' पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का? – InMarathi

पोलिसांची खिल्ली, धार्मिक कट्टरतेला खतपाणी: बॉलिवूड त्यांच्या ‘धुंद’ विश्वातून बाहेर पडणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

कोरोना महामारीमुळे तब्बल दीड वर्षं फिल्म इंडस्ट्री ठप्प होती, आणि अखेर गेल्या नोव्हेंबरपासून थिएटर सुरू झाली आणि दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या सूर्यवंशीने बॉक्स ऑफिसवर दणक्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली, आणि सिनेबिझनेसमधला सर्वात मोठा खड्डा भरून निघाला.

एकंदरच सगळ्या व्यवसायाला चालना मिळाली, तब्बल दीड वर्षांपासून थांबलेला बिझनेस सुरू झाला, लोकांनी थिएटरमध्ये तुडुंब गर्दी केली आणि सूर्यवंशी हा पोस्ट कोविड काळातला पाहिला सुपरडुपर हीट सिनेमा ठरला ज्याने २०० करोडहून अधिक कमाई केली.

अजूनही बऱ्याच थिएटरमध्ये सूर्यवंशी सुरू असला तरी आता तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. कालच मी तो सिनेमा पाहिला आणि आपल्या फिल्म इंडस्ट्रीची कीव करावीशी वाटली, जी अवस्था फिल्ममेकर्सची तीच प्रेक्षकांचीसुद्धा.

 

sooryavanshi inmarathi 2

 

म्हणजे मास मसाला कमर्शियल चित्रपट म्हणून ही लोकं यांना वाटेल त्या गोष्टी आपल्या माथी मारतात आणि आपलं पब्लिकही मनोरंजनाच्या नावाखाली चाललेला डोंबऱ्याच्या खेळाला तिकीट काढून भरघोस यश मिळवून देतात.

रोहित शेट्टीच्या सिनेमात अजून काय अपेक्षित आहे, त्याकडे एक सिनेमा म्हणून बघा, मोठ्या पडद्यावर अशाच गोष्टी अपेक्षित असतात, मसालापट म्हणून त्याकडे बघा असं म्हणत ज्ञान पाजळणाऱ्या लोकांच्या तर विवेकबुद्धीची कीवच करावीशी वाटते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मुळात हॉलीवूडमध्येसुद्धा असे ओव्हर द टॉप सिनेमे आजही आपल्याला बघायला मिळतात, डिसी आणि मारव्हल युनिव्हर्समध्ये आणखीन असतं तरी काय?

अगदी जुने ग्रेगरी पेक, क्लिंट ईस्टवूडचे काऊ बॉय मुव्हिज, जीम कॅरीचे नॉनसेन्स कॉमेडी मुव्हिज किंवा अगदी टॉम क्रुजच्या अॅक्शन मुव्हिजमध्येसुद्धा आपल्याला सगळं ओव्हर द टॉपच बघायला मिळतं. अलिकडचे मारव्हल डिसीच्या सुपरहीरो फिल्म्समध्येसुद्धा हाच प्रकार बघायला मिळतो.

 

dc and marvel inmarathi

 

पण तरी या सिनेमात आणि हिंदी मसालापटात नेमका फरक कोणता तर conviction! हॉलिवूडमध्ये हे असे मसालापट ज्या पद्धतीने मांडले जातात त्यासाठी लागणारा आत्मविश्वास जो त्यांच्याकडे आहे आणि त्याचीच कमी आपल्याकडच्या सिनेमात जाणवते.

आपले मसालापट फक्त २ गोष्टींवर चालतात, एक म्हणजे स्टारपॉवर आणि दुसरं म्हणजे आयटम सॉन्ग! या दोन गोष्टींच्या पलीकडे जाऊन सगळा मूर्खपणाचा कळस, आणि हा मूर्खपणा लोकं मनोरंजनाच्या नावाखाली खपवून घेतात याचं वाईट वाटतं.

आता सूर्यवंशीचंच उदाहरण घ्या ना, १९९३ चे बॉम्बस्फोट आणि त्याची पार्श्वभूमी घेऊन “An eye for an eye makes whole world blind” या गांधीजींच्या स्टेटमेंटवर सुरू होणारा सूर्यवंशी बनवताना रोहित शेट्टीचा आपण ‘ब्लॅक फ्रायडे’सारखा सिनेमा आपण करतोय असा गैरसमज झाला असावा.

 

1993 blast inmarathi

 

काही रियल फुटेज आणि फोटोज दाखवून रोहित शेट्टीने सिनेमात थोडंफार वास्तवदर्शी गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्या तेवढ्यापुरत्याच, त्यापलीकडे जाऊन त्या संदर्भाचा उपयोग फक्त हिंदू चांगले की मुस्लिम हे दाखवण्यासाठीच केला गेला.

