Site icon InMarathi

हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली… हे चाळे कधी थांबणार ?

Marathi actors im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

६४ वर्षाच्या माणसाला (म्हाताऱ्याला) २८ वर्षाची बहीण असते आणि त्या बहिणीचा लव्ह इंटरेस्ट असतो ५५ वर्षाचा माणूस (म्हातारा). अहो घाबरू नका, स्पर्धा परीक्षेत विचारतात तसा हा प्रश्न नाहीये. ही कथा आहे सलमान खानच्या येऊ घातलेल्या नव्या सिनेमाची ज्याचं नाव आहे ‘राधे’!

मुळात हे जे काही आहे याला जर तुम्ही सिनेमा म्हणत असाल तर खरंच आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना Rehabilitation मध्ये टाकण्याची गरज आहे. “एंटरटेनमेंट के लीये कुछ भी देखेगा” या कॅटेगरीमधल्या लोकांनी हा लेख वाचू नये.

हे असे मसाला चित्रपट समीक्षणाच्या परे असतात असं ज्यांना वाटतं ते अत्यंत चुकीचा विचार करतात. उलट या अशा प्रॉब्लेमॅटिक सिनेमाविषयी भाष्य केलं पाहिजे आणि शक्य होईल तितका या गोष्टीविरोधात बोललं पाहिजे.

 

 

सलमान खान किंवा तत्सम कोणताही स्टार जर प्रेक्षकांना गृहीत धरून हे असलेच थिल्लर चाळे करणार असतील तर त्यांच्यासाठी “Now it’s high time!”

आपलं बॉलिवूड २०२१ मध्ये मनोरंजनाच्या नावाखाली असे सिनेमे प्रमोट करतं हे पाहून खरंच बरं वाटतं की हे बघायला इरफान, सुशांतसारखे गुणी कलाकार या पृथ्वीतलावर नाहीत!

ज्या साऊथच्या चित्रपटांच्या जोरावर बॉलिवूड स्वतःच्या तिजोऱ्या भरतंय तिथे कोणालाही या सो कॉल्ड बॉलिवूड स्टारचं नाव विचारा, बॉलिवूडची काय लायकी आहे हे तेव्हा समजेल.

===

हे ही वाचा आधी बायोपिकचा आधार, आता रिमेकच्या कुबड्या: बॉलिवूडचा कोडगेपणा पदोपदी सिद्ध होतोय!

===

हा लेख म्हणजे काही राधे या सिनेमाचा रिव्यू नाही. पण या सिनेमात मराठी कलाकारांना घेऊन त्यांची ज्या प्रकारे खिल्ली उडवली आहे ते पाहून खरंच राहवलं गेलं नाही म्हणून हे लिहायचं ठरवलं.

एक काळ असा होता की बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर, मोहन जोशी, निळू फुले, विक्रम गोखले अशा मातब्बर मराठी कलाकारांचं नाणं खणखणीत वाजायचं. त्यांच्यानंतर अतुल परचुरे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, रीमा लागू अशा दिग्गजांनीसुद्धा हिंदीत छोटे मोठे बरेच रोल केले.

 

 

पण वर नमूद केलेल्या या कलाकारांनी स्वतःची आब राखली होती. त्यांनी केलेल्या छोट्यातल्या छोट्या भूमिकेतसुद्धा एक सच्चेपणा होता. आपल्या भूमिकेचं त्यांनी कधीच हसं होऊ दिलं नाही शिवाय कोणत्याही दिग्दर्शकाचीसुद्धा तेवढी हिंमत नव्हती की त्यांच्याकडून कसलंतरी आचरट काम करून घ्यायची.

हे सगळे कलाकार त्या वेळेस मराठी आणि हिंदीत तेवढ्याच ताकदीने काम करायचे, पण स्वतःची किंमत कमी करून यांनी कधीच हिंदी निर्मात्यांची लाचारी पत्करली नाही.

पण सध्या मराठीतले कलाकार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. त्यांना त्यांची भूमिका, त्यांची इमेज किंवा त्यांचा मान याची काही पडलेली नाही.

केवळ पैसा, प्रसिद्धी आणि हिंदीत येण्याची खुमखुमी यामुळे ते कोणत्याही थराला जाऊन चित्रपट स्वीकारू लागलेत. हे मला राधेमधल्या दगडू भाईचं पात्र साकारणाऱ्या प्रवीण तरडेकडे बघून आणि एक फुटकळ रोल करणाऱ्या सिद्धार्थ जाधवकडे बघून प्रकर्षाने जाणवलं!

 

 

सलमान खानच्या सिनेमात रोल मिळतोय म्हणून तुम्ही उद्या काहीही कराल का? आणि त्या स्क्रिप्ट लिहिणाऱ्याला प्रोड्यूसरला नसेल अक्कल पण तुम्हाला आहे की नाही? हे असे रोल्स तुम्ही स्वीकारता तरी कसे?

या सिनेमात जितका ओंगळवाणा प्रकार जॅकी श्रॉफसारख्या सीनियर अभिनेत्यासोबत झालाय तितकिच खिल्ली या मराठी कलाकारांचीसुद्धा उडवली गेली आहे.

काय ते प्रवीण तरडे शर्ट वर करून चिंपांजी सारखा नाचतोय, तो सिद्धार्थ जाधव काय टुकार चाळे करतोय? सलमान खानच्या सिनेमात सलमानसोडून बाकी सगळे कार्टून असतात हे माहीत असूनही तुम्ही या अशा भूमिका करायला तयार होता!

प्रवीण तरडेसारखा ताकदीचा नट आणि दिग्दर्शक ज्याने देऊळ बंद आणि मुळशी पॅटर्नसारखे सिनेमे दिले तो आज सलमानच्या एका टुकार सिनेमात एका फालतू गुंडाची भूमिका करतो. 

 

 

सिद्धार्थ जाधव हा मला फारसा आवडत नसला तरी त्याचं टाइम प्लीज सिनेमातलं काम पाहता सलमानच्या दसपट उत्तम अभिनय तो करतो हे जाणवतं तो हा इतका फुटकळ रोल करतो, सिंबामध्ये सिद्धार्थला थोडाफार तरी स्क्रीनटाइम होता पण या राधेमध्ये तर त्याचं अक्षरशः कार्टून करून टाकलं आहे.

सध्याच्या मराठी कलाकारांना हिंदी किंवा बॉलिवूडचं एवढं आकर्षण का असतं हे समजण्यापलिकडचं आहे. हेच काम एखादा स्ट्रगलिंग अॅक्टर करत असता तर समजू शकतो, पण मराठीत स्वतःचं स्थान निर्माण केलेल्या लोकांनी ही अशी कामं केली खरंच कीव करावीशी वाटते.

===

हे ही वाचा बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात!

===

मराठी अवॉर्ड शोमध्ये देखील हिंदी गाण्यांवर नाचणं, हिंदीतल्या टुकार अभिनेत्याला बोलावून त्याच्यातर्फे पारितोषिक देणं, काही लिमिट आहे की नाही?

आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी सिनेमा नावाजला जातोय, हिंदीपेक्षा लोकं आज मराठी, तामीळ, मल्याळम अशा रिजनल सिनेमे पाहणं जास्त पसंत करतंय आणि मराठीतले हे दिग्गज लोकं बॉलिवूडचे मिंधे बनले आहेत.

 

 

राधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मान्य आहे या ग्लॅमरच्या दुनियेत पैसा प्रसिद्धी सगळ्यांनाच हवी असते, पण केवळ त्यासाठी स्वतःचं हसं करून घेऊ नका हीच नम्र विनंती!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version