कॉमेडी विश्वाचा ध्रुव तारा झालेल्या जिम कॅरीचं बालपण ते तारुण्य “असं” असेल यावर विश्वासच बसत नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
नशीब माणसाला अपयशाच्या तळागाळातून यशाच्या शिखरावर कसं आणि कधी नेऊन ठेवेल सांगता येत नाही. आणि यशाच्या शिखरावरुन अपयशाच्या गर्तेतही तितक्याच सहजपणाने फेकून देत असतं.
शहाणी माणसं ती असतात जी यशाने हुरळून जात नाहीत..आणि अपयशाच्या धक्क्याने कोसळून जात नाहीत. कितीतरी लोकांना झिरोपासून हिरो बनवणारं नशीबच असतं आणि हिरोला झिरो बनवणारंही नशीबच असतं.
त्यामागं त्यांचे कष्ट, प्रयत्न नक्कीच असतात. पण कधीकधी अफाट कष्ट करुनही हाताला यशाची गवसणी काही लागत नाही. तेंव्हा आपसूकच नशीबाची साथ नाही असं तोंडात येतंच.
मनोरंजनाचं क्षेत्र हे सर्वात जास्त बेभरवशाचं. दर शुक्रवारी इथं चमकणारे नवे चेहरे, सतत लाईमलाईटमध्ये रहाण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, नवनवी आव्हानं, गळेकापू स्पर्धा हे सारं पार करत स्वतःला कायम लोकांसमोर उभं रहायचं नवनव्या भूमिका वठवायच्या.
लोकांची नस अचूक ओळखून सतत त्यांना हवं ते अभिनयातून देत राहणं हे फार कठीण असतं.
एखादी भूमिकेची निवड चुकली तर येणारं अपयश, समिक्षकांची बोचरी टीका, चाहत्यांचा रोष हे सारं सहन करत टिकून राहणं ही तारेवरची कसरत असते.
अभिनयात पण एक मेख अशी आहे की, माणसाला रडवणं सोपं असतं पण हसवणं अवघड. विनोद करावा पण तो कुणाच्या व्यंगावर नसावा, वर्णावर नसावा..घाणेरडा नसावा..निखळ असावा ज्याचा आनंद सगळेच जण घेऊ शकतील.
असा निर्विष विनोद करुन लोकांना खळखळून हसवणारे जे लोक आहेत त्यात चार्ली चाप्लिनचं नांव खूप वर आहे. आपल्याकडेही तसं विनोदी लिहीणारे लेखक कवि आहेतच.
विनोदी नट म्हणून पण कितीतरी नावं आहेत. परेश रावल, जाॅनी वाॅकर, जाॅनी लिव्हर.. हे भारतातील विनोदी नट झाले.
पण परदेशातील अजून एक नांव आवर्जून उल्लेखनीय आहे जिम कॅरी!
जिम कॅरी हा अभिनेता अमेरिकेतील विनोदाचा बादशहा आहे. स्टँड अप काॅमेडीचा सम्राट म्हणा हवं तर!
पण जिम कॅरी जी काही काॅमेडी करतो… तुफान लोकप्रिय होते. हा त्याचा वर्तमान आहे.
पण भूतकाळात त्यानं ज्या वेदना सोसल्या आहेत त्या वेदनांनी त्याला बळ देऊन हा हास्यसम्राट म्हणून मुकूट शिरावर चढवला आहे.
तुमच्या या वेदनाच देती मजला जगण्यासाठी अमृत,
एक एक घावाने होते तार तार हृदयाची झंकृत!
याच झंकारणाऱ्या तारा घेऊन जिमी विनोदवीर ठरला. काय सोसलं नाही जिमीनं?
गरीबी, हालाखी, घर नसणं..रस्त्यावर येणं, त्याचा मनावर झालेला खोल परिणाम.. त्या ओरखड्यांनी घायाळ मनानं वाढणारं डिप्रेशन, ब्रेक अप..जिवलगांचे मृत्यू.
पण तरीही जिम लोकांना हसवत नैराश्याच्या उरावर पाय रोवून उभा आहे. ही त्यांची कहाणी –
अमेरिकेत जन्मलेला जिम कॅरी हा अतिशय साधारण परिस्थितीत आपल्या आई वडीलांसह रहायचा. चार भावंडातलं जिमी हे शेंडेफळ.
