आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – ईशान पांडुरंग घमंडे
===
मालिकांची लोकप्रियता सांगणाऱ्या टीआरपीचा एक विनोदी फुलफॉर्म मागे एकदा कधीतरी वाचला होता, ‘ते रटाळ प्रोग्रॅम’. गेली अनेक वर्षं लाडक्या असणाऱ्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिकांसाठी हे शब्द अगदीच चपखल ठरतायत, नाही का…!!
मालिका कशी नसावी हेच दाखवण्याची चढाओढ जणू झी मराठीवरील प्रत्येक मालिकांमध्ये पाहायला मिळतेय. वाहिनी कितीही लाडकी असली, तरी हा असला कारभार सहन होत नाही बुवा. सध्याची झी मराठीची अवस्था, म्हणजे ‘प्रेक्षकांच्या हातात रिमोट असतो’ हे चॅनलवाले विसरले, की काय होतं याचं उत्तम उदाहरण.
‘चला हवा येऊ द्या’ची हवा ओसरायला लागली, तेच तेच दळण दळायला त्यांनी सुरुवात केली आणि मग बरेचसे प्रेक्षक सोनी मराठीवरील हास्यजत्रेकडे वळले. याच प्रेक्षकवर्गामधील एक मीही होतो. हास्यजत्रेत निदान त्या स्क्रिप्टमध्ये तरी वैविध्य आहे. नव्या एपिसोडमध्ये नवं काहीतरी पाहिल्याचं समाधान मिळतं. असो…
झी मराठी वाहिनीवर एक नाही, दोन नाही तर चक्क पाच नव्या मालिका एंट्री घेतायत. त्याचा शुभमुहूर्त म्हणून श्रावणी सोमवारची निवड केलेली दिसतेय. आता ५ नव्या मालिका सुरु होणार, म्हणजे ५ मालिका गाशा गुंडाळणार. मालिकांचे स्लॉट बदलले जाणार आणि ६.३० ला अवतरणारे आदेश भावजी आता ६ वाजता येणार अशीही चर्चा सुरु आहे म्हणे…
या चर्चेत तथ्य असेल, तरी किमान चार मालिकांना बॅगा भरून ‘पॅकअप’ म्हणावं लागणार आहे, हे तर नक्कीच!
या मालिकांच्या यादीत ‘अग्गबाई सुनबाई’ या ‘नव्या कोऱ्या’ (!?) मालिकेचा सुद्धा समावेश आहे. मार्च महिन्यात सुरु झालेली मालिका ऑगस्ट महिन्यात गुंडाळून टाकावी लागतेय. (आता ही मालिका म्हणजे नव्याने नाव, शीर्षक गीत आणि इतर गोष्टींचा मुलामा देऊन ‘लीप घेतलेली’ जुनीच मालिका होती, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याबद्दल कुणी बोलायचं नाही बरं…)
===
हे ही वाचा – नव्या वेष्टनात शिळाच माल! ‘अग्गबाई’, नव्या नावाने आपल्या माथी हे काय मारलं जातंय?
===
‘झी मराठी’सारख्या वाहिनीवर ही अशी वेळ येईल असं कधीही वाटलं नव्हतं. मालिकांचा दर्जा घसरतोय हे काही नवीन नाहीच. तद्दन टाकाऊ मालिका पाहायला लागू नयेत, म्हणून अनेक प्रेक्षकांनी ‘झी’कडे पाठ फिरवली. गेले काही महिने सातत्याने ‘स्टार प्रवाह’ अव्वल स्थान राखून आहे.
माझ्यासारख्या काही प्रेक्षकांनी सोनी मराठीवरील ‘श्रीमंताघरची सून’ वगैरे मालिकांवर सुद्धा नजर मारली. अर्थात, हास्यजत्रा सोडून इतर गोष्टींसाठी सोनीकडे फिरकावं असं वाटत नव्हतं. सध्या मात्र करोडपतीने सुद्धा प्रेक्षक खेचले आहेतच. थोडक्यात काय, तर पूर्वी लोकांना पर्याय नव्हते, आता ते आहेत हे ‘झी मराठी’ला विसरून चालणार नाही.
