जात लपवून “सोवळे मोडले” म्हणून पोलीस केस? – जातीयवाद की व्यक्तिस्वातंत्र्य?
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
घरी गणपती बसवला म्हणून सामाजिक बहिष्कारास सामोरे जाण्याची धमकी सहन करण्याची वेळ भाऊ कदम आणि इतर अनेकांवर नुकतीच येऊन गेली. त्यावेळी जाती व्यवस्था, धर्म-जातीचे अभिमान कसे टोकदार होत आहेत हे पुरोगामी महाराष्ट्राने अनुभवलं. त्यानंतर काहीच दिवसांत एक नवीन घटना घडली आहे. घटनेचा तपशील, दैनिक लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार असा आहे :
—
जात लपवून ‘सोवळे’ मोडले म्हणून पुण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल
ब्राह्मण आणि सुवासिनी असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा विचित्र प्रकारात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने हा विरळात विरळ गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी याबाबत फिर्याद दिली होती. डॉ. खोले यांच्याघरी दरवर्षी गौरी-गणपती बसतात, त्याचप्रमाणे आई-वडिलांचे श्राद्धही असते. त्यासाठी त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक करणारी ब्राह्मण महिला हवी होती. २०१६ मधील मे महिन्यात त्यांच्याकडे एक महिला आली. तिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असे सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेच्या घरीही खोले यांनी जाऊन चौकशी केली. तेथेही तिने आपण ब्राह्मण असल्याचे सांगितले. या महिलेने खोले यांच्या घरी २०१६ बरोबरच यंदाही गौरी-गणपती आणि आई-वडिलांच्या श्राद्धाच्या विधीचा सोवळ्यात स्वयंपाक केला. मागील दोन वर्षांमध्ये संबंधित महिलेने सहा वेळा अशा प्रकारे खोले यांच्याकडे स्वयंपाक केला.
खोले यांच्याकडे पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींनी संबंधित महिला ब्राह्मण नसल्याचे खोले यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा खोले यांनी महिलेच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली, त्या वेळी ती ब्राह्मण आणि सुवासिनी नसल्याचे समजले. आमच्या घरी सोवळ्यासाठी सुवासिनी ब्राह्मण महिलाच आवश्यक असते. असे असताना तुम्ही खोटे का सांगितले, अशी विचारणा खोले यांनी महिलेकडे केली. त्यामुळे काय होते, असे प्रश्न संबंधित महिलेने विचारले आणि ती त्यांच्या अंगावर धावून आली. तिने धार्मिक भावना दुखावल्या, १५ ते २० हजारांचे नुकसान केल्याचे खोले यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
—
वरील वृत्त दैनिक लोकसत्ता ने प्रसिद्ध केलेलं आहे. इच्छुकांनी इथे क्लिक करून खातरजमा करून घ्यावी.
सोशल मीडियावर, सदर तक्रारीचा फोटो शेअर केला जात आहे. तो फोटो :असा

हे प्रकरण सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. खोलेंचा निषेध करावा तेवढा थोडाच. पण पुरोगामी महाराष्ट्राची परिस्थिती अशी की, अश्या घटनांतही कुठून ना कुठून समर्थन करणारे लोक समोर येतातच. भाऊ कदमांवरील बहिष्काराच्या वेळी सुद्धा असे लोक पुढे आले होते, आताही येताहेत. (ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत, तो सामाजिक बहिष्कार होता – हे खाजगी प्रकरण आहे : हा युक्तिवाद समोर येईलच. त्याकडे पुढे येऊ.)
केस काय आहे? तर – हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. खोलेंनी मोलकरणीने आडनाव-जात खोटी सांगितली म्हणून मोलकरणीवर फसवणुकीची केस दाखल केली आहे. खोटं का बोललीस असं विचारता ती मोलकरीण अंगावर धावून पण गेली म्हणे. पण तक्रार अंगावर धावून जाण्याची नाही, ‘सोवळं भंगलं म्हणून धार्मिक भावना दुखावल्यात’ ही आहे.
