' ‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर – InMarathi

‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान घमंडे 

===

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे ही म्हण ऐकली होती, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून कधीतरी अनुभवली सुद्धा होती. मात्र हीच म्हण एका ‘सो कॉल्ड’ “नव्या” मालिकेसाठी अगदी तंतोतंत लागू पडेल असं अजिबातच वाटलं नव्हतं.

होय, सो कॉल्ड नवीन मालिकाच… कारण ‘अग्गबाई सुनबाई’ नावाने १५ मार्चपासून नवी मालिका घेऊन येणार असं म्हणत, सासूबाईचं सुनबाई, मालिकेचं शीर्षक गीत आणि दोन मुख्य चेहरे एवढे बदल सोडले, तर काही वर्षांचा लीप घेऊन तीच मालिका सुरु आहे, असं म्हणणं अजिबातच चुकीचं ठरणार नाही.

थोडक्यात काय, तर नव्या नावाने, नव्या ताटलीत तीच डिश वाढली जाणार आहे. आता ती चवीने खायची, की फेकून द्यायची ते आपण प्रेक्षकवर्गाने ठरवायचं आहे.

 

aggabai sunbai inmarathi

 

सुनबाईचे चार दिवस संपले आणि सासूबाईचे पुढचे चार दिवस सुरु झाले, असं म्हणूयात… बबड्याचा सोहम झाला आणि जुन्या सोहमची कमतरता पूर्ण करायला बबडू आला.

बबड्या पोरकटपणा करायचा, तेव्हा चीड यायची, बबडू मात्र (अजून तरी) लहानच असल्यामुळे त्याला पोरखेळ करायची फुल परमिशन आहे. (अजून तरी म्हणालो ते यासाठी, की पुन्हा नव्याने लीप घेऊन नवी मालिका नावाने सुधारलेला बबडू दाखवतील का? अशी शंका मनात येऊन गेली आहे.)

बबडूचा बेशिस्तपणा आणि त्याला सुधारू इच्छिणारी शुभ्रा, हा मालिकेचा विषय असावा असं प्रथमदर्शनी वाटत होतं. पण मंडळी दिसतं तसं (अजिबात) नसतं…

नीट भांग पाडलेला आणि निरागस, गोंडस दिसणारा सोहम सुधारलाय असं तुम्हाला वाटलं असेल, तर तुम्ही साफ चूक आहात. तो आहे तसाच आहे. (किंवा त्याहून अधिक बिघडलाय म्हणूयात)

 

adwait dadarkar new soham inmarathi

 

तसंच स्वार्थी वागणं, स्वतःचा आणि स्वतःच्या फायद्याचा विचार करणं हे तर आपण आधी सुद्धा पाहिलंय; हा सोहम स्त्रीलंपट सुद्धा झालाय. पहिल्याच भागात पाहायला मिळालेली लेडी ड्रायव्हर, तिचे हावभाव, तिचं वागणं यावरून ते कळलंच.

स्वतःच्याच आईला (जिला तो सध्या घरीदेखील मॅडम म्हणतो) फसवण्यासाठी पन्नास लाखांची लाच घेताना सोहमला पाहिलं आणि जीव भांड्यात पडला असं म्हणायला हवं. मग काय तर… बबड्याचा सोहम झाला आणि मालिकेतील सगळी मजाच (?) निघून गेली होती की राव…

आता मात्र पुन्हा एकदा ‘नव्या रूपात’ बबड्या बघायला मिळणार! बबड्याचं हे नवं रूप पहिल्याच भागात पाहायला मिळालं. छान भांग पाडून इस्त्री केलेला शर्ट इन करून ऑफिसात असलेला सोहम, गाडीत बसला होता ते थेट कुरळे केस, चकचकीत गॉगल आणि चकाकणारा पिवळा ब्लेझर वगैरे घालून.

तोच सोहम जेव्हा घरी पोचला तेव्हा पुन्हा त्याच छानशा टापटीप कपड्यांमध्ये होता बरं का…!! अहो आम्ही तेही मान्य केलं; तो मालिकेचा नायक (की खलनायक) आहे, त्यामुळे तो दोनवेळा गाडीत कपडे बदलू शकतो. म्हणूनच ही करामत करणं त्याला जमलं.

===

हे ही वाचा – बॉयफ्रेन्डच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा: मराठी सिरिअल्सनी हे चालवलंय तरी काय?

===

अहो पण ती शुभ्रा आई झाली, बबड्या सुधारला, या दोघांचा सोहम इतकाच निरागस (!) मुलगा शाळेत सुद्धा जाऊ लागला आणि तरीही आजोबा मात्र अजूनही आहेतच. बरं, आहेत तर आहेत चांगले ठणठणीत आहेत.

त्यांच्या चप्पलचोराचा लुक बदलला, पण आजोबांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अजूनही वाढलेल्या नाहीत. त्यांची तब्येत अजूनही तशीच्या तशी… चिरतरुण असावा म्हातारा.

 

girish oak aggabai sunbai inmarathi

 

हे चिरतारुण्य लक्षात घेऊनच, त्यांच्या हयातीतच ‘त्यांचा मान म्हणून’ त्यांच्या नावाने असावारीने DBK Foods सुरु केलंय. सध्या माणूस हयात असतानाच, त्याचा सन्मान म्हणून त्याचं नाव एखाद्या वास्तूला किंवा तत्सम गोष्टींना चिकटवून द्यायचं, हे तर सध्या फॅडच आलंय. काही दिवसांपूर्वीच स्टेडियमचं नामकरण नाही का झालं. असो, मुद्दा तो नाही.

