' “हेच खरे लोकमान्य!” : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे टिळकांच्या मुलाबद्दल गौरवोद्गार! – InMarathi

“हेच खरे लोकमान्य!” : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे टिळकांच्या मुलाबद्दल गौरवोद्गार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘जात’ हा आपल्या देशात, राज्यात पसरलेला असा विषाणू आहे जो कायम दोन लोकांमध्ये फूट पाडत आला आहे. प्लेग, कोरोनासारख्या खऱ्या विषाणूंवर विज्ञानाने विजय मिळवला आहे. पण, जात ही अशी संकल्पना आहे ज्यावर आपल्या समाजव्यवस्थेला कधीच तोडगा काढता आलेला नाहीये.

बऱ्याच अंशी याला इंग्रजांचं ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण सुद्धा कारणीभूत आहे. १९४७ मध्ये इंग्रज गेले पण ‘जात’ काही कुठे गेली नाही.

 

british divide and rule IM

 

व्यक्ती महत्वाची, त्याचे विचार महत्वाचे त्याची ‘जात’ नाही. कारण, जन्माने मिळणाऱ्या जातीवर आपलं कोणतंच नियंत्रण नसतं. हे कळायला आपल्या समाजाला अजून किती वर्ष लागतील हा एक प्रश्नच आहे.

जात, धर्म यांचा दाखला देऊन आजच्या प्रगत भारतात सुद्धा निवडणुका जिंकल्या जातात ही वस्तुस्थिती आहे.

स्वातंत्रपूर्व काळात तर ही परिस्थिती अजून भयानक होती. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला दलितांना जेवतांना शेजारी बसू द्यायचं नाही, एखाद्या दलित व्यक्तीने पिण्याचं पाणी मागितलं तर त्याला ग्लास न देता ओंजळीत पाणी प्यायला लावणे, त्यांनी केवळ उच्च घरातील लोकांचं उरलेलं जेवण जेवणे हे सर्व प्रकार त्यावेळी आपल्या भारतात घडायचे.

 

castism 2 IM

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेऊन बडोदा येथे आले तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे शहरात रहायला घर देण्यास कोणी तयार होत नव्हतं. जेवण द्यायला कोणतं भोजनालय तयार होत नव्हतं.

बडोद्याचे राजे सयाजीराव हे सुद्धा ही परिस्थिती बदलण्यास असमर्थ आणि हतबल होते. डॉक्टरांनी तेव्हा मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महाराष्ट्रातील जातीभेद बघून देखील ते नेहमीच अस्वस्थ व्हायचे. परिस्थिती समोर हरण्यापेक्षा त्यावर मात करण्याचा निर्णय घेतला. हाच त्यांच्यात आणि इतर सामान्य लोकांमध्ये फरक होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी केलेलं कार्य हे अतुलनीय आहे. समस्त समाजाची दलितांबद्दल असलेली भावना बदलण्यासाठी उच्चवर्णीय लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणं हे तेव्हा आवश्यक होतं.

या कामाची सुरुवात श्रीधर बळवंत टिळक यांनी केली होती. ‘लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक यांचे ते सर्वात लहान चिरंजीव होते. ‘अस्पृश्यता’ या संकल्पनेला समाजातून मुळासकट उखडून टाकावं हेच श्रीधर यांचे सुद्धा विचार होते.

 

shreedhar tilak IM

 

डॉक्टर बाबाबसाहेब आंबेडकरांच्या विचारांनी, लिखाणाने प्रभावित असलेल्या श्रीधर टिळकांना प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी सुद्धा पाठींबा दिला होता. श्रीधर टिळकांनी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या ‘समता सैनिक दल’ या पक्षाची पुण्यात शाखा सुरू केली होती.

श्रीधर टिळक हे लेखक होते. ‘जनप्रकाश’ आणि ‘विविधवृत्त’ या मासिकांमधून ते नेहमीच जाती व्यवस्थेवर परखड भाष्य करायचे. १९२५ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरांची भेट घेतली होती.

