' उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर” – InMarathi

उत्तुंग दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व आवाक्यात घेऊ नं शकलेला अधुरा “धर्मवीर”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

मराठी सिनेमाला प्राइम टाइम मिळत नाही ही तक्रार आपण कित्येक वर्षं ऐकत आलो आहोत, पण प्राइम टाइमची फिकीर न करताही पावनखिंड, मी वसंतराव सारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जी कमाल केली ती आपण सगळ्यांनीच पाहिली आहे.

मराठी चित्रपट कात टाकतोय असं म्हणतायत खरं, पण मलातरी तसं काही वाटत नाहीये. सध्या मराठीच नव्हे तर हिंदी फिल्ममेकर्सनादेखील एक फॉर्म्युला मिळाला आहे तो म्हणजे ऐतिहासिक सिनेमा किंवा एखादा बायोपिक. बास हाच फॉर्म्युला वापरुन सध्या सिनेमे आपल्यासमोर सादर केले जात आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या गोष्टीला मी तरी कात टाकणं नक्कीच म्हणणार नाही. कारण जेव्हा तुंबाडसारखं वेगळं आऊट ऑफ द बॉक्स काहीतरी बघायला मिळेल तेव्हाच आपण म्हणू शकू की मराठी सिनेमा कात टाकतो आहे!

नुकताच धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर बेतलेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा पाहण्यात आला आणि वर मांडलेले काही विचार डोक्यात घोळू लागले.

 

dharmveer im 1

 

या लेखातून कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन किंवा विरोध करण्याचा हेतु नाही, शिवाय सामान्य लोकांसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला धक्का लावायचा हेतु तर अजिबात नाही.

महानगरपालिका निवडणूका तोंडावर आल्या असताना हा सिनेमा काढणं आणि त्याचं एवढं जंगी प्रमोशन करणं यामागचा हेतु समजण्याइतके आपण कुणीच दूधखुळे नाही आहोत, आणि यालाच म्हणतात सिनेमाचा किंवा कला साहित्य क्षेत्राचा सॉफ्ट पॉवर म्हणून वापर करणे!

त्यामुळे या सिनेमाच्या हेतुविषयी, त्यातल्या फॅक्टविषयी किंवा आनंद दिघे यांच्या कार्याविषयी अपप्रचार करणं हासुद्धा या लेखाचा हेतु नाही. केवळ सिनेमा म्हणून धर्मवीर कसा वाटला आणि तो प्रत्येकाने बघायलाच हवा का, याविषयीच काही गोष्टी या लेखातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

धर्मवीर मधला एक डायलॉग अत्यंत आवडला तो म्हणजे “राजकारण्यांचं दुःख हा चेष्टेचा विषय असतो!” हा डायलॉग ऐकून खरंच असं वाटलं की निदान भारतात तरी राजकीय व्यक्तिमत्वावर बायोपिक बनवणं आता थांबवलं पाहिजे.

 

political biopic IM

 

कारण त्यांच्यावरचे बायोपिक हे एकतर प्रोपगांडा म्हणूनच बघितले जातात किंवा त्या सिनेमाची खिल्ली उडवली जाते हे काही अंशी खरंसुद्धा आहे. धर्मवीर हा सिनेमा या दोन्ही प्रकारात मोडत नसला तरी या सिनेमाला म्हणावा तसा समतोल साधता आलेला नाहीये.

प्रवीण तरडे यांच्यासारखा एक जबरदस्त लेखक दिग्दर्शक असूनसुद्धा सिनेमा हा बराच तुकड्यातुकड्यांत विखुरलेला वाटतो. मुळात बायोपिक म्हणा किंवा कोणताही सिनेमा म्हणा, मनोरंजन सोडून त्या सिनेमातून आपल्याला काय मिळतं याचा विचार करणं फार आवश्यक आहे.

माझ्या पाहण्यातले भारतात बनलेले उत्कृष्ट बायोपिक म्हणजे एम.एस.धोनी आणि भाग मील्खा भाग. या दोन्ही सिनेमात लेखक दिग्दर्शक यांना जी गोष्ट जमली ती मला नाही वाटत इतर कोणाला जमेल.

कारण बरेचसे बायोपिक काढताना आपल्याइथे त्या व्यक्तीला सिनेमाच्या माध्यमातून दैवत्व प्राप्त करून दिलं जातं. एक माणूस म्हणून त्या व्यक्तिमत्वाकडे आपण कधीच बघत नाही, आणि राजकीय व्यक्तिमत्वाच्या बाबतीत तर ते अजिबात होत नाही.

