' भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास! – InMarathi

भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

ऑनलाईन शिक्षण पद्धत ही मागच्या दोन वर्षांपासून भारताने मान्य केली आहे. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून उच्च दर्जाचं शिक्षण, पदवी घेऊ शकतात, लहान मुलांच्या क्लिष्ट प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तर देऊ शकतात असेच बरेच फायदे आता लोकांना पटले आहेत.

पारंपरिक शिक्षण पद्धतीला बाजूला सारून या ऑनलाईन मार्गावर भारतीयांना नेण्याचं श्रेय हे बायजु’जला  मोठ्या प्रमाणावर जातं असं म्हणता येईल. काळाची पावलं ओळखून बायजु’ज् ने आपलं काम सुरू केलं आणि आज त्यांच्याकडे भारतातील सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

 

byju inmarathi

 

‘ऑनलाईन शाळा, क्लासेस’ हा एक नवीन उद्योग होऊ शकतो हे बायजु’ज्ने भारताला दाखवून दिलं आणि आज त्यांना बघून कित्येक नवीन उद्योजक या व्यवसायात गुंतवणूक करत आहेत.

बायजु’जची कोणत्याही प्रकारे जाहिरात न करता आम्ही त्यांनी हे यश कसं साध्य केलं? हे या लेखाच्या माध्यमातून सांगत आहोत.

बायजु’जचे संस्थापक ‘बायजु रवींद्रन’ हे मूळचे केरळमधील अझीकोडा या भागात राहणारे आहेत. लहानपणी ते कन्नूर नावाच्या एका छोट्या गावात राहत होते. त्यांचे वडील हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते आणि आई गणिताच्या शिक्षिका होत्या.

खेळाची प्रचंड आवड असलेल्या बायजु रवींद्रन यांनी शालेय शिक्षणानंतर केवळ खेळण्यासाठी वेळ मिळत रहावा म्हणून इंजिनियरींगचं शिक्षण घ्यायचं ठरवलं होतं. इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करून बायजु हे एका इंग्लंडच्या शिपिंग कंपनीत नोकरी करत होते.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे, कमीत कमी वेळात पेपर सोडवणे हा त्यांचा छंद आहे. नोकरी करत असतांना ते नेहमीच आपल्या मित्रांना आयआयएमची प्रवेश परीक्षा पास होण्यासाठी मदत करायचे.

बायजु रवींद्रन यांनी स्वतः आयआयएमच्या प्रवेश परीक्षेत १०० गुण मिळवले होते. पण, त्यांनी कधीच आयआयएममध्ये शिकणं पसंत केलं नाही.

 

byju raveendran inmarathi

 

पदवीधर विद्यार्थ्यांची शिकवणी घेणे, एखाद्या सभागृहात स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत असतांना २०१५ मध्ये बायजु रवींद्रन यांना बायजु’जची संकल्पना सुचली. बायजु’ज आज इतकं लोकप्रिय होण्यामागे एकूण आठ लोकांचा सहभाग आहे. कोण आहेत ही ८ माणसं?

१. प्रवीण प्रकाश : बायजु सरांचा गणिताचा विद्यार्थी हाच आज त्यांच्या कंपनीचा ‘चीफ मार्केटिंग ऑफिसर’ झाला आहे. बायजु’ज एज-टेक स्टार्टअपची सुरुवात ते आजचं हायटेक स्वरूप या सर्वांचं श्रेय हे प्रवीण प्रकाश यांना दिलं जातं.

२. अर्जुन मोहन: बायजु सरांचा अजून एक विद्यार्थी ज्याने कॅलिकतमधून ऑनलाईन क्लास करून आयआयएममध्ये प्रवेश मिळवला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अर्जुन यांनी काही वर्ष ‘टायटन’ कंपनीसोबत मार्केटिंग विभागात काम केलं.

काही वर्षापर्यंत अर्जुन बायजु’जच्या विद्यार्थ्यांसाठी फावल्या वेळात क्लासेस घ्यायचे. बायजु’जचा वाढता आलेख बघता त्यांनी ‘वाईस प्रेसिडेंट – मार्केटिंग’ या पदावर २०१८ पासून रुजू झाले होते.

