' अटल बिहारी वायपेयी आणि राजकुमारी कौल: राजकारणातील एक विलक्षण प्रेमकहाणी – InMarathi

अटल बिहारी वायपेयी आणि राजकुमारी कौल: राजकारणातील एक विलक्षण प्रेमकहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय राजकारणातील एक प्रतिष्ठीत नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी! कवीमनाचा राजकारणी अशी ज्यांची ओळख होती ते अटल बिहारी आजन्म अविवाहीत राहिले. देशभक्तीला आयुष्य वाहून घेतलेला हा सच्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. मात्र खूप कमीजणांना त्यांच्या आयुष्यातील प्रेमाविषयी माहित आहे.

 

atal bihari vajpayee inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अटलजींची प्रेमकहाणी एखाद्या विरहगीतासारखी आहे. ती त्या काळाचा विचार करता बोल्डही आहे आणि आजच्या काळाचा विचार करता सनसनीखेज. मात्र सुदैवानं त्या काळात ना माध्यमं आजच्यासारखी चेकाळलेली होती ना सोशल मिडीया होता, ना या सोशल मिडियावरच्या ऐरे गैरे नथ्थु खैरेंची गर्दी.

आज इंटरनेट इतकं स्वस्त झालेलं आहे की कोणीही उठतो आणि कोणत्याही विषयावर आपण तज्ज्ञ असल्याप्रमाणे मत व्यक्त करतो. आजच्या घडीला अटलजी आणि राजकुमारी असत्या तर या प्रकरणाची सवंग चर्चाच जास्त झाली असती. मात्र तो काळ लोकांच्या आजगी आयुष्यात नाक न खुपसायचा, मार्दवपूर्ण आणि सभ्यता बाळगायचा होता. कोणाच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणं असभ्यपणाचं मानलं जात असे. म्हणूनच त्या काळातील अनेक दिग्गजांचे प्रेम चव्हाट्यावर चघळायची गोष्ट बनली नाही.

अनेकांचे खासगी आयुष्यातील संबंध हे पारंपारिक किंवा तत्कालीन रुढींत बसणारे नव्हते. मग ते गांधींजींचे ब्रह्मचार्याचे प्रयोग असोत अथवा विधुर जवाहरलाल यांचे ॲडविना माऊंटबॅटन आणि पद्मजा नायडू यांच्याशी असणारे कथित संबंध असोत, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया आणि ॲलनिया रमा मित्रा यांच्या सोबत विवाह न करता रहात होते. याच यादीत आणखिन एक नाव म्हणजे भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी!

 

nehru im

 

ग्वाल्हेरमधील व्हिक्टोरिया कॉलेज (सध्याचं महाराणी लक्ष्मीबाई महाविद्यालय) मध्ये शिक्षण घेत असताना या दरम्यान अटलजींचा परिचय याच कॉलेजमधे शिकणार्‍या राजकुमारी यांच्याशी झाला. अटलजी राजकुमारींकडे आकषित झाले आणि राजकुमारीनांही ते आवडू लागले.

अटलजींची मैत्री राजकुमारी यांचे बंधू चांद हक्सर यांच्याशी झाली. घरच्यांना या दोघांच्या प्रेमप्रकरणाबात समजले मात्र शिंदेंच्या छावणीत रहाणार्‍या, शाखेत जाणार्‍या आणि भविष्यात राजकारणातही उतरणार्‍या अटलजींना राजकुमारी यांच्या घरून विरोध झाला.

 

atal rajkumari im

 

कश्मिरी पंडित असणार्‍या राजकुमारी यांचा विवाह दिल्लीतील रामजस कॉलेजमधे असणार्‍या प्राध्यापक आणि कश्मिरी पंडित ब्रज नारायण कौल यांच्याशी झाला. यानंतर राजकुमारी आणि ब्रज नारायण कौल यांचा संसार सुरळीत सुरू झाला आणि अटलजींची राजकीय कारकिर्दही.

वाजपेयी दिल्लीत खासदार म्हणून आले आणि त्यांची राजकुमारींशी पुन्हा भेट झाली. यानंतर या भेटी गाठी वाढत गेल्या आणि अटलजी राजकुमारींच्या कुटुंबावा एक सदस्य बनले.

१९७८ साली अटलजी मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये विदेश मंत्री बनले आणि वाजपेयींना दिल्लीत मोठं सरकारी घर मिळालं. त्यानंतर राजकुमारी त्यांचे पती ब्रज नारायण कौल आणि दोन मुलींसहित या निवासस्थानात रहायला आल्या. त्यानंतर अखेरपर्यंत हे सर्वजण एकत्रच राहिले.

 

atal bihari im

 

अटलजींना परिचितांकडून जेवणाचं आमंत्रण आलं तर हे तिघेही जात असत इतके हे संबंध जिव्हाळ्याचे बनले होते. राजकुमारी यांची कन्या नमिता यांना वाजपेयींनी दत्तकही घेतलं. तिला आपली मानसकन्या मानून तिच्यावर पितृवत माया केली. वाजपेयींच्या मृत्यू नंतर त्यांचे अंत्यसंस्कारही नमिता यांनीच केले होते.

 

rajkumari koul im

 

अटलजी आणि राजकुमारी यांची ही खास मैत्री, खास नातं केवळ त्यांच्या कुटुंबियांनीच नाही तर राजकीय वर्तुळानंही खूप मार्दवपूर्ण रितिनं स्विकारलं होतं. सुरवातीच्या काळात मात्र संघाला वाजपेयींनी एका विवाहित महिलेसोबत रहाणं, तिच्यासोबत खास संबंध प्रस्थापित करणं मान्य नव्हतं. मात्र वाजपेयींनी या विरोधाला जुमानलं नाही. अर्थात अटल बिहारी वाजपेयी या नावाला संघातही खुप प्रतिष्ठा होती, दबदबा होता. शिवाय सक्रिय राजकारणातला संघाचा चेहरा म्हणजे अटलजी होते. कालांतरानं हे संबंध स्विकारलेही गेले.

राजकुमारी यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होतेच पण सोनिया गांधी देखिल उपस्थित होत्या.

आपल्या नात्याला समाजाच्या स्विकृतीची गरज नाही असं राजकुमारी ठामपणे सांगत असत. आमच्या दोघांत काय नातं आहे समाजाला समजावून देण्याची काहीच गरज नाही. माझ्या पतीला सगळ्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे समाज काय म्हणतोय याकडे लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही असं एका मुलाखतीत त्या बोलल्या होत्या.

 

vajpayee im

 

त्यांनी कायम अटलजींची एखाद्या सहचारिणीप्रमाणे काळजी घेतली. त्यांचं पथ्यपाणी, तब्येत, औषधपाणि सगळं त्या बघत असत. ब्रीज नारायण यांचाही अटलजींवर खूप लोभ होता. अटलजींच्या सभांनंतर ते ही सभा कशी झाली? अटलजींनी समुदायाला आपल्या भाषणानं खिळवून ठेवलं का? या सगळ्याची आपुलकीनं चौकशी करत असत. अत्यंत मनस्वी अशी ही कहाणी अधुरी राहिली हे दुर्दावंच म्हणायला हवं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?