खरंतर माझ्या पिढीने आनंद दिघे यांना पाहिलेलं नाही, त्यांच्याबद्दलचे किस्से आणि आठवणीच ऐकल्या आहेत. त्यामुळे मला तरी या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या की आम्ही ज्या व्यक्तिविषयी एवढं ऐकून आहोत त्यांचं महान कार्य बघायला मिळेल, त्यावेळची राजकीय परिस्थिति अनुभवता येईल, पण याबाबतीत माझी घोर निराशा झाली.

anand dighe IM

 

आनंद दिघे यांचे सुरुवातीचे दिवस आणि आदिवासी पाड्यात त्यांनी केलेलं कार्य अगदी १५ ते २० मिनिटांत आटोपून नंतर फक्त आणि फक्त त्यांच्या वादग्रस्त करकीर्दीवरच सिनेमाचा पूर्ण फोकस होता.

ज्या पद्धतीने मुळशी पॅटर्न प्रवीण तरडे यांनी बांधला होता त्यामानाने धर्मवीर हा बराच सुमार कथा आणि पटकथा असलेलाच सिनेमा म्हणावा लागेल. अर्थात त्यातही त्यांच्यावर बरीच बंधनं असू शकतात, पण तरी एक कलाकृति म्हणून आनंद दिघे यांच्या कारकिर्दीला हा सिनेमा न्याय देऊ शकत नाही.

कित्येक लोकं आनंद दिघे यांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेऊन पूजायचे, पण ते तसं का करत होते, दिघे साहेबांनी नेमकं काय कामं केली, त्यांच्या दरबारात लोकांच्या समस्या कशा दूर व्हायच्या हे अत्यंत थोडक्यात मांडलं असून, काही ठिकाणी तर फक्त संदर्भ देऊन नमूद करण्यात आलं आहे.

सिनेमातून आपल्या मनावर कायम हे बिंबवण्यात आलंय की आनंद दिघे समजून घ्यायचे असतील तर लोकांमध्ये फिरावं लागेल, पण सिनेमात मात्र दिघे साहेब आणि सर्वसामान्य जनतेचे सबंध कसे होते हे अगदी थोडक्यात आटोपलं आहे.

आजच्या जनरेशनचा एक रिक्षावाला आणि एक पत्रकार महिला यांच्या माध्यमातून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास आपल्यासमोर उलगडतो, पण पटकथेची योग्य मांडणी नसल्याने आपल्या समोर येणारे प्रसंग हे खूप विखुरलेले वाटतात.

 

dharmveer scenes IM

 

शिवाय कायद्याची चौकट मोडून लोकांसाठी एक प्रती न्यायालय चालवणाऱ्या आनंद दिघे यांना खूप फिल्मी पद्धतीने दाखवलंय असंही मला प्रकर्षाने जाणवलं.

सिनेमाच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येक गोष्ट दाखवायलाच हवी का? हा प्रश्नसुद्धा माझ्यासमोर उभा राहिला. कारण सिनेमा ही गोष्ट फक्त मनोरंजन म्हणून पाहणारे लोकं फार कमी आहेत, त्यामुळे आपण सिनेमातून लोकांसमोर काय मांडतोय आणि कसं मांडतोय हेसुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

न्याय मिळवून देण्यासाठी असो किंवा आणखीन कशाहीसाठी असो कायदा हातात घेणारी व्यक्ती ही कधीच योग्य नसते हे आपल्या फिल्ममेकर्सना जोवर निर्भीडपणे मांडता येणार नाही तोवर हे असंच सुरू राहणार.

दिघे साहेबांनी खरंच कायदा आपल्या हातात घेतला होता का? घेतला असेल तर तो कशासाठी घेतला होता? त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिला का? त्यांच्यावर खरच टाडा लागला होता का की लावला होता? या गोष्टींपेक्षा दिघे साहेब साहेब नेमके कसे घडले हे बघण्यात मला जास्त इंटरेस्ट होता, आणि तीच गोष्ट या सिनेमात नसल्याने माझा भ्रमनिरास झाला.

 

anand dighe shivsena inmarathi

 

अर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही. शिवाय सिनेमात मध्येच येणारी गाणी मजा घालवत होती.

बायोपिकमध्ये गाणी असावीत का नाही हा डीबेटचा मुद्दा ठरेल, पण ती गाणी सिनेमातला इंटरेस्ट कमी करणारी नसावीत असं मला वाटतं. बाकी मेक-अप आणि स्पेशल इफेक्टच्या बाबतीतसुद्धा सिनेमा तितका प्रभाव पाडत नाही, अर्थात बजेटची कमतरता असल्याने तेवढी अपेक्षा करणंदेखील चूकच आहे.

