Site icon InMarathi

मुलीच्या प्रियकराच्या हत्येमध्ये संशयित ‘लक्सच्या’ मालकाची केस CBI ने का गुंडाळली?

lux murder case inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘प्रेम आंधळं असतं’ हे आपण नेहमीच म्हणत असतो. प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींना जात, धर्म, गरिबी, श्रीमंती यासारखे काहीच भेद जाणवत नसतात. पण, त्यांच्या नातेवाईकांना मात्र हे सर्व भेद ठळकपणे जाणवत असतात. हेच कारण आहे की, भारतातील कित्येक प्रेमकथा अर्धवट रहातात आणि त्यांना ‘ऑनर किलिंग’ सारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं.

भारत स्वतंत्र होऊन ७४ वर्ष झाली आहेत तरी आजही काही विवाहांना मान्यता किंवा त्यांचा विरोध हा ‘खाप पंचायत’ मध्ये ठरवला जातो हे त्या प्रेमी युगलाचं आणि भारताचं दुर्दैव म्हणावं लागेल.

पालकांचा विरोध असलेल्या कोलकत्ता येथील रेहमान आणि प्रियांकाची प्रेमकथा अशीच अर्धवट राहिली होती. प्रियकर रेहमानला आपला जीव गमवावा लागला होता. त्यात काय विशेष? असं आपल्याला वाटू शकतं. पण, या कथेत हे विशेष आहे की, मुलगी प्रियांका ही लक्स कोझी ब्रँडचे मालक अशोक तोडी यांची मुलगी आहे आणि रहेमान हा गरीब परिस्थितीत जगणारा एक शिक्षक आहे.

 

 

धर्म, आर्थिक परिस्थिती हा बदल मुलींच्या वडिलांना इतके खटकत होते की, त्यांनी रहेमानला प्रियांकाच्या आयुष्यातूनच नाही तर या जगातून बाहेर जाण्यास भाग पाडलं. रहेमान जग सोडून गेला, पण त्याचा जीव कोणी घेतला? हे मात्र शेवटपर्यंत सिद्ध झालं नाही.

काय घडलं होतं?

२१ सप्टेंबर २००७ रोजी पोलिसांना मूळचे कोलकत्ताचे असणाऱ्या रिझवानूर रेहमान यांचा मृतदेह पोलिसांना मुंबई येथे रेल्वे ट्रॅकवर सापडला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनंतर हे समोर आलं होतं की, रहेमान यांनी आत्महत्या केली आहे. लोकांच्या वाढत्या मागणीमुळे ही केस नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.

सीबीआयला चौकशी करतांना हे लक्षात आलं की, ही आत्महत्या नसून खून आहे. सीबीआयने आपली चार्जशीट भरतांना त्यामध्ये रेहमानची पत्नी प्रियांका तोडीचे वडील आणि ‘लक्स कोझी’ या कंपनीचे मालक अशोक तोडी, त्यांचे भाऊ प्रदीप तोडी, काका अनिल सरोगी आणि त्यांना मदत करणाऱ्या तीन पोलिसांवर रहेमानला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२३ वर्षीय प्रियांका तोडी आणि ३० वर्षीय रिझवानुर रहेमान यांची पहिली भेट ही ते शिकवत असलेल्या कम्प्युटर ग्राफिक्स ट्रेनिंग सेंटर मध्ये झाली होती. शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या ओळखीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. याबद्दल दोघांनीही आपल्या घरी बोलण्याचं टाळलं. १८ ऑगस्ट २००७ रोजी दोघेही विवाह बंधनात अडकले.

रेहमानच्या काही जवळचे मित्र फक्त या विवाहासाठी उपस्थित होते. रेहमान आणि प्रियांका या दोघांनीही हे लग्न सुद्धा आपल्या घरच्या लोकांपासून लपवलं.

३१ ऑगस्ट २००७ रोजी रेहमानने आपल्या सख्ख्या भावाला या लग्नाची माहिती दिली. ते प्रियंकाला आपल्या घरी घेऊन गेले. अशोक तोडी यांच्या राहत्या घरापासून थोड्या अंतरावरच एका चाळीत रेहमान कुटुंबीय रहायचे. अशोक तोडी यांना हे लग्न मान्य होणारच नाही अशी दोघांनाही खात्री होती. अशोक तोडी यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून दोघांनीही पोलिसांना एकत्रितपणे एक विनंती पत्र पाठवलं होतं.

अशोक तोडी आणि परिवारापर्यंत ही बातमी गेली आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली.

 

 

‘लक्स कोझी’च्या मालकाच्या मुलीने एका कमी पगार असलेल्या, मुस्लिम धर्मीय व्यक्ती सोबत केलेला हा प्रेमविवाह त्यांना अजिबात मान्य नव्हता. आपला राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली.

८ सप्टेंबर २००७ रोजी अशोक तोडी यांनी पोलिसात अशी फिर्याद दाखल केली की, रिझवानूर रेहमानने निदान एका आठवड्यासाठी प्रियंकाला माहेरी पाठवावं. असं न केल्यास रेहमानवर फसवणुकीचा दावा ठोकण्यात येईल असं या फिर्यादीत लिहून देण्यात आलं होतं.

