Site icon InMarathi

बाळासाहेबांनी एक फोन केला आणि मुंबई सोडून गेलेल्या अवधूतचा जीव भांड्यात पडला!

avdhoot featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मराठी सिनेमा हा नेहमीच लोकांना काहीतरी वेगळं देण्याच्या प्रयत्नात असतो. आशयघन कथानक नेमकं कसं मांडायचं हे मराठी सिनेमातून शिकण्यासारखं आहे. शिवाय राजकीय धर्तीवर बेतलेले मराठी सिनेमे आजही लोकं आवडीने बघतात.

राजकीय मराठी सिनेमा म्हंटलं की आपल्यासमोर उभे राहतात वजीर, सिंहासन, सामनासारखे दर्जेदार सिनेमे, या सिनेमांच्या माध्यमातून तत्कालीन राजकीय परिस्थितिवर फार परखडपणे भाष्य केलं गेलं.

 

 

हे सिनेमे फक्त राजकीय नाही तर सामाजिक प्रश्नांनासुद्धा उचलून धरणारे सिनेमे ठरले. पण २००९ साली या सगळ्या राजकीय फिल्म्सची परिभाषा बदलून टाकणारा एक सिनेमा आला ज्यामुळे त्या वेळचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं!

महाराष्ट्राच्या राजकीय विश्वातल्या एका अत्यंत धक्कादायक सत्य घटनेवर हा सिनेमा बेतला होता, तो सिनेमा म्हणजे अवधूत गुप्ते दिग्दर्शित झेंडा!

सगळ्या महाराष्ट्राने हा सिनेमा डोक्यावर घेतला, काहींनी खूप विरोध केला, काहींनी समर्थन केलं, एकंदरच तिकीटबारीवर त्या वर्षी झेंडाने रेकॉर्डब्रेक कमाई केली.

 

 

महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय परिवारातल्या अंतर्गत मंतभेदांवर आणि एका मोठ्या राजकीय पक्षात पडलेल्या फूटीमुळे ढवळून निघालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणावर हा सिनेमा बेतला होता.

हे ही वाचा शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!

तुम्हाला अंदाज आला असेलच, राज ठाकरे यांचं शिवसेनेतून बाहेर पडणं आणि त्या नंतर ठाकरे परिवारात निर्माण झालेली दरी, बाळसाहेबांवर झालेले घराणेशाहीचे आरोप आणि चुकीच्या हाती कंट्रोल गेल्याने नाराज झालेले कित्येक शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या नवीन पक्षात प्रवेश केला होता!

 

 

याच धर्तीवर थोडा काल्पनिक रंग भरून अवधूत गुप्ते या गुणी संगीत दिग्दर्शकाने त्याच्या या पहिल्या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. कितीही काल्पनिक म्हंटलं तरी झेंडामध्ये खरी नावं न घेता बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे दाखवल्या होत्या.

या गोष्टीवरून खुद्द दिग्दर्शक अवधूत गुप्ते याला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता, कारण ज्यांच्या एका शब्दावर सारी मुंबई बंद व्हायची अशा बाळासाहेब ठाकरेंचा आणि एकेकाळी मराठी अस्मितेसाठी झटणाऱ्या शिवसेनेविषयी यात बरंच भाष्य केलं गेलं होतं!

सिनेमा हा पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या नजरेतूनच दाखवलेला असला तरी बऱ्याच राजकीय घडामोडी या सिनेमात जशाच्या तशा दाखवण्यात आल्या होत्या, आणि यामुळे अवधूत गुप्ते विरोधात वातावरण बरंच पेटलं होतं!

 

 

खुद्द बाळासाहेब यांनीदेखील या सिनेमाचा विरोध कधीच केला नव्हता, पण काही कडव्या शिवसैनिकांना चित्रपटातल्या बऱ्याच गोष्टींवर आक्षेप होता, पण अखेरीस सिनेमा सेन्सॉरच्या तावडीतूनही सुटून प्रदर्शित झाला आणि लोकांनी अक्षरशः सिनेमा डोक्यावर घेतला.

