तंबाखूचा व्यापारी म्हणवणारा, अनेक तरुणींचं आयुष्य नासवणारा सोंगाड्या ‘लखोबा लोखंडे’
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
सिनेमा किंवा आणखीन कुठली कलाकृती म्हंटली की ढोबळमानाने आपल्यासमोर काही गोष्टी उभ्या राहतात.
एक हीरो, एक किंवा २ हिरॉईन, त्यांच्या घरची मंडळी. हीरो आणि हिरोईनचा मित्र किंवा मैत्रीण वगैरे वगैरे, आणि सर्वात शेवटी येतं नाव ते म्हणजे कथेतल्या खलनायकाचं!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
खलनायक म्हंटलं की सगळ्याच प्रेक्षकांच्या भुवया उंचवतात. खलनायक म्हणजे क्रूर, कपटी, उलट्या काळजाचा, अत्यंत हिडीस प्रवृत्तीचा असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं!
कलाविश्व गाजवणारे जुने खलनायक आणि आत्ताचे खलनायक यात प्रचंड फरक आढळून येईल. कारण जुन्या काळातले खलनायक हे खूप स्टीरियोटाइप असायचे, म्हणजे खलनायक असून सुद्धा त्यांच्या वाईट वागण्याला काही मर्यादा असायच्या.
यामध्ये प्रेम चोप्रा किंवा प्राण असे काही कलाकार अपवाद होतेच म्हणा पण ते अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे!
पण जसजसा काळ बदलला तसतसं लोकांची मानसिकता बदलत गेली, आणि हळू हळू पडद्यावर किंवा रंगभूमीवर दिसणारे खलनायक सुद्धा खूप रियलिस्टिक वाटू लागले.
त्या खलनायकी पात्रांना पाहून डोक्यात तिडिक जायला लागली (जे अपेक्षित आहेच). खलनायकांना काही मर्यादा असतात हा समज कालातीत झाला, आणि आपल्याला चीड येईल असा पण तरीही त्याचं काम वारंवार बघायला मजा येईल असे खलनायक लोकांसमोर आले.
अगदी शोलेमधल्या गब्बर सिंग पासून गँग्स ऑफ वासेपूर मधल्या रामाधीर सिंग पर्यंत आपण वेगवेगळे व्हिलन पाहिले.
सुपरहिरो बॅटमॅन पेक्षा जास्त पसंत केलं जाणारं जोकर हे पात्र लोकांनी अक्षरशः सेलिब्रेट केलं, डोक्यावर घेतलं, इतक की त्यावर फिल्ममेकर्सना एक स्वतंत्र चित्रपट काढावा लागला.
केवळ स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर या कलाकारांनी लोकांना खलनायकावर सुद्धा भरभरून प्रेम करायला कसं भाग पाडलं याचा आढावा घेण्यासाठी केलेला हा लेखप्रपंच!
आज आपण अशाच एका व्हिलनबद्दल जाणून घेणार आहोत. “तो मी नव्हेच” या अजरामर नाटकातला निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे!
माधव काझी या गुन्हेगाराच्या खऱ्या केसवर आचार्य अत्रे लिखित हे अजरामर नाटक माहीत नाही असा प्रेक्षक सापडण अशक्यच. ५२ वर्षाच्या कारकिर्दीत ३००० प्रयोग यशस्वीपणे पार पाडत या नाटकाने एक स्वतंत्र इतिहाच रचला आहे!
१९५५ ते १९६० च्या दरम्यान या माधव काझीने बऱ्याच बायकांना लुबाडल आणि तेंव्हा तो खूप अॅक्टिव होतं याखेरीज आणखीन कोणतीही माहिती इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध नाही!
अशा एका कोर्टरूम केसच्या आधारावर आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं “तो मी नव्हेच” हे पुस्तक आणि त्यावर बेतलेलं त्याच नावाचं नाटक हे मराठी रंगभूमीतला मैलाचा दगडच मानलं जातं!
