' ‘जवा नवीन पोपट हा…’ महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गाण्यामागचा भन्नाट किस्सा – InMarathi

‘जवा नवीन पोपट हा…’ महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गाण्यामागचा भन्नाट किस्सा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘आवड मला ज्याची मी…’ हे गाणं विठ्ठल शिंदे यांनी मला गायला सांगितलं. माझ्या आवाजात ते रेकॉर्ड झालं. पण कॅसेट कंपनी हे गाणं घेण्यास तयार नव्हती. शेवटी आठव्या क्रमांकाला हे गाणे टाकून कॅसेट तयार झाली.

हे गाणं एवढं गाजलं की कंपनीने ‘नवीन पोपट’ या नावाचीच कॅसेट बाजारात आणली. त्या कॅसेटचा एवढा खप झाला की, कंपनीने मला मारुती ८०० व टीव्हीएस सुझुकी गाडी भेट दिली. आजही ही लकी गाडी मी जपून ठेवली आहे.”

‘जेव्हा नवीन पोपट हा’ ह्या गाण्याचे गायक आनंद शिंदे ही आठवण सांगतात, तेव्हा त्यांचे भूतकाळात रमलेले मन आणि पाणावलेले डोळे बराच काही सांगून जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मराठी संगीत विश्वातील हे एक ‘एव्हरग्रीन’ गाणं आहे. आजच्या काळातही, तरुणाई या गाण्यावर थिरकताना दिसते. मिरवणूक, मग ती कोणतीही असो आनंद शिंदे यांच्या गाण्यांची फर्माईश होतेच होते आणि अंगात वार भरल्यासारखी पोर मिरवणुकीत नाचायला लागतात.

८० च्या दशकात ही स्थिति काही वेगळी नव्हती. अगदी हिन्दी सिनेसृष्टीला या गाण्याची भुरळ पडली आणि ‘पाप की दुनिया’ या चित्रपटात दस्तुरखुद्द किशोर कुमार यांनी या गाण्याचा ‘नवीन अवतार’ ( हिन्दी गाणे ) गायला होता.

मित्रांनो, हे उडत्या चालीचे गाणे जेवढे भन्नाट, तेवढीच भन्नाट आहे त्याची जन्मकथा!

‘आवड ज्याची मला मी त्यालाच आणले
तुझ्या ग बोलण्याला आता मी मानल
शेजारची ही काळी मैना लागली डोलायला
जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’

 

jawa navin popat im

 

मित्रांनो हे गाणे आजपर्यंत तुम्ही अनेकदा, अनेक ठिकाणी ऐकले असेल, कधीतरी तुमचे पाय या गाण्यावर थिरकले ही असतील पण मित्रांनो गाण्याच्या या पहिल्या चार ओळीतच एक खमंग किस्सा दडला आहे आणि तो किस्सा आहे कव्वाली सामन्याचा!

झाले असे, की त्यावेळी आनंद-मिलिंद यांना म्हणावी तशी ओळख मिळालेली नव्हती. एकदा मुरबाडला कव्वालीचा सामना आयोजित केला गेला होता आणि त्यावेळच्या ज्येष्ठ गायिका रंजना शिंदे विरूद्ध मिलिंद शिंदे असा तो सामना होता.

तेव्हा प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांचं ‘तुझ्या जवळची पेरुची फोड, लाल लाल पाहुनी, हा पोपट माझा, मिठू मिठू करतोय येड्यावाणी…’ हे गाणं खूप गाजत होतं.

महाराष्ट्रातील त्यावेळचं हे एकमेव पोपटगीत होतं. या गाण्याचा, गीतकार मानवेल गायकवाड यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. त्यामुळे मानवेल गायकवाड यांनी ‘आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं,….जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला ‘ हे गाणं मिलिंद शिंदेंसाठी लिहिलं.

 

popat im

 

मिलिंद शिंदे यांनी मुरबाडच्या सामन्यात हे गाणं गायलं देखील होतं, परंतु या गाण्याची चाल त्यावेळी वेगळी होती. गाण्याच्या या ओळींमागे एक अजब किस्सा होता तो एकदा गाण्याचे गीतकार मानवेल गायकवाड यांनी सांगितला होता.

रंजना शिंदे आघाडीच्या आणि सीनियर गायिका होत्या. तर मिलिंद नवखे होते. त्यामुळे रंजना शिंदे यांना कव्वालीच्या सामन्यात जेरीस आणायचं ठरलं.

