' सरस्वती नदीचं कोडं : पौराणिक शाप, आधुनिक विज्ञान आणि गूढतेचं वलय – InMarathi

सरस्वती नदीचं कोडं : पौराणिक शाप, आधुनिक विज्ञान आणि गूढतेचं वलय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभरात सगळीकडेच नद्या आहेत, पण भारत आणि नद्या यांच्यातलं नातं निराळंच असल्याचं दिसतं. फक्त भारतातच कितीतरी नद्या आहेत.

बऱ्याचदा नद्यांकडे आपण केवळ पाण्याचा स्रोत म्हणूनच न पाहता नदीला पवित्र मानतो. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा आपल्याला उपयोग होऊ शकत नाही. नद्या, तलाव यांच्या पाण्याचा मात्र उपयोग होतो.

नद्यांना व्यावहारिक आणि पौराणिकदृष्ट्याही महत्त्व आहे. आपल्याकडे नद्यांच्या उगमाविषयी, लुप्त होण्याविषयीच्या बऱ्याच कथा आहेत. त्या किती खऱ्या, किती खोट्या हे जरी आपल्याला खात्रीलायकपणे माहिती नसलं तरी त्या कथा कळल्यावर आपल्याला माहीत नसलेली बरीच माहिती मिळणे आणि मनोरंजनही होणे असे दुहेरी हेतू साध्य होतात.

 

luni river inmarathi

 

नदी म्हटलं, की पटकन आठवणारी नावं म्हणजे ‘गंगा, यमुना, सरस्वती’. आपल्या देशातल्या विविध ठिकाणी पुष्कळ नद्या आहेत. आजही लोक देशातल्या वेगवेगळ्या नद्यांना विविध कारणांसाठी भेटी देतात.

ज्या सरस्वती नदीचं नाव आपण हमखास घेतो ती नदी भारतात  कुठे वाहते? कुणी ती वाहताना पाहिलीये का? वाहताना दिसत नसतानाही ती अस्तित्त्वात आहे हे खरं कसं मानायचं? सरस्वती नदीचा प्रवाह हे आपल्याला अद्याप न उकललेलं गूढ आहे, की ती केवळ एक दंतकथाच आहे? जाणून घेऊ याविषयी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सरस्वती नदीच्या उगमाविषयी :

राजस्थानातील अरवली पर्वतरांगांच्या मध्ये सरस्वती नदीचा उगम झाला. उत्तराखंडमधील बद्रीनाथजवळ ज्या अलंकानदा नदीचा उगम झाला तिची सरस्वती नदी उपनदी असल्याचं म्हटलं जातं.

कच्छच्या रणाला मिळण्यापूर्वी सरस्वती नदी पाटण आणि सिद्धपूर येथून वाहते. बऱ्याच वर्षांपूर्वी ही नदी अस्तित्त्वात होती आणि कालांतराने ती आटली किंवा दिसेनाशी झाली असं म्हटलं जातं.

सरस्वती नदीबद्दल संशोधन काय सांगतं?

 

saraswati river im 1

 

सरस्वती नदी हे मिथक नाही असा संशोधकांना विश्वास आहे. भारताच्या नैऋत्य-पश्चिम भूप्रदेशातून ज्या नद्या बारमाही वाहायचा त्यांच्यापैकी एक ही नदी होती.

‘डाऊनटूअर्थ’च्या वृत्तानुसार, हिमयुगानंतर ज्या भागातून ही नदी वाहायची तिथे मोठाल्या हिमनद्या तयार झाल्या. या हिमनद्यांमुळे राजस्थान आणि कच्छच्या रणांमधल्या बऱ्याच भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली.

मरीन टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीजमुळे हे भाग बुडाले आणि त्यामुळे वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. सरस्वती नदीला तिच्या स्रोतापासून वेगळं करण्यासाठी या टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीज कारणीभूत होत्या असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेच कालांतराने ही नदी कोरडी पडली आणि नाहीशी झाली.

सरस्वती नदीविषयी पौराणिक ग्रंथांमध्ये केलं गेलेलं भाष्य :

 

saraswati river im 2

 

प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये सरस्वती नदीचे सुरुवातीचे उल्लेख आढळतात. वैदिक काळानंतर आलेल्या ग्रंथांमध्येही सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो.

हिंदू धर्माचं पालन करणारे लोक ज्या नद्यांची पूजा करायचे त्यांपैकी एक सरस्वती ही नदी. ‘डाऊनटूअर्थ’च्या २०२२च्या वृत्तात, हरप्पन संस्कृतीच्या काळात ही नदी अस्तित्त्वात होती असा शास्त्रज्ञांना विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

खरंतर, या हरप्पन बांधकामाचे बरेच महत्त्वाचे भाग सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर बांधले गेले होते. अचानक दिसेनाशा झालेल्या आणि हरयाणामध्ये सध्या सिरसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीचा उल्लेख महाभारतातल्या काही मजकूरांमध्ये आढळतो.

