' वडिलांच्या अनपेक्षित संन्यासामुळेच अक्षय खन्ना फिल्मी झगमगाटापासून लांब राहिला! – InMarathi

वडिलांच्या अनपेक्षित संन्यासामुळेच अक्षय खन्ना फिल्मी झगमगाटापासून लांब राहिला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नव्वदच्या दशकात ८० चं दशक गाजविलेल्या लेडी किलर विनोद खन्नाच्या मुलाचं बॉलिवुडमधे पदार्पण झालं. देखण्या विनोदचा तितकाच देखणा, गालावर गोड खळी पडणारा मुलगा अक्षय चित्रपटात येणार याची बरीच हवा झालेली होती.

१९९७ साली विनोद खन्नाची निर्मिती असणार्‍या हिमालय पूत्र या चित्रपटातून त्यानं पदार्पण केलं मात्र हा चित्रपट इतका वाईट फ्लॉप झाला की सगळ्यांना वाटलं आता अक्षयची कारकीर्द संपली.

पहिल्या फ्लॉपनंतर दुसरा चित्रपट मिळणं कठीण असतानाच त्याला जेपी दत्तांचा महत्वाकांक्षी असणारा बॉर्डर प्रोजेक्ट मिळाला.

 

akshay khanna inmarathi

 

खरंतर जेपी अक्षयला यात भूमिका द्यायला फारसे उत्सुक नव्हतेच मात्र अक्षयचे ग्रह जोरावर असल्यानं आणि ऐनवेळेस अनेकांनी नकार दिल्यानं ही भूमिका त्यांनी अक्षयला देऊ केली.

या संधीचं अक्षयनं अक्षरश: सोनं केलं आणि त्याच्या नावावर पहिला हिट सिनेमा नोंदवला गेला. या हिटनंतर त्याच्याकडे सिनेमांची रांग लागेल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा त्याच्या कारकिर्दीने खालच्या दिशेनं प्रवास सुरु केला.

काही चित्रपट आले, काही चालले तर काही फ्लॉप झाले. कपूर ॲण्ड सन्सनी आरके बॅनरचं पुनरुज्जीवन करण्याचा घाट घातला आणि ऋषी कपूरनं जबाबदारी स्विकारत आरके बॅनरचा बहुचर्चित असा आ अब लौट चले अक्षय आणि ऐश्वर्याला घेऊन काढला.

 

aa ab laut chalen inmarathi

 

या चित्रपटानं पुन्हा एकदा अक्षयला एक हिट दिला. मात्र नायक म्हणून अक्षयचे चित्रपट म्हणावे तसे चालत नव्हते आणि त्याला तितके चित्रपटही मिळत नव्हते.

आज त्याच्या कारकिर्दीकडे बघताना खरंच बुचकळ्यात पडायला होतं. अक्षयकडे काय नव्हतं? गुड लुक्स होते, अभिनय होता, फिल्मी बॅकग्राऊंड होतं, उत्तम संवादफेक हे त्याचं वैशिष्ट्य होतं. सगळं काही होतं.

खन्ना आडनावाचं पाठबळ इतकं जबरदस्त होतं की भल्या भल्या निर्माता-दिग्दर्शकांनी त्याला आपल्या चित्रपटात घेतलं होतं. आघाडीच्या नायिका त्याच्यासोबत काम करत होत्या मात्र ज्या प्रमाणात त्याची कारकीर्द धो धो चालायला हवी होती तशी ती कधीच चालली नाही.

बच्चनपूत्र अभिषेकप्रमाणे त्याच्यावर सुपरफ्लॉपचा शिक्का कधीच बसला नाही मात्र त्याची एकूण कारकीर्द उमलली नाही. अक्षयचा स्वभाव अबोल आणि तो काहिसा मुडी होता. त्याच्या या स्वभावाचा फटका त्याला त्याची कारकीर्द घडविताना बसला.

या इंडस्ट्रीत टिकायचं तर स्वत: स्वत:चे गोडवे गाता येणं आवश्यक आहे मात्र अक्षयला याच गोष्टीचं वावडं होतं. माझं काम बोलू दे हा त्याचा हेका असल्यानं या बोलबच्चन दुनियेत त्याचा टिकाव लागणं कठीण होतं. खरंतर असा कोणताही जॉनर नव्हता ज्यात त्यानं त्याच्या अभिनयाची छाप पाडली नव्हती.

मूड स्विंग्ज, कौटुंबिक अस्थिरता आणि व्यसनांच्या आहारी जाणं, भावनिकदृष्ट्या कणखर नसणं, वडिलांच्या आयुष्याची सावली सतत पाठीशी लागणं या सगळ्या गोष्टींनी त्याला आणखीनच लहरी स्वभावाचं बनवलं.

 

akshay khanna 2 inmarathi

 

एकेकाळी प्रियदर्शन, अब्बास मस्तान या आघाडीच्या गुणी दिग्दर्शकांचा लाडका असणारा हा अभिनेता त्यांच्यापासूनच काय पण इतरही दिग्दर्शकांपासून दुरावला.

त्याला अकाली पडलेलं टक्कल चेष्टेचा विषय झाला. तरीही तो थांबला नाही अधून मधून चित्रपटातून झळकत राहिला, ज्या भूमिका करत होता त्यात छाप पाडत राहिला. अगदी अलिकडच्या इत्तेफाकपर्यंत.

त्याच्या लहरी, एकाकी स्वभावाची बीजं त्याच्या वडिलांच्या आयुष्यामुळेही कुठेतरी रुजली होती. विनोद खन्नानं त्याचा बहुचर्चित संन्यास जेंव्हा पत्रकार परिषदेत जाहिर केला तेंव्हा अक्षय अगदी लहान होता. कोवळ्या वयातल्या अक्षयच्या मनावर वडिलांच्या या निर्णयाचा, त्यांच्या वैराग्याचा खोलवर परिणाम झाला.

नंतर विनोद पुन्हा गृहस्थाश्रमात परतला, त्यानं पुन्हा एकदा लग्न केलं. हे लग्न सगळ्यांसाठीच खूप तापदायक ठरलं. यामुळे अक्षयचं आयुष्य तर ढवळून निघालं. तो माणूसघाणा बनला. त्याच्या वयाचे स्टार किडस पार्ट्या करत मौजमजेचं आयुष्य जगत असताना तो मात्र गर्दीपासून दूर रहाणं पसंत करत होता.

त्याच्या या स्वभावामुळेच त्याच्या आयुष्यात कधीही प्रेम आणि लग्नाचं स्थैर्य आलं नाही. एकेकाळी जयललीता यांना डेट करण्याचं स्वप्न बघणारा अक्षय लग्नाच्या बेडीपासून मात्र कायम चार हात दूरच राहिला.

 

akshaye khanna jaylalitha inmarathi

 

नेहमीच स्टारडमपासून लांब राहिलेल्या अक्षयच्या फॅनबेसमध्ये काहीच फरक पडलेला नाही, आजही त्याचे सिनेमे लोकं उत्सुकतेने बघतात. मग तो ईत्तेफाकमधला ऑफिसर असो किंवा सेक्शन ३७५ मधला वकील, अक्षय खन्ना हा सुपरस्टारचा मुलगा असून स्वतःला अभिनेता म्हणून प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आहे हे मात्र नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?