' देशातच नव्हे, तर कंपनीला जगभरात ‘हिरो’ बनवणाऱ्या व्यक्तीच्या मागे ईडीची पीडा – InMarathi

देशातच नव्हे, तर कंपनीला जगभरात ‘हिरो’ बनवणाऱ्या व्यक्तीच्या मागे ईडीची पीडा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादी व्यक्ती जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचते तेव्हा त्यामागे प्रचंड परिश्रम असतात. शून्यातून वर येऊन देशात, जगात आपलं वेगळं स्थान, आपलं स्वतःचं एम्पायर उभं केलेल्या अनेकांची उदाहरणं आपल्याला माहीत असतात. यशस्वी होण्यापूर्वीचा त्यांचा खडतर प्रवास आपल्याला समजतो तेव्हा आपण भारावून जातो. त्यांची एक छान प्रतिमा आपल्या मनात तयार होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्याला सुपरिचित असलेल्या अशा नावांपैकी काही नावं जेव्हा काही नकारात्मक कारणांमुळे चर्चेत येतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं आणि आपल्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला गालबोट लागतं. अगदी आता आतापर्यंत आपल्यातल्या ‘ईडी’ हे काय प्रकरण आहे हे माहीत नव्हतं. पण मध्यंतरी अनेक मोठमोठ्या मंडळींवर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप झाले आणि अशा आरोपांचा तपास करणाऱ्या ईडी या यंत्रणेविषयी आपल्याला कळलं.

 

ed im

 

ही यंत्रणा अशा आर्थिक अफरातफरी, घोटाळ्यांच्या आरोपाखाली व्यक्तींना अटक करू शकते. संशयास्पद मालमत्ता जप्त करू शकते. ‘हिरो मोटोकॉर्प’चे चेअरमन आणि सीईओ असलेले पवन मुंजाल सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. ‘हिरो मोटोकॉर्प’ला देशातच नाही तर जगभरात ‘हिरो’ बनवणाऱ्या मुंजाल यांच्या मागेही इंडीची पीडा लागलीये. या निमित्ताने, पवन मुंजाल यांच्या यशाचा प्रवास आणि त्यांच्यावर नेमके काय आरोप केले गेलेत याचा थोडक्यात आढावा घेऊ.

‘हिरो होंडा’ची जन्मकथा आणि प्रगतीचा आलेख :

‘हिरो सायकल्स’ आणि ‘हिरो होंडा’ला जगातल्या सर्वात मोठ्या सायकल आणि मोटारसायकल निर्मिती कंपन्यांचा बहुमान मिळवून देणाऱ्या मुंजाल कुटुंबाचा यशाचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. पवन मुंजाल यांचे वडील ‘ब्रिजमोहन लाल मुंजाल’ हे ‘हिरो ग्रुप’चे संस्थापक आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळात दयानंद, सत्यानंद, ब्रिज आणि ओम या मुंजाल बंधूंनी सायकलचा व्यवसाय करायचं ठरवलं. ब्रिजमोहन लाल तेव्हा किशोरवयातून जेमतेम बाहेर पडले होते. या भावांनी लोकांना सायकलचे सुटे भाग पुरवायला सुरुवात केली. पण त्यावेळी त्यांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. ‘मॅनिफॅक्चरिंग लायसन्स’ मिळवणं हे त्यांच्यापुढलं सगळ्यात मोठं आव्हान होतं.

 

cycle featured inmarathi

 

१९७१ साली या मुंजाल बंधूंनी ‘हिरो सायकल्स’करता रिम बनवणाऱ्या विभागाची व्यवस्था केली आणि फ्रीव्हील्स बनवणारी ‘हायवे सायकल्स’ ही दुसरी कंपनी लॉन्च केली. काही वर्षांतच हिरो सायकल्सचं उत्पादन दुप्पटीने वाढलं आणि १९७५ साली ती सायकल निर्मिती करणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी बनली. ८० च्या दशकात, दुचाकी वाहनांच्या दुनियेत ‘हिरो ग्रुप’ आधीपेक्षा मोठा आणि धाडसी ठरला.

हिरो ग्रुपने पहिली मोठी झेप घेतली ती ‘होंडा’ या बड्या जपानी ऑटोमोबाईल एंटरप्राइजशी हातमिळवणी करून. त्यानंतर ‘हिरो होंडा’ उदयाला आली. ह्रितिक रोशन, प्रियांका चोप्रा, वीरेंद्र सेहवाग यांसारखे सेलिब्रिटीज हिरो होंडाचे ब्रँड अँबॅसेडर्स झालेले आहेत.

