' “शिवसेना आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची!” – InMarathi

“शिवसेना आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या संघर्षाला अखेर परवा अर्धविराम मिळला. एकनाथ शिंदेंच्या रुपात महाराष्ट्राला ३० वे मुख्यमंत्री मिळाले, मात्र ‘ पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ‘ म्हणत राजकारणातील वादळी घडामोडी सुरूच आहेत.

बंडखोर आमदारांना शिवसैनिकांनी गद्दार ठरवलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर शिवसेना नक्की कुणाची? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. यानिमित्ताने एक वेगळा विचार मांडणारी आनंद कुलकर्णी यांची ही पोस्ट खास InMarathiच्या वाचकांसाठी

“ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्या पुत्राला खाली खेचण्याने तुम्हाला पुण्य मिळत असेल तर लखलाभ!” असं शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या फेसबुक live मध्ये म्हणाले.

अनेकांना कालचं live हे ग्रेसफुल, इमोशनल, शालीन, सोज्वळ अजून काय काय असं वाटलं. माझ्यामते ते हतबल झाल्यावर शेवटची sympathy मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारं आणि अत्यंत ओंगळवाणं होतं.

ग्रेस्फुली राजीनामा देणे म्हणजे काय हे जर कुणाला बघायचं असेल तर अटलजींनी १३ दिवसांच्या सरकार नंतर राजीनामा देताना संसदेत केलेलं भाषण पाहावं.

 

uddhav thackeray inmarathi

 

 

इतकी फाईट दिल्यानंतर उद्धव साहेब किमान तसं काहीतरी करतील आणि “माझे शिवसैनिक मुंबईत जोवर येत नाहीत तोवर मी राजीनामा देणार नाही ही माझी भूमिका होती, आता ते आलेत माझ्याविरुद्ध ते मत मांडत आहेत त्यांच्या इच्छेसाठी हा माझा राजीनामा!” असं म्हणून राजीनामा देतील.

इथे तुम्ही नेतृत्व म्हणून महान होता. जर तुम्हाला इतकाच सत्तेचा मोह नव्हता तर मग आमदारांनी बंड केल्या बरोबर का राजीनामा दिला नाही? सगळं संपल्यावर राजीनामा दिला. मग किमान ग्रेस्फुली मान्य तरी करा की मी सरकार वाचवायचे शंभर टक्के प्रयत्न केले, पण नाही जमलं जे अटलजींनी मान्य केलं होतं.

राजीनामा म्हणजे विक्टिम कार्ड खेळणं झालं. त्यानंतर विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा देणं हे म्हणजे विधिमंडळात असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचा अपमान आहे.

जेव्हा सगळ्यात प्रमुखपद तुमच्याकडे असतं, तेव्हा तुम्ही ते स्वीकारता जेव्हा ते जातं तेव्हा त्या सदस्यत्वाची किंमत देखील तुम्हाला नाही. सगळे शिवसैनिक फक्त तुमची चाकरी करायला करायला आहेत का? हा प्रश्न उभा राहतो. मग “सत्तेचा मोह नाही” हे कुठल्या तोंडाने म्हणता तुम्ही!

जिथे सत्ता नाही तिथे तुम्ही थांबुही शकत नाही. आता पक्षात प्रमुखपद तुमच्याकडे आहे म्हणून ठीक उद्या त्या प्रमुखपदालाही कुणी आव्हान दिलं तर तिथंही पक्ष सदस्यत्वचा राजीनामा द्यायला हे मागे पुढे बघणार नाहीत. वर म्हणायचं मला त्या पदाचा मोह नाही! तुमच्यात लढण्याची वृत्ती असेल तर पराभव मान्य करून लढा की… ते जास्त आवडेल… हा पळकुटेपणा झाला. तुम्ही किती सत्तलोलूप आहात हे सांगणं झालं!

“तुम्हाला मतं मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा!” असं अतिशय शालीन व सोज्वळ राजकारणी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या एका संबोधनात परवा बंड केलेल्या आमदारांना उद्देशून म्हणाले आणि बाळासाहेबांना बाप समजून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांची लायकी दाखवली.

उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चामध्ये “शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची!” ही घोषणा ऐकू येत होती. पण मला वाटतं एकनाथ शिंदे यांचं बंड हीच घोषणा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना ऐकवत होतं.

शिवसेनेसारखे परिवारकेंद्री पक्ष हे राजेशाहीचे प्रतिकं आहेत. त्यात शिवसेनेत तर या पक्षप्रमुखाना लोकातून निवडून येण्याचे देखील कष्ट नको असतात. सगळं आयतं हवं असतं. वर लोकाधार असलेल्या लोकांनी यांच्या ऑर्डर निमूटपणे ऐकाव्या अशीही त्यांची इच्छा असते.

या दृष्टीने लोकशाहीला मारक असलेल्या या परिवारवादी संस्कृतीला आव्हान देणारं एकनाथ शिंदे यांचं बंड महत्वाचं आहे (अर्थात त्यांचे चिरंजीव देखील खासदार आहेत हा भाग वेगळा!)!

 

eknath shinde featured IM

 

या सगळ्या घटनाक्रमात शिंदे किंवा त्यांचा गट एकदाही पक्षाविरुद्ध किंवा उद्धव ठाकरे यांच्यविरोधात थेट बोलला नाही. याबाबतीत शिंदे साहेबांना मानलं पाहिजे की दीपक केसरकर सारखा हुशार माणूस त्यांनी हेरून त्याला प्रवक्ता केलं. असं असताना या लोकांना गद्दार म्हणणं हे अगदीच चुकीचं आहे.

