‘रमा, तू आयुष्यात आली नसतीस तर…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं असंही हळवं रूप…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पत्र ही गोष्ट आजच्या काळात जवळपास लुप्तच झालेली असली, तरी एक काळ असा होता जेव्हा दूर गेलेल्या आप्तेष्टांचं क्षेमकुशल पत्राद्वारेच करायचं.
लोक अगदी आतुरतेने आपल्या प्रिय व्यक्तींच्या पत्रांची वाट पहायचे. आपल्या भावना जितक्या उत्कटनेने मांडणं शक्य होईल तितक्या उत्कटतेने त्या पत्रांमधून मांडल्या जायच्या. त्यामुळे लोकांच्या आयुष्यात पत्रांना एक खासच स्थान होतं.
प्रियकर-प्रेयसीसाठी आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा तो एकमेव छुपा आणि सोयीचा मार्ग असायचा, पण कधीकाळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेखील आपल्या पत्नीला पत्रं लिहून आपल्या मनातल्या तीव्र भावनांना वाट मोकळी करून दिली होती हे आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आपल्या पत्नीवर असलेलं प्रेम त्यांनी या पत्रातून व्यक्त केलं होतं, पण तरीही गुलाबी भावनांचं प्रेमपत्रं नाही ते! बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला लिहिलेलं हे पत्रं वास्तवदर्शी तरीही उत्कट, आपल्या आयुष्यात आपल्या पत्नीचं स्थान किती मोलाचं आहे हे व्याकुळतेने सांगणारं, आपल्याला लेकाला आपल्याप्रमाणेच अभ्यासाची गोडी लागावी ही कळकळ मांडणारं, रमाबाईंच्याच नाही तर कुणाही सामान्य वाचकाच्या थेट हृदयाला हात घालणारं आहे.
एरव्ही प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी अशी ओळख असलेल्या बाबासाहेबांची एक अतिशय हळवी बाजू या पात्रातून वाचकांसमोर येते. फॉरवर्ड प्रेसच्या एका लेखात या पत्राचा उल्लेख आहे.
—
रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर…
रमा !
कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे.
या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.
दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली.
मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो, तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.
आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा!
आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली.
मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.
रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.
मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.
आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.
मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !
मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.
खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.
माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.
रमा! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती.
अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
सर्वांस कुशल सांग.
कळावे,
तुझा
भीमराव
लंडन
३० डिसेंबर १९३०
लेखक प्रो. यशवंत मनोहर यांच्या ‘रमाई’ या पुस्तकातून साभार.
—
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्वपूर्ण घटना
- “हेच खरे लोकमान्य!” : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे टिळकांच्या मुलाबद्दल गौरवोद्गार!
—
ज्ञानाचं व्रत घेतलेल्या बाबासाहेबांनी आपल्यामागे संसार सांभाळणाऱ्या आपल्या पत्नीच्या मानसिक अवस्थेचा किती सखोलपणे विचार केला होता, आपल्यामागे तिचं काय होतं असेल याचं त्यांना किती तीव्र भान होतं, बाबासाहेबांची देशासमोर एक फारच वेगळी प्रतिमा असताना त्यांच्यातल्या पतीला आणि वडिलांना घराची ओढ लागूनही कसं भावनाविवश होऊन चालणार नव्हतं हे आपल्यापर्यंत त्या पत्रातून खोलवर पोहोचतं.
या असामान्य व्यक्तिमत्त्वापुढे आपण कायमच नतमस्तक होतो, पत्रातले बाबासाहेब पाहून मात्र आपले डोळे पाणावतात.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.