“प्रिय जॉन बेली..” : ‘ऑस्कर’च्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र मराठीबद्दलचा अभिमान शतगुणित करतं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखिका : नीलिमा देशपांडे
एक फोन आला..
ऑस्करचे प्रेसिडेंट जॉन बेली मुंबईला येत आहेत- कार्यक्रमाला ये ,तुला आवडेल
आवडेल म्हणजे काय अर्थात !!!
चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्करच्या प्रेसिडेंटची भेट, छोटीशी पण ब्येष्ट !!
एक छानसं पत्र मी त्यांच्यासाठी लिहून घेतलं होतं, हे अमेरिकन्स इतके साधे आणि सरळ असतात ना – मी माझी ओळख करून दिली पत्र दिले, तर आपल्या कोटाच्या आत ते पत्र ठेवत ‘वाचतो’ असं गोड हसून म्हणाले.
नंतर Interaction चा कार्यक्रम होता, चिऊने ( नीलिमा यांची मुलगी) त्यांना एक प्रश्न विचारला. एकूणच तिच्या आणि सगळ्यांच्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळी आणि जराही घाई न करता उत्तर दिली.
खरे आभार महाराष्ट्र शासन – सांस्कृतिक विभाग आणि मा. विनोदजी तावडे यांचे.
भारतात,पहिल्यांदा ते ही मराठी मातीत ऑस्करच्या प्रेसिडन्टना बोलावून त्यांच्या अभ्यासाचा, अनुभवाचा आपल्या फिल्म इस्टिट्यूटच्या मुलांना उपयोग व्हावा यासाठी हा वेगळा उपक्रम राबवला.
धन्यवाद.
त्यांना लिहिलेले पत्र जे मूळ इंग्लिश मध्ये आहे, हा त्याचा मराठी अनुवाद आहे.
====
||श्री||
प्रिय जॉन ,
वैश्विकीकरणाच्या या काळात ‘मायन्यात’ तुम्हांला प्रिय लिहिण्याइतके आम्ही आता सरावलो आहोत.सगळ्यांत आधी तुमचे
‘इये मराठीचिये नगरी’ स्वागत !!!
ऑस्कर म्हंटल की चित्रपटसृष्टीचा अत्युच्च सन्मान हे समीकरण संपूर्ण जगाच्या माहितीचे आहे. आता लवकरचं सुवर्णमहोत्सवी वर्षांत आपण पदार्पण करत आहात… शुभेच्छा !!
मराठीच्या दृष्टीने बोलायचे तर भारतीय चित्रपट आणि मराठीचे नाते आई-मुलाचे आहे. एका मराठी माणसाने भारतातील चित्रपट सृष्टीला जन्म दिला,इतकेच नव्हे तर अभिमानाने सांगावेसे वाटते माझ्या गावाने – कोल्हापूरने – मराठी चित्रपट वाढवला ,त्याची जोपासना केली.
उत्तम संगोपन करत दर्जेदार कथा,उत्तम अभिनय करणारे दिग्गज आणि अत्युत्कृष्ट नेपथ्य, कर्णमधुर संगीत कशाचीच उणीव शिल्लक ठेवली नाही, कोल्हापूरने.
मराठी माणसाला नाटकाची,संगीताची आवड होतीच त्याचे बदलते स्वरूप म्हणून येणारे चित्रपट त्यांनी आपला मानांकन दर्जा राखत आपलेसे केले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.इथे लौकिकापेक्षा पारलौकिकाचा विचारचं अधिक.शेतीवाडी ,कामधाम सांभाळून झाल्यावर नाट्यशास्त्राचे प्रणेते ‘भरतमुनी’ म्हणतात तसे श्रमपरिहारासाठी ,आनंदासाठी या कथा-कहाण्यांचा ,अभिनयाचा आधार घेतला जायचा.
जॉन, आमच्याकडे पावसाच्या काळात शेतीची काम संपली की रिकाम्या झालेल्या लोकांसाठी ‘सप्ताह’ चालायचे,आजही असतात.
सप्ताह म्हणजे एखादी मिथक कथा ,पारंपारिक कथा सात दिवस क्रमश: वाचली जाते. यात धार्मिक कथा असल्यातरी त्याचे सार हे मनोरंजनातून प्रबोधन करणारे असायचे.
इथे कायिक अभिनय नसून, वाचिक अभिनय असतो.सगळा शब्दांचा खेळ.शब्दांच्या जादूने ते कथेतले विश्व समजून घेताना लोक रमून जायचे. आनंद घ्यायचे. आणखी एक असाच प्रकार असतो तो धान्याची कापणी झाली की नाच-गाणी वगैरे.
असे कार्यक्रम कमी-अधिक फरकाने महाराष्ट्रभर व्हायचे,आजही होतात, त्यामुळे मराठी माणसाच्या रक्तातचं अभिनयाची आवड,कलेची जाण मुरलेली आहे.
यातूनच जन्माला आले अयोध्येचा राजा ,संत तुकाराम यासारखे चित्रपट.
कालामानानुसार मराठी माणूस शेतीच्या पलीकडे जाऊन आणखी वेगळी कामे करू लागला तरी कलेचा वारसा त्याने सोडला नाही. त्याने तो जपला, वाढवला.