सदर प्रकरणाची विविध अंगांनी चिकित्सा करायला हवी. पहिलं अंग आहे व्यक्ती स्वातंत्र्याचं.
घटनेने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे डॉ. खोले ह्यांना, हवी ती व्यक्ती आचारी म्हणून घरी बोलावण्याचा अधिकार आहेच. त्या स्त्री ने स्वतःची ओळख खोटी सांगून खोलेंची फसवणूक केली ह्यात वादच नाही. खोलेंनी ह्या फसवणुकीकडे दुर्लक्ष करून त्या बाईला ह्या पुढे नं बोलावण्याचा निर्णय घ्यायचा की फसवणुकीचा फौजदारी दावा उभा करायचा – हा ही खोलेंच्या निवडीचा प्रश्न आहे. त्यामुळे कायदा, व्यक्ती स्वातंत्र्य ह्या गोष्टींसमोर डॉ. खोले कुठेही चूक नाही. अनेक समर्थकांनी हा मुद्दा मांडला आहे.
अनेकांचं म्हणणं असं ही आहे की, नोकरीस जाताना आपण आपले क्रेडेन्शियल्स सांगत असतो. ते जर खोटे सांगितले तर नोकरीवरून काढून टाकणे, गुन्हा दाखल करणे अयोग्य असेल का?
पण – हे एवढं साधं आहे का?
खोलेंनी फसवणुकीचं सांगितलेलं कारण – त्यांच्या तक्रारीचा आधार – हा महत्वाचं अंग दुर्लक्षून कसं चालणार नाही? अमुक एका जातीच्या स्त्रीमुळेच सोवळं अभंग रहातं आणि ते भंग केल्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात – अश्या कारणासाठी पोलीस तक्रार होत असेल तर त्यावर कठोर टीका व्हायला हवी.
सोवळं-ओवळं अजूनही जन्माधिष्टित जातींचं पाळावं? की अंगभूत कौशल्य, सचोटीचं? स्वयंपाकीण बाईसाठी ‘स्वच्छता’ ही आणखी एक कसोटी ठरावी. पण “जातीची कसोटी का?” ज्या ब्राह्मण समाजातून “ब्राह्मण हा जन्माने नसतो, कर्माने असतो” असं अनेकदा म्हटलं जातं, त्यांनी जन्माधिष्ठित जात ही कसोटी का बघावी? इथे आपण घटनादत्त व्यक्तिस्वातंत्र म्हणून तो त्यांचा हक्क समजायचा की, त्याही पुढे जाऊन समाज व्यवस्थेला विसाव्या शतकात येण्यापासून थांबवणारी एक प्रथा?

इथे आणखी एक धक्कादायक प्रकार बघायला मिळतोय. अनेकांनी सोशल मीडियावर “डॉ खोले ह्यांनी त्यांची श्रद्धा, त्यांचा धर्म पाळला” असं समर्थन केलं आहे. जातीवरून योग्यता ठरवणे ही श्रद्धा मानावी अंधश्रद्धा? अशी जातीय उतरंड मानणे, त्यावरून योग्यता ठरवणे – त्यावर आक्षेप घेणे – हा धर्म कधीपासून झाला? “गर्व से कहो हम हिंदू है” हे ब्रीद सर्व हिंदूंनी अभिमानाने म्हणावंसं वाटणाऱ्यांना जर “हा” हिंदू धर्म आणि हेच हिंदूच धर्म पालन वाटत असेल – तर बहुजन समाजास त्यात “गर्व” वाटण्यासारखं काय आहे?
