' नेहमीचा मसालापट, समजून-उमजून केलेला ‘स्मार्ट रिमेक’ की आणखीन काही? – InMarathi

नेहमीचा मसालापट, समजून-उमजून केलेला ‘स्मार्ट रिमेक’ की आणखीन काही?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक बनणार असून खुद्द भाईजान सलमान खानने त्याचे हक्क विकत घेतले आहेत ही बातमी जेव्हा कानावर आलेली तेव्हा एक तीव्र सणक डोक्यात गेली होती, पण आज तो रिमेक बघितल्यावर एक सुखद धक्काच बसलाय हे मान्य करावंच लागेल!

सध्या बॉलिवूड म्हणजेच आपली हिंदी फिल्म इंडस्ट्री ही फक्त आणि फक्त रिमेकच्या जोरावर चालू आहे हे सत्य आहे. बरं आधी फक्त साऊथकडच्या सिनेमांचे रिमेक व्हायचे, पण आता डिजीटल माध्यमातून साऱ्या जगाशी जोडलं गेल्याने कोरियन जपानी आणि इतर भाषेतल्या सिनेमांचेसुद्धा रिमेक अगदी सर्रास होऊ लागले होते.

 

hindi remake inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रिमेक ही काही नवीन गोष्ट नाही, मराठीतला ‘अशी ही बनवा बनवी’सारखा अजरामर सिनेमासुद्धा एका फ्लॉप हिंदी चित्रपटाचा रिमेक होता, तर हिंदीतला ‘मशाल’सारखा सिनेमा हा ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकावर बेतलेला होता.

खरंतर हे सगळं इथे मांडण्यामागचा एकच उद्देश की त्या काळातही रिमेक होत होते, पण त्या रिमेकमध्येसुद्धा काहीतरी नावीन्यपूर्ण गोष्टी आपल्याला बघायला मिळायच्या, पण सध्या सरसकट सिनेमाचे हक्क घेऊन त्याचा फ्रेम टू फ्रेम रिमेक करण्याचा फंडा बघता बॉलिवूडमधल्या लोकांची विचारशक्ती खुंटली आहे असंच दिसून येतंय!

सैराटच्या रिमेकनंतर बॉलिवूडकरांनी मराठी सिनेमाच्या वाट्याला कधीच जाऊ नये असं वाटू लागलं होतं, कारण हिंदी प्रेक्षकांना केटर करण्यासाठी त्यात जो मसाला घातला जातो त्यामुळे त्या सिनेमाचा मूळ आत्मा हरवून बसतो असं माझं ठाम मत आहे, पण मुळशी पॅटर्नचा रिमेक ‘अंतिम – द फायनल ट्रूथ’ बघताना तसं जाणवलं नाही.

या रिमेकमध्येसुद्धा काही बदल करण्यात आले आहेत, पण सिनेमाच्या मूळ आत्म्याला धक्का न लावता हा रिमेक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल्याने सलमानचा हा सिनेमा सहनीय आहे.

 

antim the final truth inmarathi

 

प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न हा खूप हार्ड हिटिंग सिनेमा आहे, त्यामानाने अंतिम हा तसा बराच टोन डाउन केलेला आहे. मुळशी पॅटर्न ही फक्त एका जिल्ह्याची किंवा तालुक्याची गोष्ट नसून साऱ्या देशाची कहाणी आहे, आणि हीच कहाणी देशभरात पोहोचवण्यात महेश मांजरेकर यशस्वी झाले आहेत.

कदाचित एखाद्या अमराठी माणसाने या सिनेमाचा रिमेक केला असता तर आज याविषयी एवढं चांगलं बोललं गेलं नसतं हेदेखील तितकंच खरं आहे. ज्या कळकळीने प्रवीण तरडे यांनी हा विषय हाताळला होता तितक्याच पोटतिडकीने मांजरेकर यांनी या सिनेमाचं smart adaption केलं आहे!

शेतकऱ्यांच्या समस्या, पैशाच्या हव्यासापोटी जमिनी विकून खाणं आणि पुढची युवा पिढी नासवणं हा एकंदर प्रकार अंतिममध्येसुद्धा तितक्याच प्रभावीपणे मांडला आहे फक्त त्यात थोडेफार बदल केले असल्याने मुळशीएवढा तो हार्ड हिटिंग ठरत नाही. काही सीन्स फारच उथळ असले तरी ते बघताना खटकत नाही कारण डोक्यात एक गोष्ट पक्की असते की हा रिमेक आहे!