मुळात ‘हे विश्वचि माझे घर’ या उक्तीला प्रमाण मानणाऱ्या मराठी माणसाने आपल्या कलेला मर्यादेत बांधून ठेवले नाही.तरीसुद्धा, व्यापारउदिमाची वृत्ती नसल्याने त्यामागील अर्थकारण त्याला कळले नाही आणि काही प्रमाणात याचा परिणाम चित्रपटाच्या दर्जावर झाला.
सध्या मराठी चित्रपट सृष्टीत चांगले, अर्थगर्भ विषय घेवून चित्रपट करणारे काही मोजके लोक आहेत.
पण,त्यांची अडचण आर्थिक आहे. कलात्मक आणि सामाजिक किंवा हटके प्रयोग करण्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य आणि त्याच्या परताव्याची हमी दोन्ही बाजूंनी आम्ही कात्रीत सापडलो आहोत.
वरती मी सप्ताहाबद्द्ल म्हणाले ना –
ते दरवर्षी असतात –
‘तेच ते तसेच वर्षानुवर्षे’ –
का माहितीय ?
कथा तीच असली तरी आपण वर्षभराने बदललेले असतो,आपले जगण्याचे संदर्भ बदलेले असतात आणि त्यामुळे आपण त्याच कथेतून दरवेळी नवीन काही शिकतो.
मला चित्रपटाच्या बाबतीत नेमके हेच म्हणायचे आहे. आपले चित्रपट मनोरंजनासाठी असले तरी त्यातून तयार होणारा विचार हा माणसाला मार्गदर्शक ठरला तर, पुढच्या पिढीला आपण आपल्याला माहित असणारे ज्ञान सोपवल्याचा आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद आपल्याला मिळेल.
मला नेहमी वाटते, वैश्विकीकरण हा शब्द आपण अलीकडे वापरू लागलो असलो तरी,तो आधी पासून अस्तित्वात आहे. जर असे नसते तर,अनेक वेगवेगळ्या धर्मानी सांगितलेली मानवतेची तत्व एकसारखी कशी असती?
संपूर्ण जगात मानवाच्या समस्या आणि आनंद जवळपास सारखेच कसे असले असते? ‘आपण एक आहोत’ फक्त प्रदेशानुसार आपल्या राहण्या-वागण्यात असणारे फरक आपल्यात भिंत निर्माण करू शकत नाहीत.
उपनिषदात एक संस्कृत वचन आहे
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
आपण सगळेच मोठ्या मनाने जगू या, आनंद देऊ या ,घेऊ या !!
माझ्या भाषेत ज्ञानाचे मोठे भांडार आहे, थोडी आर्थिक मदत मिळाली तर त्याचे चित्रपट स्वरुपात रुपांतर करून ते जगभर पोहोचवता येणे शक्य आहे.
मूळ गोष्टी कालातीत असतात.बदलतात ते संदर्भ.विशेष अभिमानाची बाब सांगायची राहून गेली ती म्हणजे अशा सप्ताहांचे, आख्यानांचे जन्मदाते ‘कवी श्रीधर’ – ज्यांनी रामायण,महाभारत रसाळ मराठीत आणले आणि सर्वसामान्यांना त्याचा लाभ घडवला; त्यांची मी वंशज आहे.
आणि म्हणूनचं एक लेखिका म्हणून लेखन करताना मी हा वारसा न विसरता भान बाळगून लिहिते. जगाच्या या पटलावर मी एक अतिशय लहान लेखिका आहे.
माझा विचारही कदाचित लहान असेल परंतु,मला खात्री आहे हा माझा असणारा विचार मी
‘ करतलामल ‘ (तळहातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा, म्हणून सर्व बाजुंनी दिसणारा) या संज्ञेवर तपासलेला आणि जोपासलेला आहे.आणि म्हणून तो ‘संयत आणि टिकावू’ आहे.
मला माहित नाही माझ्यावर कुणाचा प्रभाव आहे किंवा नाही ? पण मला अनेक लेखकांनी त्यांच्या अनुभवाच्या-लेखनाच्या विचारांवर पोसले आहे,वाढवले आहे,
आणि पुढे माझा स्वतःचा विचार विकासित होताना मला प्रकर्षाने हे जाणवले की आपल्याकडे असणारे ज्ञान किंवा विचार पुढच्या पिढीकडे सोपवताना आपल्या कोणत्या तरी एकांगी विचाराने त्यांची दिशाभूल तर होणार नाही ना, याची काळजी घेणे हे परमकर्तव्य आहे.
हा महत्त्वाचा विचार लेखनाच्या नाण्याची दुसरी बाजू असलेल्या चित्रपटसृष्टीने अंगिकारला तर जग सुंदर होईल.
मायमराठीचे उद्गाते – ज्यांनी देवभाषेतले ज्ञान सामान्यांसाठी खुले केले ते ज्ञानेश्वर माउली म्हणतात –
‘राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?’
तसे आणि त्या न्यायाने मी हे पत्र लिहिण्याचे धाडस करत आहे.
मला नक्की काय हवे आहे ? असे तुम्हाला वाटले असेल तर –
मला माझ्या कल्पनांना, माझ्या भाषेतल्या सुंदर कथांना-विचारांना , खरं म्हणजे माझ्याच का – कोणत्याही प्रादेशिक भाषेतील अशा विचारला ऑस्करने जगापर्यंत पोहोचायला लागेल ती मदत करावी एवढीच इच्छा आहे.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत्||
ॐ शांतिः
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.