ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून कॉमन मॅनचं ‘स्कूटर’चं स्वप्न पूर्ण करणारा भारतीय…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज बजाजचे पूर्व चेअरमन राहुल बजाज यांचे कॅन्सरसारख्या आजरामुळे निधन झाले. वयाच्या ८३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, गेल्या महिनाभरापासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख…
महाराष्ट्राची ओळख ‘ऑटोमोबाईल’ क्षेत्रातील प्रगत राज्य करण्याचं श्रेय आनंद महिंद्रा, रतन टाटा आणि राहुल बजाज या तीन व्यक्तींना देता येईल. या ऑटोमोबाईल कंपन्यांमुळे त्यांच्या गाड्यांना आवश्यक ते सुटे भाग तयार करणारे किती तरी नवीन उद्योग सुरू झाले.
पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि औरंगाबाद हे शहरं अनुक्रमे टाटा मोटर्स, महिंद्रा आणि बजाज यांच्यामुळेच प्रगत झाली. महिंद्रा आणि टाटा या उद्योग समूहांनी लोकांसाठी तयार केलेल्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने जीप, बस, ट्रक अश्या अवजड गाड्यांचा समावेश होतो.
जीप, बस सारखे वाहन प्रकार हे जगात इतरत्र आधीपासून अस्तित्वात होते. पण, बजाज कंपनीने जी स्कुटर आणि तीन चाकी भारतात तयार करणं सुरू केले त्यानंतर भारतात एक वाहन क्रांती आली.
कमी अंतर असलेल्या आणि छोटे रस्ते असलेल्या ठिकाणी जातांना पार्किंग शोधायला नको म्हणून लोक आजही दुचाकीने किंवा रिक्षाने जाणं हाच पर्याय उत्तम समजतात.
===
हे ही वाचा – टाटा सुमो हे नाव महाकाय सुमोंमुळे पडलं आहे की आणखी काही, वाचा रंजक इतिहास!
===
राहुल बजाज यांनी सुचवलेल्या “बुलंद भारत की बुलंद तस्वीर… हमारा बजाज” या ओळीने सुरू झालेल्या बजाज चेतक स्कुटरचा प्रवास खूप सुसाट होता. बजाज स्कुटरला लोकांनी घराघरात जागा दिली आणि बजाज समूहाला जगातील सर्वोच्च ऑटोमोबाईल कंपनीच्या यादीत बसवून ठेवलं.
आज बजाज गाडी तयार करण्याव्यतिरिक्त इलेक्ट्रीकल, फायनान्स सारख्या क्षेत्रात सुद्धा आपलं अढळ स्थान टिकवून आहे. ५३ वर्षांची यशस्वी कारकीर्द गाजवून राहुल बजाज यांनी नुकतीच ‘नॉन-एक्झेक्युटिव्ह चेअरमन’ या पदावरून निवृत्तीची घोषणा केली होती.
सर्वात मोठा काळ चेअरमन पद भूषवणारे राहुल बजाज हे एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जायचे. शून्यातून विश्व निर्माण करतांना राहुल बजाज यांना किती आणि कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असेल? जाणून घेऊयात.
१९२६ मध्ये राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी बजाज उद्योग समूहाची स्थापना केली. राहुल बजाज यांचे वडील कमलनयन बजाज हे १९४२ पासून बजाज उद्योग समूहा सोबत जोडले गेले.
बजाज ऑटोचा पाया कमलनयन बजाज यांनी रचला. राहुल बजाज यांनी त्यावर यशाची उत्तुंग इमारत उभी केली असं म्हणता येईल.
बालपण, शिक्षण आणि करिअरची सुरुवात :
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी राजस्थान येथे झाला होता. त्यांचे आजोबा जमनालाल बजाज हे एक यशस्वी व्यवसायिक आणि राज्यसभा सदस्य होते.
राहुल बजाज यांनी दिल्लीच्या प्रतिष्ठित स्टेफन्स कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं आणि मुंबईच्या लॉ कॉलेज मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आपलं MBA चं शिक्षण राहुल बजाज यांनी हार्वर्ड बिजनेस स्कुल मधून पूर्ण केलं.