मुळशी पॅटर्नची पटकथा ज्याप्रमाणे उलगडते त्याच्या अगदी विरुद्ध अंतिम आहे. एका पाठलागाच्या सीनमधून संपूर्ण सिनेमाचं कथानक आपण मुळशी पॅटर्नमधून उलगडताना पाहिलं, पण अंतिममध्ये हेच कथानक बऱ्यापैकी सरळसोट मांडलं आहे.

 

mulshi pattern inmarathi 2

 

शिवाय मुळशी पॅटर्नमध्ये सुरुवातीला आकाशात झेप घेणारी घार, आणि तिच्याच नजरेतून खाली दिसणारी डेवलपमेंटच्या कॅन्सरने ग्रसित झालेली शहरं आणि उपेंद्र लिमयेच्या आवजातून ही शहरं बकाल कशी झाली याचं स्पष्टीकरण हे सगळं अंतिममध्ये बघायला मिळत नाही!

अंतिमची सुरुवात राहुल्याच्या गाव सोडण्यापासून होते, तिथून पुढे त्याचं पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये येणं, इथल्या गुन्हेगारी विश्वात त्याचं पाऊल पडणं आणि पुढच्या प्रवासाची गोष्ट मुळशी पॅटर्नमध्ये जशी समोर आली आहे तशीच इथेसुद्धा येते.

काही सीन्स नव्याने घेतले असून काही सीन्स जसेच्या तसे रिमेक केले आहेत. शिवाय मुळशी पॅटर्नमध्ये मुख्य पात्रं हे राहुल पाटील असून उपेंद्र लिमयेने साकारलेलं पोलिसाचं पात्र सहाय्यक म्हणून दाखवलं आहे.

अंतिममध्ये इथेच मोठा ट्विस्ट आहे, उपेंद्र लिमयेच्या पोलिसाच्या पात्राला एक पार्श्वभूमी देऊन ते पात्रसुद्धा यातल्या मुख्य नायकाप्रमाणे मोठं केलं आहे, पण surprisingly इथे सलमानचं पात्र कितीही महत्वाचं आणि मोठं दाखवलं असलं तरी ते मुख्य पात्राला म्हणजेच राहुल्याला overshadow करत नाही, आणि इथेच सलमान एक अभिनेता म्हणून जिंकतो.

 

salman in antim inmarathi

सलमानच्या अभिनयाला बऱ्याच मर्यादा आहेत, त्यामुळेच जेव्हा नवाझूद्दीनसारखा अॅक्टर उघडपणे सांगतो की “भाई सिर्फ एक बार टेक देता है” तेव्हा आपल्यालाही समजून येतं की सलमान त्याची मर्यादा ओळखून आहे.

शिवाय गेल्या काही वर्षापासून सलमानच्या सिनेमावरून होणारी टीका बघता अंतिममधला सलमान हा खूप वेगळा आहे हे निश्चितच. संपूर्ण सिनेमात सलमान कुठेच त्याच्या स्टारपॉवरचं बॅगेज कॅरी करताना दिसत नाही आणि म्हणूनच मुळशी पॅटर्नसारख्या सिनेमाचा रिमेक असूनसुद्धा तो लोकांना तितकाच आवडतो.

बाकी अंतिम हा सिनेमा म्हणून संवादांच्या बाबतीत बराच फिका पडलाय हेदेखील तितकंच खरं आहे. मूळ मराठी सिनेमातले बरेचसे डायलॉग हे काळजाला हात घालणारे होते, विचार करायला लावणारे होते, रिमेकमध्ये काही डायलॉग जसेच्या तसे भाषांतरित केले आहेत, पण मूळ डायलॉगची मजा त्यात येणारच नाही.

या सिनेमाच्या आणखीन २ कमकुवत बाजू म्हणजे मुख्य भूमिकेतला अभिनेता आणि गाणी. मूळ मराठी सिनेमात ओम भूतकरने साकारलेल्या राहुल्याच्या नखाची सरसुद्धा आयुष शर्माला येणार नाही, त्याच्या परीने त्याने प्रयत्न केला आहे, पण त्या पात्रातला rawness जो ओम भूतकरच्या देहबोलीतून दिसतो तसं आयुष शर्माकडे बघितल्यावर अजिबात वाटत नाही.

