जगाला वेठीस धरणा-या या संसर्गजन्य रोगाला “COVID-19” हे नाव मिळण्याची प्रक्रिया नक्की वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
नावात काय आहे असं शेक्सपियरने मी म्हटलं आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीची ओळख ही नावानेच असते. गावाची ओळख, ठिकाणांची ओळख, देशांची ओळख ही नावानेच असते.
म्हणजे कुठलंही नाव असल्याशिवाय ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येत नाही.
स्वतःच्या सोयीकरिताच माणसाने आपल्या प्रत्येक गोष्टीला नाव ठेवले, अगदी माणसाला होणाऱ्या आजारांना देखील.
म्हणजे ठराविक लक्षणं दिसली तर त्या आजाराला एक विशिष्ट नाव असतं. उदा: मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब, कावीळ. इत्यादी.
आतादेखील जगभरात एका आजाराने धुमाकूळ घातला आहे आणि तो म्हणजे कोरोना व्हायरस. याचं नाव जागतिक आरोग्य संघटनेकडून COVID-19 असं ठेवण्यात आलं आहे.
प्रश्न पडतोय की, WHO अशी नाव कसं ठरवत असेल? किंवा कुठल्या निकषांवर ह्या आजाराला असं नाव दिलं असेल.
२०१५ या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या नवीन आजाराला कोणते नाव द्यायचे याचे काही निकष ठरवले.
त्यानुसार, कुठल्याही प्रदेशाचं, देशाचं, ठिकाणाचं, प्राण्याचं, पक्ष्याचं, एखाद्या विशिष्ट लोकसंख्येचं, उद्योगधंद्यांच, कुठलंही नाव एखाद्या नवीन आजाराला द्यायचं नाही असे नियम लावले.
कारण त्यामुळे त्या प्रदेशाची, व्यक्तींची बदनामी होते आणि त्या लोकांकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन संपूर्ण बदलतो. आणि त्यांना हीन वागणूक दिली जाते.
त्या ठिकाणाबद्दल, प्रदेशाबद्दल एक नकारात्मकता संपूर्ण जगात निर्माण होते. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या देशातील कुठल्याही गोष्टी इतर देश घ्यायला घाबरतात.
त्यामुळे तिथल्या व्यापारावर या गोष्टीचा परिणाम होतो. एखादा प्रदेश जर कुठल्याही आजाराने बाधित झाला तर, त्या ठिकाणीचा पर्यटन क्षेत्रालाही त्यामुळे धोका निर्माण होतो.
बराच काळ लोक मग त्या प्रदेशात जायला घाबरतात. ही गोष्ट टाळण्यासाठी नवीन आजारांना वरील निकष ठरवूनचं नाव द्यायचं असं ठरलं.
आणि सध्याच्या सोशल मीडियामुळे अशा आजारांची माहिती संपूर्ण जगभर जाते, आणि मग त्यातून काही काही नको असलेल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.
असं करण्याचं कारण म्हणजे जेव्हा २००८ मध्ये स्वाइन फ्लू आला, ज्याचं नाव नंतरुन H1N1 करण्यात आलं, त्यावेळेस इजिप्तमध्ये अशी घटना घडली की तिथल्या डुकरांची सामुहिक कत्तल तिथल्या सरकारने कडून करण्यात आली.
सध्या देखील भारतातल्या चिकन मार्केटवर COVID-19 मुळे याचा प्रभाव दिसून येत आहे.
अशा घटना टाळण्यासाठी म्हणून मग जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक अन्न संघटना, जागतिक अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या सगळ्यांनी मिळून म्हणूनच असे ठरवलं की,
एखादा नवीन आजार आला आणि त्याची लक्षणे जर पूर्वीच्याच एखाद्या आजाराची असतील, तर त्या आजाराला नवीन नाव द्यायचं. जे सामान्य लोक वापरत नाहीत आणि त्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याबाबत योग्य काळजी घेतील.
खालील निकषानुसार मग अशा आजारांचे नाव ठेवले गेले-
आजार संसर्गजन्य असला पाहिजे, त्याची ठळक लक्षणे दिसली पाहिजेत. पूर्वी हा आजार कुठल्याही मनुष्यप्राण्याला झालेला नसला पाहिजे. संपूर्ण मानवजातीवर त्याचा परिणाम होत असेल तर अशा आजाराला नवीन नाव देण्यात येईल.