यातली गाणी तर आजही लोकांना तोंडपाठ आहे, ज्ञानेश्वर मेश्रामच्या आवाजातलं “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती” हे गाणं आणि गुरु ठाकूरने लिहिलेले शब्द ऐकताना आजही अंगावर काटा येतो.

एवढं होऊनही अवधूत गुप्ते बद्दलचा राग काही कमी होत नव्हता, त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी बाहेर कित्येक लोकं येऊन निदर्शनं करायचे त्याचा आणि त्याच्या सिनेमाचा विरोध करायचे!

या सगळ्याला कंटाळून आणि त्रासून अवधूतने त्याच्या कुटुंबासोबत मुंबई सोडून काही दिवस गोव्यात जाऊन राहायचे ठरवले, त्याप्रमाणे तो तिथे गेला आणि मध्यंतरी एका मासिकात झेंडाबद्दल एका खोचक पत्रकाराने बराच मोठा लेख लिहिला होता!

या लेखात त्या पत्रकाराने असंही नमूद केलं होतं की “अवधूत गुप्तेला जसा पाठिंबा हवा होता तसा पाठिंब देण्यात शिवसेना कमी पडली!” कर्मधर्म सहयोगाने तो लेख बाळासाहेबांच्या वाचण्यात आला, आणि त्यांनी ताबडतोब अवधूत गुप्तेला फोन केला!

 

 

अवधूतने त्याचा फोन बंद करून ठेवला असल्याने बाळासाहेबांनी त्याच्या पत्नीच्या मोबाइलवर फोन केला आणि तेव्हा त्यांनी अवधूतला विचारलं की त्याला या सगळ्या प्रकाराचा त्रास होतोय म्हणून तो घर सोडून गेला आहे का?

यावर अवधूतने उत्तर दिलं तेव्हा बाळासाहेबांनी त्याला विचारलं की – “तू अशा अशा मासिकात आलेला हा लेख वाचलास का? त्यात म्हंटलंय म्हणे शिवसेना अवधूत गुप्तेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नाही म्हणून! तुला असं वाटतं का?”

हा प्रश्न ऐकून अवधूत उत्तरला की नाही साहेब तसं अजिबात नाही, हे उत्तर ऐकून बाळासाहेब त्याला म्हणाले की “शिवसेना तुझ्यापाठीमागे उभी राहिली नाही असं वाटत असेल तर तू माझ्याकडे ये, तुझं पैशापासून आणखीन कसलंही नुकसान झालं असल्यास हा बाळासाहेब ठाकरे तुझ्याबरोबरीने उभा राहील!”

हे ही वाचा बाळासाहेबांचं मंत्रीपद दादा कोंडकेंनी एका खास कारणामुळे नाकारलं होतं!

बास बाळसाहेबांचा तो एक फोन कॉल आल्याने अवधूतचा जीव नक्कीच भांड्यात पडला, इतका मोठा माणूस आपल्याशी जेव्हा इतक्या आत्मियतेने बोलतो तेव्हा खरंच त्याची किंमत त्याच माणसाला कळू शकते.

केवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले आहेत, नाहीतर परप्रांतीयांनी कधीच या चंदेरी दुनियेचा चेहरा मोहरा बदलून टाकला असता!

 

 

आपल्या परिवारातल्या गोष्टींवर तसेच आपल्या राजकीय पक्षातल्या गोष्टींवर सिनेमा बनवणाऱ्या बाळासाहेबांनी अवधूतला कधीच आडकाठी केली नाही त्यामुळेच तोसुद्धा इतका परखड सिनेमा बनवू शकला आणि लोकांच्याही तो पसंतीस उतरला, याचं श्रेय अवधूतइतकंच बाळासाहेबांनी द्यायलाच हवं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version