भारतात ‘रॅपिड कोरोना टेस्ट’ नाही झाल्या तर आपल्याला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
Covid-19 कोरोना फॅमिलीतील विषाणू. आज सगळ्या जगावर याची गडद छाया आहे. आता भारतात देखील त्याचे पेशंट वाढलेले आहेत.
आणि आता तर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे याचं कारण म्हणजे कोरोना पॉझिटिव पेशंट वाढताहेत.
आता तर १५ मे पर्यंत मुंबईतील कोरून पॉझिटिव्ह साडेसहा लाख होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय, यावरूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.
त्याच्यासाठी सध्या असे म्हटले जाते की भारतात अधिकाधिक टेस्ट लवकर केल्यामुळे एकूण किती रुग्ण आहेत याची संख्या कळेल आणि कोरोनाचा फैलाव रोखता येईल.
कारण आता जर सध्याच्या परिस्थितीत कोरोना तिसऱ्या स्टेजला गेला आणि कम्युनिटी स्प्रेड सुरू झाला तर भारतात परिस्थिती भयंकर गंभीर बनेल.
कारण आपली वैद्यकीय व्यवस्था इतक्या सगळ्या रुग्णांना तपासू शकेल इतकी सक्षम नाहीये.
भारताची लोकसंख्या सध्या १३० कोटीच्या घरात आहे. पण झालेल्या टेस्ट या फक्त दिडलाखांच्या आसपास असतील. त्यापैकी २२००० रुग्ण हे कोरोना ग्रस्त आहेत.
आणि मृतांचा आकडा हा ७०० च्या घरात आहे. आणि ही परिस्थिती केवळ एका महिन्यात आलेली आहे.
म्हणूनच लवकर टेस्ट होणे का जरुरीचं आहे याची कल्पना येते. ज्या टेस्ट झाल्या आहेत त्यापैकी १००००० टेस्ट या महाराष्ट्रात झाल्या आहेत, म्हणून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येतात.
सरकार सध्या कोरोनाच्या रॅपिड टेस्ट करण्याचा विचार करत आहे तसेच कृतीदेखील करताना दिसत आहे.
परंतु या टेस्ट करण्यासाठी लागणाऱ्या किट्स ची संख्या सध्या खूपच कमी आहे.
चीनवरून जे किट्स मागवण्यात आले होते, ते किट वापरताना असं लक्षात आलं आहे की त्यातून येणारे रिझल्ट हे चुकीचे येत आहेत, त्यामध्ये तफावत येत आहे.
पहिल्यांदा राजस्थानमधून याविषयी तक्रार आली. त्यानंतर इतर राज्यांनी देखील या किटच्या येणाऱ्या रिझल्ट बद्दल शंका उपस्थित केल्या.
म्हणून सरकारने सध्या या किटवर कोरोना चाचण्या करण्यास बंदी घातली आहे. आधी या किटच्या चाचण्या करूनच मग पेशंटच्या चाचण्या करण्यात येतील.
सध्या भारतात दोन लॅब अशा आहेत की ज्यात एका दिवसाला चौदाशे टेस्ट करता येतात. यावरून हेही लक्षात येईल की टेस्ट करण्यासाठी देखील यंत्रणा उभारावी लागणार आहे.
सगळ्या छोट्या लॅबना टेस्ट करण्याची परवानगी देऊन खात्रीलायक रिझल्ट कसे मिळतील हे देखील आता पाहणं गरजेचं झालं आहे.
तरीदेखील लॅबची संख्या वाढवणे, रुग्णांसाठी असणाऱ्या बेडची संख्या वाढवणे, अनेक आशा वर्कर्स, होमगार्ड यांना बेसिक नर्सिंग ट्रेनिंग देणे,
याबरोबरच रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी ठिकाणं शोधणे इत्यादी कामांना आता वेग आला आहे. घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची चौकशी आता केली जात आहे.
भारताने सुरू केलेल्या या प्रयत्नांना आता किती यश मिळेल हे येत्या काही दिवसातच कळेल. कारण भारतात प्रत्येक १०००० रुग्णांमागे केवळ ८ डॉक्टर आहेत.
तर इटली मध्ये ४१ डॉक्टर असून साऊथ कोरियामध्ये ७१ डॉक्टर आहेत. सध्या डॉक्टरांना मिळणाऱ्या PPE किट देखील कमी पडत आहेत.
अनेक हॉस्पिटल्स सध्या रुग्णांनी भरून गेले आहेत. रुग्णांना आता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जात आहे.
