वयाच्या ७१व्या वर्षीही आपल्या जबरदस्त फिटनेसने तरुणांना प्रेरणा देणारा शरत सक्सेना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
बॉलिवुडमधे अनेक चेहरे कित्येक वर्षं काम करत असतात मात्र मुख्य भूमिकेत न दिसता सहाय्यक भूमिकांमधून ते येत राहतात. काहींना लहानशा भूमिकांतूनही एक ओळख मिळते तर काहींना आयुष्यभर चेहर्याला नावच मिळत नाही. शोलेमधला सांबा अर्थात मॅकमोहन हे याचं उत्तम उदाहरण.
काही मिनिटांची भूमिका आणि एखाद दुसरा संवाद लाभलेला सांबा आयुष्यभर सांबा म्हणूनच ओळखला गेला. ऐंशीच्या दशकात व्हिलनच्या आजूबाजूला असणारी त्याची चमचे मंडळी सिनेमा बदलाला, व्हिलन बदलला तरीही तीच असे.
आठवतोय डॉनमधला टकलू? डॉन शिवाय बरसात की रात, शालीमार, दुसरा आदमी, दीवार अशा शेकडो चित्रपटातून झळकलेला हा खलनायक मधुबाबू शेट्टी कायमच छोट्याशा भूमिकांतून झळकत राहिला.
ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात आलेला असाच एक चेहरा आज वयाच्या सत्तराव्या वर्षी मात्र पुन्हा एकदा चर्चेच आला आहे. मात्र यावेळेस चित्रपटातल्या भूमिकेसाठी नाही तर कमालिच्या बॉडी ट्रासन्सफ़ॉर्मेशनसाठी ही चर्चा रंगली आहे. अनेक हिंदी चित्रपटांतून झळकलेलं हे नाव आहे, शरद सक्सेना.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण, अमिताभसोबतच शरद सक्सेनाचंही बॉलिवूड पदार्पण झालेलं होतं. भागमभाग सारखा विनोदी चित्रपट असो किंवा दबंगसारखा ॲक्शन चित्रपट.
शरदनी हरतर्हेची भूमिका साकारली आहे मात्र इतकं करूनही आज ते सहाय्यक भूमिकांसाठीच ओळखले जातात. अलिकडेच त्यांनी याबाबत खंतही व्यक्त केली.
शेरनी चित्रपटात त्यांच्या वयाहून वीस वर्षं लहान दिसलेल्या शरदना त्यासाठी तासन तास वर्क आऊट करावं लागलं आहे.
–
हे ही वाचा – बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अनेक वर्षे अंधारात राहूनही स्वबळावर उजळलेला तारा आपल्यालाही प्रेरणा देतो!
–
इंडस्ट्रीत तरूण लोकांसाठी काम आहे मात्र वृध्दांसाठी नाही आणि ज्या काही थोड्याफार भूमिका लिहिल्या जातात त्या आजही अमिताभकडेच जातात यामुळे माझ्यासारख्या वयानं ज्येष्ठ अशा कलाकारांना आजही कामासाठी निर्मात्यांकडे खेटे घालावे लागतात.
मुळचे भोपाळचे असलेलं सक्सेना कुटुंब आणि यातला शरद. भोपाळमधील सेंट जोसेफ हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जबलपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगची पदवी घेतली.
मात्र लहानपणापासूनच अभिनयाची आवड आणि हिंदी चित्रपटांच वेड असलेल्या शरदला मुंबई खुणावत होती. शरद यांच्या कुटुंबाचा चित्रपटांशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. त्यामुळेच इंडस्ट्रीत काम मिळविण्यासाठी आणि टिकून रहाण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
१९७४ साली बेनाम या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. हळूहळू सहाय्यक भूमिकांमधे त्यांनी आपलं स्वतंत्र स्थान बनविलं. मात्र या सहायक भूमिकांत ते टाईपकास्टही झाले.
मध्यंतरी एका मुलाखतीत सहायक भूमिकेत टाईपकास्ट झाल्याविषयी खंत वाटते का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, सुरवातीच्या काळात भूमिकेच्या लांबीपेक्षाही मी त्या भूमिकेसाठी पैसे किती मिळणार आहेत हे पहायचो.
कारण मुंबईसारख्या शहरात जेव्हा कोणाच्याही आधाराशिवाय तुम्ही रहाता तेंव्हा तुमचा संघर्ष जीवघेणा बनतो. इथला खर्च भागवून टिकून रहायचं तर सतत कमावत रहाण्यावाचून पर्याय नाही.
मी चित्रपटात आलो आणि माझं लग्न झालं. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती त्यामुळे भूमिका निवडण्याचं स्वातंत्र्य मला नव्हतं. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे पैसा कमावणं हे जास्त महत्वाचं बनलं होतं.
ते ज्या काळात चित्रपटात आले तेव्हा मस्क्युलर हिरोची चलती नव्हती. फिटनेस राहूदे पण जवळपास थोराड आणि काहीसे बेढब असे नायकही लोकांना चालत असत.
फिटनेसकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतंच. सलमान खाननं पहिल्यांदा हिरोला पिळदार शरीराचा साकार केला आणि तिथून हिरो म्हणलं की तो सिक्स पॅकवालाच असावा हे समीकरण बनलं.
मात्र ही पिळदार शरीराची चलती येईपर्यंत शरद यांचं हिरोच्या भूमिका साकारायचं वय सरलं होतं. शरीरयष्टीशिवाय हिंदी चित्रपटात रंगावरही लक्ष दिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे.
हिरो गोरा चिठ्ठा, चिकनाचुपडा असलेलाच लागतो त्यामुळे जरा गडद वर्ण असणारे चेहरे इथे हिरो म्हणून चालत नाहीत. बेनाम पासून फिल्मी कारकीर्दीची सुरवात केलेल्या शरद यांनी हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमधूनही भूमिका साकारलेल्या आहेत.
अलिकडेच शरदनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एक फोटो पोस्ट केला आणि बघता बघता तो फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये त्यांचं बॉडीट्रान्सफ़ॉर्मेशन बघून भले भले थक्क झालेले आहेत. विशेष म्हणजे तरूणांनी शरद यांची तोंडभरून स्तुती केलेली आहे.
फिटनेसला वय नसतं. मनात आणलं तर सत्तरीतही हे ध्येय साध्य करता येतं हा संदेश या फोटोतून जात आहे.
ज्या वयात इतर कलाकार तब्येतीच्या त्रासानं हैराण आहेत, फिटनेस दूरच राहिला पण नियमीत आरोग्य राखतानाही अनेकांची दमछाक होत आहे तिथे शरद सक्सेनांची फिटनेस स्टोरी अबालवृध्दांसाठी प्रेरणादायक आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.