' ३५ वर्षं हवेत गायब झालेलं विमान अखेर पायलटच्या मृतदेहाने जमिनीवर आणलं! – InMarathi

३५ वर्षं हवेत गायब झालेलं विमान अखेर पायलटच्या मृतदेहाने जमिनीवर आणलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जे एल ५० नावाची एक वेबसिरीज मध्यंतरी फारच चर्चेत होती. एका वर्षी एका काळातून उडालेलं विमान थेट काही वर्षानंतर प्रकट होतं. खराब हवामानामुळे ते क्रॅश होतं आणि त्यातून एक व्यक्ती मात्र वाचते. जे विमान अनेक वर्षांपूर्वी उडालं आणि अदृश्य झालं, ते आत्ता अचानक कसं प्रकट होऊ शकतं यावर अनेकांनाच आश्चर्य वाटतं.

उत्तम अभिनय आणि एका वेगळ्या विषयाचा प्रयोग यामुळे ही सिरीज अनेकांच्या पसंतीस सुद्धा पडली होती. मात्र हे असं एका काळात उडालेलं विमान अनेक वर्षं गायब होऊन परत येऊ शकतं का? अशी घटना सत्यात घडू शकते का?

 

JL 50 IM

 

असे प्रश्न विचारले तर कुणीही व्यक्ती नाही असंच उत्तर देईल. मात्र अशीच की घटना खरोखर घडली असल्याचं म्हटलं जातं. कधी उडालं होतं हे विमान, नेमकं काय झालं होतं? चला जणू घेऊया.

…आणि विमान हवेतच गायब झालं :

वीकली वर्ल्ड न्यूज यांच्या १९८९ साली प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार सॅंटियागो एअरलाईन्सचं एक विमान फ्लाईट ५१३ हे ४ सप्टेंबर १९५४ रोजी जर्मनीहून ब्राझीलकडे निघालं. १८ तासांचं प्रवास पूर्ण करून हे विमान ब्राझीलमध्ये लँड होणं अपेक्षित होतं. मात्र हे विमान ब्राझीलला पोचलंच नाही. हवेतच अचानक गायब झालं.

अटलांटिक महासागरावरून प्रवास करत असताना अचानक विमानाचा संपर्क तुटला आणि विमान गायब झालं. साहजिकपणे हे विमान क्रॅश झालं असावं असा कयास केला गेला.

 

santiago flight IM

 

महासागराच्या वरील भागात क्रॅश झालेलं आणि त्यातच कोसळलेलं विमान आणि त्याचे अवशेष मिळणं जवळपास अशक्यच होतं. बराच काळ शोधकार्य करून झाल्यानंतर, या विमानाला जलसमाधी मिळाल्याचं मान्य केलं गेलं.

ब्राझीलमध्ये लँडिंग…

३५ वर्षानंतर म्हणजेच १९८९ साली मात्र एक विचित्र घटना घडली. १९८९ सालच्या डिसेंबर महिन्यात ब्राझीलच्या पोर्टो ऑलेग्री या विमानतळावर एक अनधिकृत विमान घिरट्या घालत असल्याचं लक्षात आलं. हा तोच विमानतळ होता, जिथे सॅंटियागो फ्लाईट ५१३ १९५४ साली लँड होणार होतं.

ते विमान गायब झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच सॅंटियागो एअरलाईन्स बंद झाली होती. या विमानाच्या पायलटशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विमानतळावरील मंडळींना कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर काही वेळाने ते विमान एका रिकाम्या रनवेवर लँड झालं. विमानाची अवस्था आणि इंजिनची स्थिती अत्यंत उत्तम होती. विमान लँड झालं आहे म्हटल्यावर ते नेमकं कुठून आलं आहे हे जाणून घेणं आवश्यक होतं.

मोठ्या हिंमतीने आणि सावधपणे या विमानाचे दरवाजे बाहेरून उघडण्यात आले. आतली परिस्थिती पाहून मात्र विमानतळावरील लोक हादरून गेले.

नुसतेच हाडांचे सांगाडे…

या विमानाच्या आतमध्ये एकही जीवित व्यक्ती नव्हती. उलट ८८ प्रवाशी आणि ४ क्रू मेम्बर्स अशा ९२ व्यक्तींचे सांगाडे या विमानात आढळून आले. हे संगाडे अत्यंत सुस्थितीत असल्याचं यावेळी म्हटलं गेलं होतं.