बरं रोहित शेट्टीच्या सिनेमात लॉजिक जर काही काळ बाजूला जरी ठेवलं तरी बेसिक काही गोष्टींची अपेक्षा करणं काही वावगं ठरू नये, जसं की मुंबईत ६ वेगवेगळ्या ठिकाणी गाडीत बॉम्ब प्लांट केलेले असताना मुंबई पोलिस असो की इंडियन आर्मी, ते बॉम्ब शोधण्यासाठी पहिले बॉम्ब स्क्वॉड आणि sniffer dogs यांना पाचारण करण्यात येईल, हो की नाही?

पण रोहित शेट्टीच्या सो कॉल्ड कॉप युनिव्हर्समध्ये कोणतीही सुरक्षा न बाळगता चक्क मुंबई पोलिस ऑफिसर्सच रस्त्यावर बॉम्ब शोधायला उतरतात आणि त्यांना बॉम्ब सापडतात देखील, किमान ही बेसिक गोष्टीचीसुद्धा रोहित शेट्टीच्या नॉनसेन्स सिनेमात अपेक्षा असू नये असं काही लोकांचं म्हणणं असेल तर खरंच आपल्या लोकांनी सिनेमा बघणं सोडून द्यायला हवं.

 

sooryavanshi 3 inmarathi

 

बरं सिनेमात ९३ चे बॉम्बब्लास्ट घडवणारा मोस्ट वॉन्टेड आतंकवादी जेव्हा मुंबईत येतो आणि मुंबई पोलिस जेव्हा त्याला पकडतात तेव्हा तो स्वतःला मारण्याआधी एक शेवटची इच्छा व्यक्त करतो की मला माझ्या आईच्या शेजारीच दफन करा, आणि सिनेमात दाखवलेला Anti Terrorist Squad त्या अतिरेक्याचे अंत्यविधी इमानेइतबारीत पार पाडतो.

जर उद्या दाऊद मुंबईत आला, पोलिसांनी त्याला पकडलं आणि जर त्याने त्याची शेवटची इच्छा व्यक्त केली तर पोलिस आधी त्याला गोळ्या घालतील की त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतील हा सारासार विचार तुम्हीच करून बघा, तुम्हाला पटतंय का ते!

बरं जर सिनेमात ९३ च्या बॉम्ब स्फोटांचा उल्लेख केला नसता तरी भारतीयांच्या या मानसिकतेचं कौतुक केलं असतं, पण जेव्हा ९३ सारख्या भीषण हल्ल्याची पार्श्वभूमी घेऊन जेव्हा तुम्ही सिनेमात पोलिसांना एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराचे अंत्यविधी पार पाडताना दाखवता तेव्हा सिनेमातून नेमका के मेसेज जातो हे मी वेगळं सांगायची नक्कीच गरज नाही!

मुंबईच्या एका मोठ्या जेलमधून स्लिपर सेल चालवणाऱ्या म्होरक्याला ज्या पद्धतीने जेलमधून पळवलं जातं तो सीन बघता आपल्या पोलिस यंत्रणेने यावर आक्षेप कसा  घेतला नाही याचंच आश्चर्य वाटतं.

आपली पोलिस यंत्रणा एवढीही कमकुवत नाहीये की त्यांच्यासमोर एक बॉम्ब लावून भिंत फोडून एका कुविख्यात आतंकवाद्याला पळवून घेऊन जाता येईल, आणि जर हे एवढं सोप्पं असतं तर कसाबसारख्या दहशतवाद्याला पळवायचा प्लॅन पाकिस्तानने केला नसता का?

 

kasab inmarathi
newsnation.com

बरं गेली २७ वर्षं सावंतवाडीसारख्या गावात अतिरेक्यांनी ६०० किलो RDX लपवून ठेवेलेलं आहे असं दाखवताना निदान रोहित शेट्टीने कोकण, सावंतवाडी या ठिकाणांची भौगोलिक परिस्थिति, तिथे झालेला विकास या सगळ्याची बेसिक रेकी जरी केली असती तरी ती गोष्ट लोकांनी हसत हसत मान्य केली असती.

पण फिल्ममेकिंगचे बेसिक नियमच धाब्यावर बसवून फक्त स्वतःचा गल्ला भरू पाहणाऱ्या रोहित शेट्टीच्या सिनेमातून एवढी अपेक्षा करणं देखील योग्य नाहीये म्हणा.

