' …..आणि रोलर कोस्टरची राईड हवेतच थांबली, ही घटना वाचून काळजात धडकीच भरेल – InMarathi

…..आणि रोलर कोस्टरची राईड हवेतच थांबली, ही घटना वाचून काळजात धडकीच भरेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काहीतरी साहसी करण्यात आपल्याला आनंद मिळतो. रोजच्या व्यस्त शेड्युलमधून थोडा विरंगुळा म्हणून आपल्यातल्या अनेकांना साहसी गोष्टी करायला आवडतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

साधारण नवरात्रीच्या सुमारास आपल्यातल्या अनेकांनी कधी ना कधीतरी गावाकडच्या जत्रेत जाणं अनुभवलं असेल. अतिशय उंचावर जाऊन खाली येताना पोटात गोळा आणणाऱ्या आकाशपाळण्यात आपण एकदातरी बसलेले असू. आपणच नाही तर आपल्यालासोबत आकाशपाळण्यात बसलेली मोठी माणसंही वरून खाली येताना उत्साहात आणि घाबरून जोरात ओरडली असतील.

कुणीतरी आधीच भीत भीत अशा डोकं गरगरवणाऱ्या पण तरीही मजा आणणाऱ्या आकाशपाळणा आणि तत्सम चित्तवर्धक उपक्रमांचा भागच झालेलं नसतं. तर त्यात बसून झाल्यानंतर बाकीचे आपल्याला कशी भीती वाटत होती आणि तरीही किती भारी वाटत होतं हे हा अनुभव न घेतलेल्यांना रंगवून रंगवून सांगतात.

 

roller coaster im

 

पण हे केवळ साहसच न राहता अचानक संकटच झालं तर? थ्रिल अनुभवायला म्हणून आपण जात बसलोय त्यातून आपण आनंद आणि भीती अशा संमिश्र भावना अनुभवत असताना पुढचा बराच वेळ आपण उलटेच टांगून राहिलो तर? तेही इतक्या उंचावर?

काळजात धडकी भरवणारी अशीच एक घटना अमेरिकेतल्या एका ‘अम्युझमेंट पार्क’मध्ये घडलीये. तिथली एक रोलर कोस्टर अचानक थांबल्यामुळे त्यात बसलेले लोक तब्बल ४५ मिनिटं ‘खाली डोकं वर पाय’ या अवस्थेत उलटेच टांगून राहिले होते.

अंगावर शहारे आणणारी ही घटना नेमकी कशी घडली? रोलर कोस्टरमध्ये बसलेल्यांची आणि त्यांच्यासोबत आलेल्यांची या यामुळे नेमकी काय अवस्था झाली? जाणून घेऊ.

अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये ‘कॅरोविंड्स अम्युझमेंट पार्क’ नावाचं एक अम्युझमेंट पार्क आहे. तिथे मजा करायला गेलेले काही जण ‘फ्लाईंग कोब्रा’ नावाच्या एका रोलर कोस्टरमध्ये बसले आणि त्यांचा तो अनुभव आनंदी न ठरता निराळ्याच अर्थाने लक्षात राहील असा ठरला.

‘फॉक्स ५९’ च्या एका वृत्तानुसार, गेल्या शुक्रवारी ‘फ्लाईंग कोब्रा’ मध्ये बसलेले लोक त्याच्यातच अडकून पडले. १२५ फूट उंच असलेली ही रोलर कोस्टर ५०एमपीएच च्या स्पीडने एकूण ६ वेळा लोकांना ३६० डिग्रीमध्ये फिरवते, पण या खेपेला ही रोलर कोस्टर सुरू असताना अनपेक्षितपणे मध्येच थांबली.

रोलर कोस्टरमधले लोक तब्बल ४५ मिनिटं डोकं जमिनीकडे आणि पाय वरच्या दिशेने या अवस्थेत होते. इतका वेळ अशाच स्थितीत थांबावं लागलेल्या लोकांसाठी हा अनुभव चांगलाच भीतीदायक ठरला. सुदैवाने, या सगळ्यात कुणालाही कुठल्याही प्रकारे दुखापत झाल्याची नोंद झाली नाही.

 

rollercoaster im

 

ब्रॅन्डन ऍलेन हा इसम या पार्कमधला आपला पहिलावहिला रोलर कोस्टर राईडचा अनुभव घेण्यासाठी फार उल्हासित झाला होता. पण त्यानंतर फारच अनपेक्षितपणे गोष्टी घडल्या.

आपल्याला आलेला हा भयप्रद अनुभव ‘फॉक्स ५९’ला सांगताना ते म्हणाले, “आमच्या आधारासाठी तिथे जे लोक होते त्यांना आम्ही काय झालंय असं विचारल्यावर काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. ते आम्हाला सरप्राईज द्यायला आमची मस्करी करत आहेत असं आधी आम्हाला वाटलं पण ते तसं नव्हतं.”

३५ ते ४५ मिनिटांत ही राईड दुरुस्त होईल असं त्यांना सांगण्यात आलं होतं, पण ती काही मिनिटं आम्हाला काही तासांसारखी भासली असं ब्रॅन्डन यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “हा काही फार जास्त वेळ नव्हता. पण जेव्हा तुमचं डोकं अशाप्रकारे पूर्णतः जमिनीकडे असतं तेव्हा ही फार मोठी गोष्ट असते. “सगळं ठीक होईल.”, असं लहानग्या मुलांचे पालक त्यांना ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते.”

गेल्या महिन्यातही ‘इलेक्ट्रो स्पिन राईड’मध्ये अशाच प्रकारे राइडर्स अडकून पडल्याची घटना घडली होती हेही ब्रॅन्डन यांनी सांगितलं. ऍलेन म्हणाले, “हे सतत घडताना दिसतंय. त्यामुळे हे फारच भीतीदायक वाटू लागलंय.”

घडल्या प्रकारानंतर ‘कॅरोविंड्स अम्युझमेंट पार्क’ने यासंदर्भात एक स्टेटमेंट रिलीज केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, “शुक्रवारी २९ एप्रिलला कॅरोविंड्स इथल्या ‘काऊंटी फेअर’ इथे असलेली ‘फ्लाईंग कोब्राज’ ही रोलर कोस्टर सुरू असताना अचानक थांबली.

पार्कच्या ‘मेंटेनन्स टीम’ ने यात तातडीने लक्ष घातलं आणि त्या वेळात त्यात बसलेल्यांना कुठलाही धोका पोहोचला नाही. त्या सगळ्यांना स्टेशनवर सुरक्षितपणे परत आणलं गेलं आणि ३० मिनिटांत उतरवलं गेलं.

 

roller coaster im1

 

आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या आणि सहयोग्यांच्या सुरक्षिततेला कॅरोविंड्स’ सर्वाधिक प्राधान्य देतं.” कोस्टरमध्ये अडकलेल्या प्रत्येकाला प्रत्येकी २ फास्ट पास व्हाउचर्स दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अशा साहसी उपकरणांच्या देखभालीकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे, ते जर दिलं नाही तर त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात हेच वरच्या उदाहरणातून लक्षात येतं.

ही घटना जरी परदेशातली असली तरी आपल्याकडच्या जत्रांमधल्या अशा साहसी उपक्रमांमध्ये आपण आता सहभागी व्हायचं की नाही याविषयी आपल्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण करणारी आहे. तूर्तास, वरच्या या घटनेत कुणाच्याही जीवाला काही धोका पोहोचला नाही याविषयीच हायसं वाटून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?