ब्रिटिशांचा लाडका असूनही प्रिय गंगामैयासाठी त्यांच्याशी भिडणारा राजा: सवाई माधोसिंग!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
चांदीच्या भल्या मोठ्या कलशांमधून तब्बल चार महिने पुरेल इतकं शुध्द गंगाजल घेऊन जाणारे जयपूरचे राजा माधोसिंग द्वितिय हे गंगामैय्या भक्त म्हणून परिचित आहेत. गंगेचा प्रवाह बदलण्याच्या ब्रिटिशांच्या निर्णयास त्यांनी जोरदार विरोध केला होता.
जयपूरचे सवाई माधोसिंग यांचा उल्लेख गंगामैय्या संदर्भात इतिहासात अनेकदा झालेला आहे. जयपूरचे राजा रामसिंग यांच्या मृत्यूनंतर १८८० मधे सवाई माधोसिंग गादीवर आले.
माधोसिंग हे रामसिंग यांचे दत्तकपूत्र होते. राजा रामसिंग निपुत्रिक असल्यानं त्यांनी ईसरदा येथील ठाकूर रघुनाथसिंग यांचे द्वितिय पूत्र माधोसिंग यांना दत्तक घेतलेलं होतं.

दत्तकविधानाच्या विरोधात असणार्या ब्रिटिशांनिही या दत्तकपुत्राला मान्यता देऊन जयपूरचा राजा म्हणून त्यांचा स्विकार केला. राज्याभिषेक झाला त्यावेळेस सवाई माधोसिंग केवळ १९ वर्षांचे आणि अननुभवी होते. त्यांचं शिक्षणही विशेष झालेलं नव्हतं.
याच कारणामुळे ब्रिटिश सरकारनं सवाई माधोसिंगांकडे राज्यकारभाराची सगळी सूत्रं सोपवली नव्हती. ब्रिटिशांच्या सल्ल्यानं चालणारा राज्यकारभार असं साधारण स्वरूप होतं.
ब्रिटिश सरकारच्या विशेष कायदेशीर सल्लागारामार्फत राज्यकारभार बघितला जात होता. सवाई माधोसिंग यांच्यासमोर ब्रिटिशांना सहकार्य करण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. मात्र या राजाच्या शालिन व्यवहारामुळे ब्रिटिशांनिही कायम यांच्या सदभावना ठेवत व्यवहार केले.
दुसर्या महायुध्दात राजा माधोसिंगनी ब्रिटिशांच्या बाजूनं सहभाग घेतला. मात्र ब्रिटिश इतिहासकारांनी या राजाला इतर भारतीय राजांप्रमाणेच जुन्या विचारांचा असा उल्लेख करत त्यांचा इतिहास लिहिला. भारतीय परंपरेतून बघता मात्र सवाई माधोसिंग हे उत्तम राजा होते असंच म्हणावं लागेल, कारण राजाच्या ठायी असणारे सर्व गुण त्यांच्यात होते.
सवाई माधोसिंग यांची गंगाभक्ती विशेष करून उल्लेखली जाते. या गंगामैयाच्या भक्तीपायीच एरवी ब्रिटिशांना एका शब्दाचा विरोध न करणारे माधोसिंग गंगेचा प्रवाह बदलण्याच्या ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावाविरोधात उभे राहिले.

त्यांच्या बाबतीतला लंडनमध्ये गंगाजल घेऊन जाण्याचा प्रसंग फारच ठळकपणे इतिहासात नोंदवला गेला आहे.
सवाई माधोसिंग यांच्याबाबतीत असं सांगितलं जातं की, पहाटे उठल्यावर सर्वात आधी ते गंगाजल प्राशन करीत असत.
१९०२ साली इंग्लंडचे राजा एडवर्ड सप्तम यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राजा माधोसिंग लंडनला जाणार होते. मात्र लंडनला जाण्याची तयारी त्यांनी अगदी भारतीय परंपरेत राहून केली.
या तयारीचा मुख्य भाग होता, चांदीचे प्रचंड आकाराचे दोन हंडे. या हंड्यांचं प्रयोजन होतं शुध्द गंगाजल. या दोन हंड्यात मिळून साधारण चार महिने पुरेल इतकं गंगेचं पाणी भरलं गेलं. हे गंगाजल ते आंघोळी साठी वापरत तसेच भोजनापूर्वी गंगाजल प्यायल्याशिवाय ते भोजन प्रारंभ करत नसत.
–
हे सुद्धा वाचा – ह्या मराठी योध्दयाने खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचला!
–
या बहुचर्चित लंडन प्रवासासाठी ऑलिंपिया हे नवंकोरं जहाज भाड्यानं घेतलं गेलं. हे जहाज गंगेच्याच पाण्यानं इंच न इंच धुवून स्वच्छ केलं गेलं. या जहाजातच एक मंदिरही बांधण्यात आलं. या मंदिरात राजांचे दैवत राधागोपाल यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

