' …मग आता आम्ही पाहायचं कुणाकडे? वाचा, ‘सामान्य माणसाचा’ प्रांजळ सवाल!! – InMarathi

…मग आता आम्ही पाहायचं कुणाकडे? वाचा, ‘सामान्य माणसाचा’ प्रांजळ सवाल!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

‘राजकीय भूकंप’ या शब्दाची तीव्रताच आता कमी झालेली आहे, असं म्हणायला हवं. कारण ‘भूकंप’ असं नाव द्यावं अशा विचित्र घटना राजकारणात घडण्याचं प्रमाण फार वाढलं आहे.

सध्याच्या राजकीय स्थितीवर नजर टाकली, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या पहाटेच्या धक्क्यापासून सुरू झालेला प्रवास मग पुढे ‘महाविकास आघाडी’ व्हाया ‘महा शिव आघाडी’ असा येऊन पोचला तो आजवर सुरू आहे.

खरंतर काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेने एक वेगळा पर्याय म्हणून भाजपची निवड केली होती, पण आज तसलं काहीच घडताना दिसत नाहीये. भाजपकडे बघून एवढंच म्हणावसं वाटतंय, “अहो काय राव, ‘तुम्ही सुद्धा (!) त्यातलेच”

 

devendra fadnavis inmarathi

 

राज्यातील नेत्यांच्या मागे केंद्रीय संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लावणं, हा परंपरागत चालत आलेला फॉर्म्युला भाजपने सुद्धा वापरला. आता या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम होणार होताच. १२ आमदारांचं निलंबन ही प्रतिक्रिया भाजपला भोगावी लागली. पुढील वर्षभरासाठी (किंवा कायदेशीररित्या निलंबन रद्द होईस्तोवर) तरी, ‘मी पुन्हा येईन’चं स्वप्न पुन्हा लांबलं.

राजकारण करण्यात भाजपच्या नेत्यांनी सुद्धा बरीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातही गैर काही नाही, पण हे करताना तुम्ही तुमची पातळी सोडू नये. निदान तुमच्याकडून तरी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला तशी अपेक्षा नाही. मात्र काही मंडळी हे विसरून वागू लागली आहेत, त्यांच्याविषयी बोलल्याशिवाय आता चैन पडणार नाही.

पुन्हा या पण ‘असे’ नको…

सुरुवात करायची झाली, तर ती विद्यमान विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासूनच करायला हवी. काय काय बोलावं आणि काय नाही, अशी स्थिती आहे मंडळी! पार ‘अजित दादांशी त्यांनी केलेली हातमिळवणी’ इथूनच त्या सगळ्याची सुरुवात होते. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही नाही…’ असं अगदी ठासून सांगणाऱ्या महाशयांनी पहाटे पहाटे थेट शपथविधीच उरकला होता की राव!

 

ajit pawar devendra fadnavis inmarathi

===

हे ही वाचा – जुनी विटी, नवा डाव! “भावी” म्हटले जाणारे ‘पवार’ अॅक्शनमध्ये! वाचा परखड मत…

===

आता जरा काही महिने मागे जाऊयात, तन्मय फडणवीस नावाच्या एका व्यक्तीने लस घेतली होती. लस घेतली हा प्रॉब्लेम नाहीच आहे मंडळी, ज्यावेळी ४५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरु झालंच नव्हतं, त्यावेळी त्याने लस घेतली; तीदेखील देवेंद्र साहेबांचं नाव घेऊन.

‘याविषयी मला काहीही माहित नाही’, असं काहीसं त्यावेळी ‘या पुतण्याचा काका’ म्हणाला होता बरं का… त्यांनतर तन्मय याने वैद्यकीय कर्मचारी म्हणून लस घेतल्याची माहिती समोर आल्याचं म्हटलं गेलं. ‘चाचा विधायक हैं हमारे’ ही झाकीर खानची वेब सिरीजच आठवली ना राव…

 

devendra and tanmay fadnavis inmarathi

 

हेच देवेंद्र फडणवीस सध्या ज्या पातळीवर जाऊन राजकारण करतायत ते बघून खरंच फार वाईट वाटतंय. खुर्ची मिळाली नाही म्हणून त्यांचा स्वाभिमान दुखावलाय अशी ओरड तर गेले अनेक महिने सुरु आहे. ते पूर्णपणे पटत नव्हतं, मन मानायलाच तयार नव्हतं. पण आता तसं नाही. फडणवीसांच्या इगोला ठेच लागली आहे हे नक्की!

“मला पंढरपूरचा एक आमदार द्या, मी सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतो” असं म्हणणारे देवेंद्रजी यांची भाषा गेल्या काही दिवसात अचानक बदलली आहे की हो. शिवसेना हा काही आमचा आमचा शत्रू नाही, वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत असं ‘छापील वाक्य’ त्यांच्याही तोंडी येऊन गेलं.

 

devendra fadnavis uddhav thackeray inmarathi

 

मतभेद, मनभेद अशा शब्दांचा खेळ करून पुन्हा नवं राजकारण सुरु करण्यात आलं आहे. सेना-भाजप हे ‘घटस्फोटित युगुल’ पुन्हा एकत्र येईल की नाही, ते येत्या काळात कळेलच, पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा हीन दर्जाच्या राजकारणाची अपेक्षा अजिबातच नाही.