राहुल बजाज यांनी १९६८ मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदापासून बजाज ऑटो लिमिटेडमध्ये काम करायला सुरुवात केली.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवाती पासूनच त्यांनी मार्केटिंग, पर्चेस, अकाउंट्स आणि ऑडिट या खात्यांची जबाबदारी स्वतःवर घेतली. १९६८ मध्ये राहुल बजाज हे चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर या पदावर विराजमान झाले होते.
१९७० मध्ये बजाज ‘चेतक’, ‘प्रिया’ हे स्कुटर्स ‘हमारा बजाज’ हे केवळ दोन शब्द वापरून आपलं मार्केटिंग कौशल्याने अल्पावधीतच बजाजला एक ‘ब्रँड’ म्हणून प्रस्थापित केलं.
जे त्यावेळी प्रस्थापित कंपन्यांना अवघड चाललं होतं. ‘हमारा बजाज’ ही केवळ ऑटोमोबाईल नाही तर प्रत्येक वस्तूच्या मार्केटिंगसाठी आदर्श केस स्टडी मानली जाते.
१९७० मध्ये इटलीच्या पीआयजिओने बजाजचा भारतात परवाना रद्द केला. बजाज चेतक या स्कुटरचा विचार करण्यामागे हे प्रमुख कारण होतं. बजाज चेतकचं डिझाईन हे इटलीच्या ‘व्हेस्पा’ पासून प्रेरित झालेलं असल्याचं त्यावेळी या क्षेत्रातील तज्ञांच्या लक्षात आलं होतं.
सामान्य माणसाला या गोष्टींशी काही देणं घेणं नसतं, तो बजाज चेतकला सुरुवातीच्या काळापासूनच रांगा लावून विकत घेण्यात व्यस्त होता. एक वर्षांपेक्षा अधिक काळ वाट पहावी लागली तरीही लोक त्या काळात बजाज चेतक हीच स्कुटर घ्यायचे.
इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये ‘लायसन्स राज’ ही पद्धत होती. या पद्धतीमुळे खाजगी कंपन्यांना गाडी तयार करण्याचा परवाना मिळवण्यासाठी खूप वाट बघावी लागायची.
यामुळे, ग्राहकांना स्कुटर बुक केल्यानंतर ती मिळत नसे. राहुल बजाज यांनी लायसन्स राजविरुद्ध आवाज उठवला आणि ही पद्धत रद्द करण्यात आली.
एका मुलाखतीत राहुल बजाज यांनी सांगितलं होतं की, “भारतीयांना आवश्यक असलेली कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी मी जेल मध्ये सुद्धा जायला तयार आहे.”
===
हे ही वाचा – काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या रॉयल एनफील्ड च्या ‘ह्या’ बाईक्स एकेकाळी खूप लोकप्रिय होत्या!
===
आपल्या कामाबद्दल इतकी ओढ असलेल्या राहुल बजाज यांना यश मिळणं हे तर सहाजिकच होतं. बजाज ऑटो लिमिटेडचे पुण्यातील आकुर्डी, चाकण येथे आणि औरंगाबाद जवळ वाळूज येथे बजाज बाईक्स, रिक्षा तयार करण्याचा प्लँट आहे.
बाईकला मिळणारा चांगला मायलेज, स्वस्त स्पेअर पार्ट्स, गाडीची कमी किंमत या गोष्टींमुळे बजाजच्या गाड्या या आजही बाजारात मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत.
बजाजचं यश हे वेगळं यासाठी सुद्धा आहे की, ९० च्या दशकात भारतात दाखल झालेल्या हिरो होंडा, सुझुकी, यामाहा, पीआयजीओ या मार्केट मध्ये कोणत्या तरी कंपनी सोबत भागेदारी करून सहभागी झाल्या होत्या. बजाज ऑटो लिमिटेडचे मात्र एकटे राहुल बजाज हे एकमेव मालक आहेत.
