' नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये? – InMarathi

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“आज एअरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपमध्ये आली आहे, एक चक्र पूर्ण झालं असंच सोशल मीडियावर बोललं जातंय. ज्या जेआरडी टाटांनी कष्ट करून, घाम गाळून त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आणि भारतीयांना उडण्याचं साहस दिलं, त्याच टाटा ग्रुपकडून ही कंपनी हिसकावून घेतली गेली, आणि आज तीच कंपनी पुन्हा टाटा ग्रुपमध्ये सामील होणार आहे. हे टाटांसाठी तर नक्कीच एक स्वप्न असणार आहे.”

हे सगळं आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, टाटा ग्रुपने एयरइंडिया पुन्हा आपल्या हातात घेतली आहे अशी बातमी सकाळपासून बऱ्याच समाज माध्यमांद्वारे पसरवली जात आहे.

त्यावर नुकतंच भारतीय सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं असून, सरकारच्या म्हणण्यानुसार अजूनही  एअर इंडिया टाटा ग्रुपकडे सुपूर्त केली नसून याबाबत अंतिम निर्णय व्हायचा बाकी आहे!

 

air india inmarathi

 

या सगळ्यामुळे टाटा आणि एयरइंडियामधल्या संबंधांबद्दल पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. २०१८ मध्येसुद्धा सरकारने एअर इंडियामधला ७६% हिस्सा विकायचा प्रयत्न केला होता पण त्यात सरकारला यश मिळालं नव्हतं.

१९३२ साली जे.आर.डी टाटा यांनी खुद्द कराची ते मुंबई दरम्यान स्वतः विमान उडवून प्रवास केला होता, ते एक कुशल पायलट होतेच, लगोलग त्यांनी टाटा एअर लाइन्स नावाने पहिली भारतीय एयरलाईन्स सुरू केली.

 

jrd tata plane inmarathi

 

१९४६ मध्ये या कंपनीत भारत सरकारने मोठी गुंतवणूक केली आणि तिचं नामकरण एयर इंडिया असं केलं. स्वातंत्र्यानंतर देशाला एका राष्ट्रीय एयरलाईन्सची नितांत गरज होती आणि यासाठीच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एअर इंडिया या कंपनीला Nationalized airlines म्हणून घोषित केलं!

हे असं केल्याने जे.आर.डी टाटा यांना बरंच वाईट वाटलं त्यांनी पत्र लिहून नेहरूंना याबाबतीत नाराजी व्यक्त केली, त्यांनी सांगितलं “आम्हाला आमची बाजू न मांडू देता एवढा मोठा निर्णय घेतलाय याचा मला खेद आहे.”

जे.आर.डी यांना नेहरूंनी या राष्ट्रीय एअरलाईन्सच्या चेअरमनपदी बसवायचा निर्णय घेतला आणि टाटांनीसुद्धा नेहरूंच्या या विनंतीला हिरवा कंदील दाखवून १९७७ पर्यंत या कंपनीचं अध्यक्षपद भूषवलं.

 

JRD tata inmarathi

१९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात टाटा यांना एअर इंडियाच्या चेअरमनपदावरुन काढून टाकण्यात आलं होतं.

टाटा ग्रुपने पुन्हा या कंपनीची सूत्रं हातात घेण्याच्या अफवेमुळे पुन्हा या जुन्या गोष्टींवर समाजमाध्यमातून चर्चा होत आहे. खरंतर टाटांनी जीवाचं रान करून उभ्या केलेल्या या कंपनीला सरकारी लेबल लावण्यामागे बरंच राजकारणसुद्धा होतं, याबाबतीत जे.आर.डी टाटा यांनी उघडपणे भाष्यसुद्धा केलं!

जागतिकीकरण आणि खासगीकरणाची ठिणगी जशी भारतात पडली तेव्हापासूनच भारतातल्या बऱ्याचशा सरकारी कंपन्यांना घरघर लगायला सुरुवात झाली. एकंदरच नवीन येणारं तंत्रज्ञान आणि औद्योगिकरण यामुळेसुद्धा बरेच सरकारी उद्योगधंदे ठप्प पडले.

एअर इंडियासुद्धा गेली अनेक वर्षे बरीच तोट्यात असून सध्या सरकार त्यातून गुंतवणूक काढून घ्यायचा विचार करत आहे आणि यामुळेच कदाचित या अफवांना उधाण आलं आहे.

 

air india 2 inmarathi

 

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?