‘इतना सन्नाटा क्यू हैं भाई’; रहीम चाचांनी चक्क ३ वर्षं कराचीच्या तुरुंगात काढली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
हिंदी चित्रपटांत चरित्र भूमिका हा एक वेगळा विषय आहे. अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी कायम या प्रकारच्या भूमिका केल्या किंबहुना त्यांच्या याच प्रकारच्या भूमिकांसाठी त्यांना ओळखलं जात होतं.
नायक किंवा नायिकेचे वडिल, घरातील वडीलधारी मंडळी आणि कुटुंबातीलच एक सदस्य असल्यासारखा नोकर (शक्यतो रामूचाचा जो बंडी धोतर आणि खांद्यावर लाल गमचा टाकून बाबू बाबू म्हणत नायकाला चार समजूतीच्या गोष्टिही सांगत असे) या सगळ्या भूमिका साधारण या वर्गवारीत मोडत असत.
फिरून फिरून तेच तेच कलाकार या भूमिकांमधे दिसत असत आणि प्रेक्षकांनाही या कलाकारांना बघण्याची इतकी सवय झालेली असे की सराईतपणे ते या कलाकारांना गोष्टीत सामावून घेत असत.
असेच एक चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे अवतार किशन हंगल. अर्थात या नावानं तुम्ही त्यांना ओळखत नसालच. त्यांच्या ए.के. हंगल. या नावानं ते परिचित आहेत. त्याचं वय कधी वाढलंच नाही. ए.के. हंगल यांचं उलट झालं. ते कायमच वयानं वयस्कर गटातले दिसले.
म्हणूनच त्यांना कायम चरित्र भूमिकाच मिळत गेल्या. शोले मधला अंध रहीम चाचा असो की अनुभवमधला घरकाम करणारा चाचा. ए.के. हंगलनी या सगळ्या सिनेमांमधून लक्षात राहतील अशा छोट्या भूमिका साकारल्या.
–
हे ही वाचा – शाहरुखचा ‘तो’ अवतार बघून सनी देओलची ‘पॅन्ट फाटली’..वाचा नेमकी भानगड काय?
–
मात्र अभिनयाची उत्तम जाण असूनही त्यांना एकाच साच्यातल्या भूमिका मिळत गेल्या. शौकिनसारखा एखादा अपवाद वगळता त्यांना वेगळ्या प्रकारच्या भूमिका कधीच मिळाल्या नाहीत.
मूळचे कश्मिरी पंडीत असणारं हंगल कुटुंबातील फाळणीपूर्व भारतातल्या पेशावरमधील सियालकोट येथे १ फेब्रुवारीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातले सदस्य ब्रिटिश सरकारच्या सेवेत होते. मात्र त्यांनी या परंपरेला छेद देत सरकारी नोकरीला विरोध केला आणि चक्क शिलाई काम शिकायला सुरवात केली.
एकीकडे हे कौशल्य शिकणं चालू असतानाच त्यांनी कलाशाखेतली मास्टर्स पदविही प्राप्त केली.राजकारणातही रूची असणार्या अवतारनं पेशावरमधील शिलाई काम करणार्यांची ट्रेड युनियन स्थापन केली. इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशननं त्यांच्या शिलाई कौशल्याची तारीफ केली आणि त्यांच्यासोबत काम केलं.
भारत स्वतंत्र झाला आणि मागोमाग भारत पाकिस्तान फाळणीही झाली. अनेक हिंदू कुटुंबं भारतात स्थलांतरीत होत असताना त्यांनी मात्र पाकिस्तानातच रहाण्याचा निर्णय घेतला. कम्युनिस्ट विचारसरणीच्या हंगलना त्यांच्या या विचारसरणीसाठी तीन वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला होता.
तुरूंगवास संपल्यानंतर त्यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र ए.के. हंगलनी याला ठाम नकार दिला. त्यावर त्यांना त्यांच्या पार्टीतील ज्येष्ठ मुस्लिम सदस्यांकडून केवळ बारा तासांचा अवधी देण्यात आला आणि ताबडतोब पाकिस्तान सोडून भारतात जाण्याचे आदेश देण्यात आले.
अखेर कोणताच उपाय हातात न राहिल्यानं खिशात वीस रूपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली.
मुंबईत आल्यावर त्यांना शिलाईकामाची नोकरी मिळाली. कापडाची उत्तम जाण असणाऱ्या हंगल यांच्या शिलाईकामात प्रचंड सफाई होती. त्यांच्या या कामामुळेच त्यांना अनेक प्रतिष्ठीत असे ग्राहक लाभले. यापैकी एक नाव होतं नवाब पतौडी.