 

arjun mohan inmarathi

 

‘बायजु’जच्या उभारणीत योगदान करणाऱ्या इतर व्यक्तींमध्ये मृणाल मोहित, दिव्या गोकुलनाथ, विनय एम आर, मोहनिश जैस्वाल, अनिता किशोर आणि पी एन संतोष सारख्या व्यक्तींचा समावेश होतो ज्यांनी बायजु’जच्या संकल्पनेवर सुरुवातीच्या काळात विश्वास ठेवला आणि सोबत काम करण्याची तयारी दर्शवली.

“माझ्याच विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून ठेवण्यात हा फायदा होता की, मला कसं शिकवणं अपेक्षित आहे हे त्यांना आधीच माहीत होतं. माझ्या विद्यार्थ्यांनी केवळ शिकवणंच नाही तर नवीन ऍडमिशन आणि इतर व्यवस्थापनात सुद्धा खूप मदत केली. ” अशी प्रतिक्रिया बायजु यांनी एका मुलाखतीत दिली होती.

“शिक्षकांसारखे न दिसणारे शिक्षक बायजु’जमध्ये असावेत” असं बायजु सरांचं आधीच मत होतं. त्याप्रमाणे शिक्षकांची टीम तयार होत गेली.

“स्टार्टअपचं नाव ते तुमच्या नावाने का ?” असा एक प्रश्न बायजु यांना विचारण्यात आला होता.

हे ही वाचा – – एका मराठी उद्योजकाने हजारो पोस्टकार्डांनी घडवलेला क्रांतिकारक बदल!

या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी सांगितलं की, “माझ्या मित्रांना मी स्पर्धा परीक्षेच्या टिप्स द्यायचो तेव्हा ते गमतीने आमच्या बोलण्याला बायजु’ज् क्लासेस असं म्हणायचे. तेच नाव ऑनलाईन क्लास, अॅप्लिकेशनला सुद्धा द्यावं हे माझ्या विद्यार्थ्यांनीच मला सुचवलं. माझ्यापेक्षा माझे विद्यार्थी हे जास्त चांगले शिक्षक आहेत याचा मला अभिमान आहे. आज त्यांच्या मुळेच मला कोणालाही शिकवण्याची गरज नाहीये.”

 

byju app inmarathi

 

२००७ मध्ये बायजु हे नाव त्यांच्या विद्यार्थ्यांनीच ब्रँड म्हणून ठरवलं. २ लाख रुपये इतक्या प्राथमिक गुंतवणुकीवर सुरू झालेल्या या व्यवसायात २०११ ते २०१५ या काळात मोहनदास पै आणि झुकेरबर्ग उद्योग समूह यांनी प्रत्येकी ५० कोटी इतकी गुंतवणूक केली आणि बायजु’जचं रूप बदलून टाकलं.

विदयार्थ्यांना घडवणं आणि त्यांना आपल्यापेक्षा चांगलं शिक्षक म्हणून नावारूपास आणणं हे मोलाचं कार्य बायजु यांनी केलं आहे. एका शिक्षकाच्या मुलाने आपल्या शिक्षकांना दिलेली ही सर्वोत्तम गुरुदक्षिणा म्हणता येईल.

एका खोलीत काही विदयार्थ्यांना शिकवण्यापासून सुरू झालेला प्रवास हा आज ५०० कोटी टर्नओवरच्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे ही बाब प्रत्येक स्टार्टअप कंपनीला प्रेरणा देत आहे.

पैसे कमावणे हा कधीच उद्देश नसलेल्या बायजु रवींद्रन यांच्यासाठी बायजु’जमुळे रोज १०,००० मुलांना घरी बसून विविध विषय शिकता येत आहेत ही फार समाधानाची बाब आहे. बदल घडवण्यासाठी जे व्यवसाय अस्तित्वात येतात ते नेहमीच यशस्वी होतात असं बायजु रवींद्रन यांचं मानणं आहे आणि ते त्यांनी त्यांच्या कृतीतून खरं सुद्धा करून दाखवलं आहे.

 

byju 2 inmarathi

 

भारताबाहेर बायजु’जच्या सेवा सध्या आखाती देशांमध्ये उपलब्ध आहेत. आपला व्यवसायाचा विस्तार अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये करण्यासाठी सध्या बायजु रवींद्रन हे प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने अमेरिकेचं प्रभुत्व मानल्या जाणाऱ्या आयटी क्षेत्रात बायजु या भारतीय व्यक्तीने प्रगती कौतुकास्पद आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?