 

plane disapear IM

 

प्रत्येक सांगाडा योग्यरितीने सीटवर बसलेल्या स्थितीत होता. त्यावर सिटबेल्ट्स लावलेलं होते. हे पाहून या विमानविषयी अधिकच आश्चर्याची भावना निर्माण झाली.

विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटच्या जागेवर सुद्धा केवळ सांगाडा होता. तो सांगाडा सॅंटियागो ५१३ चा कॅप्टन मिग्युल व्हिक्टर क्युरी याचा असल्याचं म्हटलं जातं. या सांगाड्याचा हात विमान उडवणाऱ्या सिस्टिम वरच होता हेदेखील विमानात शिरलेल्या लोकांनी पाहिलं आहे.

डॉक्टर सेल्सो अतेल्लो या पॅरानॉर्मल तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार हे विमान टाइम लूपमध्ये अडकलेलं असण्याची शक्यता आहे. दुसरी कुठलीच बाब याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. अर्थात, एका सांगाड्याने विमान लँड कसं केलं याविषयी मात्र कुठलंही स्पष्टीकरण नाही.

या घटनेमागचं सत्य काय?

ब्राझीलमध्ये ३५ वर्षानंतर लँड झालेल्या या विमानाची कथा सत्य आहे का? असा प्रश्न केला तर ही कथा सत्य नसावी असं दर्शवणारी काही कारणं समोर येतात.
पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे, वीकली वर्ल्ड न्यूज यांचा काल्पनिक कथा लिहिण्याचा नावलौकिक!

१९८९ साली सॅंटियागो ५१३ विषयी लेख लिहिण्याआधी पॅन अमेरिकन ९१४ या विमानाविषयी अशीच एक कथा त्यांनी प्रसिद्ध केली होती. ३७ वर्षं अदृश्य असणारं एक विमान, चक्क जसंच्या तसं लँड झाल्याचा या कथेचा आशय होता.

ही कथा खोटी आहे असं मानण्याचं आणखी एक कारण म्हणजे, या विमानाबद्दल सांगितली जाणारी कथा, १९६१ सालच्या एका शोमधील एपिसोडशी साधर्म्य साधणारी आहे. ‘द ट्वायलाईट झोन’ मधील ‘ द ऑडिसी ऑफ फ्लाईट ३३’ या एपिसोडमधील विमान टाइम ट्रॅव्हल करून भूतकाळात जातं असं दाखवण्यात आलं आहे.

 

airlines IM

 

या दोन्ही कारणांपेक्षा महत्त्वाचं आणि अधिक ठोस कारण म्हणजे १९५४ साली सॅंटियागो ५१३ नावाचं कुठलंही विमान गायब झालेलं असल्याचा कुठलाच लिखित पुरावा नसणं. थेट १९८९ साली वीकली वर्ल्ड न्यूजमध्ये याविषयीची बातमी असल्याचं पाहायला मिळतं.

सरकार आणि इतर अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की…

सॅंटियागो ही विमान कंपनी १९५६ सालीच बंद झाली होती. त्यामुळे त्यावेळी सॅंटियागोमध्ये काम करत असलेल्या लोकांना सुद्धा १९५४ सालच्या या फ्लाईटबद्दल फार काहीच ठाऊक नव्हतं.

अनेक गुप्तचर संघटनांनी याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही त्या विमानबद्दल आणि त्या घटनेबद्दल उघडपणे मत मांडण्याची तयारी दाखवली नाही. टाइम लूपबद्दल मांडण्यात आलेल्या विषयांवर कुठलंही भाष्य करण्याचं सरकारने टाळलं.

एकीकडे या घटनेबद्दल ठोस पुरावे नसल्याने सत्यासत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. मात्र सरकार आणि इतर अधिकाऱ्यांनी यावर काहीही भाष्य करण्याचं नाकारलं असल्यामुळे, टाइम ट्रॅव्हलशी संबंधित खरोखरंच काही अस्तित्वात असावं आणि त्याविषयी सगळ्यांना कळल्यामुळे भीतीची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.

याच कारणासाठी याविषयी चर्चा केली जात नाही, असंही म्हटलं जात आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?