Site icon InMarathi

नेहमीप्रमाणे भरकटलेल्या मालिकेतील एकमेव ‘चांगली’ गोष्ट – “खलनायक” अतुल परचुरे!

atul parchure majha hoshil na inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

‘संध्याकाळच्या मनोरंजनाचं मुख्य साधन काय?’ असा प्रश्न विचारला, तर घरातला ‘इडियट बॉक्स’ अर्थात टीव्ही आणि त्यावर लागणाऱ्या मालिका, असंच अनेकांचं उत्तर असेल. तसं पाहायला गेलं, तर आता मालिका हे खरोखरंच मनोरंजन उरलंय का, हा प्रश्न आहेच; कारण सासू सुनांच्या भांडणाचा सर्रास वापरला जाणारा फॉर्म्युला आता बदलला असला, तरी मालिकांचा दर्जा घसरलाय हेही तितकंच खरंय.

हल्लीच्या काळातील मालिका आणि त्यांना दिली गेलेली नावं यांचा एकमेकांशी काडीमात्र संबंध नसतो, असंच म्हणायला हवं. ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत नायिका नेहमीच नायकाला पाहत असते, कथानक मात्र काहीतरी भलतंच! ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेची गतही काही फार निराळी नाही.

 

 

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतसुद्धा सध्या तरी नांदणं सोडून इतरच गोष्टी सुरु आहेत, हेही वेगळं सांगायला नको. ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिन्ही भागांमध्ये खेळ तर सुरु असतात, पण ते नेमके कसले आणि का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याच यादीत आणखी एका मालिकेचा अगदी आवर्जून उल्लेख करावा लागेल, ती म्हणजे ‘माझा होशील ना’…!!

अगं बाई, झाला आता (!) तो तुझा… तरीही मालिका सुरूच आहे. खरं तर तो तिचा झाला, तिथूनच मालिका खऱ्याअर्थाने सुरु झाली आहे, असं म्हणायला हवं.

===

हे ही वाचा – आताच्या टुकार मालिका सोडा.. या १० मराठी सिरीयल आजही आवर्जून बघा!!!

===

मालिकेचं नाव काय आणि त्यात घडतंय काय… आदित्य सईचा होण्यासाठी, म्हणजेच मालिकेचं शीर्षक (थोडंफार तरी!) सार्थ ठरण्यासाठी, जे काही घडलं तेसुद्धा बेशक अतिरंजक आणि मेंदू बाजूला ठेऊन पाहावं असंच होतं, पण तेही असो. निदान ते मालिकेच्या नावाशी मिळतंजुळतं आणि मालिका ट्रॅकवर आहे, असं भासवणारं तरी होतं.

 

 

सध्या जे काही सुरु आहे, ते मात्र अवर्णनीय आणि अविश्वसनीय आहे. खरं तर मालिकेचा नायक आदित्य, हा आदित्य कश्यप नसून, आदित्य देसाई आहे, हे कळलं तेव्हाच मालिकेवरचा विश्वास उडाला होता. ‘भाई ये तो जॉन स्नो निकला’ अशी भावना होती मनात! (तुम्ही केवळ मराठी मालिकांचे चाहते असाल, तर हे मागील वाक्य सोडून द्या, ही नम्र विनंती.)

हे असले ‘ट्विस्ट अँड टर्न’ साऊथच्या चित्रपटांमध्ये किंवा हॉलिवूडच्या चित्रपट आणि सिरीजमध्येच वापरले जावेत. त्यांना ते झेपतात, आपल्याकडच्या मालिकांमध्ये हे असं काहीतरी करायला गेल्यावर निव्वळ बालिश वाटतं, असं माझं स्पष्ट मत आहे.

आदित्य, कश्यप नसून देसाई आहे हे कळल्यानंतर ही मालिका बघूच नये अशा विचारांपर्यंत मी पोचलो होतो. (तसंही मालिका रोज बघाव्या लागत नाहीत, चार दिवसातून एकदा पाहिल्या तरी कथानक तिथेच असतं, हा भाग निराळा…) मात्र, त्याचवेळी मालिकेतील सर्वोत्तम गोष्ट घडली होती, ती म्हणजे अभिनेता अतुल परचुरे याची मालिकेतील एंट्री…!!!

 

===

हे ही वाचा – ‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

===

नेहमी सोज्वळ आणि गोड भूमिकांमध्ये दिसणारा अतुल परचुरे ‘झी मराठी’ वाहिनीवरील या मालिकेतून पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळतोय. जेडी म्हणजेच जयवंत देसाई हा आदित्य कश्यप म्हणजेच आदित्य देसाई याचा सख्खा काका… जेडी म्हणून अतुल परचुरेने जी काही अप्रतिम एंट्री घेतली आहे, तिला तोड नाही…

त्याने ते ‘लब्बाड’ असं म्हणणं, आणि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघितले, की दर्जेदार अभिनय म्हणजे काय ते अनुभवल्याचा आनंद मिळतो. लब्बाड या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्याने बदलून टाकलाय असं म्हणता येईल.