याशिवाय अनेक परदेशी ग्राहकही आवर्जून हंगल यांच्याकडूनच कपडे शिवून घेत असत. त्या काळात त्यांना पाचशे रूपये पगार मिळत असे. त्या काळाचा विचार करता शिलाईकामासाठी हा मोबदला खूप मोठी रक्कम होती. हंगल त्यांच्या या कामावर खुषही होते. मात्र हळूहळू त्यांना शिलाई कामाव्यतिरिक्त काही तरी वेगळं करावं असं वाटू लागलं.
त्यांनी पूर्वी इप्टासोबत काम केलंच होतं आणि यात काम करणारे लोक परिचयाचेही होते मात्र फाळणीनंतर मुंबईत आल्यावर हा संपर्क तुटला होता. हंगलनी इप्टाचे लोक शोधले आणि त्यांची भेट घेतली.
कैफ़ी आझमी आणि बलराज सहानी यांच्या मदतीनं त्यांनी तालमींसाठी जागा भाड्यानं घेतली आणि रंगमंचावर काम चालू केलं. सहानी आणि चेतन आनंद यांना हंगल यांचा रंगमंचावरचा वावर चकीत करून गेला आणि चित्रपटातही भूमिका साकारण्याबाबत त्यांनी विचार करायला सांगितलं.
हंगल यांना मुळातच अभिनयाचं अंग होतं. मात्र चित्रपटात भूमिकांबाबत त्यांनी फार गंभीरपणे विचार केला नाही. बरेच दिवस हा विचार टांगून ठेवल्यानंतर अखेर बासू भट्टाचार्य यांच्या तिसरी कसममधे राज कपूर यांच्या भावाची भूमिका करायला त्यांनी होकार दिला.
मूळ कथेत मोठी भूमिका असली तरीही दुर्दैवानं एडिटींगमधे ही भूमिका इतकी कापली गेली की त्या भूमिकेला आणि हंगल यांच्या पदार्पणाला काही अर्थच उरला नाही. असं असलं तरीही भूमिका कापली जाऊनही याच भूमिकेनं हंगल यांच्यासाठी मात्र चित्रपटसृष्टीची दारं उघडली. वयाच्या चाळीशीत त्यांनी चित्रपटात पदार्पण केलं आणि चरित्र भूमिकांत आपलं स्थान पक्कं केलं.
अनेक पाकिस्तानी मूळं असलेल्या कलाकारांप्रमाणेच हंगल यांनाही शिवसेनेच्या पाकिस्तान विरोधाचा कडवा सामना करावा लागला. १९९३ साली शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी हंगल यांना गद्दार ठरवत त्यांच्या सिनेमात काम करण्यावर बंदी घातली.
याला निमित्त ठरलं त्यांनी पाकिस्तान दिनाला उपस्थित रहाणं. ही बंदी थोडी थोडकी नाही तर तब्बल दोन वर्षं चालली.
त्यानंतर ही बंदी उठवली मात्र तोवर त्यांच्या तब्येतीनं कुरबुर करायला सुरवात केली होती. त्यानी चित्रपट स्विकारणं बंद केलं होतं. त्यांचा अखेरचा चित्रपट होता, अमोल पालेकर यांचा पहेली. याशिवाय ऑस्करसाठी चर्चा झालेल्या लगानमधेही त्यांनी भूमिका साकारली होती.
चरित्र कलाकार म्हणून तुलनेनं कमी लांबीच्या भूमिका असल्या तरीही त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारनं त्यांना २००६ साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं.
–
हे ही वाचा – ५० वर्षांनंतरही “आनंद मरा नहीं है!”- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा
–
आयुष्यभर पैसा आणि प्रसिध्दीत जगलेल्या हंगल यांची अखेरची वर्षं मात्र अत्यंत हालाखित गेली. वयाच्या ९५ व्या वर्षी मुलासोबत ते पडक्या आणि जुन्या जीर्ण घरात हलाखीत रहात होते. ही परिस्थिती इतकी खालावलेली होती की औषधं आणायलाही त्यांच्याकडे पैसे नसत.
बाथरूममधे घसरून पडल्याचं निमित्त होऊन त्यांना हॉस्पिटलमधे भरती करावं लागलं होतं. तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असतानाही त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांची तब्येत इतकी नाजूक बनली होती की शस्त्रक्रिया करणं कठीण बनलं.
अखेरीस त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवलं गेलं आणि वयाच्या ९८ व्या वर्षीस २६ ऑगस्ट २०१२ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.