जहाजावर जयपूर राज्याचा पंचरंगी ध्वज फडकविण्यात आला. प्रवासाला सुरवात होण्याआधीच या सगळ्या गोष्टींमुळे जयपूरचे सवाई माधोसिंग चर्चेत आले होते. पंचवीस दिवसांच्या प्रवासात या जहाजावर भजन किर्तन रंगत असे.
जेव्हा ते लंडनला व्हिक्टोरिया स्थानकावर उतरले तेव्हाही त्यांनी राधागोपाल यांना आधी उतरवलं. या मूर्तींना सुंदर सजविलेल्या पालख्यांत विराजमान केलं गेलं.
यामागे स्वत: हिंदुस्थानी राजा हरे रामा हरे कृष्णाचं भजन गात होता आणि सोबत सेवादल आणि कर्मचारी असा जथ्था लंडनच्या गल्ल्यांमधून फिरला. या सगळ्या विशाल मिरवणूकीत भजनाच्या जल्लोशात बघणार्यांना असं वाटू लागलं की जयपूरचा राजा हा राधागोपालच आहे.
ही भव्य मिरवणूक सबंध युरोपमधे चर्चेचा विषय बनली. ३ जून १९०२ हा तो दिवस होता, जेव्हा लंडनच्या रस्त्यांवरून हिंदू देवतांची भव्य मिरवणूक निघाली होती. ही घटना त्या अर्थानं ऐतिहासिक होती कारण यापूर्वी हे असं कधीच घडलं नव्हतं. या यात्रेने मिरच्या झोंबलेल्या अनेक ब्रिटिशांनी अंधविश्र्वासू राजा अशी राजा माधोसिंग यांची थट्टाही उडवली.
ज्या चांदीच्या हंड्यांमधून हे गंगाजल नेण्यात आले असून ते आजही सिटी पॅलेसच्या सर्वतोभद्रच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहेत. जगातील सर्वात मोठी चांदीची भांडी असण्याचा मान या हंड्यांना मिळाला आहे. यांचं वजन ६८० किलो इतकं प्रचंड आहे. त्याच्या या महाकाय आकारामुळेच ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सुद्धा याची नोंद घेतली गेली आहे.

राज्याभिषेकाचा नजराणा म्हणून सवाई माधोसिंगनी एडवर्ड सप्तम याला पाच लाख रूपये मूल्य असलेली तलवार आणि अन्य किंमती भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तूंचीही खूप चर्चा झाली.
माधोसिंग यांनी एडिनबर्ग विद्यापिठातून त्यांनी एल.एल.डी.ची पदवी घेतली. पाच महिने लंडनमधे राहून ते भारतात परतले.
लंडनहून परतल्यावर सोबत नेलेल्या राधागोपालच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांनी सिटी पॅलेसच्या परिसरात एक सुंदर मंदिर बांधून त्यात केली. कालांतराने म्हणजे या मंदिरासमोरच गंगामैयाचं मंदिरही बांधण्यात आलं.
या मंदिरात माधोसिंग यांच्या पट्टराणी जादूणजी ज्या गंगामैया प्रतिमेची पूजा करत तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंदिराच्या बांधणीला त्या काळात ३५ हजार ४४४ रूपये इतका खर्च आला.
त्याकाळात या मंदिरात राणीवसा पूजेसाठी येत असे. माधोसिंह यांनी गंगामैयाचं एक मंदिर गंगोत्री येथेही बांधलं. इतर राजांप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात राजा माधोसिंह हिलस्टेशन्सवर वास्तव्यास जात नसत तर या गंगोत्रीच्या मंदिराच्या परिसरात, गंगेच्या तिरी रहायला जात असत.
एकूणच ब्रिटिशांशी सवाई माधोसिंग यांचे संबंध उत्तम होते. एक गंगाप्रवाह प्रकरण वगळता ना ते कधी ब्रिटिशांच्या विरोधात गेले ना ब्रिटिशांशी त्यांचे वादविवाद झाले किंवा खटके उडाले.

या चांगल्या संबंधामुळेच त्यांना १९०३ मधे जी.सी.व्हि.ओ. आणि १९११ साली जी.वी.आय. या पदव्यांनी सन्मानित केलं गेलं. त्या काळात ब्रिटिशांकडून मिळणार्या या पदव्या मिळविण्याची हिंदू राजांत स्पर्धा चाले. या पदव्या मिळणं प्रतिष्ठेचं मानलं जात असे. १९०४ साली माधोसिंग यांना भारतीय सेनेचं कर्नलपद तर १९११ साली जनरल पद दिलं गेलं.
राजा माधोसिंग यांच्या कार्यकालात राज्यात शाळा, पक्के रस्ते, रेल्वे लाईन्स आणि हॉस्पिटल यांची उभारणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. १९२२ साली राजा माधोसिंग यांना त्यांच्या राज्याच्या सीमेत ब्रिटिशांनी २१ तोफांची सलामी घेण्याचे अधिकार दिले.
१९२२ साली राजा माधोसिंग यांचा मृत्यू झाला. आजही त्यांची आठवण आणि उल्लेख लंडनला भल्या थोरल्या चांदीच्या हंड्यातून सातासमुद्रापलीकडे समुद्रातून गंगेचं पाणी घेऊन जाणारा राजा असा केला जातो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