सुमित राघवन, डॉ.गिरीश ओक, संजय मोने अशा हरहुन्नरी कलाकारांनी सुद्धा लखोबा लोखंडे हे पात्र साकारलं. पण तरीही आज सुद्धा लखोबा लोखंडे किंवा तो मी नव्हेच ही नावं ऐकताच डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे प्रभाकर पणशीकर!
खरंतर पणशीकर यांना ओळख देणारं नाटक म्हणजेच तो मी नव्हेच आणि त्यातलं हे विचित्र पात्र लखोबा लोखंडे.
नंतर त्यांनी इथे ओशाळला मृत्यू या नाटकातून औरंगजेब सुद्धा त्याच ताकदीने साकारला, शिवाय रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या सोबतीने केलेल्या अश्रूंची झाली फुले या नाटकाने तर लोकांना अक्षरशः वेड लावलं.
पण या सगळ्या गर्दीतसुद्धा लोकांच्या डोक्यात ते लखोबा लोखंडे हे पात्र इतकं फिट बसलं की त्याजागी आजही तुम्ही प्रभाकर पणशीकर यांच्या ऐवजी कोणत्या इतर कलाकाराचा विचार देखील करू शकत नाही, इतकं त्यांनी त्या पात्रात जीव ओतून काम केलं होतं!
तो मी नव्हेच हे मराठी रंगभूमीवरचं पहिलं असं नाटक आहे ज्यात फिरता रंगमंच वापरला गेला आणि यातल्या मुख्य कलाकाराने म्हणजेच प्रभाकर पणशीकर यांनी ५ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.
सध्या ते करणं अगदी सहज शक्य आहे, कारण काळ बदलला आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे, पण त्या काळात ५ वेगवेगळ्या भूमिका अशा प्रकारच्या नाटकात साकारणं एक वेगळंच चॅलेंज होतं!
त्यापैकी मुख्य भूमिका होती ती म्हणजे लखोबा लोखंडे जो स्वतःला निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी म्हणवतो. पण त्याने वेगवेगळी सोंगं घेऊन कित्येक बायकांना लग्नाची स्वप्न दाखवून त्यांना लुबाडला तसेच कित्येक लोकांना केवळ आणि केवळ पैशासाठी चुना लावला.
अशा या लखोबा लोखंडेला जेंव्हा कोर्टात उभं केलं गेलं आणि त्याच्याविरुद्ध कित्येक लोकांनी साक्षी दिल्या तेंव्हा स्वतःच्या बचाव करण्यासाठी त्याने केलेला आटोकाट प्रयत्न, उलट तपासणीच्या वेळेस अत्यंत विचित्र प्रश्न विचारून साक्षीदाराला uncomfortable करणं, आणि या सगळ्यातून आपल्यासमोर येणारी लखोबा लोखंडे याची हिडीस प्रवृत्ती पाहून आपला संताप अनावर होतो!
पण मुळात हे नाटकच अशा पद्धतीने लिहिलं आहे कि नाटक पाहताना काही काही ठिकाणी तुमच्या मनात लखोबा लोखंडे विषयी थोडी का होईना आपुलकी निर्माण होते.
याचं सर्वस्वी श्रेय जातं ते लेखक आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर यांना. कारण दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे, राधेश्याम महाराज अशी विविध सोंगं घेणारा लखोबा लोखंडेच आहे हे आपल्यासमोर वेगवेगळ्या प्लॉट्स मधून समोर येतच असतं!
पण प्रत्येक साक्षीदाराला उलट प्रश्न विचारताना लखोबा लोखंडे याने अवलंबलेली पद्धत, त्याची ती देहबोली, तोंड एकाच बाजूला खेचण्याची ती लकब हे सगळं पाहता त्याच्यात दडलेला खलनायक आपल्यासमोर उभा राहतोच.
शिवाय प्रत्येक साक्षीदाराच्या साक्षीवर चेहऱ्यावरच्या सगळ्या शिरा ताणून “तो मी नव्हेच” असं थाटात सांगत बसणारा लखोबा लोखंडे हाच हा कॉनमॅन आहे अशी खात्री सुद्धा बसते!
–
- नेहमीप्रमाणे भरकटलेल्या मालिकेतील एकमेव ‘चांगली’ गोष्ट – “खलनायक” अतुल परचुरे!
- बॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे?
–
एवढं सगळं होऊन सुद्धा नाटकातल्या कित्येक ठिकाणी लखोबा लोखंडे हा खरंच निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे अशी आपल्याला शंका सुद्धा येते.
पण नाटकाच्या सुरुवातीला येणारी सैयद मनसुद यांची साक्ष आणि लखोबा लोखंडेचा होणारा दारुण शेवट पाहून आपली खात्री पटते कि हाच तो कित्येकांना लुबाडणारा कित्येक बायकांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारा हैदर अली उर्फ लखोबा लोखंडे आहे!
इथे खरी कमाल आहे आचार्य अत्रेंच्या लेखणीची.
नाटकाच्या सुरुवातीला लखोबा लोखंडे यांच्यावर आरोप लागतो, शेवटाला त्यावर गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षा सुद्धा मिळते. आणि या दोघांच्या मधला वेळ आपल्याला फक्त लखोबा लोखंडेच खरा आहे असं वाटत राहतं!
सत्य घटनेवर आधारित असून सुद्धा आचार्य अत्रे यांनी ज्या काल्पनिक पद्धतीने हे नाट्य रंगवलं आहे आणि पणशीकर यांनी सुद्धा ते पात्र ज्या सचोटीने आपल्यासमोर मांडलंय त्याला तोड नाही!
प्रभाकर पणशीकर यांनी यात साकारलेलं प्रत्येक पात्र तुमच्या मनात एक वेगळीच इमेज निर्माण करतं.
दिवाकर दातार यांचं मृदू बोलणं, दाजीशास्त्री दातार यांचा फटकळ स्वभाव, कॅप्टन अशोक परांजपे यांचा करारीपणा आणि शिस्तबद्धता, आणि राधेश्याम महाराज यांचा भंपकपणा पणशीकर यांनी अगदी हुबेहूब आपल्यासमोर मांडला आहे!
शिवाय लखोबा लोखंडे स्टाईल तर तुमच्या मनात घर करतेच ती एक वेगळी गोष्ट!
तसं बघायला गेलं तर हे नाटक लखोबा लोखंडेच्याच बाजूने लिहिलं गेलेलं वाटतं, पण नाटकाची सुरुवात आणि त्या सुरुवातीच्या भागाला पुष्टी देणारा शेवट यामुळेच हे नाटक लखोबा लोखंडे सारख्या अमानुष प्राण्याचा बुरखा फाडणारं ठरतं!
आज इतकी वर्ष उलटली, जवळजवळ ३ पेक्षा जास्त पिढ्यांचं मनोरंजन करणारं हे नाटक आजच्या पिढीला सुद्धा आवडतय यावरून या नाटकाचा आणि खासकरून त्यातल्या लिखाणाचा आणि अभिनयाचा काय प्रभाव आहे त्याचा तुम्हाला अंदाज येईलच!
लखोबा लोखंडे हे पात्र कितीही उलट्या काळजाचं असलं तरी नाटकातल्या काही भागात आणि खासकरून त्याच्या कोर्टातल्या बचावाच्या भाषणात ते आपल्या मनात सहानुभूति निर्माण करतं.
पण शेवटी सैयद मनुसद जेंव्हा लखोबाला “खुदा की कसम” देऊन समजावायला जातो तेंव्हा “कोण खुदा? मी खुदाला मानत नाही!” असं उर्मटपणे म्हणणाऱ्या हैदर अली उर्फ लखोबा लोखंडेचा आपल्याला तिटकारा वाटतो!
आणि आज सुद्धा अतीव प्रेम आणि अतीव क्रोध मिळालेला लखोबा लोखंडे म्हंटलं की तो साकारणारे फक्त प्रभाकर पणशीकर हेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात!
अशा या अजरामर कलाकृतीला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवणाऱ्या लेखक आचार्य अत्रे यांना आणि एका खलनायकावर प्रेक्षकांना जिवापाड प्रेम करायला भाग पाडणाऱ्या प्रभाकर पणशीकर यांना मनाचा मुजरा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.