आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – ईशान पांडुरंग घमंडे
===
प्रेक्षकांनी पाठ फिरवली, टीआरपी घसरला, हिंदी सिनेसृष्टीत वावरून आलेल्या श्रेयस तळपदेसारख्या कलाकाराला मालिकेत आणून प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्याची वेळ आली, तरीही ‘झी मराठी’ वाहिनी काही ताळ्यावर आलेली दिसत नाही.
चार जुन्या मालिकांना केराची टोपली दाखवून नव्या मालिका घेऊन तर आले, पण तरीही, अजूनही ‘हे काय चाललंय’ हाच प्रश्न पडलाय…
नव्याने सुरु झालेल्या मालिकांमध्ये सुद्धा ‘येड्याचा बाजार आणि भोंगळ कारभार’ सुरूच आहे. आज याच मालिकांमधील अगदी लहान मुलांनाही लक्षात येईल, असा बालिशपणा उघड करावा अशी इच्छा झाली आणि म्हणूनच ही खटपट करतोय.
खरंच ‘मोठा’ बिझनेसमन आहे ना भाऊ?
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे बिझनेसमनची भूमिका साकारतोय. हा बिझनेस टायकून यशवर्धन चौधरी जगप्रसिद्ध आहे म्हणे. अहो हा दुबईतील बिझनेसमन इतका प्रसिद्ध आहे, की त्याच्याच भारतातील ऑफिसमधले लोक त्याला ओळखतही नाहीत. त्याचा मित्र बॉस म्हणून सर्रास ऑफिसात वावरतो. आता काय म्हणावं राव या वेडेपणाला!
बरं आणखी एक गंमत बघा हो, हा यश भारतात येईपर्यंत त्याच्या ऑफिसमधल्या मॅनेजरच सर्वेसर्वा असावा, असं इतर मंडळींना वाटतंय, असं दर्शवणारे संवादही त्या ऑफिसमधल्या लोकांच्या तोंडी ऐकायला मिळाले आहेत. मल्टिनॅशनल कंपनीत हे असं घडू शकतं? असेल बुवा, आपल्याला काय त्याचं…
मॉल्सची चेन चालवतात म्हणे…
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ नावाची अशीच एक मालिका झी मराठीवर दाखवली जाते. यातली मंडळी सुद्धा बिझनेसवालीच आहेत बरं का… मालिकेत बिझनेस करणारं कुणीतरी दाखवलं तरच मालिकेचं वजन वाढतं असं बहुदा यांना वाटायला लागलंय.
–
- आताच्या टुकार मालिका सोडा.. या १० मराठी सिरीयल आजही आवर्जून बघा!!!
- कुवत नसतानाही(?) परीक्षकाची खुर्ची: रीऍलिटी शोजच्या थिल्लरपणावरील खरमरीत उत्तर
–
बरं नायिकेच्या आईच्या तोंडी एक संवाद ऐकलेला आठवतोय. “अगं तुला माहित्ये ना, आमची मॉल्सची चेन आहे.” असंच काहीतरी ते पात्र म्हणालं होतं. अशा या मॉल्सची चेन चालवणाऱ्या कंपनीत एखाद्याला कामावरून काढून कसं टाकलं जातं, तर एखादी उच्चपदस्थ व्यक्ती येता-जाता त्या व्यक्तीला थांबवते आणि तुम्हाला कामावरून काढून टाकलंय असं सांगितलं जातं. वाह रे वाह!
यातला नायक सिद्धार्थ, ज्या कंपनीत काम करतो त्याचा मालक कर्जबाजारी आहे. मोबाईलचं बिलही थकलंय. त्यासाठी येणारे कॉल्स टाळण्यासाठी हा माणूस ३-३ मोबाईल घेऊन फिरतोय. म्हणजे नक्की काय म्हणायचंय राव… असो, तो सिद्धार्थ काय ते जाणे!
प्रोमो बघूनच गारद झालोय…
‘मन झालं बाजिंद’ नावाची सुद्धा एक मालिका झी मराठीवर सुरु आहे. याचा तर पहिला प्रोमो बघूनच ही मालिका चुकूनही बघायची नाही, असं पक्कं ठरवलं होतं. प्रोमोमध्येच त्या दोघांना पडताना पाहिलं आणि मालिका खड्ड्यात पडणार हे तेव्हाच लक्षात आलं म्हणा ना!