नवीन काही देण्याची प्रवृत्ती :
२००१ मध्ये बजाज चेतकची कमी झालेली लोकप्रियता लक्षात बजाज उद्योग समूहाने वेळीच आपला मोर्चा बाईक्सवर संशोधन करण्याकडे वळवला. ‘पल्सर’ बाईक ने बजाजला पुन्हा एकदा भारताच्या ऑटोमोबाईल मार्केटच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं.
राहुल बजाज यांचे सुपुत्र राजीव बजाज यांनी डायरेक्टर पदाची सूत्र सांभाळली आणि ३५ वर्ष सुरू ठेवलेल्या बजाज चेतकचं मागणी अभावी उत्पादन पूर्णपणे थांबवण्यात आलं.
आज २० वर्षानंतरही ‘पल्सर’, ‘डिस्कवर’, ‘प्लॅटिना’ यांचा खप एकत्र करून बजाजचा ऑटोमोबाईल क्षेत्रात खूप मोठा ‘मार्केट शेअर’ आहे. बजाज ‘सनी’ ही सुद्धा एकेकाळी प्रचंड लोकप्रिय गाडी होती.
बजाज पल्सर, रिक्षा व्यतिरिक्त टेम्पो या मिनीबसचे उत्पादन हक्क सुद्धा बजाज ने जर्मनीच्या कंपनीकडून विकत घेतले होते. पण, काही वर्षांनी ते ‘फिरोदिया ग्रुप’ ला विकण्यात आले ज्यांना आपण ‘फोर्स मोटर्स’ या नावाने आज ओळखतो.
कामाची पद्धत :
राहुल बजाज यांना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्य द्यायची सवय होती. स्वतः खूप सकारात्मक व्यक्तिमत्व असलेले राहुल बजाज हे लोकांना काम करत करत काम शिकवत असत. लोकांना ही त्यांची कामाची पद्धत खूप आवडते आणि म्हणून लोक बजाज कंपनी मध्ये खूप वर्ष काम करतात.
८३ वर्षांचं वय असलेल्या राहुल बजाज यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. नवीन उद्योजकांना राहुल बजाज हे खालील काही टिप्स सांगतात:
१. समोरच्याचं म्हणणं लक्ष देऊन ऐका.
२. व्यवसायिकांसारखा विचार करणाऱ्या लोकांना जबादारी ची कामे द्या.
३. आपल्या कामासोबत इतरांचं पण काम करता येईल असे कर्मचारी घडवा.
४. स्मार्ट वर्क नक्की करा, पण हार्ड वर्क ची तयारी सोडू नका.
सामाजिक योगदान :
बजाज उद्योग समूह हे ‘जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था’ या सामाजिक संस्थेअंतर्गत निराधार मुलांना शिक्षण, आयटीआयचं प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना तंत्रज्ञानाचं शिक्षण, स्त्रियांना टेलरिंगचं प्रशिक्षण, ग्रामीण भागात दवाखाना असे सामाजिक उपक्रम राबवले जातात.
२००८ मध्ये बजाज ऑटो या उद्योग समूहाने बजाज फिनसर्व्ह आणि बजाज इन्व्हेस्टमेंट होल्डिंग या दोन कंपनी सुरू केल्या आणि आपल्या ग्राहकांना वाहनासोबत वाहन विमा, वाहन कर्ज, व्यक्तिगत कर्जसारख्या सुविधा द्यायला सुद्धा सुरुवात केली होती.
कार्याचा गौरव :
२००१ मध्ये राहुल बजाज यांना उद्योग जगतातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
राहुल बजाज हे कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)चे प्रेसिडेंट म्हणून सुद्धा कार्यरत होते.
राहुल बजाज हे आज फोर्ब्स मासिकाच्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३४ व्या स्थानावर होते. त्यांनी भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्राला दिलेलं हे योगदान पुढील कित्येक वर्ष भारताच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावत राहील हे नक्की.
===
हे ही वाचा – उद्योजकांसाठी धडा: आपल्या उर्मटपणामुळे ‘फेरारी कंपनी’ने मोठा प्रतिस्पर्धी जन्माला घातला
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.