नोकरीत आपले क्रेडेन्शियल खोटे सांगणं ही चूक / गुन्हा ठरवता येईल. पण मुळात क्रेडेन्शियल्सच आक्षेपार्ह आहेत, हे मान्यच करायचं नाहीये का? ब्राह्मण असणे – ह्याचा कामाच्या क्वालिटीशी संबंध आहे का? विशेषतः तेव्हा – जेव्हा एम्प्लॉयीने सलग दोन वर्ष आपलं काम सिद्ध करून दाखवलं आहे! वरील तक्रार वाचल्यास लक्षात येईल की, डॉ. खोले ह्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत सहावेळा ह्या बाई कडून स्वयंपाक करून घेतला. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. ही स्वयंपाकीण तिच्या कामात चांगली आहे. जेवण चांगलं बनवत असेल, स्वच्छता पाळत असेल, योग्य दरात काम करत असेल. अन्यथा खोलेंनी तिला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा – तब्ब्ल ६ वेळा पुन्हा पुन्हा कामावर बोलावलं नसतं.
अनेकांनी – उच्चवर्णीयाने जातीय सवलती मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र दाखवले तर काय होईल – असा र्हेटरीकल प्रश्न उपस्थित केला आहे. अश्यांना, मोठ्या विनम्रतेतेने, हे सुचवावंसं वाटतं की, कृपया प्रत्येक जातीयवादाच्या विषयावर आरक्षण, जातीय सवलती हे विषय काढत जाऊ नका. त्याने फक्त प्रश्नांना प्रतिप्रश्न आणि वादाला वाद वाढत जातो. (विषयांतराचा धोका पत्करून एक नमूद करतो की गावागावतील जातीय धग अजूनही संपली नाहीये. केवळ अमुक एका जातीचा आहे म्हणून प्रवेश निषिद्ध होतो आणि संधी मिळत नाही – ही वस्तुस्थिती आजही आहे. त्यामुळे, जातीय सवलती आजही तितक्याच गरजेच्या आहेत जितक्या ७० वर्षांपूर्वी होत्या. त्या अधिकाधिक सर्वसमावेशक कश्या होतील हा संपुर्ण वेगळा विषय आहे. पण जातीय सवलती आवश्यक आहेत आणि न्याय प्रक्रियेतील महत्वाचं टूल आहेत. सबब, कुठलंही जातीयवादाचं प्रकरण समोर आलं की त्यावर घसरू नये.)
मूळ मुद्दा असा की – प्रस्तुत प्रकरणाची सरकारी सुविधांशी तुलना कशी करता येईल? काही विषय सामाजिक जाणिवांचे असतात तर काही व्यवस्थेच्या अंमलबजावणीचे. हा विषय समाजाने अधिकाधिक सुजाण व्हायचं आहे की नाही – हा आहे. जर व्हायचं असेल तर कुणी सुरुवात करायची – हा प्रश्न निर्माण होतो.

अनेक ब्राह्मण मित्र हे म्हणत असतात की, बहुतांश ब्राह्मण आज जातपात मानत नाही आणि मी ह्याच्याशी नक्कीच सहमत आहे. परंतु म्हणूनच सदर प्रकरणावर, किमान ब्राह्मण आणि इतर उच्चवर्णीयांनी, व्यक्तिस्वातंत्र्याच्या चष्म्यातून बघू नये. लार्जर पिक्चर बघावं. आज असे अनेक उच्चवर्णीय आहेत जे कोणत्याही प्रकारची जात मानत नाहीत. त्यांनी समाज सुधारणेत मोठा सहभाग घेतला आहे – आणि – सुरूवात उच्चवर्णीयांनाच करावी लागणार आहे. शेवटी “आम्ही शहाणे आहोत” (चांगल्या अर्थाने) असा समज ही अनेक उच्च वर्णियांत असतोच ना? मग शहाण्यांनी शहाण्यासारखं वागू नये का!? (इथे “उच्चवर्णीय वाईट आहेत”, “जातीयवादाचा दोष उच्चवर्णीयांचा आहे” असं दोषारोपण अजिबात नाही. आज जातीयवाद सर्वत्रच बोकाळला आहे. धार्मिक कट्टरता सर्वांमध्येच शिरली आहे. भाऊ कदम प्रकरण त्याचीच साक्ष देतं. जातीयवाद कमी करत जाण्यात पुढाकार घेण्याची जबाबदारी उच्चवर्णीयांनी घ्यावी – अशी “अपेक्षा” आहे. – ही सुद्धा “अपेक्षा”! बंधन नव्हे.)
