' मराठी मंचावरील हिंदी-मराठी कलाकारांमधील भेदभाव डोक्यात तिडीक आणतो… – InMarathi

मराठी मंचावरील हिंदी-मराठी कलाकारांमधील भेदभाव डोक्यात तिडीक आणतो…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मराठी मनोरंजन सृष्टी ही हिंदी किंवा दक्षिणात्य मनोरंजविश्वाच्या तुलनेत जरी लहान असली तरी आता हे चित्र हळू हळू बदलतंय. मराठी सिनेमा, नाटक, मालिका यांचीसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे.

एकंदरच मराठी सिनेमा म्हणजे फक्त आशयघन सिनेमा ही चौकट मोडून आता प्रत्येक क्षेत्रात काहीतरी नवीन प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी टेलिव्हिजन मात्र यात कुठेतरी कमी पडतंय हे प्रकर्षाने जाणवतंय.

सध्या मराठी चॅनल्सवर लागणाऱ्या मालिका ह्या खूप लोकं बघत असली तरी त्यांची खिल्लीच जास्त उडवली जाते. आज मराठी मालिका नित्यनेमाने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग टेलिव्हिजनपासून दूर गेलाय आणि त्या दूर गेलेल्या प्रेक्षकाला पुन्हा जोडण्याचं काम केलं ते “चला हवा येऊ द्या”सारख्या रीयालिटि शोने!

 

chala hava yeu dya inmarathi

 

‘फू बाई फू’ हा कॉमेडी स्किट्सचा प्रयोग यशस्वी झाला आणि मग नंतर त्यातल्याच काही हरहुन्नरी कलाकारांनी एकत्र येऊन ‘चला हवा येऊ द्या’ची सुरुवात केली आणि आज या कार्यक्रमाने हिंदीतल्या ‘द कपिल शर्मा शो’लासुद्धा मागे टाकलं आहे.

सुरुवातीला फक्त लोकांना हसवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर होत होता, नंतर हळू हळू या कार्यक्रमाची रूपरेषा बदलू लागली आणि मनोरंजन सृष्टीतले वेगवेगळे कलाकार त्यांच्या आगामी कलाकृतिचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाची निवड करू लागले.

लोकांनीसुद्धा या कल्पनेला उदंड प्रतिसाद दिला आणि पाहता पाहता ‘चला हवा येऊ द्या’ हा एक ब्रॅंड तयार झाला. खुद्द बॉलिवूडकरांनाही या मंचावर यायचा मोह आवरता आलेला नाही.

 

chala hawa yeu dya 2 IM

 

किंग खान शाहरुख खानपासून जी सुरुवात झाली टी घोडदौड अजूनही सुरूच आहे. पण तुम्हाला माहितीये का सध्याच्या ‘चला हवा येऊ द्या’च्या रुपरेषेवर बरेच प्रेक्षक नाराज आहेत. स्वप्नील जोशीची या शोमध्ये झालेली एंट्री बऱ्याच लोकांना खटकळी असून, या कार्यक्रमात पूर्वीसारखी मजा राहिलेली नाही अशी तक्रार बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर केलेली आहे.

नुकतंच अनिल कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नितू कपूर यांचा ‘जुग जुग जियो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्यांच्या टीमने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली. तो एपिसोड चांगलाच झाला आणि लोकांनाही तो आवडला, पण त्यातली एक गोष्ट लोकांना चांगलीच खटकली.

काही दिवसांपूर्वी मराठीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हे खास एपिसोड ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आयोजित करण्यात आला होता. या एपिसोड दरम्यान स्वप्नील जोशी हा परीक्षकाच्या खुर्चीत बसला होता आणि इतर मान्यवर व्यक्ती या मंचावर होत्या. पण जेव्हा जुग जुग जियोची टीम जेव्हा या मंचावर आली तेव्हा मात्र स्वप्नील जोशी हा त्यांच्याबाजूला मंचावर बसलेला पाहायला मिळाला, आणि हीच गोष्ट लोकांना चांगलीच खटकली आहे!

यावरून सध्या सोशल मीडियावर लोकं त्यांचा राग व्यक्त करतायत. अशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.

chala hawa yeu dya hypocrisy IM
maharashtratimes.com

 

अशोक सराफ यांच्यासारखे दिग्गज कलाकार मंचावर असताना स्वप्नील जोशी यांनी समोरच्या त्या खुर्चीत बसणंच योग्य नाही अशीही काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड कलाकारांना मिळणारी वागणूक आणि मराठी कलाकारांना मिळणारी वागणूक ही खूप लज्जास्पद बाब आहे या शब्दात लोकांनी यावर टीका केली आहे. या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा नीलेश साबळे यांच्यावरसुद्धा लोकांनी टीका केली आहे.

एकंदरच मराठी सिनेसृष्टी ही बऱ्याच बाबतीत हिंदीला फॉलो करते असा आरोप बऱ्याचदा होत असतो, पण आता चला हवा येऊ द्यासारख्या मंचावर मराठी कलाकार आणि बॉलिवूडकर यांना मिळणाऱ्या वागणुकीत होणारा भेदभाव पाहून पुन्हा प्रेक्षक असेच आरोप करत आहेत.

यामागे जरी या कार्यक्रमाच्या निर्मात्यांची भावना तशी नसली तरी “ये पब्लिक है ये सब जानती है” याचा विचार त्यांनी करायलाच हवा. ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने ही गोष्ट नक्कीच मनावर घेऊन सुधारणा करायला हवी नाहीतर त्यांचीही अवस्था इतर मालिकांसारखीच होईल हे नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?