हिरो होंडाचा जन्म झाला आणि दुचाकी वाहनांच्या इंडस्ट्रीची परिभाषाच बदलून गेली. त्यावेळी ‘बजाज’ कंपनीचं मोठं प्रस्थ होतं. पण हिरो होंडाने हे सगळंच चित्र बदलून टाकलं. १९८५ साली पहिली ‘१०० सीसी हिरो होंडा’ मोटरसायकल आली आणि त्यानंतर हिरो होंडाने मागे वळूनच पाहिलं नाही.

 

hero honda im

तुमच्याविरुद्ध खोटा FIR दाखल झाला तर काय कराल? घाबरण्यापेक्षा हे वाचा…

शेअर मार्केटमधल्या भीतीचा अचूक थर्मामीटर INDIA VIX; समजाऊन सांगतायत नीरज बोरगांवकर

शॉक ऍबसॉर्बर्स बनवण्याच्या हेतूने शोवा या जपानी कंपनीसोबत एकत्र आल्यांनतर ‘मुंजाल शोवा’ अशी नवी कंपनी काढण्यात आली. तीन दशकांच्या अथक परिश्रमांनंतर ‘हिरो सायकल्स’ सायकल निर्मिती करणारी सगळ्यात मोठी कंपनी म्हणून उदयाला आली.

खुद्द ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने याला अनुमोदन दिलं. या सगळ्याचा असा परिणाम झाला की, कंपनीच्या प्रतिस्पर्धी असलेल्या ‘बजाज ऑटो’ सारख्या कंपन्यांना स्कुटरपासून मोटारसायकलपर्यंतच्या आपल्या धोरणात मुळापासून बदल करण्याची आवश्यक्ता वाटली.

१९९० मध्ये हिरो होंडा मोटर्सने आपण विकलेल्या बाईक्सचे प्रत्येकी हजार रुपये मिळवल्यामुळे हिरो होंडा मोटर्सला USD १० मिलियन्सचा वार्षिक फायदा झाला.

आपले वडील ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्यानंतर पवन मुंजाल यांनी हा सगळा कारभार आपल्या हाती घेतला. त्यांनी ‘बजाज ऑटो’ ला मागे टाकलं. १९९३ मध्ये हिरो ग्रुपने लॉन्च केलेला ‘हिरो एक्स्पोर्ट्स’ भारतातील दुचाकी वाहनांचा सगळ्यात मोठा निर्यातदार म्हणून उदयाला आला. ‘आयटी’ आणि ‘आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस’मध्येही पवन मुंजाल यांच्या ‘हिरो ग्रुप’ ने वैविध्य आणलं आणि दहा लाखांपेक्षा जास्त मोटारसायकलची विक्री करणारी ‘हिरो होंडा’ मार्केटमधली प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली.

 

pawan im

 

२००२ साली, उच्च प्रतीच्या सायकल्सची निर्मिती करण्यासाठी ‘मटसुशीला ग्रुप’चा भाग असलेल्या ‘नॅशनल बायसिकल इंडस्ट्रीज’शी हिरो सायकल्स जोडली गेली. ‘स्प्लेंडर’, ‘पॅशन’ आणि ‘पॅशन प्लस’ लाँच करणं हे हिरो होंडाचं आणखी एक यश होतं. २०११ साली ‘होंडा’ शी असलेले आपले संबंध तोडल्यावर मुंजाल यांच्या नेतृत्त्वाखाली ‘हिरो मोटोकॉर्प’चा जगात विस्तार झाला.

‘हिरो मोटोकॉर्प’चा विस्तार आणि पवन मुंजाल यांच्याविषयी :

‘हिरो मोटोकॉर्प’ सलग २० वर्षं दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी ठरली आहे. आतापर्यंत देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात हिरो मोटोकॉर्प’ने १०० मिलियन्सहून अधिक बाईक्सची विक्री केली आहे. पवन मुंजाल यांच्या नेतृत्त्वाखाली हिरो मोटोकॉर्प ही कंपनी आशिया, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि मिडल ईस्टमध्ये असलेल्या तब्बल ४० देशांमध्ये आपली उत्पादनं विकते. ‘

फोर्ब्स’ने दिलेल्या माहितीनुसार, जयपुर आणि जर्मनीतल्या एका केंद्रात कंपनीचं संशोधन केंद्र आहे आणि पवन मुंजाल आणि त्यांच्या कुटुंबाची ३.२ बिलियन डॉलर्स इतकी ‘रिअल टाइम नेट वर्थ’ आहे.