१९२७ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह’ केल्यानंतर श्रीधर टिळक यांच्या मनात त्यांच्याबद्दल अजून आदर वाढला आणि त्यांनी पुण्यातील ‘गायकवाड वाडा’ येथून या संस्थेचा प्रचार करण्यास त्यांनी सुरुवात केली.

 

gaekwad wada IM

 

एकीकडे श्रीधर टिळक आपलं सामाजिक योगदान देत होते आणि दुसरीकडे ‘केसरी ट्रस्ट’ मधील सदस्यांचा त्यांच्याबद्दलचा विरोध वाढत होता. एन सी केळकर आणि केतकर हे श्रीधरपंतांच्या या वागण्याला उघडपणे विरोध करत होते.

लोकमान्य टिळकांचे शिष्य असूनही ही मंडळी आपल्या कर्मठ स्वभावामुळे हे लोक काळानुसार स्वतःला बदलू शकत नव्हते. त्यांनी श्रीधरपंत आणि त्यांचे सख्खे भाऊ रामभाऊ यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यात व्यस्त झाले होते.

‘केसरी’ मधील काही प्रशासकीय चुका शोधून केळकरांनी टिळक बंधूंविरुद्ध कोर्टात देखील धाव घेतली होती. पण, श्रीधरपंत हे आपल्या विचारांवर ठाम राहिले आणि त्यांनी अस्पृश्यतेचा नेहमीच विरोध केला.

समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी त्यांनी सर्वजातीय ‘सहभोजन’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला हजेरी लावतील का? याकडे त्यावेळच्या पुण्याचं लक्ष लागलं होतं.

 

dr. babasaheb ambedkar 3 InMarathi

 

१० मे १९२८ चा ‘सहभोजन’ कार्यक्रमाचा दिवस उजाडला. गायकवाड वाड्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम वेळेवर सुरू झाला. हा कार्यक्रम उधळून लावण्याचे श्रीधर टिळकांच्या विरोधकांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्या संध्याकाळी गायकवाड वाड्याचा वीजपुरवठा खंडित केला.

काही वेळासाठी वातावरणात थोडी अस्वस्थता पसरली होती. पण, श्रीधर टिळकांनी आलेल्या सर्व अतिथींना हे आवाहन केलं की, त्यांनी आपल्या घरून कंदील घेऊन यावेत. सर्वांनी ही विनंती मान्य केली आणि काही क्षणात गायकवाड वाडा पुन्हा प्रकाशमान झाला.

काही क्षणात तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनी श्रीधरपंतांची गळाभेट घेतली. गायकवाड वाड्यात जमलेले सर्वजातीय लोक बघून, त्यांचा उत्साह, भोजनाचं नियोजन बाबासाहेबांना खूप आवडलं.

ते श्रीधरपंतांना आपला मित्र मानायचे. आपल्या मित्राचं कौतुक करतांना बाबासाहेबांनी हे उद्गार काढले होते की, “आपल्या माणसांचा विरोध पत्करून सहभोजनाचा हा कार्यक्रम घडवून आणणारा श्रीधर हाच खरा ‘लोकमान्य’ आहे.” सहभोजनाचा कार्यक्रम त्यानंतर शांततेत पार पडला.

 

sahbhojan IM

 

पुण्याच्या तत्कालीन कर्मठ समाजाला मात्र यातील काहीच पटत नव्हतं. त्यांनी श्रीधरपंतांना प्रखर विरोध केला. ‘केसरी’ ट्रस्टमधून त्यांना काढून टाकण्याचे सतत प्रयत्न होऊ लागले.

श्रीधर टिळक हा वाढता तणाव सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी त्याच महिन्यात २५ मे १९२८ रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

श्रीधर टिळकांनी जगाचा निरोप घेतला होता. पण, त्यांच्या विचारांनी अस्पृश्यते विरुद्ध लोकांना जागरूक केलं होतं.

हजारो वर्षांपासून असलेली समाजाची मानसिकता एका रात्रीतून बदलणं शक्य नव्हतं. पण, श्रीधरपंतांचे विचार, कृती हे येत्या काळात घडू पाहणाऱ्या बदलाची नांदी होती हे नक्की.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?