आदित्य ठाकरे म्हणतात की एरवी लोक विरोधकातून सत्ताधाऱ्याकडे जातात पण हे सत्तेतून विरोधात चालले आहेत. थोडक्यात जाणारी लोकं genuine आहेत हे आदित्य साहेबच समजून सांगत आहेत. ५४ पैकी ३९ लोकं तुमच्या विरोधात असतील तर काहीतरी त्यांच्यात तथ्य असेलच की हा विचार का होत नाही.

१०-१५ लोकं स्वार्थासाठी फुटले म्हणणं साहजिक आहे. पण ८० टक्के लोक तुमचा विरोध करत असतील तर तुमच्यात दोष आहे. बरं ते फुटले पण नाहीत ते अजूनही दावा करतात, की आम्ही शिवसैनिक आहोत. यातील अनेक लोकांना शिवसेनेने जसं मोठं केलं तसं याच लोकांनी शिवसेना मोठी केली.

जेव्हा ९२ – ९३ च्या दंगलीत ही लोकं केसेस अंगावर घेत होती तडीपारी करून घेत होती तेव्हा शिवसेना प्रमुखांचे पुत्र आणि त्यांचे प्रवक्ते कुठे होते. आदित्य ठाकरेंनी तर या लोकांना बोलू पण नये. कारण त्यांचं वय जेवढं त्याहून अधिक काही लोकांचा शिवसेनेतला अनुभव आहे. अशा लोकांचं म्हणणं टाळून तुम्ही केवळ बाळासाहेबांचे पुत्र आहात आणि नातू आहात म्हणून स्वतःचं घोडं पुढं दामटवत असाल तर लोकांनी तुमचं का ऐकावं?!

कार्यकर्ता हा चळवळीचा प्राण असतो. ज्या चळवळीत कार्यकर्ता डावलला जातो तिची राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस होते आणि राज्यात शिवसेना होते.

केवळ भाजपविरोध म्हणून ज्यांना उद्धव ठाकरे सज्जन, सोज्वळ, गोड, गोंडस अगदी सहा महिन्याच्या लेकरापेक्षाही क्यूट वाटत आहे त्यांच्याबद्दल मला हसू येतं. Emotional अत्याचार करण्याच्याबाबतीत केंद्रात आदरणीय पंतप्रधान आणि राज्यात हे आदरणीय पक्षप्रमुख यांची बराबरी कुणी करू शकत नाही. बरं हीच लोकं जेव्हा मोदी emotionl मारतात तेव्हा हसत असतात. ठाकरे emotionl मारतात तेव्हा ते सज्जन वाटायला लागतात.

मी दाव्याने सांगतो की ठाकरे युतीचे मुख्यमंत्री असते तर यांना मोदी आणि ठाकरे एकच वाटले असते. मोदी साहेबांकडे किमान वक्तृत्वशैली आणि शून्यातून पुढे येण्याचा इतिहास तरी आहे यांच्याकडं तेही नाही. त्यामुळे या वैचारिक आभाळ हेपलणाऱ्या दुटप्पी लोकांवर लिहावं तेवढं थोडं आहे.

यांचा भाजप विरोध इतका आहे की उद्या तालिबान ने भाजपविरुद्ध भूमिका घेतली तर ते तालिबानचा मानवतावादी दृष्टिकोन समजवायला लागतील. ठाकरे साहेब इतके क्यूट असते तर ते पाहिली गोष्ट मुख्यमंत्री झाले नसते आणि झाले तर तब्बल अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस सारख्या धूर्त राजकारणी माणसासमोर टिकले नसते.

तुमचे covid मधले प्रताप पाहून जर तुम्हीच तुमची पाठ थोपटून घेत असाल तर काय बोलणार?! बरं हे आजारी होते. आजारपणाबद्दल सहानुभूती आहे, पण राज्य थांबू शकत नाही तुमच्या आजारपणामुळे! तुम्ही आजारी आहात तर पद सोडा दुसऱ्याला द्या एकवेळ आदित्यला द्या… त्या आजारपणाची सहानुभूती कसली मिळवताय?! लोकांमध्ये न मिसळता राजेशाही पद्धतीने बापाच्या पूर्व पुण्याईवर यांना प्रमुखपद हवं आहे.

 

uddhav thackeray im

 

आजच्या लोकशाहीच्या जमान्यात यांचं प्रमुखपद केवळ शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून का मान्य करावं?! ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचलं अशा लोकांनी त्या पदाची का महत्वाकांक्षा ठेऊ नये?! शिवसेना ही ठाकरे and sons private limited अशी कंपनी असती तर कुणाला देणंघेणं नव्हतं. पण तो भारताच्या राजकारणाला आणि महाराष्ट्राला दिशा देणारा एक पक्ष आहे.

त्याच्या प्रमुख पदावर केवळ बाप संस्थापक आहे म्हणून नाही तर लायक असणारा माणूस बसला पाहिजे. त्यामुळे परिवाराने घेरलेला प्रत्येक पक्ष even लोकशाहीतील प्रत्येक जागेत बंड झाला पाहिजे तो लवकरात लवकर काँग्रेस मध्येही झाला पाहिजे.

कधी भाजप कुठल्या परिवाराच्या घशात गेली तर तिथेही झाला पाहिजे सध्या मोदी एकाधिकारशाहीने वागत असतील तर एखाद्या महत्वकांक्षी माणसाने तिथेही बंड केला पाहिजे. अगदी ठाण्यात श्रीकांत शिंदेला पाडण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याने बंड केला पाहिजे.

“अब राजा का बेटा राजा नही बनेगा… वही बनेगा जो हकदार होगा!”
लेखनसीमा!
– आनंद
( टीप: हे सगळं फडणवीस साहेबांच्या मास्टरस्ट्रोक अगोदर लिहिलं होतं… आता तर शिंदे साहेबांचा विषय अजून खोल आहे! )

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?