 

hero im

 

कंपनीकडे जागतिक दर्जाच्या ८ उत्पादन सुविधा आहेत. त्यातल्या ६ भारतात आहेत आणि १ कोलंबिया आणि १ बांग्लादेशमध्ये आहे. मुंजाल हे ‘कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (CII) आणि ‘द सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅनिफॅक्चरर्स’ (SIAM) इथे कार्यकारी पदावर आहेत. मुंजाल हे ‘मुंजाल ऍक्मे पॅकेजिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, पॅन मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड, बहादूर चंद इन्वेस्ट्मेन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हिरो इन्व्हेस्ट कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन स्कुल ऑफ बिझनेस, हिरो फ्युचर एनर्जीज ग्लोबल लिमिटेड आणि रॉकमन इंडस्ट्रीज लिमिटेड इथल्या बोर्डावरही आहेत.

घर आणि ऑफिसवर पडलेली ‘ईडी’ची धाड :

‘हिरो मोटोकॉर्प’चे चेअरमन आणि सीईओ असलेल्या पवन मुंजाल यांच्यावर आरोप केला गेलाय की त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये बोगस खर्च दाखवले आहेत. यासंदर्भात, मुंजाल यांच्या घरावर आणि ऑफिसवर ‘इन्कम टॅक्स डिपार्टमेंट’ने रेड टाकली आहे.

पवन मुंजाल आणि आणि कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या बऱ्याच परिसरांवर छापे टाकले जात आहेत.

गुरुग्राम, दिल्ली आणि बाकी शहरांमधल्या परिसरांमध्ये ही कारवाई सुरू आहे. आयकर विभागाच्या टीमला जो संशयास्पद खर्च मिळाला आहे त्यातला काही खर्च इनहाऊस कंपन्यांचाही आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की विभागाच्या अधिकाऱ्यांची एक टीम कंपनी आणि तिच्या प्रमोटर्सच्या आर्थिक मालमत्तेची आणि अन्य व्यावसायिक व्यवहारांची तपासणी करत आहे. हिरो मोटोकॉर्पकडून मात्र या संदर्भात अद्याप काही विधान आलेलं नाही.

आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे. मागच्या एका आठवड्यात कंपनीचे शेअर एका टक्क्याने खाली आले आहेत आणि एका महिन्यात हे शेअर्स ११ टक्क्यांनी खाली आले आहेत.

मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये २३ टक्क्यांनी शेअर्स खाली आले आहेत. या वर्षी आतापर्यंत शेअर्सने ४ टक्क्यांचा ‘निगेटिव्ह रिटर्न’ दिला आहे.

 

share market loss IM

 

फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘हिरो मोटोकॉर्प’ची विक्री २९ टक्क्यांनी झाली. हिरो मोटोकॉर्पने सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या कंपनीने ५,०५,४६७ उत्पादनं विकली होती. मात्र या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या फक्त ३,५८,२५४ उत्पादनांची विक्री झाली.

कंपनीच्या देशी विक्रीतही फेब्रुवारी २०२२ मध्ये ३१.५७ टक्क्यांनी घट झाली आहे. या व्यतिरिक्त हिरो मोटोकॉर्पने गेल्या महिन्यात ३,३८,४५४ मोटारसायकल्स विकल्या. मागच्या वर्षी त्याच महिन्यात कंपनीने ४,६३,७२३ मोटारसायकल्स विकल्या होत्या.

फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीच्या स्कुटर विक्रीत घट होऊन १९,८०० स्कुटर्स विकल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत कंपनीने ४१,७४४ स्कुटर्स विकल्या होत्या. मात्र फेब्रुवारी २०२१ च्या तुलनेत या वर्षीच्या फेब्रुवारीत कंपनीची निर्यात २१,०३४ वरून २६,७९२ इतकी झाली आहे.

अजून कुठली कुठली मोठी नावं या ईडी प्रकरणातून समोर येणार आहेत आणि ईडीने त्यांच्यावर लावलेले आरोप किती खरे-खोटे आहेत हे येणारा काळच ठरवेल. इतक्या मोठ्या आर्थिक उलाढालींमधली अफरातफर नुसती समजून घेणं हे सुद्धा आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचं आहे. त्यामुळे केवळ समोर येणाऱ्या बातम्या पाहण्यापलीकडे आपल्या हातात दुसरं काही नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?