 

om bhutkar and aayush sharma inmarathi

 

पिळदार शरीर, सिक्स पॅक, उंच गोरा यामुळे तो फक्त नायकासारखा भासतो पण अभिनयाच्या बाबतीत तो अजूनही बराच मागे आहे हे स्पष्टपणे जाणवतं, काही सीन्समध्ये त्याने चांगलं काम करायचा प्रयत्न केला आहे पण एकंदरच सिनेमातली ही भूमिका एखाद्या मराठी कलाकाराने उत्तम केली असती असं मनोमन वाटत राहतं.

शिवाय यातली गाणी तर सहज विसारण्यासारखी आहेत. मूळ मराठी सिनेमातली आरारारा, पानी पानी, आभाळा, ऊन ऊन व्हटातून अशी कित्येक गाणी आजही लोकांच्या तोंडी आहेत, पण रीमेकमधलं एकही गाणं आपल्या मनावर छाप सोडण्यात यशस्वी होत नाही.

रवी बसरूर ज्यांनी KGF या सिनेमाला पार्श्वसंगीत दिलं त्यांच्या पार्श्वसंगीताची जादू तुम्हाला अंतिममध्ये अनुभवयाल मिळते खरी, पण ती फक्त बॅकग्राऊंड स्कोअरपुरतीच, एका मसालापट अॅक्शन सिनेमाला ज्याप्रकारचं पार्श्वसंगीत अपेक्षित आहे तसंच इथे अनुभवायला मिळतं, पण गाण्यांच्या बाबतीत हा सिनेमा मार खातो!

 

ravi basrur inmarathi

 

सलमानच्या भूमिकेत बरेच बदल केले गेले असले तरी त्याची भूमिका आपल्याला पटते आणि कुठेही त्याची आणि उपेंद्र यांची तुलना करायची इच्छा होत नाही आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते माजरेकरांना, शिवाय सलमाननेसुद्धा त्याच्या स्टारडमचा वापर यात कमी केला असल्याचं जाणवतं!

त्याचे अतरंगी चाळे किंवा डान्सस्टेप, त्याची धासु मारामारी, मिश्किल जोक, डायलॉगबाजी, शर्टलेस सीन हे सर्व तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळतं, पण त्याचा कुठेही overdose नसल्याने ते सगळं बघताना प्रेक्षकही एंजॉय करतात, महिमा मकवाना हिनेसुद्धा तिच्यापरीने चांगलंच काम केलं आहे.

काही ठिकाणी अंतिम हा सिनेमा आपल्याला मांजरेकर यांच्या वास्तवच्या वळणावर जातोय असं वाटतं खरं पण लगेच सिनेमा मूळ ट्रॅकवर येतो, शिवाय मांजरेकर यांचा सिनेमा म्हंटल्यावर सचिन खेडेकरसह इतरही तगडी मराठी कलाकार मंडळी तुम्हाला पाहायला मिळणारच!

 

mahesh manjrekar inmarathi

 

सचिन खेडेकर यांनी साकारलेली पैलवानाची भूमिका चांगली झाली आहे, पण ऑनेस्टली त्या भूमिकेत मोहन जोशी यांनाच घ्यायला हवं होतं. बरोबरच उपेंद्र लिमये, सैयाजी शिंदे, शरद पोंक्षे, उदय टीकेकर, भारत गणेशपुरे, अशी मोठी स्टारकास्ट यात आहेच आणि त्यांची कामं चोखच झाली आहेत यात काहीच वाद नाही.

एकंदरच प्रेझेंटेशन आणि बजेटच्या निकषावर अंतिम हा खूप मोठा सिनेमा असून मूळ कथेला धक्का न लावता तो चांगल्या पद्धतीने सादर केला आहे यासाठी महेश मांजरेकर यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत, पण प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्यात मुळशी पॅटर्न जितका यशस्वी ठरला तितका अंतिम यशस्वी होईल की नाही हे सांगता येणं कठीण आहे.

आकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल यात काहीच वाद नाही, पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!

 

antim 2 inmarathi

 

अर्थात कोरोना महामारीनंतर मराठमोळ्या दिग्दर्शकाचा एवढा बिग बजेट सिनेमा रिलीज होणं आणि रिमेक असूनही तो लोकांच्या पसंतीस उतरणं यावरून हे समजून येतं की लोकांना खरंच काहीतरी चांगला कंटेंट हवा आहे आणि तो दिला तर लोकं नक्की थिएटरकडे पुन्हा गर्दी करायला सुरुवात करतील, हे अंतिमने सिद्ध करून दाखवलं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?