' “फिल्म इंडस्ट्रीत महिलांना सुगीचे दिवस आलेत” धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं निरीक्षण – InMarathi

“फिल्म इंडस्ट्रीत महिलांना सुगीचे दिवस आलेत” धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं निरीक्षण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ओटीटी माध्यमं आणि थेटरमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समांतर चालतील अशी परिस्थिती असतानाच लॉकडाऊननंतर अनेक चित्रपटदेखील ओटीटी माध्यमांवरच प्रदर्शित झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ओटीटी माध्यमांसाठी हा नक्कीच सुकाळ आहे असं म्हणता येईल.

आजच्या घडीला अनेक आघाडीच्या कलाकारांना ओटीटी माध्यमांवर आपली वर्णी लावायची असते. आजही आपलं स्टारडम टिकवून ठेवलेले काही जुने कलाकारही याला अपवाद नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसुद्धा ‘द फेम गेम’ या वेबसिरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. २५ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर ही सिरीज प्रदर्शित होणार असून यातलं माधुरी दीक्षित साकारत असलेलं पात्र अनामिका आनंद नावाच्या अभिनेत्रीचं आहे.

 

madhuri dixit IM

 

ही सिरीज एक सस्पेन्स थ्रिलर असून अनामिका आनंदच्या गायब होण्याभोवती हे कथानक फिरतं. यानिमित्ताने माधुरीने आपण काम करायला सुरुवात केली त्या काळाच्या मानाने आज फिल्म इंडस्ट्रीत महिलांच्या बाबतीत झालेला बदल सुखावह आहे असं म्हटलंय.

माधुरी दीक्षितने १९८४ साली ‘अबोध’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यावेळी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच चित्रपटनिर्माते स्त्री पात्राला मध्यवर्ती ठेवून चित्रपट बनवायचे. फारच कमी लेखकांच्या संहितेत अभिनेत्रीचं पात्रं उत्तम रंगवलं जायचं.

आज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”

 

madhuri dixit 2 IM

 

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना माधुरी म्हणाली, “आजच्या काळात स्त्रीप्रधान चित्रपट हे केवळ आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणारी स्त्री, एक पीडित महिला कशी सगळ्या अडथळ्यांवर मात करत वर आली याच विषयांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आज चित्रपटांमध्ये दाखवली जाणारी स्त्रीपात्रं आपल्या रोजच्या आयुष्यातल्या स्त्रियांसारखीच असतात. त्यांच्याकडे ‘पुरुष’ किंवा ‘स्त्री’ अशा चष्म्यांतून न बघता माणूस म्हणून बघितलं जातं. आज कामावर जाणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत कामं करणाऱ्या, क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या अशा सगळ्या स्त्रियांचं स्त्रीपात्रांच्या माध्यमांतून चित्रण केलं जातंय. हे छानच आहे कारण यामुळे तुम्हाला पडद्यावर तर्हेतर्हेच्या भूमिका साकारायला मिळतात आणि त्या भूमिकांद्वारे महिलांना पडद्यावर बरंच काही करता येण्यासारखं असतं.”

स्त्रियांच्या कथा पुढे आणण्यात ओटीटी माध्यमांचा खूप मोठा वाटा असल्याचं ती सांगते. प्रेक्षक आधीपेक्षाही प्रगल्भ होऊन अधिक संवेदनशील झाल्यामुळेही हा बदल झाला असल्याचं मत ती नोंदवते.

माधुरी पुढे म्हणते, “ओटीटी माध्यमं आल्यानंतर चित्रपटांमध्ये महिलांचं जसं चित्रण केलं जायचं त्यापेक्षा फार वेगळं चित्रण या माध्यमांतून केलं जातंय हे प्रेक्षकांनी पाहिलं. ओटीटी माध्यमांवरच्या वेब सिरीज मधली महिलांची पात्रं उत्तम लिहिलेली आणि उत्तम विकसित केलेली असतात. लेखक आता पितृसत्ताक विचारसरणीतून संहिता न लिहिता आधुनिक संवेदनेतून लेखन करत आहेत. आता प्रेक्षकही प्रगल्भ झालेत आणि त्यांना केवळ एक नृत्य करणारी आणि मोजकेच संवाद म्हणणारी स्त्रीपात्रं पाहायची नाहीयेत तर अधिकाधिक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये स्त्रियांना पाहायचंय. सगळ्यांसाठी ही निश्चितच सुखावह बाब आहे.”