बरं या सिनेमातले नॉनसेन्स डायलॉग, सीन्स, अॅक्शन सिक्वेन्स, बालिश पटकथा, कतरीनाचा सो कॉल्ड ‘अभिनय’ या सगळ्याकडे दुर्लक्ष जरी केलं तरी यामध्ये हिंदू मुस्लिम संबंधांवर केलेलं भाष्य तर आणखीनच चीड आणणारं आहे.

ज्या देशात टायगर मेमनसारखा गुन्हेगार निपजला त्याच देशात एपीजे अब्दुल कलामसारखे शास्त्रज्ञसुद्धा मोठे झाले हे बेसिक लोकांना ठाऊक आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम संबंध आणि मुस्लिम लोकांची चांगली बाजू दाखवण्याचा रोहित शेट्टीचा केविलवाणा प्रयत्न बघता त्यावर हसावं का रडावं हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.

सिनेमात एका मुस्लिम मोहल्ल्यामधून एका माणसाला पोलिस अटक करून घेऊन जाताना अक्षय कुमार ज्यापद्धतीने तिथल्या लोकांसमोर मौलिक मार्गदर्शनाचं भाषण देतो ते पाहून असं वाटतं की हे असं जर आपल्या पोलिसांनी केलं असतं तर अशा कित्येक मोहल्ल्यातून त्यांचंच बाहेर पडणं मुश्किल झालं असतं!

 

gulshan grover with akshay inmarathi

 

शिवाय हिंदू लोकांना स्टीरियोटाईप करून सर्वधर्मसमभाव ही गोष्ट अधोरेखित करणारं एक गाणं या सिनेमात घालून ज्या पद्धतीने फ्रेम लावून त्यातून जो काही मेसेज दिला गेलाय तो न समजण्याइतका सध्याचा प्रेक्षक तरी मूर्ख नाही.

प्रश्न हिंदू वाईट की मुस्लिम वाईट की सिस्टिम वाईट याचा नाहीये, प्रश्न आहे तो या सगळ्या गोष्टी स्टीरियोटाइप करण्याचा. ७० किंवा ८० च्या दशकापासून आपल्या सिनेमातून एक narrative जो तयार केला आहे त्या चौकटीबाहेर जाऊन विचार करायचा प्रयत्न कुणीच करत नाही.

आणि आज देशातला एक मोठा समुदाय या अशा पद्धतशीर पसरवल्या जाणाऱ्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवतो किंवा त्यावर आपलं मत प्रदर्शीत करतो तेव्हा त्याचीच बोलती बंद केली जाते, victim card खेळून जातीय तसेच धार्मिक तेढ निर्माण केली जाते आणि मनोरंजनाच्या नावाखाली त्याच त्याच गोष्टी दाखवून १०० करोड आणि २०० करोड क्लब उभे राहतात आणि या क्लबमधूनच मग ‘धुंद’ बॉलिवूडकरांची काळी बाजू समोर येते!

 

100 crore club inmarathi

 

रोहित शेट्टीने मध्यंतरी एक स्टेटमेंटसुद्धा केलं होतं की त्याच्या आधीच्या सिनेमात जेव्हा हिंदू खलनायक दाखवला गेला तेव्हा कुठलाच वाद झाला नाही, पण माझं म्हणणं इतकंच आहे की हिंदू असो वा मुस्लिम कोणलाही निगेटिव्ह दाखवताना त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांची तयारी त्याने ठेवायला हवी.

इतकी वर्षं ज्या गोष्टी पद्धतशीरपणे आपल्या मनात रुजवल्या गेल्या आहेत त्याचा आता अतिरेक व्हायला लागल्यामुळेच याबद्दल हिंदू तितक्या उघडपणे विरोध दर्शवत आहेत.

हिंदू सहिष्णू आहेत किंवा मुस्लिम चांगले आहेत याचं सर्टिफिकेट रोहित शेट्टीने किंवा फिल्म इंडस्ट्रीने द्यायची सध्या काहीच गरज नाही, गरज आहे ती फक्त लोकांची मतं ऐकून जाणून घेऊन त्यापद्धतीने बदल करण्याची.

 

rohit shetty inmarathi

 

एक सिनेमा म्हणून सूर्यवंशी किती चांगला किती वाईट ते नंतर ठरवता येईल पण फिल्म्समधून पद्धतशीरपणे लोकांच्या मानसिकतेवर घाला करून एक ठराविक विचारधारा पुढे रेटणं हे कुठेतरी थांबायला हवं!

अर्थात हे तेव्हाच थांबेल जेव्हा प्रेक्षक या असल्या सिनेमांना मनोरंजनाच्या नावावर डोक्यावर घेणं थांबवतील. विद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?