' समाजक्रांतीकारक सावरकर व सप्तशृंखलांपैकी सहावी शृंखला – InMarathi

समाजक्रांतीकारक सावरकर व सप्तशृंखलांपैकी सहावी शृंखला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका : मधुरा कुलकर्णी

===

“राष्ट्रहिताच्या दृष्टीनेसुद्धा सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले, तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही” हे सावरकरांचे परखड मत होते. त्यामुळे समाजातील जातीभेद, वर्णभेद, विषमताच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाच्या आणि हिंदू समाजाच्या शत्रू आहेत हे त्यांनी हेरले. चार वर्णांच्या झालेल्या चार हजार जाती कशा नष्ट कराव्यात याची त्यांना चिंता होती. त्यामुळे जातीभेद नष्ट झालाच पाहिजे, आंतरजातीय विवाह झालेच पाहिजेत यादृष्टीने सावरकरांनी भरीव कार्य केले.

रत्नागिरीतली १९२४ ची स्थिती म्हणजे, “महारांच्या सावलीचा विटाळ” मानला जायचा. महार शिवला तर सचैल म्हणजे नसलेल्या कपड्यांसहीत स्नान करणारे लोक असत. चांभार, महार, भंगी यांची आपसांतही तशीच कडक अस्पृश्यता. कोणी कोणाला शिवणार नाही….. तथाकथित खालच्या जातींची नावे ही ‘शिवी’ म्हणून वापरली जात.

या अशा जातीभेदाने ग्रासून सोडलेल्या भयाण परिस्थितीत सावरकरांनी १९२४ साली समाजक्रांतीची सूत्रे हाती घेतली ‘खाण्याने जात जाते, धर्म बुडतो’ ह्या खुळचट कल्पना आहेत म्हणणारे सावरकर ‘धर्माचे स्थान हृदय आहे, पोट नव्हे’ असे सांगतात. शुद्धी संस्कारात फार तर तुळशी पत्र खायला द्या शेण खाणे ही शिवी आहे असा परखड विचार सावरकरांनी मांडला.

‘रोटीबंदी’ ही सहावी बेडीही तत्काळ तोडली पाहिजे. “ह्या रोटीबंदीमुळेच कोट्यावधी हिंदु लोक, दुष्काळात मिशनऱ्यांच्या हातांनी खाल्लें म्हणून, घरावर गोमांसाचा तुकडा फेकला म्हणून, मुसलमानांनी बळाने दंग्यात, शेकडो लोकांच्या तोंडात अन्न कोंबले म्हणून बाटले ! ते बाटलेच ! त्यांच्यावर (हिंदूंचा) बहिष्कार झाला. वंशपरंपरेने मिळालेल्या हिंदुत्वास ते कोटी कोटी लोक मुकले !! शुद्धिबंदी, सिंधुबंदी ही या रोटीबंदीचींच राक्षसी अपत्ये आहेत” असे सावरकरांचे म्हणणे होते.

सहभोजनात प्रत्येक वर्गानुसार वेगळी पंगत बसत नव्हती. आणि स्वतःचे नाव जाहीर करावयाचे आणि ते वर्तमानपत्रात येणार हे सावरकरांनी निक्षून सांगितले होते.

ही सुरुवात त्यांनी अंदमान पासूनच केली होती.

सप्तशृंखलांपैकी सहावी बेडी म्हणजे रोटीबंदी…

रोटीबंदी तोडण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात सहभोजने घडवून आणली.

रोटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने सावरकरांनी काळाच्या पुढे टाकलेले पाऊल म्हणजे ‘अखिल हिंदू उपहारगृह . पतित पावनाच्या आवारात १ मे १९३३ साली हे उपहारगृह देणगी व उसने पैसे घेऊन उघडले. हे उपहारगृह चालवणाऱ्या दोन तरुणांपैकी एक तरुण महार होता.

महाराष्ट्रातील स्त्रियांचे पाहिले सहभोजन दि. २१ सप्टेंबर १९३१ ला या पतितपावन मंदिरात झाले. ह्या पहिल्या सहभोजनास ७५ स्त्रिया उपस्थित होत्या. यानंतर पाचच वर्षांत, म्हणजे १९३६ च्या गणेशोत्सवातील स्त्रियांच्या सहभोजनातील संख्या ४०० पर्यंत वाढली होती. सावरकरांनी १९३३ ला पतितपावनाच्या आवारात सर्वांना मुक्त असलेले ‘अखिल हिंदू उपहारगृह’ सुरू केले. येथे पुर्वास्पृश्य पदार्थवाटपाचे काम करत व सावरकर त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तीस आधी उपहारगृहात जाऊन चहा पिऊन येण्याची अट घालत. ह्या सहभोजन नि अखिल हिंदूउपहारगृहामुळे रोटीबंदीची बेडी तुटली.

आपल्या सामाजिक चालीरीतींत ही जातिभेदाची पद्धती म्हणजे हिंदुस्थानला मिळालेला महाशाप आहे. शेंड्या-बुडख्यासकट त्याचे उच्चाटन केले पाहिजे हा विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होता.

राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनम् अभ्युत्थानाय हिंदुनामयं पक्ष: प्रवर्तितः

१६ नोव्हेंबर, १९३० : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तथाकथित स्पृश्य-अस्पृश्यांचे रत्नागिरीत पहिले प्रकट सहभोजन केले.

“अस्पृश्यता निवारणाचे किचकट आणि कठीण कार्य मी आयुष्यभर करत आलो. पण या स्वातंत्र्यवीराने रत्नागिरीसारख्या सोवळ्याच्या बालेकिल्ल्यात, सहभोजन, सहपूजन असे व्यवहार प्रकटपणे चालवले आहेत. अवघ्या सात वर्षात या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवली ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांनाच द्यावे..” हे उद्गार आहेत, ‘डिप्रेस्ड क्लासेस ‘मिशन’च्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे…

समाजासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या सावरकरांना विनम्र अभिवादन

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?