पाटील साहेब थोडं दमानं

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुद्धा जरा बरा नेता म्हणून जनता पाहत होती. त्यांच्याही जिभेचा लगाम सत्ता गेल्यापासून सुटलाच आहे. विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला तोंडाची वाफ दवडावी लागणार हे खरं आहे, पण ते करत असताना आपल्या बोलण्यात कुठे काही विसंगती, विरोधाभास वगैरे नाही ना याची तरी काळजी घ्यायला हवीत की साहेब!

तुमचा सहकारी असणाऱ्या शिवसेनेने इतर दोन पक्षांना एकत्र घेऊन तुमचा पत्ता कट केलाय, हे खरंय; पण म्हणून त्यांच्यासोबत तुम्ही पुन्हा जाणारच नाही असं नाहीये, हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नसावी…!!

 

uddhav thackarey and devendra fadnavis inmarathi

 

प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत थोडं पक्षातील अंतर्गत राजकारण सुद्धा कमी करता येईल असं बघाल तर बरं होईल अशीही सामन्यांची अपेक्षा आहे बरं का… म्हणजे जे विनाकारण (तुमच्यासारखीच) तोंडाची वाफ दवडतात त्यांना जरा आवरतं घेता आलं तर बरं… बरं तेही राहिलं, माजी शिक्षणमंत्री असणारे तावडे कुठे आहेत? ‘ते सध्या काय करतात?’ पडलाय आम्हाला… खरं तर या ‘प्रश्नाचा विनोद’ झालाय.

===

हे ही वाचा – रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

===

हे असंच सुरु राहिलं, तर भाजपच्या गोटात आणखी एखादे एकनाथ खडसे निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. सध्याच्या तुमच्या स्थितीत जिथे देशभर तुमची आयात सुरु आहे, तिथे ही अशी गळती तुम्हाला परवडणार आहे का?

 

chandrakant patil inmarathi

 

मुंढेंची (सु!)कन्या

गोपीनाथ मुंढे हे भाजपमधील एक उमदं आणि आदर करावं असं व्यक्तिमत्व होतं. आजही त्यांच्याविषयीचा आदर कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काहीशा मनमानी कारभाराकडे पाहताना, आज प्रमोद महाजन असायला हवे होते, असं सामान्यांना वाटतं, तसंच गोपीनाथ साहेब हवे होते असं वाटल्याशिवाय राहत नाही.

 

gopinath-munde-inmarathi

 

त्याच मुंढेंची कन्या मात्र सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यातच आहे. मग तो चिक्की घोटाळा असो किंवा त्या पक्ष सोडणार असल्याच्या होणाऱ्या चर्चा असोत. अधूनमधून वडिलांच्या पुण्याईचा आधार घेऊन ही पंकजा ताई स्वतःला चर्चेत ठेवत असतात. ओबीसीचा विषय आला की मोर्चात सहभागी सुद्धा होतात. त्यांनी समाजासाठी लढू नये, असं अजिबात म्हणणं नाही पण अख्खी जनता कोरोना काळात ‘घरात बसून’ असताना आंदोलनं कसली करता.

 

pankaja mundhe inmarathi

 

देश पातळीवरही तेच चाललंय

कालच अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या नव्याने नियुक्त्या झाल्या. या राज्यांची यादी बघितली तर लक्षात येतंय, की यातल्या बहुतांश राज्यांच्या निवडणूक तर येत्या काळात येऊ घातल्या आहेत मंडळी… म्हणजे काय, तर तिथेही राजकारण करण्याची तयारी सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातलं ऑपरेशन लोटस जरा बाजूला पडलेलं दिसतंय. त्यातही ‘बारा’मतीकर सामील असलेल्या सरकारने १२ आमदारांची १२ महिन्यांसाठी झोप उडवली असल्यामुळे हे ऑपरेशन आणखी काही काळ लांबणीवर पडलंय. आता भाजप त्याच बारामतीकरांना सोबत घेऊन पुन्हा सत्तेत येऊ शकतं ही बात आणखी निराळी. देवेंद्रजी विधानसभेत ‘पुढच्या वेळी तुमच्यासोबत येऊ’ असं भुजबळांना म्हणाल्याचंही अजून आमच्यासारखे लोक विसरले नाहीयेत. गमतीत म्हणाले असतील, तरी सत्यात घडणं ‘अशक्य’ नाही.

 

bhujbal and fadnavis inmarathi

===

हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

===

असो, इतर राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या, ४० हून अधिक नवीन मंत्र्यांसह केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे प्रकार येणाऱ्या काळातील निवडणुका नजरेसमोर ठेऊनच केलं जातंय हे शेंबडं पोर सुद्धा सांगेल. बरं, महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील अशा ‘आयात’ उमेदवारांचा या यादीत समावेश झालेला आहे. यावर अधिक बोलणे न लगे…

नितीन गडकरी हेदेखील महाराष्ट्र भाजपमधील एक साफसुतरं नाव म्हटलं जातं. आज त्यांचंही नाव एका ‘नकोशा यादीत’ समाविष्ट झालंय की…

ईडीने कारवाई करावी या उद्देशाने जी साखर कारखान्यांची यादी काढण्यात आली, त्यात गडकरींशी संबंधित २ कारखान्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. यावर मला तर एवढंच म्हणायचंय, “अहो गडकरी, तुम्हीसुद्धा…”

 

nitin gadkari inmarathi

 

थोडक्यात काय, तर भाजप हा काँग्रेसचा ‘चांगला पर्याय’ राहिला नसून ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या कॅटेगरीमध्ये गेलाय. हे असंच सुरु राहिलं तर भाजपवरील उरला सुरला विश्वास उडायला वेळ लागणार नाही…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?