शिवाय या बजेटमधला सगळाच भाग प्रसाद ओक यांच्या मेक-अपवर खर्च झाला असेल त्यामुळेच इतर पात्रं त्यांचे मेक-अप आणि प्रोडक्शन कॉस्ट याबाबतीत हात आखडता घ्यावा लागला असावा असा माझा अंदाज आहे.

सिनेमातली एकमेव उत्कृष्ट गोष्ट म्हणजे प्रसाद ओक यांचं कास्टिंग, तरी प्रसाद ओक यांच्या माध्यमातून आपण दिघे साहेब पडद्यावर फक्त ‘बघतो’, ‘अनुभवत’ नाही. दिघे साहेबांच्या चेहेऱ्यावरची आणि खासकरून त्यांच्या डोळ्यातली निरागसता किंवा प्रसन्नता टिपण्यात प्रसाद ओक कमी पडला आहे.

 

prasad oak IM

 

त्याने काम उत्तमच केलंय, दिघे साहेबांची देहबोली, त्यांचे हावभाव, दाढीवरून हात फिरवण्याची, अंगठ्या फिरवण्याची स्टाईल हे सगळं हुबेहूब पकडलं आहे पण तरी काही सीन्समध्ये तो कमी पडलाय हेदेखील तितकंच खरं आहे.

क्षितिज दाते आणि इतर कलाकारांची कामंसुद्धा बरी झाली आहेत, पण त्यांच्या पात्रांच्या लुकवर आणि एकंदर इतर कास्टिंगवर आणखीन मेहनत घेता आली असती.

दिघे यांच्या अपघातानंतर सिंघानिया हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेले राज ठाकरे आणि नारायण राणे या व्यक्तिरेखा बघून मात्र हसू आवरलं नाही. त्या गोष्टी दाखवल्या नसत्या तर कदाचित वेगळा प्रभाव पडला असता असं माझं स्पष्ट मत आहे.

सिनेमातले संवाद मात्र अप्रतिम आहेत आणि याबाबतीत प्रवीण तरडे यांचा हात कुणी धरू शकणार नाही, पण यावेळेस कथा आणि पटकथेच्या बाबतीत मात्र तरडे यांनी निराशा केली आहे.

 

pravin tarde IM

 

खरंतर या सिनेमाच्या माध्यमातून बरंच काही मांडता येऊ शकलं असतं, पण हा सिनेमा कमर्शियल बनवण्याच्या नादात कुठेतरी आपला आत्मा हरवून बसल्यासारखा वाटतो. सिनेमातले काही सीन्स अंगावर येतात खरे पण त्यांचा प्रभाव दीर्घकाळ आपल्यावर राहत नाही.

सिनेमा बघताना आनंद दिघे यांच्याबद्दलचा मनातला आदर नक्कीच वाढतो पण सिनेमातल्या काही चुकीच्या गोष्टी ग्लोरिफाय केल्याने एक सवालसुद्धा मनात निर्माण होतो आणि त्या गोष्टी खरंच दाखवायला हव्या होत्या का असंदेखील वाटतं.

सिनेमा बघताना हा सिनेमा का बघावा? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असेल तर ते योग्य आहे आणि हे असे बायोपिक बघण्याआधी तर तुम्हाला हा प्रश्न पडायलाच पाहिजे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ का बघावा याची कारणं दोनच, एकतर दिघे साहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व, आणि प्रसाद ओक यांचा अभिनयाचा एक उत्तम प्रयत्न, बास इतकंच मी सांगू शकतो!

 

dharmaveer 3 IM

 

आनंद दिघे यांच्या जीवनावर बेतलेला हा सिनेमा म्हणजे अथांग महासागरातला एक थेंबच आहे. दिघे यांचं कार्य अफाट आहे ते आणखीन विस्तृतपणे आणि निष्पक्ष पद्धतीने समोर यावं असं मला वाटतं.

आणि ते जर जमणार नसेल तर मी आधी म्हणलो तसं खरंच निदान भारतात तरी राजकीय व्यक्तिमत्वावर बायोपिक काढणं थांबवलं पाहिजे

मराठी सिनेमा बिझनेस करत नाही असं रडगाणं सध्या कुणी गाऊ शकणार नाही कारण गेले काही महीने मराठी सिनेमांची चांगलीच चलती आहे, पण बायोपिक आणि ऐतिहासिक सिनेमा यांच्या फॉर्म्युलातून बाहेर पडून मराठी सिनेमाने खरोखर कात टाकणं गरजेचं आहे असं प्रकर्षाने वाटतं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?