पोलिसांनी रेहमान आणि प्रियांकाला चौकशीसाठी कोलकत्ता येथील पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. अशोक तोडी यांनी पाठवलेली फिर्याद ऐकवली, ज्यामध्ये हे पण लिहिण्यात आलं होतं की, “प्रियांका ही लग्न झाल्यापासून आमच्याशी मोकळेपणाने बोलत नाही. ती प्रत्येकवेळी आमच्याशी फोनवर बोलतांना रेहमान तिच्या आजूबाजूला असतो. ती कोणत्यातरी दबावाखाली असल्याचा आम्हाला संशय आहे.”

“आपण आनंदी आहोत” हे प्रियंकाने वारंवार सांगूनही प्रियंकाचे वडील अशोक तोडी या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. रेहमानने शेवटी एका आठवड्यासाठी प्रियांकाला माहेरी पाठवण्याची परवानगी दिली. पोलिसांसमोर रीतसर करार पत्रावर सर्वांनी सह्या केल्या. १५ सप्टेंबर २००८ रोजी प्रियंकाला पुन्हा सासरी पाठवण्याचं ठरलं.

 

 

करार पत्रापेक्षा रेहमानने तिथे हजर असलेल्या प्रियंकाच्या वडील, काका यांच्यावर विश्वास ठेवला आणि तीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली.

१९ सप्टेंबर २००८ उजाडली तरीही प्रियांकाला सासरी पाठवण्यात आलं नाही. रेहमानने एका समाजसेवी संस्थेला हाताशी धरून झालेल्या प्रकाराबद्दल तोडी कुटुंबीय आणि त्यांना सामील असलेले पोलीस यांच्या विरोधात लढा देण्याचं ठरवलं.

रेहमानने वकिलाची मदत घेऊन अशोक तोडी यांना नोटीस पाठवली. पण, काहीच उत्तर आलं नाही. रेहमानला प्रियंकापासून लांब रहाण्याची सख्त ताकीद देण्यात आली. तिचा फोन नंबर बंद करून टाकण्यात आला.

२० सप्टेंबर २००८ रोजी रेहमानने पुन्हा सामाजिक संस्थेमार्फत प्रियंकाला भेटण्याचा प्रयत्न केला. रहेमानने एका पत्रात हे देखील लिहून दिलं की, “प्रियांका सोबत सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी मी हिंदू धर्म स्वीकारायला सुद्धा तयार आहे.” पण, मुलीच्या प्रेमात आंधळे असलेल्या पालकांना रेहमानची अजिबात दया आली नाही.

२१ सप्टेंबर २००८ रोजी रिझवानूर रेहमानच्या सहनशक्तीचा अंत झाला. कोलकत्ता येथील निर्मनुष्य रेल्वे ट्रॅक शेजारी जाऊन त्याने प्रियंकाच्या आई वडिलांना असा मेसेज केला की, “कृपया करून मला प्रियांका सोबत बोलू द्या. अन्यथा, पुढील दहा मिनिटांत मी स्वतःला संपवेल.”

हिंदीमध्ये लिहिलेला हा मेसेज बघूनही आई वडिलांनी समाजाच्या भीतीपोटी रहेमान बद्दल कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. रिझवानूर रेहमान काही क्षणात हाताची घडी घालून रेल्वे ट्रॅक वर झोपला. एक भरधाव रेल्वे त्या रुळावरून गेली आणि रेहमानची प्राणज्योत मालवली.

 

 

प्रियांकाने सामाजिक संस्थेला भेटून “माझ्यावर पोलिसांचा, माझ्या वडिलांचा कोणताही दबाव नाहीये” अशी मोघम प्रतिक्रिया दिली. सीबीआयने प्रकरण आत्महत्या म्हणून बंद केलं आणि अशोक तोडी यांच्यावर रेहमान यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला.

हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ठ आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाने नुकतंच तोडी कुटुंबियांच्या सीबीआयचे आरोप रद्द करण्याच्या अर्जाला फेटाळून लावलं होतं. कोलकत्ता पोलीसचे सुकांती चकबोर्ती आणि कृष्णेंदू दास यांना या केसचा निकाल घोषित करतांना बडतर्फ करण्यात आलं होतं.

ही केस सीबीआयने हाताळावी अशी कोर्टात मागणी करणारी रेहमानची आई आजही या प्रकरणात न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

 

‘लक्स कोझी’ या २०० कोटी रुपयांच्या ब्रँडचा मालक अशोक तोडी आजही या प्रकरणासाठी कोलकत्ता न्यायालयाच्या चकरा मारत असतो. त्याने खून केला आहे की नाही ते न्यायालय ठरवेल.

कोलकत्त्याचा सामान्य माणूस हा अशोक तोडी यांनाच या प्रकरणात दोषी मानतोय. कारण, प्रत्येक खून हा प्रत्यक्ष गुन्हेगाराकडून होत नसतो. रेहमानच्या बाबतीत तेच झालं होतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version