या मालिकेत असं काहीतरी दाखवलंय म्हणे, नैवेद्यासाठी नायिका मोदक करून ठेवते, ते सगळे मोदक खलनायिका खराब करते आणि मग उरलेल्या अगदी थोड्याशा वेळात ही नायिका पुन्हा नव्याने उकडीचे मोदक बनवते बरं का! ते विसर्जनाच्या आधी तयारही होतात आणि तरीही ते मोदक कुणाच्याही हाती लागू न देण्याचं काम खलनायिका करते.
या खलनायिकेच्या हातात, नव्या मोदकांचा डब्बा खुद्द नायिकाच देते असंही दाखवलंय म्हणे. असो, आपल्याला काय त्याचं… हा वरील मुद्दा ऐकीव माहितीवर आधारित आहे, त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी…
मन कडू कडू झालं
“प्रेम करतोस म्हणे, साधा एक गुलाब तरी दिला आहेस का?” असं नायिकेने म्हणायची खोटी आणि मालिकेचा हिरो मोबाईलवर २-४ बटणं दाबतो; असंख्य ड्रोन आकाशात प्रकटतात आणि गुलाबांचा वर्षाव सुरु होतो.
बाईकवर झकासपैकी फिरणारा आणि रिक्षेत असणाऱ्या नायिकेवर लाईन मारणारा आपला हिरो कुठेतरी आदळतो आणि नंतर थेट हातगाडीवर विराजमान होऊन रिक्षेच्या बाजूला प्रकटतो.
हे असले प्रोमो बघतानाच खरं तर मन कडू कडू झालं… पण काय करणार, त्यांनी तर भडीमारच केला होता या प्रोमोजचा
हे असे दोन प्रोमो पचवले आम्ही प्रेक्षकांनी! मग आपला हा नायक ‘वसुलीचं काम करतो’ आणि त्याचा स्वतःचा बिझनेस नाही, हे सत्य त्याच्या आईला माहित नाही, हेसुद्धा मान्य करूच की राव… हृता दुर्गुळेसारखा सुंदर चेहरा घेऊन प्रेक्षकांना आकर्षित करणं यापलीकडे या मालिकेत काहीच दम वाटत नाही.
जुनं ते सोनं
या सगळ्या नव्या खेळात, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही एकमेव जुनी मालिका अजूनही सुरु आहे. “नांदायला नको जाऊस बाई, पण हा वेडेपणा थांबव” असं आता प्रेक्षक म्हणू लागलेत की राव!
मुलीच्या लग्नाच्यावेळी मुलीचा बापच गायब आहे हे कुणालाही न कळणं, नवरा मुलगा नाही म्हणून दुसऱ्याच व्यक्तीला बोहल्यावर उभं करणं इथे वेगळ्याच पातळीवर पोचलेला मूर्खपणा आता अधिकाधिक वरच जाऊ लागलाय. थोडक्यात काय, तर या सगळ्या मुर्खांच्या बाजारात ‘जुनं ते(च!) सोनं’ म्हणत माती खाण्यात जुनीच मालिका सर्वाधिक पुढे आहे.
या दोन मालिकांबद्दल तर बोलायलाच नको
मालिका असल्या, तरी सामान्य जगण्याशी साधर्म्य असेल अशाच पद्धतीने त्या साकारल्या जातात. असाच या वर उल्लेखित पाच मालिका भरूभरून माती खाताना दिसतायत. सामान्य जीवन दाखवणं सुद्धा जमत नाहीये, तर ‘रात्रीस खेळ चाले ३’ आणि ‘ती परत आलीये’ या मालिकांमध्ये तर अनैसर्गिक गोष्टीच दाखवायच्या ठरवल्या आहेत, म्हणजे रानच मोकळं आहे.
–
- प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यावर ‘झी’चे उघडले डोळे! श्रावणी सोमवारपासून ‘सुधारण्याचा’ मुहूर्त
- अभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका! ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग!
–
झी मराठीवरच मी एवढा प्रहार का करतो? असा प्रश्न अनेकांना पडतो, कदाचित तुम्हालाही पडला असेल. अहो, आमचं बालपण गेलं हीच वाहिनी बघण्यात. दर्जेदार मालिका पाहण्यात. मग त्यांच्याकडून अपेक्षाही मोठ्या आहेत की राव… अपेक्षा आहेत, म्हणून बोलतो… बाकी काय, असो… तूर्तास रजा घेतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.