काजळ लावलेले ते डोळे, भेदक आणि करारी नजर, चेहऱ्यावरील कपटी भाव, ते विकट हास्य, किती किती म्हणून वर्णन करावं… एक पात्र म्हणून कदाचित जेडी सुद्धा वास्तववादी वाटणार नाही, पण अतुल परचुरेचा अभिनय या पात्रामध्ये वेगळीच जान फुंकतो.

त्याची ‘लब्बाड’ म्हणायची खास स्टाईल आहे, तशीच आदित्य कश्यप या नावाचा आदित्य केचप असा उल्लेख करणं, त्यावेळी त्याने वापरलेला खास स्वर, या सगळ्यांमुळे ते पात्र अधिकच क्रूर वाटू लागतं.

 

 

अतुल परचुरेसारख्या उत्तम नटाला खलनायक म्हणून पाहणं हा एक निराळाच आनंद आहे. नाही म्हणायला खलनायक आणि खलनायिका यांची मोठी फौज या मालिकेत उभी केलेली आहेच. नायक किंवा नायिकेची आई/बाबा किंवा जवळच्या नात्यातली कुणीतरी व्यक्ती व्हिलन असणं, हा पूर्वापार चालत आलेला ‘फुल्ल प्रूफ’ फंडा तर वापरलेला आहे.

अतुल परचुरे मात्र, या सगळ्यांवर कडी करून सर्वोत्तम खलनायक ठरतोय.. माझ्यासाठी तर नक्कीच… कदाचित तुम्ही सुद्धा याच्याशी सहमत असाल…

मध्यंतरी अनेक दिवस हे पात्र पडद्यावर दिसत नव्हतं. नव्याने लागलेल्या लॉकडाऊनचा परिणाम म्हणून बदललेलं कथानक म्हणून म्हणा, किंवा मुळातच असलेल्या कथानकात, मधल्या काळात त्या पात्राची लेखकाला गरज वाटली नसेल, म्हणून म्हणा पण जेडी गायब झालेला होता.

अतुल परचुरे कधी एकदा पुन्हा पडद्यावर येतोय, याची आतुरतेने वाट पाहत होतो मी… चातकासारखी!! अखेर मागच्या काही दिवसांपासून तो पुन्हा दिसू लागला आणि मालिका पुन्हा ट्रॅकवर (!) आली असं म्हणूयात. (ट्रॅकवर म्हणजे मुळात ऑफट्रॅकच आहे, पण त्या ऑफट्रॅकच्या मूळ ट्रॅकवर असं म्हणणं अधिक योग्य ठरले का राव?)

असंही मालिकेच्या नावाचा आणि कथानकाचा आता बादरायण संबंध सुद्धा उरलेला नाही, मग घ्याच आणखी थोडी लिबर्टी आणि जेडी आणि आदित्यची ठशन दाखवा नुसती पडद्यावर… कारण आदित्य देसाई हा ‘आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज’चा मालक आहे, हे त्याला कळण्यासाठी आणखी किती दिवस जाणार आहेत, ते देवच जाणे.

 

===

हे ही वाचा – स्वामी समर्थांवरील मालिका चंदाभोवतीच का फिरते? अतिरंजितपणा थांबवायला हवा!

===

तो बापडा, अजून स्वतःला आदित्य कश्यपच समजतोय. अग्गबाई वाल्यांनी वेळीच (?) नाव बदललं, तसं यांनी सुद्धा ‘माझा होशील ना’ हे नाव बदलून ‘मालक होशील ना’ असं करायला हरकत नाही. निदान मालिकेत जे दाखवलं जातंय, त्याचाशी मिळतंजुळतं काहीतरी नावातही दिसेल.

एकीकडे वडिलांची ठीगभर संपत्ती, दुसरीकडे नवरा करोडोंचा मालक, आणि तरीही ती सई बिचारी भावाच्या चाळीची मालकीण म्हणून मिरवणाऱ्या आदित्यच्या मामीकडे मोलकरीण म्हणून काम करणार. बिचारीचे हाल पाहवत नाहीत आता. एकदाचा त्या आदित्यला मालक करून टाका कंपनीचा आणि सोडवा सईला यातून…

 

 

ती यातून सुटणार नाहीच, आगीतून फुफाट्यातच पडेल. पण पडू देत. कारण तिथे अतुल परचुरे पुन्हा फॉर्मात येतील. आता खरा खलनायक जेडीच आहे. पुन्हा एकदा ‘अरे लब्बाड’ असं म्हणत तो आदित्यकडे त्या भेदक नजरेने आणि कपटी हास्य चेहऱ्यावर आणून बघेल आणि एक आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीत, एक छानशी फुंकर मारायला एका नकारात्मक भूमिकेतून सज्ज होईल…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version