एक असा शब्द जो आजाराची लक्षणे दाखवील. म्हणजे श्वसनसंस्थेचे आजार, हिपॅटायटीस, डायरिया, न्यूरोलॉजिकल सिंड्रोम.
एखादा विशिष्ट शब्द ज्यामध्ये आजाराची तीव्रता कीती असेल म्हणजे जास्त किंवा कमी ते सांगितलं जाईल, त्याचा परिणाम काय असेल आणि कालावधी किती असेल. पर्यावरण यांचा समावेश असेल.
आजाराला कारणीभूत असलेला एखादा घटक.
कोणत्या वर्षी तो आजार आला.
कोणत्याही आजाराचे नाव हे छोटं ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ H7N9, रेबीज, मलेरिया, पोलिओ
WHO नुसार COVID-19 हे नाव म्हणजे त्यातील-
COVI — कोरोना व्हायरस
D — डिसीज
19 — 2019 यावर्षी नवीन पहिला रुग्ण आढळून आला.
निकषानुसार आजाराच नावे हे छोटं आणि सर्वांना घ्यायला सोपं असावं असंही ठरलं.
आताच्या कोरोना व्हायरसला जे COVID-19 हे नाव आहे ते ११ फेब्रुवारी २०२० या दिवशी WHO कडून अधिकृत करण्यात आले.
याआधी कुठल्याही आजाराला वेगळ्या पद्धतीने नाव दिले जायचे. तिथल्या प्रदेशावरून नाव दिलं जायचं जसं की स्पॅनिश फ्लू, बॉम्बे प्लेग, अथेन्स प्लेग.
दुसरा म्हणजे काही आजारांना माणसांवरून नाव दिलं जायचं. म्हणजे ज्या माणसाने एखादा आजार शोधला त्याच्या नावाने त्या आजाराला नाव दिले. उदाहरणार्थ, चागास डिसीज.
प्राण्यांपासून पक्ष्यांपासून होणाऱ्या आजारांना त्या प्राणी किंवा पक्षाचं नाव दिलं जायचं उदाहरणार्थ, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू
कधीकधी प्रदेशावरून संस्कृती वरून लोकसंख्या उद्योग धंदे यांच्यावरून देखील काही आजारांना नावे दिली गेली.
परंतु यातून त्या प्रदेशाचं त्या माणसाची बदनामी होते, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्षात आलं. म्हणून प्रदेश आणि माणसं यांची नावं कुठल्याही नवीन आजाराला द्यायची नाही असं ठरलं.
तीच गोष्ट प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या बाबतीत झाली. एखादा आजार जर त्यांच्यापासून आला तर लोक या प्राणी किंवा पक्ष्यांना मारून टाकायला लागले.
त्यांच्यावर उपजीविका असणारे लोक देखील मग यामध्ये भरडले जाऊ लागले म्हणून त्यांचंही नाव कुठल्याही आजाराला द्यायचं नाही असं ठरलं.
त्याचबरोबर कुठल्याही आजाराला ‘प्राणघातक’, ‘महामारी’ असं म्हणायचं नाही असं ठरलं. कारण असे शब्द वापरले तर माणसाच्या मनात भीती निर्माण होते आणि त्यामुळे संपूर्ण समाजात गोंधळ माजतो.
समजा एखादी साथ आली आणि लोकांना असा एखादा आजार झाला तर लोक त्यांची काळजी घेणार नाहीत, त्यांना वाळीत टाकल्यासारखे केले जाईल.
ते टाळण्याकरीता सिव्हियर डिसीज किंवा तीव्र पसरणारे आजार असं एखाद्या नवीन आजाराबाबत म्हणायचं ठरलं. तर नोवल म्हणजे आधीच्याच आजाराचा पुढचा प्रकार.
तारीख आणि वर्ष हे जर आजाराचं नाव ठेवताना वापरलं तर त्याच प्रकारचा आजार कोण कोणत्या वर्षी आला हे पाहणं आणि त्याचा अभ्यास करणे सोपे जाईल म्हणून त्या दृष्टिकोनातून नाव ठेवण्यात येतं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.