 

madhuri dixit 3 IM

माधुरीची वेबसिरीजही अनामिका आनंद या मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या सुपरस्टारच्या आयुष्यावर आहे. अनामिका आनंद या पात्राच्या ग्लॅमरस आयुष्यातली काळी गुपितं  या सिरीजमध्ये ती गायब झाल्यानंतर आपल्या समोर येणार आहेत.

ओटीटी माध्यमाकडे कशी वळले याविषयी बोलताना वेब सिरीजमधून जितकं सविस्तरपणे कथानक मांडलं जातं ते आपल्याला आवडत असल्याचं माधुरी सांगते.

माधुरी म्हणते, “तुम्ही चित्रपट बघता तेव्हा अवघ्या २ ते ३ तासांत तुम्हाला सगळं कळतं. पण असं विस्तृतपणे कथानक मांडताना तुम्हाला तुमच्या कथा सांगण्यासाठी बराच वेळ मिळतो. प्रत्येक पात्राची पार्श्वभूमीही सांगता येते. मुख्य कथानकाच्या बरोबरीनेही इतरही अनेक कथा वेब सिरीजमध्ये घडत असतात. त्यामुळे सगळीच पात्र खूप रंजक होतात आणि तुम्ही त्या दुनियेत पुरते रममाण होता.”

 

OTT platform IM

 

प्रत्यक्षातली माधुरी आणि या सिरीजमधलं तिचं पात्रं यात काही साम्य आहेत का असं तिला विचारल्यावर ती म्हणाली, “अनामिका ही मोठी स्टार आहे. बॉलिवूडमधलं मोठं नाव आहे आणि आजही तिने तिचं स्थान टिकवून ठेवलं आहे हे इतकंच साम्य आमच्यात आहे. माझ्या आयुष्यापेक्षा तिचं आयुष्य, तिचे कौटुंबिक संबंध अतिशय वेगळे आहेत. तिने आयुष्याचं कटू वास्तव पाहिलं होतं आणि तशीच ती घडली. माझे आईबाबा नेहमीच माझ्या अवतीभवती होते आणि त्यांनी मला कायमच पाठिंबा दिला. पण अनामिकाला मात्र असं सुरक्षित वातावरण लाभलेलं नाही. त्यामुळे माझ्या प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा मी साकारत असलेली भूमिका खूपच वेगळी आहे.”

५२व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ऑफ इंडिया’च्या सोहळ्यात माधुरीचा सत्कार झाला. त्यावेळी भाषण करतानाही माधुरी म्हणाली, “स्त्रियांचं योगदान केवळ इंडस्ट्रीच्या विकासासाठीच नाही तर देशाच्या विकासासाठीही खूप महत्त्वाचं ठरत आहे.”

२०१९ साली आलेल्या ‘कलंक’ या चित्रपटातून माधुरी मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होती. मध्यंतरी इंडस्ट्रीतल्या नेपोटीजमची काळी बाजू लोकांसमोर उघडी पडली होती. नेपोटीजमचं प्रॉडक्ट नसलेल्या माधुरीने आपल्या कौशल्यांच्या आणि कष्टांच्या जोरावर या चित्रपटसृष्टीत नाव कमावलंय.

 

kalank IM

 

पूर्वीचा काळ आणि आताचा काळ अशा दोन्ही काळांची साक्षीदार असलेल्या माधुरीने आपलं हे निरीक्षण नोंदवणं ज्या स्त्रियांना, मुलींना या क्षेत्रात करियर करायची इच्छा आहे त्यांच्या मनात इंडस्ट्रीविषयी निश्चितच एक आशादायी चित्र उभं करेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?