डीबीके फूड्सची ही मालकीण ऑफिसला येते ती थेट हेलिकॉप्टरमधून… भारतीय उद्योजकांमधील एक बडं प्रस्थ असलेला अंबानी सुद्धा नेहमी ऑफिसला जाण्यासाठी, हेलिकॉप्टरचा वगैरे वापर करत नसेल. आपल्या आसावरी मॅडम मात्र रस्त्याने नाही, तर हवाईमार्गे ऑफिसला येतात.

बघा मराठी उद्योजक कुठे पोचलाय; आधी राधिका मसालेच्या सर्वेसर्वा राधिका सुभेदार आणि आता आसावरी… नुसत्या फूड इंडस्ट्रीच्या जोरावर कोट्यवधी कमावलेत या दोघींनी…

 

anita date zee marathi radhika masale inmarathi

 

असो, या आसावरी मॅडमकडे जरावेळाने येऊ. नव्या मालिकेचं आणखी एक बिंग फोडूयात ना. मगाशी चप्पलचोर असा मी कुणाचा उल्लेख केला ते तुम्हाला कळलं असेलच. सुप्रसिद्ध शेफ, मिस्टर अभिजित राजे. अहो नावं तर नावं, इथे टोपणनाव सुद्धा तेच आहे. आणि म्हणे ‘नवी मालिका’!

===

हे ही वाचा – मराठी मालिका निर्माते मराठी दर्शकांना कधीपर्यंत “बिनडोक” समजत रहाणार आहेत?

===

ज्या अभिज किचनसाठी रक्त आटवलं, त्याचं गेलेलं वैभव परत मिळवलं (त्यासाठी सुद्धा सुनेने फार प्रयत्न केले. पण तिचे चार दिवस संपले हो मंडळी…) ते अभिज किचन गेलं कुठे? जगप्रसिद्ध शेफने, अभिज किचनचा धंदा बंद करून, घरातल्या किचनचा ताबा घेतलेला दिसतोय.

नाही, मी Women Empowerment च्या विरोधात अजिबात नाही. आसावरीने सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, तिनेही जरूर जगप्रसिद्ध व्हावं, मात्र त्यासाठी अभिजित राजेंवर घरचं किचन सांभाळण्याची वेळ का यावी? ‘सोपं नसतं संसार करणं’ असं प्रोमोमध्ये म्हणायची संधी सूनबाईंना मिळावी म्हणून असेल का…

किंवा कदाचित त्यांना बायकोच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं असेल. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं या यशस्वी स्त्रीच्या मागे असणारा पुरुष राजेंना व्हायचं असेल. म्हणजे बघा ना, नवऱ्याने टाकलेल्या राधिकाने स्वतःची कंपनी उभी केली तशी नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा असणारी आसावरी स्वतःच्या जोरावर मोठी उद्योजिका झाली.

 

asavari aggabai sunbai inmarathi

 

इतकी मोठी उद्योजिका झाली, की आता ती सगळीकडे इंग्लिश या ग्लोबल लँग्वेजचाच वापर करते असं वाटतं. असावं, असंच असावं माणसाने. व्यवसायात उतरल्यावर या जागतिक भाषेचा वापर वाढणारच. तो वाढायला हवा.

काळाच्या बरोबर तुम्हाला धावता यायला हवं. पण, हा वापर इतका वाढावा की कालपरवापर्यंत नवऱ्याला अहो-जाहो करणारी, अगदी नम्रपणे वागणारी आणि बुजरी अशी आसावरी शुभमच्या (म्हणजे आपल्या सोहम आणि शुभ्राचा मुलगा हो) ‘ट्युशन टीचर’शी बोलताना ‘टू हंड्रेड रुपीज’ असं म्हणतेय.

 

shubham aggabai sunbai inmarathi

 

आसावरी जिकडेतिकडे नुसतं इंग्रजीत बोलतेय. (घरच्यांशी सोडून)’नाही पुन्हा असं होणार नाही. I will look into it’ असं संभाषण असावारीच्या तोंडी शोभत नाही, असं आपलं मला तरी वाटलं. म्हणजे माणूस कितीही बदललं तरी त्याची पाळंमुळं घट्ट असतात. त्यामुळे उत्तम आणि लफ्फेदार इंग्रजी बोलता येऊ लागलं, तरीही आसावरी उठसूट आपलं इंग्रजीत संवाद साधतेय, हे माझ्या तरी पचनी पडलं नाही.

बबडूचा बबड्या होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून जपणारी, त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवणारी आई आणि शुभ्राला यावरून सातत्याने धारेवर धरणारी सासू, स्वतःचा मुलगा अजूनही तिला गंडवतोय हे मात्र ओळखू शकली नाही. वाह रे उपरवाले क्या ये तेरा खेल…

 

aggabai sunbai zee marathi inmarathi

 

‘अग्गबाई सूनबाई’ या ‘नव्या’ मालिकेसाठी एक नवं नाव सुचलंय, “अग्गबाई नकोबाई”…

थोडक्यात काय, तर सोहम सुधारलेला नाही. कारण, मालिकेचे निर्माते (निर्माते म्हणजे फक्त शब्दशः निर्माते नव्हेत. मालिका निर्माण होण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले सगळेच आले यात) सुधारले नाहीत.

नवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.

या मालिकांविषयी तुम्हाला काय वाटतं, ते कमेंट्समधून नक्की कळवा. मालिकाप्रेमी असणाऱ्या तुमच्या मित्रमंडळींपर्यंत, हा लेख नक्की पोचवा. अग्गबाई… हे एवढं तर करालच ना तुम्ही…!!

===

हे ही वाचा – योग्य वेळी संपलेली प्रेमकथा.. तुला पाहते रे !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?