म्हशीलकरांच्या गाण्यावरून पोपटाचं गाणं लिहायचं, मिलिंद नवखा असल्याने त्याला नवीन पोपट म्हणायचं आणि रंजना शिंदेंना म्हातारी मैना चिडवायचं, अस ठरलं. त्यानुसार गाणं लिहिलं गेलं.

गाण्याची चाल सुरुवातीला वेगळी होती तरीही गाण्यानं हंगामा केला. त्यानंतर रेकॉर्डिंग वेळी हे गाणं आनंद शिंदे यांना आवडलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड झालं. त्यातील ‘म्हातारी मैना’ ऐवजी ‘काळी मैना’ हा शब्द घेण्यात आला.

 

anand shinde im

 

तर आनंद शिंदे सांगतात, की मला आणि मिलिंद यांना घेऊन गाण्याची एक कॅसेट निघावी अशी आमचे वडील आणि प्रसिद्ध लोकगायक प्रल्हाद शिंदे यांची इच्छा होती. त्यांनी प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे तशी इच्छा बोलून दाखवली होती.

विठ्ठल शिंदे ही कॅसेट करायला तयार झाले. त्यासाठी गाण्यांची निवड करण्यात आली आणि गाण्याला चाली लावण्यास सुरुवात झाली. तब्बल दीड महिना या कॅसेटसाठी च्या गाण्याच्या प्रॅक्टिस करण्यात आल्या.

विठ्ठल शिंदे यांच्या घरीच ही गाणी बसवली जात होती, पण हे गाणं मला आवडलं आणि रेकॉर्डिंगवेळी हे गाणं मी गातो असं मी मिलिंदला सांगितलं.

 

popat im1

 

मिलिंदनेही मला हे गाणं दिलं आणि माझ्या आवाजात गाणं रेकॉर्ड झालं आणि पुढचा सारा इतिहास घडला, पण त्या आधी देखील अडचणींचा डोंगर काही संपला नव्हता.

पोपटाच्या गाण्यावर आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती. सहा चाली लावून समाधान झाले नाही, म्हणून विठ्ठल दादांनी सातवी चाल लावली. ती चाल सर्वांना आवडली. त्यानंतर आम्ही रेकॉर्डिंगसाठी गेलो, पण व्हिनसच्या रेकॉर्डिंग विभाग प्रमुखांनी गाणं रेकॉर्ड करण्यास नकार दिला.

विठ्ठल दादा हट्टालाच पेटले. अखेर या गाण्यासाठी दोन बैठका घेतल्या गेल्या आणि गाणं कॅसेटमध्ये घेण्यास रेकॉर्डिंग विभाग प्रमुखाने होकार दिला, पण नंतर आनंद-मिलिंदच्या आवाजात कॅसेट करण्यास या रेकॉर्डिंग विभागप्रमुखांनी नकार दिला.

ही नवीन पोरं काय गाणार? कॅसेटची विक्री होईल का? असे सवाल त्यांनी केले. तिथेही विठ्ठल दादांचा हट्ट पुन्हा अडवा आला आणि कॅसेट बाजारात आली, पण कॅसेटचा काहीच खप झाला नाही.

लोकांनी गाणं उचलून धरलं नाही. त्यानंतर पुन्हा हा अधिकारी वैतागला. त्यांनी विठ्ठल शिंदेंना बोलावून घेतलं आणि नव्या पोरांकडून गाऊन घेतल्यामुळेच गाणं गाजलं नसल्याचं सांगितलं.

विठ्ठल दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांना आकाशवाणीवर हे गाणं वाजवायला सांगितलं आणि पेपरला गाण्याची जाहिरात देण्याची सूचना केली.

ही मात्रा लागू पडली आणि गाणं हिट झालं. कॅसेट हातोहात खपली. कंपनीला लाखोंचा फायदा झाला तर आनंद-मिलिंद आम्ही दोघे भाऊ या गाण्यामुळे रातोरात स्टार झालो.

मित्रांनो असा एकच क्षण, एकच घटना, एकच संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते. त्यावेळी घेतलेला योग्य निर्णय तुमचे आयुष्य बदलून टाकतो… जवा नवीन पोपट हा … हॅट्स ऑफ टू दीज लेजंड्स!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?