महिन्या दीड महिन्याच्या अंतरात, ४-५ मालिकांना पळ काढावा लागत असेल, तर चॅनलचं भविष्य खरंच अंधारात आहे असं म्हणायला हवं. म्हणूनच मग, विजय कदम, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे असे मोठे आणि नावाजलेले चेहरे लोकांना दाखवून ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ असं म्हणत प्रेक्षकांना बोलावण्याची वेळ चॅनलवर आलीय.
हृता दुर्गुळे सारखा सुंदर चेहरा प्रोमोमधून व्हायरल करून, तरुणाईला आकर्षित करण्याचे प्रयोगही सुरु आहेत. जिथे उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या स्मृती मंधानाचा गोड चेहरा, तिचं क्युट असणं बघून तरुणाई त्यावरही भाळते, तिथे हृता आणि प्रार्थनासाठी मालिका बघायला प्रेक्षक ‘झी मराठी’कडे वळू शकतात, हेही खोटं मुळीच नाही.
थोडक्यात काय तर, अवंतिका, आभाळमाया, वादळवाट, एका लग्नाची दुसरी गोष्ट, श्रीयुत गंगाधर टिपरे या आणि अशा अनेक दर्जेदार मालिका देणाऱ्या ‘झी मराठी’ला आता ‘अट्रॅक्टीव्ह पॅकेजिंग’ हा मार्केटिंग फंडा वापरावा लागतोय.
सध्याची स्थिती पाहता, नव्या मालिकांकडून फार काही अपेक्षा नाहीत. त्या ठेवण्यात अर्थही नाही. अपेक्षा ठेऊन नंतर भ्रमनिरास होण्यापेक्षा अपेक्षाच न ठेवणं चांगलं…! वेड्या मनाला ते कळेल का, कळलं तर वळेल का हा प्रश्न आहेच.
‘माझा होशील ना’ ही मालिका संपणार असल्याची चर्चा रंगतेय. काहींचं म्हणणं आहे, तिची वेळ बदलण्यात येणार आहे, तर काहींच्या मते ही मालिका घरचा रस्ता धरणार आहे. यातील जे काही खरं असेल ते असो, पण ‘झी मराठी’वरील ही अगदीच तर्कहीन असणारी मालिका, अतुल परचुरे पडद्यावर आला की हवीहवीशी वाटू लागते. त्याने रंगवलेली पहिलीवहिली नकारात्मक भूमिका मनाचा ठाव घेऊन गेली आहे. हाच तो ‘कळतंय पण वळत नाही’मधला प्रकार, ज्याविषयी मी मगाशी बोललो.
===
हे ही वाचा – नेहमीप्रमाणे भरकटलेल्या मालिकेतील एकमेव ‘चांगली’ गोष्ट – “खलनायक” अतुल परचुरे!
===
‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘मन झालं बाजिंद’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘मन उडू उडू झालं’ आणि ‘ती परत आलीये’ या नावाने नव्या मालिका आता झी मराठीवर अवतरणार आहेत. या नव्या मालिकांकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीतच हे तर आधीच ठरवलंय. तुम्हीही ठेऊ नका, हेही सांगेन. पण, काय करणार मंडळी पुन्हा एकदा वेडं मन आलंच की उफाळून.
‘ती परत आलीये’मधली ‘ती’ म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीची गेलेली लाज ठरावी आणि पुन्हा एकदा, या वाहिनीने मुसंडी मारावी अशी इच्छा मनात नक्कीच आहे. कसंय शेठ, शेवटी झी मराठी म्हणजे ‘बचपन का प्यार’… आणि ‘बचपन का प्यार भूल नहीं जाना रे’
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.