परंतु डॉ. खोले फक्त जात ब्राह्मण नाही म्हणून सोवळे मोडले असं म्हणत आहेत. हे कोणाला पटू शकेल? वरील तक्रारीचा स्क्रिनशॉट व्यवस्थित वाचल्यास लक्षात येतं की “फसवणूक” हा खोलेंच्या तक्रारीचा मुख्य मुद्दा नाही. स्वयंपाकीण बाईने जात खोटी सांगितली हे दुखणं आहेच – पण मुख्य तक्रार ही आहे की – ही स्वयंपाकीण बाई ब्राह्मण नसून हिने ६ स्वयंपाक केले – ज्यामुळे आमचं सोवळं मोडलं – आणि आमच्या धार्मिक भावना दुखावला गेल्या! म्हणजे, खोले ह्यांचं सोवळं स्वच्छता, शुचिर्भूतता ह्यांच्यामुळे भंगलं नाहीये. जातीमुळे भांगलं आहे. खोलेंची तक्रार ती आहे!
इथेच खोले प्रकरण आणि भाऊ कदम प्रकरण एक सारखं होतं. वरकरणी खोले ह्यांचं प्रकरण एका कुटुंबाचं, तर भाऊ कदमांचं सामाजिक बहिष्काराचं आहे. परंतु गुणात्मक फरक कितीसा आहे? “आमच्या काही प्रथा आहेत. आमच्या काही मान्यता आहेत. त्या पाळल्या गेल्या नाही तर आमच्या भावना दुखावतात” – ही ती गुणात्मक समानता आहे. एकट्या खोले असल्या की पोलीस केस होते – अखंड समाज असला की सामाजिक बहिष्कार. गुणात्मक फरक शून्य आहे.
समारोपात दोन गोष्टी मांडतो –
१) आपल्या घरात कुणाला कामावर ठेवावे, कुणाला काढावे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. परंतु कामावर ठेवताना जात बघणे, हा प्रतिगामी क्रायटेरिया आहे.
२) खोटी ओळख सांगितली ही फसवणूक आहेच. पण पोलीस तक्रारीत फसवणूक हा मुद्दा दुय्यम आणि “सोवळे मोडले म्हणून धार्मिक भावना दुखावल्या” हा मुद्दा प्राथमिक असेल आणि ह्या मुद्द्याचा आधार स्वच्छता, शुचुर्भूतता नसून “जात” असेल – तर हा जातीयवादच आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा मुखवटा ह्यावर चढवता कामा नये.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

khupach sanyant lekh ! very balanced article !
अर्धवट माहितीवर आधारलेला लेख….खोले यांनी दिलेली तक्रार हि संबंधित स्त्रीने त्यांच्यावर हल्ला केला, तोतयेगिरी केली आणि शांतताभंग केला या बद्दलची आहे. भा.दंडविधान ३५२,४१९,५०४ या कलमान्वये आहे. हा गुन्हा घडण्यास कारणीभूत घटनेमागची पार्श्वभूमी फसवणुकीची आहे. त्यामुळे ती हकीकत फिर्यादी जवाबात आली आहे.
” Totayagiri ” is complaint . Nirmala lied about being a brahmin & her husband is alive . Important iis
Is not quality .
Important is truthfulness .
If this is the behaviour of a “so called educated woman ” towards a poor woman who needs to earn money by going to people’s houses to cook ,then her education is of ZERO value. As a human she has shown even worse side of herself by claiming her feelings are hurt! Is Mrs Khole unaware of The reason Brahmins only eat food cooked by Brahmins was to stop Brahmins exploiting the lower castes and no other reason. This was the explanation my uneducated grandmother gave me in 1950s. Surely Mrs Khole could have cooked her own food, if she was so particular!!
God help India with such educated people!