणून घेऊयात.

 

eknath shinde featured IM

 

कोकणातील शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणाऱ्या भास्कर जाधव यांचा जन्म १ ऑगस्ट १९५७ रोजी तुरंबव या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता. घरातील जेमतेम परिस्थिती सुधारवण्यासाठी ते चिपळूणला स्थलांतरित झाले. लहानपणी त्यांनी ट्रक क्लिनरचं काम केलं आहे.

काही वर्ष हा संघर्ष करत त्यांनी ट्रक चालक होण्याचा परवाना मिळवला. ट्रक चालक असतांना त्यांनी स्वतःचे काही ट्रक विकत घेतले. एनरॉन ही कंपनी जेव्हा भारतात ‘गुहागर’ येथे आपले पाय रोवू पाहत होती तेव्हा भास्कर जाधव हे ‘ट्रान्सपोर्ट कन्ट्रॅक्टर’ झाले आणि सर्वप्रथम शिवसेनेच्या संपर्कात आले.

राजकारणात करिअर करायचं हे त्यांनी तरुणपणीच ठरवलं होतं. १९८२ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत सदस्य म्हणून प्रवेश केला. आपल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनू शिवसेना चिपळूण तालुका प्रमुख हे पद मिळवलं. दहा वर्ष पक्षाचा प्रचार केल्यानंतर १९९२ मध्ये त्यांना जिल्हा परिषद सदस्य हे पहिलं राजकीय पद त्यांना मिळालं.

१९९५ मध्ये भास्कर जाधव यांना रामदास कदम यांच्या शिफारसीमुळे शिवसेनेकडून आमदारकीचं तिकीट मिळाल्याचं सांगितलं जातं. भास्कर जाधव यांनी ही निवडणूक सहजपणे जिंकली आणि ते चिपळूणचे आमदार झाले. अथक परिश्रम आणि काम करण्याची आक्रमक पद्धत यामुळे भास्कर जाधव यांची कोकणात लोकप्रियता वाढत होत होती.

 

bhaskar im 2

 

शिवसेनेने या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यांना १९९९ मध्ये परत तिकीट दिलं. आपल्या पक्षाने आपल्यावर टाकलेला हा विश्वास भास्कर जाधव यांनी परत एकदा सार्थ ठरवला आणि ते पुन्हा एकदा आमदार झाले.

शिवसेनेतून राष्ट्रवादीकडे :

२००४ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मात्र शिवसेनेने भास्कर जाधव यांना तिकीट दिलं नाही. भास्कर जाधव यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी शिवसेना नेतृत्व आणि मिलिंद नार्वेकर यांना नावं ठेवत शिवसेना सोडली. अपक्षपणे निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण, ते कोकणातील शिवसेनेच्या उमेदवाराला हरवू शकले नाहीत.

२००६ मध्ये त्यांनी सुनील तटकरे यांच्या विनंतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भास्कर जाधव यांना विधान परिषद सदस्य ही निवडणूक लढवण्याची संधी दिली. ‘रामदास कदम’ या शिवसेनेच्या अनुभवी नेत्याचा भास्कर जाधव यांनी या निवडणुकीत पराभव केला.

भास्कर जाधव हे नाव तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध झालं आणि त्यांना रत्नागिरीचं पालकमंत्री आणि नगरविकास, वन मंत्री अशी महत्वाची पदं, खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

२०१३ मध्ये भास्कर जाधव यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाची धुरा सोपवण्यात आली होती. २०१४ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आली. पण, भाजपा लाटेतही भास्कर जाधव आपल्या मतदारसंघातून निवडून येण्यात यशस्वी ठरले.

भास्कर जाधव हे राजकारणा व्यतिरिक्त त्यांच्या चिपळूण मधील भव्य वाढदिवस सोहळ्यांमुळे आणि त्यांच्या मुलाच्या शाही लग्न समारंभामुळे नेहमीच चर्चेत राहिले. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ते दरवर्षी राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह असलेलं घड्याळ हजारो लोकांना वाटायचे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेला त्यांचा बंगला आणि तिथे रात्री २.३० वाजेपर्यंत मुलाच्या लग्नाच्या मिरवणुकीची परवानगी या वादग्रस्त गोष्टींमुळे विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं.

पुन्हा शिवसेनेत :

२०१९ पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. पण, उदय सामंत यांच्यासोबत असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे आणि भाजपाला वाढता प्रतिसाद बघून भास्कर जाधव हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.

 

bhasjar jadhav im

 

२००४ मध्ये शिवसेना भवनात ताटकळत ठेवल्याने पक्ष सोडलेले भास्कर जाधव हे २०१९ मध्ये शिवबंधनात पुन्हा एकदा बांधले गेले. भास्कर जाधव गुहागर येथून परत एकदा आमदार म्हणून निवडून आले. पण, यावेळी ‘महाविकास आघाडी’च्या रूपाने एक नवीन राजकीय आव्हान त्यांच्यासमोर होतं.

भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांची स्वतःची आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. पण, मंत्रिमंडळात स्थान मिळवणं भास्कर जाधव यांना शक्य झालं नाही आणि त्यांनी शिवसेनेविरुद्ध परत एकदा नाराजीचा सूर आळवला.

अधिवेशनात आक्रमकपणा :

भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या मंत्रिपद न देण्याच्या निर्णयावरून न्यायालयात अधिकृत तक्रार देखील नोंदवली. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. भास्कर जाधव तरीही शिवसेनेसोबतच राहिले. शिवसेनेकडून त्यांना विधानसभेत ‘तालिका अध्यक्ष’ हे पद देण्यात आलं होतं. याच काळात त्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ या पदवीने सुद्धा गौरवण्यात आलं होतं.

५ जुलै २०२१ रोजी भास्कर जाधव यांचं नाव परत एकदा चर्चेत आलं जेव्हा पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी आपली आक्रमकता दर्शवत भाजपाच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन केलं होतं. आपल्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय राबवला होता.

वैयक्तिक पातळीवर भास्कर जाधव यांनी आपला राजकीय वारसा पुढे सुरू राहील याची तरतूद करून ठेवली आहे. त्यांचा एक मुलगा समीर जाधव हा नगरसेवक आहे तर त्यांचा लहान मुलगा विक्रांत जाधव हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. तुरंबव या आपल्या गावी गेल्यावर भास्कर जाधव हे नेहमीच भाताची शेती आणि इतर धार्मिक कार्यक्रमात एका सामान्य गावकऱ्याप्रमाणे सहभागी होतात हे त्यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणता येईल.

 

bhaskar inmarathi

शिवसेना पक्षाला आज भास्कर जाधव सारख्या निष्ठावान नेत्यांची आवश्यकता आहे जे की पक्षातील दुसरी फळी मजबूत करतील आणि प्रसंगी पक्ष श्रेष्ठींना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतील किंबहुना तो निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडतील.

विरोधक जितका आक्रमक तितकी सुप्रशासनाची खात्री या उक्तीप्रमाणे येत्या काळात भास्कर जाधव यांची आक्रमकता ही जनतेच्या कशी उपयोगी पडेल हे बघणं रंजक असणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?