भौगोलिक इतिहास आणि पुरातत्त्व शोध राजस्थान कायमच रखरखीत नव्हतं असं सुचवतात. राजस्थान पूर्वी हिरवंगार होतं आणि नदीची मोठी प्रणाली तिथे अस्तित्त्वात होती. यामुळे या क्षेत्राभोवती मोहेंजोदारो आणि हरप्पन संस्कृतीची उभारणी करण्यात आली.

हिंदू पुराणात सरस्वती नदीला असलेलं महत्त्व :

सरस्वती नदी हे सरस्वती देवतेचं प्रकटीकरण आहे. सरस्वती ही ज्ञान, संगीत आणि सर्जनशीलतेची देवता आहे. सरस्वती नदीच्या किनाऱ्याजवळ शंकराच्या मुलांपैकी एक असलेले कार्तिकेय आणि देवी पार्वती यांची देवाच्या सैन्याचे पुढारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती असं बऱ्याच संस्कृत ग्रंथांमध्ये म्हटलंय.

जुलमी क्षत्रियांना मारल्याबद्दल पापक्षालन करण्यासाठी भगवान विष्णूंचा अवतार असलेले देव परशुराम यांनी सरस्वती नदीत स्नान केलं होतं अशी एक आख्यायिका आहे.

महाभारतातील पुरुरवा त्याची होणारी पत्नी उर्वशी हिला सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरच भेटला होता. सरस्वती नदीजवळ केवळ महाभारताचं युद्धच लढलं गेलं नाही तर त्याचं पठणदेखील त्याच्या किनाऱ्याजवळच झालं.

सरस्वती नदीला असलेल्या शापामागची दंतकथा :

 

saraswati river lost im

 

‘रेडीफ.कॉम’च्या एका वृत्तानुसार, संस्कृत धर्मग्रंथांमध्ये सरस्वती नदीला मिळालेल्या शापाची दंतकथा आहे. एकदा व्यास श्रीगणेशाला सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर महाभारत सांगत होते.

आपल्याला आपलं पठण पूर्ण करता यावं म्हणून व्यासांनी सरस्वती नदीला हळू वाहण्याची विनंती केली. मात्र उन्मत्त सरस्वती नदीने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि ती वेगाने वाहत राहिली. तिच्या अशा वागण्यामुळे चिडलेल्या श्रीगणेशाने ‘तू एक दिवस नष्ट होशील’ असा शाप सरस्वतीला दिला.

सरस्वती नदी जमिनीच्या खालून वाहते हे सांगणारी कथा :

‘स्पिकिंग ट्री’च्या एका वृत्तानुसार, पौराणिक कथांनुसार ज्या देवाने हे विश्व निर्माण केलं त्या ब्रह्मदेवाच्या डोक्यातून सरस्वतीने जन्म घेतला. ब्रह्मदेवाने पाहिलेली ती सगळ्यात सुंदर स्त्री होती.

तिच्या सौंदर्याची ब्रह्मदेवाला भुरळ पडली आणि तिला साध्य करावं अशी इच्छा ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण झाली. आपली जी विशेष दखल घेतली जात होती, त्यामुळे सरस्वती खुश नव्हती आणि तिने तिथून पळून जायचा प्रयत्न केला. त्यामुळेच ही नदी जमिनीखालून वाहते असं म्हटलं जातं.

सरस्वती नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठीची हरयाणा सरकारची भूमिका :

२०१५ साली हरयाणाच्या भाजपा सरकारने जिथे ही नदी वाहायची त्या शेतजमिनी खणून काढण्यासाठी ‘सरस्वती कायाकल्प’ नावाची टीम स्थापित केली होती.

७ फूट खोल खणल्यावर त्यांना खरोखरच पाणी सापडलं. या प्रकल्पाची सुरुवात पहिल्यांदा २००३ साली झाली होती. हा प्रकल्प त्यानंतर थांबवला गेला आणि २०१५ साली तो पुन्हा सुरू करण्यात आला.

 

saraswati river im

 

‘डाऊनटूअर्थ’च्या वृत्तानुसार, ही नदी फार लवकर नष्ट झाली असं शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं, पण बऱ्याच भागांमध्ये ही नदी जमिनीखालून वाहते.

हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमधून ही नदी सध्या वाहत असल्याचं समजतं. ही नदी अस्तित्त्वात आहे हे दाखवणारे आणि जैसलमेर क्षेत्राच्या जमिनीखाली असणारे निश्चित पॅटर्न्स दाखवणारे डिजिटल फोटोज अमेरिकन सॅटेलाईट लँडसॅटने शेअर केले आहेत.

दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांविषयी आपण वाचलं, ऐकलं असेल किंवा आपल्या सुदैवाने प्रत्यक्षात पाहीलंही असेल. जगाला, देशाला पाणीटंचाईची समस्या इतकी भेडसावतेय. अशात, एखाद्या नदीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे भयानक आहे.

सरस्वती नदी खरंच अस्तित्त्वात होती का याचा शोध घेतला जाईलच. ती असल्यास ती पुनरुज्जीवित करण्यासाठीही सरकारकडून प्रयत्न केले जावेच. पण भविष्यात बाकी नद्यांची अशी अवस्था होऊ नये आणि त्या खरंच अस्तित्वात होत्या का की केवळ दंतकथाच होत्या असा प्रश्न पडू नये हीच इच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?