‘प्रामाणिकपणा’ची परीक्षा घेणारं एक असं दुकान ज्याला ना दार, ना कुलूप, ना दुकानदार!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मित्रांनो, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नावाची एक संस्था आहे जी जगातील अभिनव, नावीन्यपूर्ण आणि युनिक अशा गोष्टींची नोंद घेवून त्यांचे एक रेकॉर्ड आपल्याकडे जमा करून ठेवते. या मध्ये अनेक गोष्टींचा सहभाग असतो ज्या आजपर्यंत कोणी केल्या नाहीत किंवा पाहिल्या नाहीत.
आता हा विषय काढायचे कारण देखील तसेच युनिक आहे मित्रांनो. गोष्ट अशी आहे की गुजरातच्या ‘छोटा उदयपूर’ मधील ‘केवडी’ गावात असं एक दुकान आहे, ज्याचा दरवाजा गेल्या ३० वर्षांत कधीच बंद झाला नाही.
माल घेतल्यानंतर दुकानदार ग्राहकाकडे पैसेही मागत नाही. एक दुकान अव्याहतपणे सुरू आहे ते ही दिवसरात्र आणि थोडी थोडकी नाही तर तब्बल ३० वर्षे. आहे ना युनिक गोष्ट? दुकानमालक हजर असो वा नसो, दुकान ग्राहकांसाठी कधीच बंद होत नाही.
एवढेच नाही तर दुकानात सामान घेण्यासाठी आलेले ग्राहक स्वत: त्यांना लागणारा माल घेऊन पैसे देऊन निघून जातात. काय कन्सेप्ट आहे हे दुकान सुरू करण्यामागे? काय बेस आहे? या सगळ्यांची उत्तरे आपण या लेखातून शोधायचा प्रयत्न करू.
गुजरातच्या छोटा उदयपुर हा भाग आदिवासी भाग आहे. विकास आणि अगदी मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या या भागात गरजेच्या वस्तु मिळणे तसे अवघड होते. त्यातच बहुतांश जनता ही दारिद्र्य रेषेखाली मोडणारी आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे झाले तर उधारीवर खरेदी असा सगळा मामला आहे.
असे असतांनाही जेव्हा एखादी व्यक्ती फक्त आणि फक्त विश्वासाच्या आधारावर एक दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दुकान सुरू करते, ज्यामधे ग्राहक वस्तु घेतात किंवा खरेदी करतात आणि त्याची किंमत कॅश बॉक्स मध्ये ठेवून जातात.
या दुकानाला कोणताही दरवाजा नाही की ते कुलूप लावून बंद केले जात नाही. तेव्हा त्या व्यक्तीने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
आजच्या युगात जेव्हा लोक आपल्या प्रियजनांवर उघडपणे विश्वास ठेवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत दुकानदार अज्ञात ग्राहकांवर विश्वास ठेवू शकतो का? दुनियादारीची शिकवण देणाऱ्या या दुकानात चक्क दुकानदारच नसतो!
या दुकानाचे मालक सईद भाई हे आहेत, जे खूप आनंदी आणि समाधानी व्यक्ती आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी हे दुकान सुरू केले. सुरुवातीपासूनच हे दुकान विश्वासाच्या जोरावर सुरू असून भविष्यातही असेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सईद भाई यांचे दुकान २४ तास सुरू असते. सईद भाई म्हणतात, “ कोणताही व्यवसाय सुरू करताना एकच नियम महत्वाचा असतो, तो म्हणजे विश्वास! आणि जर मी आजपर्यंत काही चुकीचे केले नसेल तर मी कधीच चूक करणार नाही. या जीवनात मला फक्त देवाची भीती वाटते. माणसांना का घाबरायचे? हाच विचार करून मी हे दुकान अशा पद्धतीने चालवायला सुरुवात केली.”
या दुकानाप्रमाणेच त्यांच्या जीवनाविषयीच्या कल्पनाही अगदी अनोख्या आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावाने हे दुकान प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील एक बोहरा व्यापारी होते . गावकरी त्यांना ‘उभा सेठ’ या नावाने ओळखत होते.
आज तेच आडनाव सईद भाईंसाठी वापरले जाते. त्यांच्या दुकानाला ‘उभा सेठांचे दुकान’ असे म्हणतात. त्यांच्या या दुकानात कोल्ड्रिंक्स, दुधापासून ते किराणा सामानापर्यंत सर्व काही विकत मिळते. याशिवाय पाण्याची टाकी, दरवाजे, फरशी, कट्लरी, हार्डवेअर इत्यादी वस्तू देखील दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.
—
- ८ वर्षाच्या चिमुरड्याने थेट पाठ्यपुस्तकात जागा मिळवली, याची अभिमानास्पद गोष्ट!
- प्रिय तुकाराम मुंढे जी, कृपया सावध असा! प्रमाणिकपणाचा अहंकार फार वाईट असतो!
—
३० वर्षांपासून असेच सुरू आहे. दुकानाचे मालक सईद भाई सांगतात की त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी हे दुकान सुरू केले. ग्राहकांच्या भरवशावर गेल्या ३० वर्षांपासून हे दुकान सुरू असल्याचे ते सांगतात. एवढेच नाही तर दुकानात कोणताही दरवाजा लावला गेलेला नाही आणि त्याला कुलूपही नाही.
याशिवाय, सईद भाई जेव्हाही दुकानात असतात तेव्हा ते ग्राहकांना वस्तू देत नाहीत किंवा त्यांच्याकडून पैसे घेत नाहीत. दुकानात सर्व सामान्य वापराच्या वस्तू उपलब्ध आहेत. त्यांनी सांगितले की, जेव्हा दुकान सुरू केले तेव्हा त्यांनी लोकांना खूप समजावून सांगितले होते की त्यांचे दुकान नेहमी खुले राहील आणि लोकांना आवश्यक ते मिळेल. हे दुकान भरवशावर चालेल. परिणामी आजपर्यंत दुकानात काहीही चुकीचे घडले नाही.
मात्र, चार वर्षांपूर्वी या दुकानात चोरी झाली होती. पण मित्रांनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चोराने पैसे चोरले नाहीत तर बॅटरी चोरली. या चोरीमुळे पोलिसही आले, पण त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. सईद भाईने पोलिसांना सांगितले की कदाचित या चोराला बॅटरीची गरज असावी म्हणून त्याने चोरली असावी.
आजच्या काळात प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात, लोक पैशाच्याच काय पण कोणत्याही बाबतीत आपल्या लोकांवर विश्वास ठेवत नाहीत, अशा ठिकाणी सईद भाई यांचे केवळ विश्वासाच्या आधारावर चालणारे दुकान हे वाळवंटातील ओएसिस सारखेच आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.