साधारण परिस्थिती नंतर नंतर फारच ढासळत गेली. म्युझिशिअन असणारे त्याचे वडील. नोकरी गेल्यामुळे अस्वस्थ होते. तात्पुरती एक नोकरी मिळाली त्यांना. घर गेलं मग हे सारं कुटुंब रस्त्यावर असलेल्या व्हॅनमध्ये राहू लागलं.
जिम शाळेत जायचा. त्याला शिक्षक सांगायचे तुला शेवटची पाच मिनिटे देऊ. तेवढ्यात तुझी कला सादर करायची. त्या पाच मिनीटासाठी जिमी शांत बसायचा.
आणि शेवटच्या पाच मिनिटांत दंगा धुडगूस घालायचा. आख्खा वर्ग हसून हसून बेजार व्हायचा. त्या पाच मिनीटात तो माणूस, जनावर, पक्षी काहीही असायचा.
आख्खी शाळा जिमला काॅमेडीयन म्हणूनच ओळखायची. मग त्याचे बाबा त्याला जवळपास सगळ्या लाफ्टर क्लबमध्ये घेऊन गेले. त्याचे काॅमेडीअनचे गुण लोकांसमोर यावेत म्हणून.
पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. एका नवख्या मुलाला पहिल्याच फटक्यात बिनचूक काॅमेडीयन हो म्हणणं म्हणजे जास्त अपेक्षा होती.
त्याचा पहिला शो यथातथाच झाला. त्याला खूप निराश वाटू लागलं. मग त्यानं वयाच्या १५व्या वर्षी शाळेला रामराम ठोकला. आणि साफसफाईचं काम करु लागला. कारण पैशाची फार तंगी होती.
नंतर जशी आर्थिक परिस्थिती सुधारली जिम कॅरी चं कुटुंब परत एका चांगल्या घरात रहायला गेले. आणि जिम परत स्टेजवर आला. नव्या जोमानं .. पूर्ण तयारीने जिम मैदानात उतरला.
आणि त्याची काॅमेडी फुलत गेली. लोकांना त्याच्या परफाॅर्मन्सचं वेडच लागलं आणि ते वेड आजतागायत कायम आहे. वर्तमानपत्र सुद्धा त्याची दखल घेत होती.
पुढं जिम सिनेमा करु लागला. तिथंही त्याची छाप उमटवलीच त्यानं. निव्वळ चेहऱ्यावर हावभाव करुन जिम सर्वांना लोटपोट हसवतो. त्यांचे चाहते त्याच्या विनोदावर फिदा आहेत.
पण…पण लहानपणी जे परिस्थितीचे चटके त्यानं भोगले होते त्यामुळं त्याच्या मनाला अनंत जखमा झाल्या होत्या. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याला नैराश्यानं घेरलं.
लहानपणी तो घाबरुन बाथरुममध्ये तासनतास बसायचा. त्याला त्याचे आई वडील हाका मारुन बाहेर काढत. आई मरणावर बोलू लागली की तो अजूनच व्याकूळ व्हायचा.
नंतर नंतर त्याला समजू लागलं तसं लक्षात आलं की आईचा हा लक्ष वेधून घेण्याचा प्रकार आहे. पण तोवर त्याला सतत भीती वाटायची आपली आई मेली तर?
या नैराश्याच्या घेऱ्यात अडकल्यावर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं. तो दारु पिऊ लागला. यामुळं त्याची सहकलाकार काॅमेडीयन जेनी मेकार्थी सोबत त्याचा ब्रेक अप झाला.
त्याच्या गाजलेल्या भूमिका म्हणजे एस व्हेंच्युरा द पेट डिटेक्टीव्ह, द मास्क! पण नैराश्याच्या घेऱ्यात अडकलेला जिम अत्यंत रागीट होता.
लहानपणी खूप बालसुलभ इच्छा मारुन जगावं लागलं, कामाची जबाबदारी परिस्थितीमुळे फार लहान वयात खांद्यावर पडली तर याचा हा परिणाम होता.
पण जिमला यातून बाहेर पडण्यासाठी एकच झटका बसला..त्याची मैत्रीण कॅथरीना व्हाईट याच नैराश्याच्या गोळ्यांचा ओव्हरडोस होऊन मेली!
जिमचे डोळे खाडदिशी उघडले आणि त्यानं ठरवलं आता ही औषधं घेणं नाही.. आता आपणच यातून बाहेर पडायचं. आणि हळूहळू ड्रग्ज, दारु अगदी काॅफी पिणंही बंद केलं त्यानं.
आणि निव्वळ मनःशक्तीवर जिम नैराश्य आणि व्यसनातून बाहेर पडला.
त्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.