विलगीकरण कक्ष, प्रशिक्षित नर्सेस, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर यांची कमतरता जाणवत आहे.
त्यात भर म्हणून नवीन समस्या उद्भवली असून डॉक्टरांना नर्सेसना कोरोनाची लागण होताना दिसत आहे.
भारतात कोरोना पसरण्याचा धोका का आहे?, तर लोकांना साधी सर्दी, पडसे, खोकला, ताप अशा गोष्टी आल्या तर लोक स्वतःच त्यावर उपचार घेतात.
गरज पडल्यास मेडिकल दुकानांमध्ये जाऊन गोळ्या आणतात. तरीही कमी नाही झालं तरच ते डॉक्टरांना दाखवतात.
या सगळ्यात बराच वेळ जातो आणि आजार बळावण्याची भीतीदेखील निर्माण होते.
आता जूनमध्ये मान्सून येईल आणि त्यावेळेस साध्या फ्लूच्या रुग्णांची संख्या देखील वाढलेली असेल त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर नक्कीच प्रचंड ताण येणार आहे.
जर आताच्याच रेटने रुग्ण वाढत राहिले तर जून-जुलैमध्ये देखील परिस्थिती गंभीर राहील अशी भीती निती आयोगाचे आरोग्य विषयक सल्लागार डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार जर “तीन मे नंतर लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणली तर सध्या कोरोना रुग्णांचा जो ग्राफ फ्लॅट दिसतोय,
किंवा अचानक मोठी वाढ झालेलं दाखवत नाही ते कदाचित लोक परत एकत्र आल्याने अचानक वर जाईल आणि covid-19 च्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढेल.”
जागतिक आरोग्य संघटनेला देखील हीच भीती वाटत आहे.
सध्या लॉकडाउन संचारबंदी इत्यादी गोष्टी करून कोरोनाचं संक्रमण होण्यापासून जे प्रयत्न केले गेलेत या प्रयत्नांवर सरकारला आता पाणी फिरू द्यायचं नाहीये.
यासाठीच पुढेदेखील काही नियम असेच ठेवावे लागणार आहेत. नाहीतर इटली, स्पेन, अमेरिका या सारखीच भारताची अवस्था होऊ शकते.
भारत हा कोरोनाचं नवीन हॉटस्पॉट बनू शकतो आणि तेच टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून होताना दिसत आहे.
भारतातली काही काही राज्य आता कोरोनामुक्त झाली आहेत ज्यात गोवा आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.
तर केरळमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यात तिथल्या सरकारला यश आलं आहे.
आरोग्याच्या बाबतीत देखील आता सरकारने प्रयत्न चालू केले आहेत. covid-19 वर लस शोधण्यासाठी देखील युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
प्लाजमा थेरेपी चालू करण्याचा देखील आता विचार होत आहे.
आयसीएमआर च्या परवानगीने प्लाजमा थेरपी चालू होऊ शकेल,तसेच देशांतर्गत बनणाऱ्या व्हेंटिलेटर ची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे.
याशिवाय कोरोना रुग्णांवर हैड्रॉक्सीक्लोरोक्वीन, अँटी एच आय व्ही तसेच अँटी इबोला औषध रेनडेसीविर यांचादेखील कोरोना रुग्णांच्या उपचारात वापर करून पाहिला जात आहे.
भारताला साथींच्या आजाराचं तसं नवल नाही. अनेक साथींच्या आजारांना भारताने आत्तापर्यंत तोंड दिलेलं आहे.
१९१८ मध्ये आलेल्या फ्लूच्या साथीने देखील अनेक जणांचे प्राण घेतले. याशिवाय १९९० मध्ये आलेल्या एच आय व्ही एड्स ने देखील अनेक रुग्णांना ग्रासले, त्यातही अनेकांचे मृत्यू झाले.
नंतर आलेल्या सार्स मध्ये सुद्धा काही मृत्यू भारतात झालेले. स्वाइन-फ्लूने पण अनेक लोकांचे जीव घेतले आहेत.
आता आलेला कोरोना हा सगळ्यात भयंकर असून तो एका माणसापासून दुसर्याला होण्याचे चान्सेस यामध्ये खूप आहेत.
म्हणूनच यावेळाचं संकट हे खूप मोठं असून त्याला आता भारत कसा तोंड देतोय याकडे संपूर्ण जगाचे देखील लक्ष लागून राहिलं आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.